Skip to main content

स्वप्न

वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची इस्त्रीसाठी येईल माझ्या कामी

कधि चंद्राचा घेउनी चेंडू खेळत बसेन गगनी
चांदणमेवा थोडा थोडा खाईन अधुनी मधुनी

प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?

सांग स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही ? - रात्रंदिन मग झोपून पाहीन वाट :)

१४टॅन Sat, 30/09/2017 - 12:36

पण 'छोट्यांसाठी' असेल तर ती फारतर जे १९८०-२००० मध्ये 'छोटे' होते त्यांच्यासाठी आहे.

तिरशिंगराव Sun, 08/10/2017 - 12:43

वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन
ह्यावरुन जुनी आठवण झाली. माझ्या एका भाचीने समुद्र कधीच पाहिला नव्हता. लहान असताना ती स्वत: गोष्टी रचून सांगायची, त्यांत एक नेहमीची गोष्ट म्हणजे,
एक बाई एकदा समुद्रावर धुणं धुवायला गेली होती.
आम्ही मुंबईकर या वाक्याला भरपूर हंसायचो.

बॅटमॅन Tue, 10/10/2017 - 21:13

छान कविता. लहानपणी मंगळावर जायची स्वप्ने पाहिलेली त्याची आठवण झाली. यत्ता पहिलीत असताना विचार केला की चौथी संपल्यावर जाऊ. चौथी संपल्यावर कळाले की आत्ता तरी कै होत नै मग म्हटले दहावीनंतर जाऊ. मग लक्षात आले की काही होणे नाही. :)

पुंबा Wed, 11/10/2017 - 18:50

कविता मस्त..

कधि चंद्राचा घेउनी चेंडू खेळत बसेन गगनी

ह्यावरून तो मुपीवरचा महाप्रसिद्ध लेख आठवला..