‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’.....
‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’..... लेखक: अवधूत डोंगरे - अक्षरमानव प्रकाशन - ऑगस्ट २०१२ - मूल्य: रु.८०/-
जगणं, सार्थ आणि निरर्थ! नक्की काय फरक आहे दोन्हीत? जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं जीवनसाखळीत असण्याचं काय प्रयोजन असू शकेल? ते कुठे कुणाला ठाऊक असतं? अन ठाऊक असण्याची गरजही नाही. आपलं आपण जगत राहून स्वत:ला जगवायचं, बस्स इतकंच! हा इतकाच उद्देश. तर असं निरुद्देश जगत राहणारी माणसं दिसत असतात आजूबाजूला. आपल्या जगण्यातील त्यांचं स्थान वा त्यांच्या जगण्यातील आपलं स्थान काय असू शकतं? नगण्य... फालतू! त्यांच्या असण्या-नसण्याने ना त्यांना फरक पडतो ना आपल्याला. परंतु त्यांचं असणं कादंबरीचा विषय होऊ शकतो एवढं मात्र खरं!
तर अशा नगण्य, फालतू माणसांचं जगणं दाखवणारी कादंबरी म्हणजे ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’. गोष्ट म्हटली की त्यात घटना-निर्णयात्मक परिस्थिती आली, संघर्ष-थरार आले, कारण-परिणाम आले. हे असलं काहीही नसेल तर ती कसली गोष्ट अन ते वाचण्यात काय असेल गंमत?
कादंबरी प्रवाही हवी, आणि ती वाचण्याची उत्सुकता टिकून रहाण्यासाठी तर काहीतरी ‘घडत’ राहिलं पाहिजे, त्यात दृश्य-संवाद हवेत. त्यातून मानवी नाती उलगडली गेली पाहिजेत वा काही अनुमानं काढता आली पाहिजेत. तिला सुरूवात - शेवट हवेत. म्हणजेच पुढे वाचत रहाण्याची उत्सुकता टिकून राहिली पाहिजे. म्हणूनच, अगदी खरं सांगायचं तर, ‘आता पुढे काय घडलं?’ असं कुतूहल जागं असेल तर अवधूत डोंगरेंचं हे लिखाण वाचण्यात काहीच मजा नाही. पण, ‘काय अन कसं आहे हे नगण्य माणसांचं जगणं’ अशा कुतूहलाने वाचली गेली तर हे ‘फालतू’पण समजून घेणंही आनंददायी ठरू शकतं.
नायकाच्या वर्तमानातील तपशील, म्हणजेच ‘त्या’च्या जगण्याचं वर्णन, म्हणजेच ही कादंबरी! ह्या तपशीलांना संदर्भ आहे ‘त्या’च्या वर्तमानपत्रातील कार्यालयात नोकरी करण्याचा, तिथल्या नोकरदारांचा. युनिव्हर्सिटीच्या वास्तूचा, तिथल्या कॉरिडोर्सचा, तिच्या परिसरात उन्मळून पडलेल्या जुन्या वृक्षाचा. त्याच्या जाण्या-येण्याच्या रस्त्या-वाटेचा, त्या वाटेवरील माणसांचा, त्या माणसांच्या रोजच्या वावरण्याचा! ह्या माणसांत समावेश आहे अनेकांचा, वर्तमानपत्राच्या कार्यालयात पानं लावण्याचं काम करणार्या नोकरदारांपासून रस्त्यावर पुठ्ठे-पुस्तकं-चहा विकणार्यांपर्यंत, इअरफोन्स घालून मित्रासमवेत जाणार्या आकर्षक तरूणीपासून बाकड्यावर रोज येऊन बसणार्या वृध्दांपर्यंत, लायब्ररी-कॅण्टीनमध्ये जा-ये करणार्यांपासून तिथेच फिरणार्या तीन पायांच्या कुत्र्यापर्यंत... सर्वसमावेशक!
अनेक स्तरांवरील माणसं-वास्तू-सजीव-निर्जीवांच्या असण्या-वावरण्यात सामावलेलं जगणं यात आहे. परकीय शक्तींनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांपासून स्वकीयांकडूनच प्राणघातक हल्ला होण्याच्या घटना तसेच क्रिकेटमध्ये विक्रमी धावा करण्याच्या घटनेपासून नक्षलवादाच्या प्रणेत्याने आत्महत्या करण्याच्या घटनांचे उल्लेख आहेत, म्हणजेच समकालीन वास्तव जग आहे.
माणसाचा मृत्यू, वृक्ष नाहीसा होणं यासारख्या क्षणिक महत्त्वाच्या ठरणार्या व लगेच विस्मृतीत जाणार्या घटना आहेत. म्हटलं तर या सार्याचा ‘त्या’च्या जगण्याशी संबंध आहे व नाहीही!
माणूस-प्राणी मर्त्य असणं हे तर निश्चितच आहे, वर्तमानपत्रांचं प्रकाशन संपण्याची शक्यता आहे, झाडं उन्मळून नाहीशी होण्याची शक्यता आहे, अर्ध्या वा पूर्ण शतकभरानंतरही सध्या अस्तिवात असलेलं काय-काय शिल्लक उरण्याची शक्यता आहे? कसलाच अंदाज नाही.
आत्ता-आधी-नंतर अशा निरनिराळ्या अस्तित्वांची दखल घेत आजच्या कालप्रवाहात असणार्यांची व ती समज नाही अन तरीही जगत असणार्यांची, तसेच, ‘त्या’च्या नगण्यपणाची त्याला जाणीव आहे अन इतरांना ती नाही अन अशा नगण्य जीवांच्या वरपांगी निरर्थक भासणार्या जगण्याची ही सार्थ कहाणी आहे.
२२.०२.२०१५
समीक्षेचा विषय निवडा
हे खास तुमच्यासाठी -
हे खास तुमच्यासाठी - http://en.wikipedia.org/wiki/Karl_Ove_Knausg%C3%A5rd
या माणसाने आत्मचरित्रपर सहा कादंबर्या लिहिलेल्या आहेत.
http://www.nytimes.com/2015/03/01/magazine/karl-ove-knausgaard-travels-…
मी ह्यातले काहीही वाचलेले नाहिये. मला या माणसाबद्दल फारशी काही माहीती नाही. I stumbled upon it.
नगण्य
उपडं खुलं आभाळ,
आभाळभर लाह्याच लाह्या,
टिपूर दुधी चांदणं
अन डोगरांच्या काजळरेखा
दूssर दूssर तेवणारे दिवे
एखादा माजघरातील मंद
तर एखादा रस्त्यावरचा
...उघडा-नागडा
डोंगरमाथ्यावर आपण
विश्वाच्या पसार्यातले
दोन नगण्य जीव
नगण्य तरी कसे म्हणावे
एकमेकांच्या साक्षीने
जीवनाचा अर्थ शोधणारे
माझ्याकरता तू
अन तुझ्याकरता मी.
चांगला परिचय. हाती आलं तर
चांगला परिचय. हाती आलं तर नक्की वाचेन