नाट्यत्रयी वाडा चिरेबंदी, भाग#१
मी नाटकवेडा माणूस आहे. म्हणजे नाटकं पाहायला आवडतात, नाटकं करायला नाही! ह्या ब्लॉग वर मी बऱ्याच नाटकांबद्दल लिहिले आहे. त्यातही मला जुन्या काळातील, म्हणजे १९७० ते १९९० मध्ये रंगमंचावर आलेल्या नाटकांचे पुन्हा आजच्या काळात केलेले प्रयोग पाहायला आवडतात. मराठी नाटकांच्या बाबतीत हा तसा पहिला तर सुवर्णकाळ होता. काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वाह्निन्यांच्या गर्दीत एक दोन मराठी वाहिन्या होत्या त्या अशी जुनी नाटकं दाखवत असत. वाडा चिरेबंदी हे नाटक जुने आणि बरेच प्रसिद्ध आहे. प्रसिद् नाटककार महेश एलकुंचवार यांनी ते लिहिले आहे. त्यांचे एक नाटक वासांसि जीर्णानि खूप पूर्वी मी पहिले होते, त्यात डॉ. श्रीराम लागू यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यांची एकदोन पुस्तके जसे मौनराग, पश्चिमप्रभा, सप्तक ही देखील वाचली होती, तसेच नुकतेच त्यांनी Henry Miller(The Time of the Assassins)चे अनुवाद केलेले विनाशवेळा हे देखील वाचले होते. पण इतर प्रसिद्ध नाटकं जसे गार्बो, पार्टी पाहायचे राहून गेले आहे.
वाडा चिरेबंदीबद्दल कित्येक वर्षांपासून ऐकत होतो. पण त्याचे प्रयोग बंद झाले होते. ह्या नाटकानंतर त्यांनी आणखी दोन नाटके, जी वाडा चिरेबंदी नाटकाचे पुढचे भाग अशा स्वरूपात लिहिले. दिवाळी पासूनच वाडा चिरेबंदी नाटकाची जाहिरात पाहत होतो. त्यातही ती जाहिरात या तीनही नाटकांचे सलग एकामागे एक असे प्रयोग. हे मला नवीनच होते. एखाद्या नाटकाची नाट्यत्रयी अथवा त्रिनाट्यधारा(trilogy) अशा स्वरूपात प्रयोग असा प्रकार कधी मी ऐकला नव्हता. चित्रपटांची trilogy असतात. जसे सत्यजित राय यांची Apu Trilogy, ज्याच्या बद्दल मी नुकतेच चित्रपट रसास्वाद शिबिरात ऐकले होते. मी मग पुढचा मागचा जास्त विचार न करता ह्या नाट्यत्रयीचा अनुभव घेण्यासाठी तिकिटे राखून ठेवली.
नाटकाच्या जाहिराती पाहून मला राहून राहून जयवंत दळवी यांच्या बॅरिस्टर या नाटकाची आठवण येत होती. जुन्या, पारंपारिक घरात घडणारे नाट्य असे स्वरूप असणार असे मनात चित्र तयार होत होते. एकाच विषयावरची तीन नाटकं सलग पाहायची म्हणजे शारीरिक आणि मानसिक तयारीची कसोटीच होती. तसे करणे म्हणजे एखादी महाकादंबरी एका बैठकीत वाचून काढण्यासारखे होते. त्यातच दिवाळीच्या सुमारास जुन्या पुस्तकवाल्याकडे डॉ. कमलेश यांनी १९९४ मध्ये संपादित केलेले ह्या नाट्यत्रयीवरील पुस्तक सापडले. मागील रविवारी मी ह्या नाट्यत्रयीचा (महा)अनुभव घेऊन आलो, त्याबद्दल येथे लिहावे म्हणून आज बसलो आहे.
नाट्यत्रयी मधील पहिले नाटक वाडा चिरेबंदी हे नाटक पाहताना मला राहून राहून माझ्या आजोळची, आजी, मामा, तेथील वातावरण, याचीच प्रकर्षाने आठवण येत होती. वाडा चिरेबंदी हे नाटक काय आहे? ही आहे कहाणी खेडेगावातील एका ब्राम्हण, पण शेतजमीन असलेल्या, कुटुंबाची. धरणगाव नावाच्या विदर्भातील एका गावातील देशपांडे नावाच्या वतनदाराच्या वाड्यात घडलेले हे नाटक. बऱ्याच दिवसात मस्त वऱ्हाडी बोली ऐकू आली. हे नाटक घडते ते पाच दिवसाच्या कालावधीत. कुटुंबप्रमुख, तात्या, यांचे निधन झालेले असते, चार-पाच दिवस झालेले असतात; घरात(वाड्यात) सुतक असते. मुंबई वरून त्यांचा एक मुलगा आणि त्याची पत्नी येतात, आणि दशक्रिया विधी होऊन, ते परत मुंबईस निघेपर्यंत जे त्या भावंडामध्ये, आणि इतर सदस्यांमध्ये आपापसात जे काही होते, त्याचे दर्शन होते. हे नाटक घडते तो काळ अर्थातच आजचा नाही. तो आहे, खाजगीकारण, उदारीकरण आणि जागतिकीकरण(खाऊजा) यांचे भारतात वारे वाहू लागण्याच्या पूर्वीचा. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक विजया मेहता यांनी त्यांच्या झिम्मा आत्मचरित्रात्मक पुस्तकात या नाटकासंबंधी लिहून ठेवले आहे. त्या महेश एलकुंचवार यांच्या वऱ्हाडातील घरी गेल्या होत्या, त्यांचा असाच मोठा वाडा होता, आणि इतर वातावरण तसेच होते. त्यामुळे या नाटकाच्या कल्पनेची बीजे तिथेच असावीत असे त्यांना वाटते.
तात्यांच्या निधनाने हा चिरेबंदी वाडा आता ढासळू पाहोत आहे. कारण काहीही असो, जवळ जवळ हेच प्रारक्त आहे त्या काळातील कुटुंबांचे. जुने जाऊन, नष्ट होऊन, नवीन निर्माण होण्याची प्रक्रिया ही अव्याहत चालूच असते. माझ्या आजोळी देखील असेच झाले. आम्ही देखील देखील गावातील शेतजमीन असणारे, कुळांकरावी ती कसून घेऊन त्यावर उपजीविका. नव्या जमान्याच्या रेट्यात सर्व जण इतस्तः पांगले, नवीन कुटुंबे थाटली गेली. वाड्यात जे कोणी राहत, त्यांनी कसे बसे जिवंत असे पर्यंत निभावून नेले, आत्ता तेथे कोणी राहत नाही, तो आता हळू हळू नष्ट होत जातो आहे. पण ह्या नाटकात मुल्यांची देखील ढासळ नाटककराने चित्रित केली आहे. तात्यांचा ज्येष्ठ पुत्र भास्कर घराची जी काही इस्टेट आहे ती आपल्याकडे ठेवू पाहत आहे. दुसरा पुत्र सुधीर हा मुंबईला जाऊन आपला वेगळा संसार थाटला आहे. पण त्याला देखील इस्टेटमध्ये वाटा हवा आहे. अजून दोन भावंडे, जी वाड्यात राहत आहे, त्यांचे आयुष्य दिशाहीन झाले आहे. तात्यांच्या सुतक काळात इस्टेट, तसेच श्राद्ध-खर्च कसा करायचा यावर कलह चालू आहे. सगळेच कसे अप्पलपोटे. माझ्या आजोळी एक दोन जण होते ते समंजस होते, आणि हा ऱ्हास थोपू पाहत होते. नाटककाराने हे असे दर्शवले असते, तर, आशेचा किरण असतो असे दाखवता आले असते. निवेदिता जोशी यांची वहिनी, वैभव मंगले याने साकारलेला भास्कर, आणि प्रसाद ओकने सादर केलेला सुधीर छानच. सर्वांचा अभिनय, ट्युनिंग मस्त जुळून आले आहे. वेशभूषा, नेपथ्य उत्तमच, अगदी त्या काळात(४०-५० वर्षांपूर्वीचा) घेऊन जाणारा. अगदी दारात बाहेरून आल्यावर पाय धुण्यासाठी दगडी टाकी देखील दर्शवली आहे, अगदी अशीच व्यवस्था माझ्या आजोळी देखील होती. एक मात्र राहिले, ते म्हणजे जुन्या काळातील रेडियो, जो माझ्या मामाकडे असे, आणि तो कायम धेऊन बसे, वाड्यात दिवे अर्थात नाही(कंदील लावण्याचा कार्यक्रम संध्याकाळी असतो).
ही नाट्यत्रयी साकार झाली पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात. तुडुंब गर्दी होती. बऱ्याच दिवसानंतर अशी गर्दी नाटकाला पाहायला मिळाली. ह्या नाट्यत्रयी बद्दल विविध लेख असणारे एक पुस्तक ज्याचे नाव आहे दायाद(त्याचे नुकतेच प्रकाशन झाले होते), त्याबद्दल थोडेसे नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी बोलले. ते म्हणाले, दायाद म्हणजे वारसा, जो महेश एलकुंचवार यांचा आवडता शब्द आहे. एका पिढी काढून पुढच्या पिढीकडे तो जायला हवा, आणि वारसा कोणता तर, फक्त सांपत्तिक नव्हे, तर विचारांचा देखील. वर म्हटल्या प्रमाणे डॉ. कमलेश यांचे पुस्तक याचं स्वरूपाचे आहे, पण त्याचा उल्लेख नाही झाला.
असो. धरणगावच्या ह्या चिरेबंदी वाड्यात पुढे काय मांडून ठेवले आहे, हे पुढच्या नाटकात पाहायला मिळते, ज्याचे नाव, जरा कोड्यात टाकणारे आहे-मग्न तळ्याकाठी. त्याबद्दल पुढच्या भागात, तेही लवकरच!
समीक्षेचा विषय निवडा
अं?
Permalink Submitted by नील लोमस on शुक्रवार, 01/12/2017 - 12:37.
पण मनोबा, त्रिधारेतल्या पहिले नाटकच पहिल्या धारेची मारल्याशिवाय कळत नसेल तर पुढची नाटके का पाहिलीत तुम्ही.
पहिलं नाटक व्यवस्थित समजण्यासारखं आहे. छान, मस्त आहे. दुसरंही उत्तम आहे. तिसरं डोक्यावरुन बाउन्सर जातं, असं मी वर लिहिलय.
पहिलं नाटक समजायला काहीही अडाचण नाही.
ह्या नाटकात मुल्यांची देखील
ह्या नाटकात मुल्यांची देखील ढासळ नाटककराने चित्रित केली आहे
ढासळ म्हणजे घसरण किंवा ऱ्हास असे म्हणायचे असले तर अशी काय मुल्यांची घसरण दिसली. मुळात जो माणुस मेलाय तो काय फार उच्च मुल्यांचा होता का?
म्हंजे शब्द कळतात, पण वाक्यं कळत नाहित
हे तर ऐसीवर फार कॉमन आहे. कधी कधी वाक्य कळतात पण काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. दोष माझाच आहे मनोबा. पण तुला तरी असले काहीतरी कळत असेल अशी माझी समजुन होती. पण तू पण माझ्यासारखाच निघालास.
दागिने आणि बायका
यांचं नातं मलाही फार वरवर वाटायचं.
विषेशत: लग्नानंतर प्रिय बऱ्या अर्धीशी यावर तुफान वाद झडले. माझ्या डोक्यात दागिने-सोने-शून्य इंट्रिन्सिक मूल्य-बंडल गुंतवणूक हे लॉजिकली हार्डवायर्ड फिट्ट झालेले, त्यामुळं मला कळायचंच नाही.
![]()
अनपेक्षित असा "लक्ष्मीपूजन" हा पद्मजा फाटकांचा लेख सामोरा आला. ( खरेतर लेडिज-बायकांच्या दिवाळीअंकात शोभेल असं शीर्षक असल्याने मी जरा सावध झालेलो होतोच, पण ह्या लेखामुळेच फाटकांचा फॅन झालो. ) एकेरीत येतो. दागिन्याशी असणारं पद्मजाचं नातं काय मोहक उलगडलंय तिनं. आपल्या समीकरणी डोक्याला हे समजणारं नातं नाही हे कळल्याने मी सपशेल हार मानली. प्रिय अर्धीला मात्र त्यानंतर एखाद्या दागिन्यासाठी मी अजिबात नाही म्हंटलं नाही. दागिने मोडणं, घडवणं, सोनाराकडच्या फेऱ्या ह्यांविषयी प्रिय अर्धी, आई, तिची आई अशा त्यांच्या त्यांच्या स्पेशल परंपरा आहेत यावर पूरेपूर सहमत.
![]()
पुढील वाचनासाठी : कुणाला इच्छा असल्यास दणदणीत शिफारस.
(खरोखर जाणून घेण्यात रस आहे
(खरोखर जाणून घेण्यात रस आहे म्हणून विचारतोय.)
हे सवतं लिहायची गरज नाही हो साहेब.
==================================
सुखवस्तु श्रोते अशी नाटकं पाहतात. त्यांची एक समाजाबद्दलची मानसिकता असते. प्रत्येक विचार, भावना अतिला नेऊन फालतू गोष्टींना नाट्यत्व दिलं आहे. शेवटच्या नाटकात तर तो दुष्काळातला सुखी माणूस इतका राजबिंडा घेतला आहे कि हसू येतं. अतिचं अति झालं नि हसू आलं.
ही आहे कहाणी खेडेगावातील एका
ही आहे कहाणी खेडेगावातील एका ब्राम्हण, पण शेतजमीन असलेल्या, कुटुंबाची.
आम्ही देखील देखील गावातील शेतजमीन असणारे, कुळांकरावी ती कसून घेऊन त्यावर उपजीविका.
>> पण आणि देखील शब्दाचा वापर रोचक आहे!
कुळकायद्यात जमीन गेली नाही का तुमची?
===
कारण त्यात जे शब्द, वाक्यं असतात ती अतिजडबोजड असतात.
आँ? असं कुणी बोलतं का? विशेषत: गावाकडलं?
कंटाळवाण्या, अगम्य, तत्वद्न्यानात्मक गप्पांनी गच्च भरलेलं.
हे तर ऐसीवर फार कॉमन आहे. कधी कधी वाक्य कळतात पण काय म्हणायचे आहे हेच कळत नाही.
>> लॉल बरोबर!
===
नाटकं डोक्यावरून जाणारे लेखन सादर करायचा मंच असतो आणि प्रेक्षकांसाठी फुशारकी मारण्यासाठी.
फुकट पास मिळाले तरी पाहात नाही. >> सहमत!
"आम्ही तुमच्या डोक्यावरुन जाणारे काहीतरी सादर करतोय" असा फक्त आविर्भाव असतो. >> कायकी!
===
सुखवस्तु श्रोते अशी नाटकं पाहतात. त्यांची एक समाजाबद्दलची मानसिकता असते. प्रत्येक विचार, भावना अतिला नेऊन फालतू गोष्टींना नाट्यत्व दिलं आहे.
>> करेक्ट! ते वर पिढीजात दागिने आणि बायकांचं नातं वगैरे जे लिहलंय त्यावरून येतं लक्षात!
त्रिनाट्यधारा
त्रिनाट्यधारेला मीही होतो. (http://www.aisiakshare.com/comment/162007#comment-162007)
पहिली दोन नाटकं जास्त आवडली. तिसरं तितकंसं (खरं तर अजिबातच) भावलं नाही. पहिल्या दोन्हींत तुलना करायचीच तर "वाडा चिरेबंदी" हे "मग्न तळ्याकाठी "पेक्षा किंचित उजवं वाटलं काही काही बाबतींत.
एलकुंचवारांचं लिखाण आणि नाटकं असं काहीही असलं तरी मुळात माझी अपेक्षा "हे काही आपल्याला झेपणारं नाही" हीच असते. कारण त्यात जे शब्द, वाक्यं असतात ती अतिजडबोजड असतात. बोलताना कुणीच ज्या भाषेत बोलणार नाहित असे ते शब्द. एक काल्पनिक उदाहरण-- संतापलेला माणूस "डोकं फिरलय माझं. मरशील तू." असं काही म्हणेल की "मी प्रक्षुब्ध झालो आहे. तुझा जीव घेण्याचा माझा मानस आहे. तुझ्या प्रारब्धात माझ्या हातनं मृत्यू लिहिलाय" असं काही म्हणेल? एलकुंचवारांच्या लिखाणात ही दुसऱ्या प्रकारची वाक्यं जास्त दिसली होती पूर्वी. "यातनाघर" नावाची त्यांची एकांकितका आणि काही लेख बघावेत.
सुदैवानं पहिल्या दोन्ही भागात जवळपास असं काहिच नव्हतं. अपवाद -- दुसऱ्या नाटकात भास्कर आपल्या मुलाला चिडून म्हणतो "प्रवाहपतितासारखा वागू नकोस्" आँ? असं कुणी बोलतं का? विशेषत: गावाकडलं?
शिवाय तो तीर्थयात्रेस निघालेला सर्वात धाकटा मुलगा. त्याचं मोठ्ठं स्वगत आहे, कितीही लक्षपूर्वक ऐकलं तरी काय बोलतोय तेच कळत नाही. म्हंजे शब्द कळतात, पण वाक्यं कळत नाहित. दीर्घ पल्ल्यच्या संवादात, एका कंटाळवाण्या सुरात तो म्हणतो " मला शोधायचय तळं. जणार आहे मी त्याच्या शोधात. ते असतं मग्न. जिकडं तिकडं ते असतं." वगैरे वगैरे. अजिबात काही समजलं नाही.
हे वगळता, पहिली दोन्ही नाटकं आवडली.
तिसरं नाटक "युगान्त" हे आख्खं असच होतं. कंटाळवाण्या, अगम्य, तत्वद्न्यानात्मक गप्पांनी गच्च भरलेलं. व्यापक, व्याप्त, अवकाश, पोकळी, ब्रम्हांड, वगैरे सतत शब्द वापरुन कुणी बोललं तर कसं वाटेल? हे तसच होतं. "जीवनाचा अर्थ काय. झालय सगळं भस्म. हीच तर नियती आहे. नियती आणि गती कुणाला चुकत नाहित. आपलं भागधेय, भाग्यविधान भावोक्त असतं" (अगदिच हेच नाहित पण बरऱ्याचशा) अशाच संवादांनी भरलेलं. तितक्या भागास कंटाळलो. एलकुंचवारांचच "यातनाघर" आठवलं.
.
ता.क. - दागिन्यांचा प्रवेश मलाही आवडला. दागिन्यांबद्दल महिलांना जे आकर्षण असतं ते निव्वळ "महागडी/मूल्यवान वस्तू" , किंवा "शोभेची वस्तू" इतकच नसतं, हे फारच छान,संयतपणे, 'साटल्या'ने मांडलय. त्या त्या घरात नव्या येणाऱ्या सुनेसाठी सुरुवातीचे काही दिवस अगदि पेश्शल असतात कुटुंबात मिसळून जायला. त्या कामात दागिने जणु त्या त्या घरातल्या आधीच्या स्त्रियांचे hall of fame असतात असं म्हणा, किम्वा काही वर्षांनी त्या त्या सुनेसाठी तो heritage walk असल्याचा अनुभव असतो. आपल्यापूर्वी ह्या घरात मालकिणीचा, एका घर सांभाळणाऱ्या यशस्वी आपल्या आधीच्या स्त्रीसोबतचा जणू तिच्यासाठी तो alumni connect असतो. एक साखळी तयार होत असते. आजे सासू कडून सासु कडे, सासू कडून सुनेकडे अशी ती परंपरा. एका अर्थी ह्यात पुरुषप्रधान व्यवस्थेची सोयही दिसते. अदरवाइज रक्ताच्या नात्यानं न जोडल्या गेलेल्या तीन पिढ्यातल्या,बाहेरच्या घरुन आलेल्या मुली त्या धाग्यानं जोडल्या जातात. भावनिक दृष्ट्या जवळ येतात.
पुरुष बाय डीफॉल्ट आजोबा, वडिल मुलगा अशा रक्ताच्या जोडलेले असतातच. घर मग असं जोडलं, बांधलं जातं.