Skip to main content

ग्रफेलो? हा कोण असतो? १ आणि २

काही दिवसांपूर्वी नेटफ़्लिक्सवर ग्रफेलो (Gruffalo) नावाची छोटी कथा बघायला मिळाली. इतकं अप्रतीम लेखन, ॲनिमेशन, डबींग आणि पार्श्वसंगीत छोटयांनाच काय, पण मोठ्यांनाही खिळवून ठेवेल असं आहे. आधी कल्पना नव्हती, पण शोधल्यावर कळलं, की जूलिया डोनाल्डसन ही लेखिका तिच्या "ग्रफेलो" साठी जगप्रसिद्ध आहे, आणि Children's Laureate सन्मानार्थीही. चित्रकार ॲक्सेल शेफ्लरने इतकी उत्तम कामगिरी बजावलिये, की पुस्तक उघडल्याक्षणीच तुम्ही क्षणात एका घनदाट जंगलात जाऊन पोचता. इतक्या बोलक्या चित्रांना, ॲनिमेशनने अर्थात् संजीवनीच मिळते असं म्हणायला हरकत नाही, आणि मधूर, तरीही गूढ-भयावह अशा पार्श्वसंगीताने तर ह्या गोष्टीला चार चाँदच लावलेत. ह्या पुस्तकाचा अनुवाद करायचा इथे प्रयत्न करतेय. सुरूवातीला पोराला जेवता-झोपता-उठता-बसता सारखी ग्रफेलोची गोष्ट लागायची. ती इंग्रजीत पाठ होईतोवर मी मराठीतच सांगत असे. पण मूळ इंग्रजीतली लय त्यात यायची नाही. म्हणून हा प्रयत्न.

पिटुकल्या उंदराला वाटलं कधीतरी
जंगलातून मारावी छोटीशी फेरी.
कोल्होबाने उंदराला वेळीच हेरलं
एका उडीत त्याला पंजात धरलं.

"उंदीरमामा चला माझ्या बिळातल्या घरास,
केलिये मेजवानीची तयारी खास !"
(कोल्हा लबाड, करणार वाटतं माझाच घास!)
"नको नको कोल्होबा," उंदराने विनवलं,
तो तिकडे ग्रफेलो, माझी वाट पाहतोय म्हटलं!

"ग्रफेलो? ग्रफेलो?
हा कोण असतो?"
"कोल्होबा, तुम्हाला ठाऊक कसं नाही?
ग्रफेलोचा पंजा बघूनच घाबराल तुम्ही.
अजस्त्र जबड्यात त्याच्या, दात, जसे खिळे!
डोकावतात बाजूने दोन मोठे सुळे!"

"बरं बरं उंदिरमामा, इतकंच बोला,
कुठे भेटणार तुम्ही, ह्या ग्रफेलोला?"
"इथेच तो येणारे, ह्याच खडकावरी,
त्याला खायला आवडतो, कोल्होबा-तंदूरी"

"ठीकठीक" कोल्हा म्हणाला घाबरून,
शेपूट घातली पायात, नि ठोकली तिथून धूम.
"वेडा रे कोल्हा, त्याला कळलंच नाही,
ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"

==============================२======================================

कोल्ह्याच्या हातावर देऊन तुरी
पुढे निघाली उंदराची स्वारी
नेमकी घुबडाच्या नजरेस पडली
घुबड झेपावला वेगाने खाली.

“कसं काय उंदिरमामा, निघालात कुठे?
माझ्या घरट्यात या, खाऊ चहा बिस्किटे!”
“घुबडदादा तुझा आग्रह एरवी कसा मोडवेल?
पण ग्रफेलो फुका माझी वाट बघत रडेल.”
(घुबडाघरचा चहा, मला महागात पडेल.)

“ग्रफेलो? ग्रफेलो? हा कोण बुवा?”
“घुबडदादा तुला माहित असायलाच हवा.
झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे पाय”
“बापरे उंदीरमामा, खरंच की काय”.
नाकावर त्याच्या विषारी पुटकुळी,
आणि धारदार नखं बघून बसेल दातखिळी.”

“बरं बरं उंदीरमामा, येवढंच बोला,
कुठे भेटताय तुम्ही ह्या, ग्रफेलोला?”
“ठरलं होतं इथेच नदीपाशी भेटायचं.
कारण त्याला फार आवडतं आईस्क्रीम घुबडाचं.”

“ठीक ठीक” अशी घुबडाने केली चिवचिव,
आणि गेला उडून, मुठीत धरून जीव.
“वेडा रे घुबड, त्याला कळलंच नाही,
ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"

आवडली का गोष्ट? पुढील भाग लवकरच येतोय. तोवर इथे जरूर बघा.

ऋषिकेश Thu, 09/04/2015 - 10:50

छानच! हे भारीच्चे. अनेक आभार

===

माझ्या मुलीलाही गद्य गोष्टी आवडतातच पण त्याचे कवितेत रुपांतर केलं तर अधिकच आवडत. (किंवा हल्ली आम्ही छोटी छोटी नाट्य रुपांतरं सुरू केलीत मी ससा ती कासव किंवा मी राजा ती उंदीर असं ;) )

तिची ही आणखी एक आवडती कविता-गोष्ट

एक होती परी
ती खूप्प खूप्प गोरी!
छोटीशी गोंडस छान छान छान!

एकदा काय झालं
काय झालं?

स्वर्गेच्या गंगेला पूर मोठा आला
नी परीचा बंगला वाहून गेला
ती रड रड रडली
नी वेडिपिशी झाली
नी धावत धावत चंद्राकडे गेली
नी धावत धावत चंद्राकडे गेली

परी कशी म्हणते
"चांदोबा चांदोबा
माझं घर गेलं वाहून
आता मी कशी राहू?"
चांदोबा म्हणाला
"जाऊ दे वाहून
देतो तुला नदीतच घर एक बांधुन"

तेव्हापासून परी नदीतच राहिली
नी लाटांच्या बंगल्याची मालकीण झाली

-- मूळ कवी अज्ञात (कोणाला माहिती असेल तर सांगा)

फूलनामशिरोमणी Fri, 10/04/2015 - 02:40

In reply to by शुचि.

आमचा फिरंगी पोट्टा विडीओचॅट करतांना आजी-आजोबांना इंग्रजीत गोष्टी सांगतो, त्यांना त्या काही केल्या कळत नाहीत. म्हणून अनुवादाची सुरसुरी आली. आता त्यांनाही पाठवते.

फूलनामशिरोमणी Fri, 10/04/2015 - 02:42

In reply to by ऋषिकेश

वा! ही कविता पण मस्तच आहे! मूळ इंग्रजी ऐकल्यासारखी वाटत नाही. स्थलकालाबाधित बालसाहित्याचे अनुवाद अजून जोरात व्हायला पाहिजेत असं मला वाटतं.

काही सूक्ष्म बदल केले पुन्हा, मूळ लेखनाच्या जवळ जायचा प्रयत्न!
"हिज फेवरेट फूड इज रोस्टेड फॉक्स!"
ह्याला "कोल्ह्याचे तंदूरी" बनवले :)

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 17:07

In reply to by बॅटमॅन

'कोल्ह्याचे तंदुरी करणे' ही शब्दरचना काहीशी कढीवरणभातटैप्स, बोले तो, आमच्या आज्जीच्या पिढीतील एखाद्या अनभिज्ञ पारंपरिक शाकाहारणीने केल्यासारखी वाटते.

त्यापेक्षा, 'तंदुरी कोल्हा' असा बदल सुचवितो.

(अतिअवांतर: 'फॉक्स'ची तंदुरी करणे ही एक अत्यंत रोचक आणि अत्यावश्यक संकल्पना आहे.)

..........

तथाकथित 'न्यूज़'.

बॅटमॅन Fri, 10/04/2015 - 17:10

In reply to by 'न'वी बाजू

बदल पूर्ण मान्य. शब्दार्डरीमुळे काय फरक पडतो ते लग्गेच दिसून येते. कोल्हा तंदुरी म्हणजे एखाद्या ढाब्यातली डीष वाटते.

(अतिअवांतर: 'फॉक्स'१ची तंदुरी करणे ही एक अत्यंत रोचक आणि अत्यावश्यक संकल्पना आहे.)

त्यापरीस मधल्या व्हिरीतला गाळ काडा अगोदर- (पक्षी भारतभूमीतील अनेक च्यानलांसाठी कत्तलखाने उघडा) 'वळू' नामक तुफान इणोदी म्हराटी पिच्चर.

'न'वी बाजू Fri, 10/04/2015 - 17:40

In reply to by बॅटमॅन

त्यापरीस मधल्या व्हिरीतला गाळ काडा अगोदर- (पक्षी भारतभूमीतील अनेक च्यानलांसाठी कत्तलखाने उघडा)

नको. ती परराष्ट्राच्या अंतर्गत बाबींतील ढवळाढवळ होते. (अर्थात, तोही प्रघात नाही, असे नाही, परंतु तरीही...)

सबब, ते डिपार्टमेंट तुमचे. आमचे ते काम नव्हे.

असो.

फूलनामशिरोमणी Fri, 10/04/2015 - 22:09

In reply to by 'न'वी बाजू

तुमचा प्रतिसाद वाचल्यावर लगेच, लिंबाचं लोणचं, मेथीचं अळण, डाळीचे वडे, असले पदार्थ सुचू लागले, म्हणजे सूचना अगदीच मार्मिक होती तर. =))

"तंदूरी कोल्ह्या" चा विचार केला होता, पण यमकात जुळत नसल्यामुळे घेऊ शकले नाही.
पण "कोल्हा-तंदूरी" चांगलं वाटतंय. तंदूरी चिकनलाच फॅशनेबल हॉटेलात "चिकन तंदुरी" म्हणतात तसं? पण जॅकी चॅन म्हणतात की ढाब्यावर तसं म्हणतात. तसं तर तसं.

अस्वल Sat, 11/04/2015 - 01:50

ग्रफेलोबद्दल वाचूनHedgehog in the fog ही रश्यन गोष्ट आठवली मला उगाच.
त्यातल्या त्या हेजहॉगला जंगलात रात्री असेच चित्रविचित्र अनुभव येतात.

शिवाय संदीप खरेंचा बुम्बूम्बा रा़क्षस!

फूलनामशिरोमणी Tue, 14/04/2015 - 04:01

In reply to by अस्वल

रशियन परिकथा (अनुवादित) मला फारच आवडायच्या. त्यातले चित्रविचित्र खाद्यपदार्थ वाचून भूकच लागायची: बोर्श्त/रायाचा पाव.