सुजाणांची हताशा ('A Walk in the woods' नाटक समीक्षा )
(नाटक इंग्रजीत आहे . ज्यांना संपूर्ण कोरी पाटी हवी आहे त्यांनी बघितल्यावर वाचावे . )
ली ब्लेस्सिंग च्या 'अ वॉक इन द वुड्स ' याच नावच्या नाटकाचे हे भारतीय रूपांतर आहे . रत्ना पाठकने हे दिग्दर्शित केले आहे . रजित कपूर आणि नसीरुद्दीन शाह हे दोनच कलाकार त्यात आहेत . लेखाचे शीर्षक हीच नाटकाची थीम आहे . या सुजाण पात्रांप्रमाणे प्रेक्षकाला सुद्धा ही हताशा जाणवते . पण तरी एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचे समाधान घेऊनच प्रेक्षक घरी परततो .
राम चिनप्पा (रजित कपूर ) हा भारतीय दूत आणि जमालुद्दीन लुफ्तुल्लाह (नासिर) हा पाकिस्तानी दूत जीनीवाला शांतिप्रस्तावावर चर्चा करायला भेटतात. नेहमीप्रमाणे टेबलवर बसून वाटाघाटी करण्यापेक्षा आपण निसर्गाच्या जवळ म्हणजे झाडांमध्ये बसून बोलूया म्हणून जमाल सुचवतो . 'नो नॉनसेन्स' पद्धतीच्या रामला ते अजिबात मान्य नाही . पण हा प्रस्ताव मार्गी लागावा म्हणून तो जमालची अट मान्य करतो . पण तरी जमालला प्रस्तावापेक्षा गप्पा आणि मैत्री यातच जास्त रस असतो . तो प्रस्तावावर चर्चा करायला आणि स्वतच्या वरिष्कठाडे तसेच पंतप्राधांनांकडे घेऊन जायला नाखुशच असतो . त्यापेक्षा त्यांची मैत्री वाढवण्यातच त्याला रस असतो . पण का ? शेवटी राम मैत्री चालू ठेवायची असेल तर हा प्रस्ताव पाकिस्तानी पंतप्रधानांकडे नेऊन दे म्हणून बजावतो. नाइलाजाने तो देतो . प्रस्ताव हा त्यालाही १००% योग्य वाटतो . पण तो मंजूर होणार नाही याची त्याला खात्री असते . त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तो नामंजूर होतो . त्याचं कारण एवढेच की हा प्रस्ताव भारताने तयार केला आहे . आणि तो जर मंजूर झाला तर भारताला श्रेय मिळेल ! राम हताश होतो . शेवटी तो सुचवतो की आपण व्यक्तिश: दोघे मिळून एक आदर्श प्रस्ताव तयार करूया . तो कुणा एका राष्ट्राचा असणार नाही . जमालही त्याला मान्यता देतो . दोघे विचार करून एक आदर्श प्रस्ताव तयार करतात आणि एकमेकांच्या प्रमुखांना दाखवायला नेतात . आणि ......
युद्ध कोणालंच नको आहे . पण खरच तस आहे का ? वेळोवेळी तर ही युद्धखोरी आणि असहिष्णूता वाढतच चालली आहे . ( हे नाटक आत्ता नाही तर फार पूर्वी लिहिले आहे . आणि ते अमेरिकेत लिहिले आहे . म्हणजे हा प्रॉब्लेम संपूर्ण मानवजातीचा होतो आणि त्यामुळे जास्तच गंभीर होतो.) जर कुणी आपल्यावर हल्ला करत असेल तर आक्रमक होण्यात काही वाईट नाही . पण अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असताना ही युद्धखोरी मुद्दाम जोपासली जात असेल तर ? ज्याने मुख्य प्रश्न बाजूला पडावेत ? प्रेक्षकाला विचार करायला भाग पडतो .
पण तरीही या नाटकाचा विषय हा नाही . दोन संपूर्ण विरुद्ध परिस्थितील व्यक्तींचं एकत्र येणे , आणि एकाच कारणासाठी दु:खी असणं आणि शेवटी एकमेकांचे सांत्वन करण हे खरं महत्वाचं आहे. एका अर्थाने ते एकमेकांमध्ये solace शोधतात. दोन सुजाण व्यक्तींना काही गोष्टी जाणवतात . ते सुधारण्याचा त्यांचा मनापासून प्रयत्न आहे . पण आजूबाजूची परिस्थितीच त्यांना साथ देत नाही . ते अल्पमतात आहेत हे त्यांना जाणवतं . आणि त्याहीपेक्षा आपल्या कामाला आणि हुद्द्याला काही अर्थ नाही . आपल्याला करण्यासारखं काहीच नाही याने त्यांना वैफल्य येते . आपली कुणाला गरजच नाही ही ती हताशा आहे . राम त्या जागेवर नुकताच आला आहे . कुणाला जमले नाही ते आपण करून दाखवू म्हणून त्याच्यात अमाप आत्मविश्वास आहे . नंतर त्याला त्याची निरर्थकता पटते आणि त्याला नैराश्याचा झटका येतो . तो स्वत:ला जमालच्या साथीने सावरू पाहतो.
जमालला आधीच या सगळ्याची निरर्थकता पटलेली आहे . त्यामुळे हे करण्यात त्याला काहीच रस वाटत नाही . त्यापेक्षा आलो आहोत तर निसर्गाच्या सानिध्यात मन रमवावे , समोरच्या माणसाशी मैत्री करावी , गप्पा माराव्यात (या गप्पांमध्येच दोन्ही देशांच्या मैत्रीची खरी शक्यता आहे असेही सुचवले जाते आणि त्या गप्पा एक प्रतीक बनतात) हे त्याला जास्त बरं वाटतं . ज्यावेळी दोघे मिळून स्वत : चा एक प्रस्ताव बनवतात तेव्हा त्याला पुन्हा एक आशा वाटू लागते . स्पोईलर अलर्ट : *STOP* पण अहंकारामुळे दोन्ही देशांचे पंतप्रधान हा प्रस्ताव फेटाळतात. स्पोईलर अलर्ट समाप्त. *GOOD* मग जमाल निवृत्ती घेतो आणि नैराश्याचा झटका आलेल्या रामला ही तेच सुचवतो. जर तू ते केलं नाहीस तर तुझ्या संवेदनशील मनामुळे तू विझुन जाशील असे त्याला बजावतो . या सर्व मांडणीत दोघांची व्यक्तिरेखा अत्यंत विचारपूर्वक लिहिली आहे .
नाटकाची नर्म विनोदी हाताळणी त्रासदायक वास्तवाला सुसह्य बनवते पण वास्तवाला ओवरलॅप करत नाही . नाटकात नेपथ्य ही एकच आहे . पण ते आशय मांडायला पुरेसं आहे . अनेक संवाद टाळ्या घेतात. पण ते टाळीबाज नाहीत . ते हुशारीने लिहिल्याचे जाणवते . खर तर वर म्हणल्याप्रमाणे नाटक हे रूपांतरित आहे . पण त्याचे रूपांतरित असणे अजिबात जाणवत नाहीत . इतके संवाद इथल्या वातावरणात मिसळून जातात . जमालचा शेवटचा संवाद : "Look at those beautiful trees , soon they will be cut to make negotiating tables ." अंगावर काटा आणतो . असे अनेक संवाद नाटकात आहेत . च्युइंगगमचा संवाद रामचे नैराश्य आणि त्याला जोडलेली प्रतीके अचूक पकडतो .
रजित कपूर आणि नरीरुद्दीन शाह यांचा अभिनय अप्रतिम आहे . कडक शिस्तीचा आणि नो नॉनसेन्स प्रकारचा राम रजित कपूर अचूक पकडतो . त्याच्या आवाजातला कडकपणा आणि त्याच वेळेला असलेली काळजी आणि इच्छा लाजवाब . नसीरुद्दीन शाहने जमाल सुंदर रंगवला आहे . त्याची हताशा त्याने केवळ नजरेतून सुंदर प्रकट केली आहे . त्याची व्यथा त्याच्या आवजातून येतेच . पण काही अंशी आता त्याचा अभिनय predictable ही वाटतो. विरामाच्या जागांचा अचूक वापर दोघांनीही केला आहे .
रत्ना पाठक ने दिग्दर्शन योग्य रीतीने केले आहे . प्रयोग छान बांधीव झाला आहे . असलेल्या अनेक जागा व्यवस्थित शोधल्या आहेत . प्रकाशयोजना नाटकाला आवश्यक असणारी दिवसातली वेळ आणि त्यापेक्षाही वेगवेगळे मूड्स अचूक पकडते . वेशभूशेचा इथला उपयोग तर फारच जमला आहे . पहिल्यांदा भेटतात तेव्हा दोघांची फॉर्मल वेशभूषा आणि नंतर बदलणारी आणि शेवटी पुर्णपणे होणारी इन्फॉर्मल वेशभूषा त्या दोघांची वाढत जाणारी जवळीक दाखवते .
चूक काढायची म्हणली तेर असं म्हणता येईल की त्या दोघांची मैत्री पुरेसा वेळ न देता लगेच होते . पण मध्ये अनेक महिन्यांचा काळ जात असल्याने ही चूक फार मोठी नाही .
एकंदरीत हे नाटक अजिबात चुकवू नये असे आहे .
परीक्षण आवडले. विशेषतः दोन
परीक्षण आवडले. विशेषतः दोन अगदी विरुद्ध विचारांच्य व्यक्तींचे एकत्र येणे वगैरे प्लॉट मस्त आहे, व्यक्तीचित्रणाला खूप स्कोप आहे.