पशुपक्षीभूषण
जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत.
सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला.
कावळ्यांनी सर्वप्रथम , एका तळयांत होती' या गाण्याविषयी आक्षेप नोंदवला. त्यावर विस्ताराने बोलताना एक काकराज म्हणाला की वर्षानुवर्षे, हे गाणं आमच्या कानावर पडत आहे. त्यांत, हेतूपुरस्सर, बदकांची अवहेलना करण्यांत आली आहे. बदकांना सामान्य दाखवून हंसाला मात्र, उगाचच 'राजहंस' म्हणून गौरवण्यांत आले आहे. तो हंस कुरुपच होता, मग त्याला चिडवले तर बिघडले कुठे ? त्यास्तव, या गाण्यावर त्वरित बंदी घालण्यांत यावी. आणि त्याचा कवि जर जिवंत असेल तर त्याला किंवा त्याच्या वंशजांना ताकीद देण्यांत यावी. सर्वप्राणीसमभाव हा आचरणांत आणला गेलाच पाहिजे. काकराजाचे भाषण चालू असताना, मधेच एक बदक, 'रंगारी बदक चाळ' या नांवाविषयी आक्षेप घेऊ लागले, पण, फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा आवाज क्षीण पडला.
दुसरा एक काकराज त्वरेने उभा राहिला आणि त्याने, 'बगळ्यांची माळ फुले' हे गाणे कसे वर्णभेद करणारे आहे ते सांगायला सुरवात केली. बगळ्यांचीच का? 'कावळ्यांची' असे त्याऐवजी लिहायला कवीला काय झाले होते, असा संतप्त सवाल त्याने केला. यावर, कावळे समाज संतप्त झाला आणि त्या कवीला दिसताक्षणी डोक्यावर टोचून टोचून हैराण केले पाहिजे, अशा घोषणा होऊ लागल्या.
गिधाडांनी वेगळाच मुद्दा मांडला. माणसांच्या अनेक सभा, उघड्या मैदानावर होतात तेंव्हा आम्ही झाडावर बसून ऐकत असतो. त्यांत, कोणाच्याही उत्तुंग कामाबद्दल गरुडभरारी असा शब्द वापरला जातो. अशा तर्हेने समस्त गिधाडांच्या भावना दुखावल्या जातात हे माणसांच्या लक्षांत आणून दिले पाहिजे, असे एका गिधाडाने निक्षून सांगितले. आम्ही मानवजातीचे खरे मित्र आहोत. त्यांचे पर्यावरण टिकवण्यासाठी आम्हाला झाडांवर तासनतास ताटकळावे लागते, तेंव्हा कुठे मेजवानीचा लाभ होतो. तर कृतज्ञता म्हणून त्यांनी गृधभरारी असा शब्द वापरला पाहिजे, असा ठराव पास केला पाहिजे हे त्याने पंख-फडफडीच्या गजरांत सांगितले.
गाढवांचा प्रतिनिधी बोलायला उभा राहिला तेंव्हा खुरांचा खडखडाट करुन गर्दभ समाजानी आपली ताकद दाखवून दिली. एक गाढवराज म्हणाले, आमच्याइतकी अवहेलना तर दुसर्या कोणाच्याच वाट्यास येत नाही. आमच्याकडून एवढे काम करुन घेतात पण पोळ्याला फक्त बैलांचीच पूजा करतात. आता आम्हाला जर पुरणपोळी दिली तर काय आवडणार नाही ? ही माणसे तर कायम, 'सिंहगर्जना' वा 'वाघाचे काळीज', असले शब्द वापरुन आम्हाला अनुल्लेखाने मारतात. त्यांना अजून गर्दभ गर्जनेची ताकद माहीत नाही. आमची एक लाथ बसली तर सिंहांची सुद्धा बत्तिशी तुटते.
तरसांचा प्रतिनिधी बोलायला उभा राहिल्यावर, आधी सर्व तरसांनी मनसोक्त हंसून घेतले. ते ऐकल्यावर तो तरसराज ओरडला, "हंसू नका"! कधीतरी गंभीर व्हा.' या सारख्या हंसण्यामुळेच आपण हास्यास्पद ठरतो आहोत. आपल्याला स्वतंत्र शिकार करता येत नाही, हा अपप्रचार आहे. पण आपल्याला पर्यावरणाची खरी काळजी आहे, ती ह्या वाघ्-सिंहांना नाही. भूक बेताचीच आणि शिकार करुन ठेवतात ही अगडबंब! अन्न टाकू नये, एवढेही त्यांना समजत नाही. केवळ ते उरलेले अन्न वाया जाऊ नये म्हणून आपल्याला ते खावे लागते. सबब, आपल्यालाही समाजात मानाचे स्थान मिळालेच पाहिजे.
सगळे किरकोळ ठराव संमत झाल्यावर, मुख्य ठराव होता तो 'पशुपक्षीभूषण' हा मान कोणाला द्यायचा? पण त्यावर इतका गोंधळ माजला की कुठलाही निर्णय न होता, सभा संपल्याचे अध्यक्षांना जाहीर करावे लागले. त्यानंतरही, सभेच्या ठिकाणी रात्रभर भीषण हातघाईची लढाई चालूच राहिल्याचे, पळ काढलेल्या एका खबर्याकडून आमच्या प्रतिनिधीस कळले.
पशुपक्षांच्या अन्यहि तक्रारी
पशुपक्षांच्या अशाच तक्रारी जुन्या संस्कृत सुभाषितकारांविरुद्ध आणि कवींविरुद्ध आहेत. हे लेकाचे पशुपक्षांमध्ये दोन गट करतात. एकामध्ये वाघ, सिंह, हत्ती, गरुड, चकोर इत्यदि पडतात आणि दुसर्यामध्ये कुत्रा, गाढव, शेळी, कावळा इत्यादि. अनेक सुभाषितांमधून पहिल्या गटाचे उदात्तीकरण आणि दुसर्या गटाचे पद्धतशीर अवमूल्यन आणि चारित्र्यहनन केलेले आढळते. पुढील काही सहज सुचलेली उदाहरणे हेच दर्शवितात.
गुणैरुत्तमतां याति नोत्तुङ्गेनासनेन वै |
प्रासादशिखरस्थोऽपि काको न गरुडायते ||
आपल्या गुणांनी मनुष्य श्रेष्ठ ठरतो, उंच आसनावर बसल्याने नाही. राजवाडयाच्या शिखरावर बसला महणून कावळा गरुड ठरत नाही.
कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो हंस: कुतो मानसात्।
किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्भ: सुधासन्निभम्।
रत्नानां निचया: प्रवालमणयो वैडूर्यरोहा: क्वचित्।
शम्बूका: किमु सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम्॥
(बगळे आणि हंस ह्यांच्यामधील संवाद.) ’रक्तवर्णाचे नेत्र, मुख आणि पाय असलेला तू कोण?’ ’मी राजहंस.’ ’तू कोठून आलास?’ ’मानस सरोवरापासून.’ ’तेथे काय मिळते?’ ’सुवर्णकमळांची वने, अमृतासमान जल, रत्नांचे खच, कोठेकोठे प्रवालमणि आणि वैडूर्य.’ ’कवडया मिळतात का?’ ’नाही.’ हे ऐकल्यावर बगळे खीखी करून हसले.
हंस: शुक्लो बकः शुक्लः को भेदो बकहंसयो:।
नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बक:॥
हंस पांढरा, बगळाहि पांढरा. तर मग हंस आणि बगळा ह्यांच्यात भेद काय? दूध आणि पाणी वेगळे करण्याची वेळ आली की कळते की हंस तो हंस आणि बगळा तो बगळा.
स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥
गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी।
मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरुतर शिला भेदुनि करीं।
भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥
हे वासुदेवशास्त्री खरे ह्यांचे वरील श्लोकाचे समश्लोकी भाषान्तर आहे, जे त्यांनी ’केसरी’ वृत्तपत्राच्या शीर्षकासाठी तयार केले होते.
न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना -
गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बा: करटिन:।
लुठन्मुक्ताभारे भवति परलोकं गतवतो
हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकल:॥
ज्यांच्या गंडस्थलांच्या उद्रेकांभोवती भुंग्यांचे थवे गुंजत आहेत असे मत्त हत्तीहि जेथे भीतीमुळे डोळे फिरवीत होते आणि उभे राहू शकत नव्हते अशा सिंहाच्या (हत्तींच्या गंडस्थलातील) मोत्यांनी खचाखच भरलेल्या प्रांगणात आता तो सिंह आता परलोकी गेल्यामुळे कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकावी लागत आहे. शिव! शिव!
सिंह: शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु।
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतु:॥
सिंहाचा छावाहि मदस्रावामुळे ज्यांची गंडस्थळे मलिन झाली आहेत अशा गजांवर तुटून पडतो. तेजस्वी पुरुषांचा हा स्वभावच असतो. पराक्रम वयावर अवलंबून नसतो.
कृमिकुलचितं लालाक्लिन्नं विगन्धि जुगुप्सितं
निरुपमरसप्रीत्या खादन्नरास्थि निरामिषम् |
सुरपतिमपि श्वा पार्श्वस्थं विलोक्य न शङ्कते
नहि गणयति क्षुद्रो जन्तुः परिग्रहफल्गुताम् ||
किडयांनी बुजबुजलेले, लाळेने भरलेले, दुर्गन्धी, किळसवाणे आणि मांसरहित असे माणसाचे हाड ज्याला उपमा नाही अशा चवीने खाणारा कुत्रा पाठीमागे सुरपति इन्द्र उभा आहे असे पाहूनहि दचकत नाही. आपण पत्करलेली बाब निरुपयोगी आहे हे क्षुद्र प्राण्यांच्या ध्यानात येत नाही.
उष्ट्राणां लग्नवेलायां गर्दभा मन्त्रपाठकाः।
परस्परं प्रशसन्ति अहो रूपमहो ध्वनिः॥
उंटांच्या विवाहात मन्त्र म्हणायला गाढवे होती. एकमेकांची ते प्रशंसा करीत होते - काय सुंदर रूप आणि काय मधुर आवाज!
लाङ्गूलचालनमधश्चरणावपातम् भूमौ निपत्य वदनोदरदर्शनं च ।
श्वा पिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते ॥
शेपूट हलविणे, खाली पायांवर लोळण घेणे, जमिनीवर पडून पोट आणि तोंड दाखविणे असे सर्व कुत्रा खाऊ घालणार्यापुढे करतो. श्रेष्ठ गज मात्र (समोरच्या खाण्याकडे) नुसते पाहतो आणि शंभर विनवण्या केल्यानंतरच खातो.
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।
अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ॥
घोडयाला नको, गजाला नको, वाघाला तर नकोच नको. बोकडाला बळी द्यावे. खरोख्रर् देवहि दुर्बळाचा घातकच ठरतो.
कुम्भिभ्रान्त्या
या ओळीत 'श्रमाने' च्या ऐवजी नजरचुकीने 'भ्रमाने' झाल्यमुळे अर्थाचा अनर्थ झाला आहे.?>
मी जे लिहिले आहे त्यात कसलीहि नजरचूक नाही. हे मी दोन कारणांनी म्हणतो.
'कुम्भिभ्रान्त्या' ह्या शब्दाचे 'भ्रमाने' असे भाषान्तर वासुदेवशास्त्र्यांनी केले आहे. तेथे 'श्रमाने' असा अर्थ सुचविणारे मूळ संस्कृतातमध्ये काहीहि नाही. 'कुम्भि' ह्या शब्दावे आपटे कोशामध्ये अनेक अर्थ दिलेले आहेत. त्यापैकी योगशास्त्रातील 'closing the nostrils and mouth so as to suspend breathing' हा अर्थ येथे लागतो आणि ही एक प्रकारची निद्राच आहे. 'कुम्भिस्थितीतून उत्पन्न भ्रान्ति' म्हणजे 'भ्रम' असा हा सरळ अर्थ आहे
विशेष म्हणजे मी उल्लेखिल्याप्रमाणे हा श्लोक 'केसरी'साठी वासुदेवशास्त्र्यांनी केला. इंग्रजी सत्ता जरी हिंदुस्तानवर असली तरी ती केवळ एवढयामुळेच की हा हिंदुस्तानरूपी सिंह केवळ भ्रमाने - आपले सामर्थ्य न ओळखता झोपेच्या आहारी गेल्यामुळे - इंग्रजरूपी गजालिश्रेष्ठाला ह्या कान्तारजठरामध्ये प्रवेश मिळालेला आहे अशी ही 'अन्योक्ति' समजणे हा अर्थाचा गाभा आहे. ('केसरी' आणि 'हरि' म्हणजे 'सिंह' हे माहीत असेलच.) 'श्रमाने' ह्यातून हा सर्व अर्थ नष्ट होऊन श्लोकाचा गाभाच नाहीसा होतो.
आई ग्ग! छानच
आई ग्ग! छानच :)