मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला.
मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला.
+++
अमित शिंदे यांची "काही येत नाही" या शीर्षकाची खालील लघुकथा फार छान आहे.
छातीत गोळी लागली आणि त्याच्या मेंदूत वीज चमकली . रक्ताच्या थारोळ्यात पडताना तो अचानक भानावर आला. एका क्षणात संपूर्ण आयुष्याचा चलतचित्रपट त्याच्या नजरेसमोरून झरझरत गेला. त्याला दिसू लागले, गेल्या काही वर्षात त्याने उभे केलेले गुन्हेगारी साम्राज्य, हातून घडलेले असंख्य गुन्हे, गुन्हेगारी विश्वात प्रवेश करण्यापूर्वी बेकारी आणि दारिद्र्यात घालविलेले अपमानित दिवस, त्यापूर्वीचे अतिसामान्य विद्यार्थ्याचे शालेय आयुष्य, परीक्षा पास होण्यात अनेक वेळा आलेले अपयश आणि जगाने उडविलेली खिल्ली. असा तो रीवाइंड चित्रपट त्याच्या प्राथमिक शाळेतील वर्गात जाऊन स्थिरावला. नुकताच खेड्यातल्या बालवाडीतून शहरातील शाळेत आलेला, भांबावलेला एक चिमुरडा. नवीन वातावरण आणि पहिल्याच दिवशी बाईंनी सुरु केलेली ए बी सी डी ची उजळणी. बरोबरच्या विद्यार्थ्यांना हे सर्व ज्युनिअर सिनिअर केजी पासूनच येत होते. मात्र त्याला हे सर्व नवीन होते. त्याला फक्त एक अक्षर ओळखीचे वाटले. “यु”. गावातल्या बालवाडीत शिकलेल्या “ण” बाणाचा शी साधर्म्य असलेले. तो उत्साहाने उद्गारला, “ बाई ! हा ‘न बानाचा’” बाईंनी त्याच्याकडे रागाने पहिले आणि म्हणल्या, “बस खाली , काही येत नाही !!”
मृत्युपूर्वी काही असंबद्ध क्षण डोळ्यासमोरून चमकून जातात असे म्हणतात. नेमका हाच क्षण मरताना त्याला का आठवावा?
+++
अगदी एखाद्याचे गुन्हेगारी जगतात जाणे सोडून दिले तरी शिक्षकांना मुलांची हेटाळणी करण्याचा काय अधिकार असतो?
आजकाल मुलांना शाळेत मारणे हा गुन्हा समजला जातो. पण मुलांची अक्कल काढणे, त्यांची हेटाळणी करणे, एखाद्याला ढ म्हणणे हेदेखील गुन्हेच समजायला हवेत.
तुम्ही वर्गातल्या सगळ्याच मुलांना प्रेरणा मिळेल असे काही करत नसाल, काही ठराविक हुशार मुलांवरच लक्ष केंद्रित करत असाल, तर कमीत कमी इतरांचे असलेले उरलेसुरले मनोबल तरी खच्ची करत जाऊ नका. अशी मुले कोणत्या सामाजिक पार्श्वभुमीवरून तुमच्या इथे शिकायला येतात, ते पाहता त्यांचे शाळेपर्यंत येणे व तेथे बसणे हीच क्रांतीकारी घटना असते. त्यात तुम्ही त्यांना त्यांच्या गणवेशावरून, एकूण अवतारावरून, गृहपाठ न करण्यावरून, विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर नीट न देण्यावरून त्यांची हेटाळणी तरी करू नका ना!
शिक्षक म्हणून तुमच्याबद्दल वर्गातल्या प्रत्येक मुलाला तुमच्याबद्दल आत्मियता वाटावी, तुम्ही शिकवता त्याची गोडी लागावी याकरता तुम्ही काय करता? तुमच्या विषयात, तुमच्या वर्गातला मुलगा नापास होतो, चांगले गुण मिळवण्यात अपयशी होतो हे तुम्ही तुमच्या शिकवण्याचे अपयश मानता का?
बाकीचे जाऊ दे, कधीतरी वर्गातल्या प्रत्येक मुलाची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी विचारायची, त्यांच्या अडचणी काय आहेत, गरजा काय आहेत हे विचारण्याची तसदी घेतलीत का? वर्गातला सर्वात हुशार मुलगा व सर्वात कमजोर मुलगा यांच्यातली दरी बुजवण्याचा प्रयत्न केलात का? अशा दुर्बल मुलांकडेही तुमचे लक्ष आहे हे त्यांना वाटावे अशी तुमची इच्छा तरी आहे का? मी तुम्हाला तुमच्या वर्गात असायला हवा आहे असे त्या मुलाला मनोमन वाटावे असे काही तुम्ही कधी केलेत का?
शिक्षक आहात, टवाळखोर नाहीत. तुमची नेमणूक तुमच्या गुणवत्तेवर झाली असो की त्या नोकरीसाटी लाख-पाच लाख मोजून झाली असो, आला अाहात ना या पेशात आयुष्यभर राहण्यासाठी? य़ा मुलांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात हो तुमच्याकडून. तेव्हा शिक्षक म्हणून तुमचे ‘शैक्षणिक’ व ‘बौद्धिक’ वय त्या मुलांपेक्षा जास्तच आहे. तर मग त्या कोवळ्या मनावर हिडिस-फिडिस करण्याचे, हेटाळणीचे आणि दुर्लक्षाचे कसले संस्कार करता? ते करायला बाहेरचे जग आहेच की!
शाळेतही तुम्ही तेच करणार, तर मग तेथे जायचेच कशाला?
ते राष्ट्रउभारणी, nation building वगैरे फार मोठे शब्द आहेत हो. आपापले काम नीट केले तरी ते आपोआपच होते.
तुम्ही तर शिक्षक आहात.
अमेरीकेत विद्यार्थीदेखील
अमेरीकेत विद्यार्थीदेखील त्यांच्या प्राध्यापकाच्या शिकवण्याचे रेटींग करु शकतात. पण परवा परवा कळालेली धक्कादायक बातमी ही की जर रेटींग चांगले दिले तर काही प्राध्यापक, त्या त्या विद्यार्थ्याला ५ की कितीतरी टक्के कॉलेज क्रेडिट देतात. I find this disgusting.
___
"फ्लॉप शो" मधल्या पी एच डी करणार्या विद्यार्थ्याने त्याच्या मेंटरकरता दूध आणणे, भाज्या वगैरे ग्रोसरी करणे आदि कामे आठवली.
__
Really? ज्या प्राध्यापकांनी मुलांसमोर आदर्श ठेवायचा तेच असा लाचखाऊपणा/भ्रष्टाचार करतात?