बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!
प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटीने काम केलेल्या मेरी कोम हा चित्रपट खोर्यांने पैसे कमवत असताना किंवा सरितादेवी या महिला बॉक्सिंगपटूच्या अगम्य वागणुकीमुळे माध्यमांना चघळण्यासाठी भरपूर काही मिळत असताना बॉक्सिंग हा खेळच नको अशी भाषा करणार्याला वेड्यात काढण्याची शक्यता जास्त आहे. परंतु ज्या खेळामुळे दूरगामी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे, खेळत असतानाच मृत्यु येण्याची शक्यता आहे अशा खेळातून आनंद घेण्याचा प्रकार म्हणजे एका प्रकारची विकृत मानसिकता असेच म्हणावे लागेल. ग्रीक – रोमन काळात गुलामांचे जीवघेण्या खेळप्रकारातून मनोरंजन करून घेणार्या त्या तथाकथित नागरिक संस्कृतीत व आपल्यात तसा फार फरक नाही असे म्हणावे लागेल. (एके काळी सार्वजनिक ठिकाणी फाशीची शिक्षा देत असताना लोक झुंडी झुंडीने बघण्यासाठी जमत होते.व त्याचा आनंद लुटत होते.) जरी आपल्या देशात अमेरिका, युरोप, कोरिया यासारख्या देशाप्रमाणे बॉक्सिंगचा बोलबाला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी, तुरळक प्रमाणात का होईना, हा खेळ मूळ धरून आहे. त्यामुळे धोक्याचा इशारा या देशालाही लागू आहे.
तुलनेने सॉकर किंवा फुटबॉल हा खेळ कमी धोक्याचे असूनसुद्धा अमेरिकन फुटबॉल लीगच्या स्पर्धेत हेल्मेट, शोल्डर पॅड्सची सक्ती केली जात आहे. प्रत्येक स्पर्धेच्या वेळी एका नसतज्ञाची हजेरीसुद्धा सक्तीचे केले आहे. काऱण खेळताना डोक्याला मार बसल्यास वा खेळाडू कोमात जाण्याची शक्यता असल्यास नसतज्ञ हजर असणे महत्वाचे ठरते. अमेरिकन फुटबॉल खेळाडूंसाठी डोक्याला गंभीर इजा हा ऑक्युपेशनल हॅझार्ड असून नॅशनल फुटबॉल लीगच्या संयोजकांना ती डोकेदुखी ठरत आहे. हजारो माजी खेळाडू लीगवर खटले भरत आहेत. कारण खेळाचे दूरगामी परिणाम माहित असूनसुद्धा खेळाडूंना हा खेळ खेळण्यासाठी उत्तेजन देणे, धोक्याची पूर्व कल्पना न देणे या मुद्द्यावर खटले दाखल केले जात आहेत.
अशाच प्रकारचा धोका बॉक्सिंगच्या खेळातही आहे. येथे तर चेहरा व डोक्यालाच लक्ष्य करत असल्यामुळे धोका कित्येक पटीने वाढतो. मुक्केबाजीतून डोक्याला सातत्याने मार बसत असल्यास Chronic Traumatic Encephalopathy (CTE) ला बळी पडण्याची शक्यता वाढते. यालाच या पूर्वी punch drunk syndrome किंवा मुष्टियोद्ध्यांची अवमनस्कता (dementia) असे म्हणत असतं. डोक्याला सातत्याने होणार्या आघातामुळे खेळाडूंच्या स्मृतीपटलावर परिणाम होऊ शकतो. त्यातून व्यक्तिमत्वात व नेहमीच्या हालचालीत बदल होण्याचा संभव वाढतो. हात पाय क्षीण होऊ लागतात. अशा प्रकारचे दुष्परिणाम अनेक माजी क्रीडापटूंच्यात आढळलेले आहेत व त्या क्रीडापटूंच्यात बॉक्सर्सची संख्या जास्त आहे हे विशेष. 1980 पासूनच या खेळामुळे CTE होऊ शकतो याची पूर्ण कल्पना संबंधितांना आहे. तज्ञांनी केलेल्या चाचणीत नसाचे धागे (nerves fibre) तुटल्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावे सापडले होते. तुटक्या नसामुळे मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याच प्रकारे यातून neuronsमध्ये प्रथिनांची गुंतागुंत होत गेल्यामुळे अल्झायमर रोगाला बळी पडलेल्याची उदाहरणं सापडले आहेत. अल्झायमर होण्यास कारणीभूत ठरणार्या amyloid प्रथिन CTE झालेल्यांच्या मेंदूमध्ये तयार होतो हेही लक्षात आले. डोक्याला वारंवार मुष्टिप्रहार बसल्यामुळे हे होत असावे याची अंधुकशी कल्पना यापूर्वीही होती परंतु नेमके कारण सापडत नव्हते. परंतु आताच्या प्रयोगातून डोक्याला दणका बसत असल्यामुळे हे होऊ शकते, हे स्पष्ट झालेले आहे.
डोक्याला रट्टे बसल्यामुळे अजून एकाप्रकारे इजा होण्याचा संभव वाढतो. अगोदरच चेहर्यावरील मारामुळे चेहर्यावर ओरखडे उमटलेले असतात. भेगा पडलेले असतात. चेहरा विद्रूप झालेला असतो. त्याचबरोबर चेहरा व डोक्यावरील दणक्यामुळे spinal cord आणि midbrain भोवती cerebral cortex वर्तुळाकार फिरतो व त्यातून मेंदूला गंभीर इजा पोचण्याचा धोका वाढतो. बॉक्सिंग ग्लोव्हजने जोरात पंच मारल्यामुळे याचे परिणाम जास्त तीव्रतेने जाणवू लागतात.
मेंदूच्या पेशी फार मृदु असतात. तरीसुद्धा आतील धाग्यातून बनलेल्या रक्तवाहिन्या कणखर असतात. लोण्यातील लोखंडी तार्यासारखी ही रचना असते. जेव्हा डोक्याला मार बसतो तेव्हा रक्तवाहिन्या तुटू लागतात किंवा रक्तवाहिन्यांचे धागे तुटू लागतात. व त्यातून मेंदूत रक्तस्राव होतो. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यास बॉक्सर कोमात जातो किंवा याचे प्रमाण जास्त असल्यास जीव जाण्याचा धोकाही असू शकतो. रक्तवाहिन्यातील धागे तुटत राहण्यामुळे दूरगामी दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते.
ज्यांच्या तारुण्यात अशा प्रकारचा मारा मेंदूवर होत असतो तेव्हा त्यांच्या पुढील आयुष्यातील वर्तनावर त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. निवृत्त झालेले बॉक्सिंग चँपियन्स नशापाणी वा दर्दसारख्या व्यसनांच्या आहारी गेलेली भरपूर उदाहरणं सापडतील. विषण्णतेमुळे ही व्यसनं त्याना चिकटतात. या व्यसनाधीनतेचा संबंध मेंदूतील निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार्या frontal cortex शी असतो. याचा अर्थ सर्व माजी खेळाडूंना CTE होतोच असे नसून CTE रुग्णांचे हे एक महत्वाचे कारण आहे.
यासंबंधीचे उंदिरावर केलेल्या प्रयोगात प्रथिनातील गुंतागुंत न्यूरॉन ते न्यूरॉन असे पसरत पसरत गेल्यामुळे साठत जातो. ही गुंतागुंतच रक्तवाहिन्यांना नीटपणे कार्य करू देत नाही. त्यातूनच CTE होण्याचा संभव वाढतो. यावरून तरुणपणी डोक्याला बसलेला मार नंतरच्या काळात अनेक मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकतो, हा निष्कर्ष काढता येईल. डोक्याला ठोसे बसत गेल्यामुळे आतील मेंदूला इजा, रक्तवाहिन्या तुटणे वा त्यांची गुतांगुत वाढणे व नंतर त्या निकामी होणे असा हा प्रवास असतो.
त्यामुळे क्रीडाप्रकारातील जीवघेण्या इजा कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याकडील ‘गोविंदा’ वा देवाला नवस बोलण्याच्या निमित्ताने 20 - 30 फुटावरून लहान बाळांना झेलणे वा पाय बांधून वर उचलणे इत्यादी प्रकारही ताबडतोब थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल सॉकरच्या खेळातील लेदर चेंडूची जागा प्लास्टिकचा मऊ चेंडू घेत आहे. परंतु फक्त सॉकरच नव्हे तर इतर क्रीडाप्रकारातही मोठ्या प्रमाणात बदल होण्याची गरज आहे. व्यावसायिक बॉक्सर्सप्रमाणे हौशी बॉक्सर्सच्या खेळप्रकारातही डोक्याला मार बसणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डोक्यावर व चेहर्याभोवती हेल्मेटसारखे कितीही दणकट आवरण असले तरीही मेंदूवर होणारे आघात थांबवता येत नाहीत.
काही तज्ञांच्या मते मेंदू हा क्रीडाप्रकाराचा लक्ष्य होता कामा नये. कितीही कडक नियम केले तरी हा धोका टाळता येत नाही. अनुभवी बॉक्सर्सना या धोक्याची जाणीव असूनसुद्धा केव्हा थांबावे हे त्यांना कळत नाही. बॉक्सिंगमुळे मेंदूला इजा पोचतो याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.
अनेक क्रीडाशौकीनांना अशा प्रकारे त्यांच्या आवडत्या क्रीडाप्रकारावर केलेली टीका सहन होणार नाही. कारण या खेळांचे ठेकेदार इतके सुखासुखी त्यांच्या आर्थिक लाभाला हात लावू देणार नाहीत. काही तरी पळवाट शोधून खेळाडूंच्या जिवावर आपली पोळी भाजून घेणार्यांचीच संख्या जास्त असते. अशा प्रकारच्या क्रीडाप्रकारातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जीवघेण्या आजारांचे आपण बळी पडू शकतो हे माहित असूनसुद्धा त्याच्यावर बंदी आणण्यास नकार देणे हे अक्षम्य अपराध ठरू शकेल!
संदर्भ: Ban Boxing - It's Demeaning and Dangerous (New Scientist 12 Aug 2013)
माहितीमधल्या टर्म्स
बॉक्सिंगवर बंदी घातली पाहिजे
बॉक्सिंगवर बंदी घातली पाहिजे याच्याशी अत्यंत सहमत.
जिवावरचे खेळ खेळायचे तर एकेकट्याने खेळण्यासारखे असतात तेवढेच खेळावेत. एकमेकांना इजा किंवा मरण देणारे नकोत.
म्हणजे ज्यांना रिस्कमधे थ्रिल आहे त्यांनी एकट्याने सुळक्यावर चढणे, एव्हरेस्टवर चढणे, आकाशातून उडी मारणे वगैरे प्रकार करावेत. पण दुसर्याला ठोसे अथवा लाथा मारण्याचे खेळ तातडीने कायदा करुन बंद व्हावेत. (कायदा करुन काय बंद होतं हा वेगळाच विषय..!!)
बॉक्सिंगमधे एकमेकांना ठोसे
बॉक्सिंगमधे एकमेकांना ठोसे लगावतात. आणि कसे उत्तम आणि जास्त ठोसे लगावले यावर पॉईंट्स देतात.
इतर अॅडव्हेंचर स्पोर्ट्समधे जे काही बरंवाईट व्हायचं ते स्वहस्ते / स्वपादे स्वतःचंच होणार असल्याने त्यावर इन प्रिन्सिपल आक्षेप नसावा.
एरवी मला कोणी ठोसे मारत नाही तोसवर मला तरी कशाला पडलीय त्या बंदीची.. पण एकूण जे काही अॅडव्हेंचर करायचं ते बिना ऑक्सिजन एव्हरेस्ट चढून, स्वतःला आग लावून उंचावरुन तलावात उडी टाकून, आगीवर चालून, मृत्युगोलात मोटारसायकल चालवून, एकट्याने मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी हवाई कसरती करुन इ इ करावे..
पण किक बॉक्सिंग, फॉर्म्युला वनमधे सुपरफास्ट गाडी चालवणे (इतरांच्या गाडीला ठोकरण्याचा धोका), दहीहंडीचा मनोरा (सर्वांना घेऊन कोसळणे आणि इतरांनाही जखमी करणे) इत्यादि एकाहून अधिक लोक एकमेकांना जखमी करणारे पोटेन्शियल असलेल्या खेळांवर बंदी घालावी.
तरीही बाकी सर्व परवडले, कारण त्यात इतरांना हानी होण्याची फक्त "रिस्क" असते. हानी करणे हाच मूळ खेळ असे स्वरुप असलेले खेळ बंदच व्हावेत.
+१ बॉक्सिंगसारख्या खेळात
+१
बॉक्सिंगसारख्या खेळात दोन्ही खेळाडूंनी आपल्याला इजा होणारच हे मान्य केलेलं / गृहित धरलेलं असतं. समजा एखादा "अनविलिंग पार्टिसिपंट" असेल (उदा. मेरीकोमने घरी सिलेंडर आणून देणार्याला बुक्के घालायला सुरुवात केली) तर बंदीची मागणी योग्य आहे. म्हणूनच कोंबड्यांची झुंज, बैलगाडा शर्यती यावरची बंदी पटते.
यानिमित्ताने माझं जरासं
यानिमित्ताने माझं जरासं व्यापक म्हणणं मांडतो:
एकूणच बंदी असावी की नसावी या बेसिसवर बर्याच चर्चा करता येतील. केल्या जातातही.
मुळात एकूण समाजमनाची पर्वा न करता कोणीतरी एकाने किंवा मूठभरांनी "नियम" करायचे. न पाळणार्यांना शिक्षा करायच्या इ इ हे मॉडेल स्वीकारार्ह आहे किंवा नाही यावर चर्चा होईल का?
बॉक्सिंगवर बंदी म्हणजे बंदी.. मला (व्यक्ती अथवा शासन यांना) वट्ट समाजहितासाठी अमुक असा निर्णय घेणं योग्य वाटतं. मग त्याला किती का विरोध होईना.. असा अॅप्रोच घेतला तरच बंदी घालावी का नाही अशा चालींवरच्या प्रश्नांना अर्थ उरतो. नपेक्षा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.. आपण (किंवा सरकार) कोण हरकत घेणार? किंवा परस्परसंमतीने काहीही होत असेल तर इ इ इ इ इ हे बाय डिफॉल्ट आहेच की.
बॉक्सिंगवर बंदी म्हणजे बंदी..
बॉक्सिंगवर बंदी म्हणजे बंदी.. मला (व्यक्ती अथवा शासन यांना) वट्ट समाजहितासाठी अमुक असा निर्णय घेणं योग्य वाटतं. मग त्याला किती का विरोध होईना.. असा अॅप्रोच घेतला तरच बंदी घालावी का नाही अशा चालींवरच्या प्रश्नांना अर्थ उरतो.
बंदी म्हणजे तसाच अॅप्रोच आहे असे समजूनच वरील चर्चा चाललेली आहे असा माझा समज होता. असो.
सरकार पुरस्कृत मँडेटरी मेडिकल
सरकार पुरस्कृत मँडेटरी मेडिकल इन्श्युरन्स च्या अनुपस्थितीत या खेळांवर बंदी अजिबात घालता कामा नये. बॉक्सिंग मधे खेळणारे दोघेही संभाव्य रिस्क जाणून असतात. व माझ्या माहीतीत तसा करार ही असतो की खेळांदरम्यान एकाला झालेल्या इजांबाबत दुसर्यास जबाबदार धरले जाणार नाही. थर्ड पार्टी इफेक्ट्स अगदीच नगण्य असतात.
चांगली माहिती
चांगली माहिती. आभार!
ज्यांना हा वा तत्सम खेळ खेळणे अयोग्य वाटते त्यांनी त्याचे तोटे सांगून अशा खेळांपासून इतरांना खेळण्यासाठी परावृत्त करावे.
कोणत्याही खेळात सहभागी होण्याची किंवा न होण्याची कायदेशीर सक्ती मात्र असु नये.
वर अनुप म्हणतात तसे - जोपर्यंत कोणा सज्ञान व्यक्तीवर बळजबरी होत नाही तोपर्यंत स्वत:चा जीव धोक्यात घालायचा का नाही हा त्या व्यक्तीचा निर्णय असावा.
अर्थात जर बॉक्सिंगमुळे - किंवा अशा खेळांमुळे- काही विपरीत सामाजिक परिणाम होत आहेत असे आढळले किंवा आर्थिक गैरव्यवहार वाढत आहेत असे दिसले तर मात्र सरकारने त्यात लक्ष घालावे (तरी बंदी हा उपाय असेल हे आता सांगता येणार नाही)
कैच्या कै
नानावटीसाहेब, तुमचे अन्य लिखाण वाचत असल्याने तुमच्याविषयी व्यक्तिशः आदर आहे.
परंतु हा धागा वाचून, "चिकनशिट लेमअॅस" अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली, त्याबद्दल क्षमस्व....
उद्या राणा संगाने एकशे कितीतरी घाव अंगी सोसण्याऐवजी तो जर गरबा खेळला असता तर अधिक सुरक्षित ठरलं असतं असंही म्हणाल!!!! :)
कायपण अभिप्राय आहेत एकेक!
च्यामारी, यांच्यापेक्षा मेरी कोम अधिक आदरणीय!!!!
बॉक्सिंग खेळण्यात काय थ्रिल आहे ते प्रत्यक्ष खेळल्याशिवाय नाही समजणार!!!
तेंव्हा एकदातरी हातात ग्लोव्ज् चढवा आणि एक राऊंडतरी स्वतः खेळा हा सल्ला!
-एक्स बॉक्सर
Boxing खेळावर बंदी घाला… खूप
Boxing खेळावर बंदी घाला… खूप हिंस्त्र आहे आणि याने लोक मरतात.
१० वि ची मेरीट लिस्ट काढून गुणवान विद्यार्थ्यांचं कौतुक करू नका… नापास होणारी पोरं आत्महत्या करतात.
rock climbing, trekking, sky diving असलं काही करू नका… करायचंच असेल तर आधी तुमची "Will" लिहून ठेवा…
राष्ट्रवादाचा उन्माद करू नका… देशासाठी जीव देणार? टाळकं ठिकाणावर आहे का?
"Anti Bullying" साठी मोर्चे काढा… नाहीतर काय पोटच्या पोराला प्रतिकार कसा करायचा शिकवणार?
आया बहिणींना सातच्या आत घरात बोलवा… रात्री बाहेर फक्त सैतान फिरतात… तुम्ही स्वतः रात्री १२ वाजता घरी येत असला तर तुम्ही अपवाद!
शेजारच्या देशाने गोळीबार केला… जशास तसे उत्तर न देता आपण बोलाचालींवर विश्वास ठेवा… बोलण्याने शत्रू विरघळतो… इतिहासात उदाहरणं आहेत!!
मध्ये एकदा एका अस्सल
मध्ये एकदा एका अस्सल "वर्तमानपत्र व्यवहारी" माणसाने सायकल स्पर्धेविरुद्ध असाच आक्षेप घेतलेला वाचनात आलं होतं. सायकल स्पर्धांमुळे सायकलपटूंची खूप दमछाक होते आणि त्यामुळे heart attack चा धोका वाढतो म्हणे. अशा जीवघेण्या स्पर्धा रद्द का करू नयेत असा त्या अमर माणसाचा सवाल होता.
अशी माणसं जेवतात काय हो? कि जेवतही नाहीत? खाऊन माजलेलं मरण येण्याऐवजी न खाऊन खंगलेलं मरण पत्करत असतील का? का ही सगळी माणसं "Achilles" चा अवतार आहेत? boxing हा खेळ सोडला किंवा सायकल शर्यत सोडली तर यांना बाकी सर्व बाबतीत अमरत्व प्राप्त झालं असावं असा अंदाज आहे. आपली मालमत्ता जिथून चोरीला जाण्याची शक्यता असते त्या जागेबद्दल आपण दुप्पट काळजी घेतो. तसेच हे लोक… बाकी सर्व बाबतीत अमर… पण gloves चढवले की यांचा रक्तदाब वाढत असणार नक्की…
बॉक्सिंगच्या खेळावर बंदी
बॉक्सिंगच्या खेळावर बंदी वगैरे काही घालू नये. आपलं स्वतःचं डोकं फोडून कसं घ्यावं किंवा दुसऱ्या कोणा राजी माणसाचं फोडावं का ही दोन सज्ञान माणसांच्या आपापसातल्या संमतीने होणाऱी खाजगी गोष्ट आहे. त्यात सरकारला नाक खुपसण्याची जरूर नाही. आणि वर हे बॉक्सिंग जर पुण्यात खेळणार असतील तर त्यांना हेल्मेट घालण्याचीही सक्ती करू नये. आसपासच्या अधिक धोकादायक गोष्टींबद्दल काहीतरी हालचाली करा आणि मगच हेल्मेट घालण्याची जबरदस्ती करा. प्राधान्यक्रम चुकलेले लोक कुठचे!
काहीही!!!
आणि पुण्यात हेल्मेट न घातल्याने मारबीर लागलाच तर एक रुपयात आयोडेक्स लावून घ्यावे केमिस्टकडून.
आयोडेक्स चोळून देणारा (आणि तेही एका रुपयात!) केमिष्ट बहुधा पुण्याबाहेरून आयात करावा लागेल. काय समजलेत? उगाच आपले मनास आले म्हणून उचलली बोटे, अन् लावली कीबोर्डाला असे करायचे ते!
(शिवाय पुन्हा त्यालाही वाण नाही, पण गुण नक्की लागायचा, त्याचे काय?)
आजकाल सॉकरच्या खेळातील लेदर
या वाक्याचा अर्थ समजला नाही. सॉकर म्हणजेच फुटबॉल, ज्यात बॉलमुळे इजा झाल्याचं ऐकलं नाही. आणि बॉलच्या मटेरिअल बदलाबद्दलही वाचलं नाही कधी. काही संदर्भ मिळेल का?
बाकी लेखाशी सहमत आहे असं वाटत नाही. जोपर्यंत कोणावर बळजबरी होत नाही तोपर्यंत. स्वत:चा जीव धोक्यात घालायचा का नाही हा ज्याचा त्याचा निर्णय असावा.