बैठकीची लावणी
गंध गंध प्रीतीचा खुळा!
कुस्करला फाया मनगटावरी पानाडीचा ॥
लई टाईम झाला, होता कुठं रातीला?
डोळं लावून बसली असंल तुमच्या वाटंला
मिस कॉल, एस्एमएस्, किती आलं जरा मोजा
देह जाळतो पहाटवारा, गंध प्रीतीचा खुळा!
दचकून कितीदा गेली असंल दाराला
म्हणं, कसा लागला डोळा बसल्या जागेला?
दार उघडून पाही लिफ्ट, व्हरांडा सुना
पदरामध्ये अश्रू निखळला, गंध प्रीतीचा खुळा!
कुठं उशीर झाला असंल? पुसावं कुणा?
कुणी असंल का गं, दुरून गुलाल उधळला?
नको बाई! चुकचुके पाल माझ्या बोलाला
कुठं शिवावा, जीव उसवला, गंध प्रीतीचा खुळा!
अगबाई! खरंच की आलं, हॉर्न वाजला
असणार वळीखलं त्यानी माझ्या उचकीला
मिचकावून डोळा हळूच चांदवा हासला
भेट भेटता भान हरवला, गंध प्रीतीचा खुळा!
चाल
आडवी तिडवी चाल लावून पाहिली पण कशातच बसत नाही ही लावणी.
बैठकीची लावणी लिहायला बैठक मारावी लागते बहुदा.