Skip to main content

चल पुन्हा तळ्याच्या काठी

जांभळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले

थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फुंकर येता
पाण्यावर झुंबर फुटले

घनदाट शांतता इथली
तोलून थिरकत्या पंखी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले

नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
हलकेच धुके शिरशिरले

चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.

भांबड Sun, 08/04/2018 - 19:48

हि कविता पहाटेच्या वेळेपेक्षा सायंकाळ बोलेतो कातरवेळी चांगली खुलली असती, सक्काळ सक्काळ कदरुन जाण्याएवढा कोलाहल नसतो म्हणून वाटलं.

चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे

पुंबा Mon, 09/04/2018 - 13:54

अशा एखाद्या तळ्याच्या काठी
बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा
शोधीत थकून आली असते

या अनिलांच्या कवितेची आठवण झाली.
कविता आवडलीच.

अमुक Wed, 11/04/2018 - 04:54

तुमच्या कवितेतल्या वातावरणाशी साधर्म्य असलेली 'इथे' नामक शांता शेळकेंची कविता आम्हांला चवथीला पाठ्यपुस्तकात होती, तिची आठवण झाली. आभार ! ती कविता मला फार आवडे; विशेषत: शेवटची काही कडवी. आठवणीतूनच इथे देत आहे.

आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निजसाउली
मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी

आणिक पुढती झरा खळाळत खडकांतुन चालला
साध्या भोळ्या गीतामध्ये अपुल्या नित रंगला

काठीं त्याच्या निळी लव्हाळी डुलती त्यांचे तुरे
तृणांकुरांवर इवलाली ही उडती फुलपाखरे

खडा पहारा करिती भवती निळेभुरे डोंगर
अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर

दुर्मिळ ऐशी देई शांतता सदा मला हे स्थल
ऐकु न येई इथे जगाचा कर्कश कोलाहल

व्याप जगाचा विसराया मी येई इथे सत्वर
अर्ध्या मिटल्या नयनी बघते स्वप्ने अतिसुंदर

शांतविले मी तप्त जिवाला इथे कितीदा तरी
कितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी !

मारवा Tue, 17/04/2018 - 07:59

फार सुंदर तरल कविता !
आवडली.

कोवळे ऊन टिपताना
हलकेच धुके शिरशिरले

हे तर फारच सुंदर जमलय्

तिरशिंगराव Sun, 22/04/2018 - 11:19

अर्थातच आवडली. प्रतिसादात आलेल्या कविताही आवडल्या.