Skip to main content

भाषा

जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला?
तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला?

देव अथवा देश दोन्हीं कल्पना या माणसांच्या
व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला?

माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची
देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला?

रोज थोड्या मिळकतीने जुळवतो मी दोन टोके
कर नवे आकारण्याची सारखी भाषा कशाला?

मानतो मी एक बिंदू-मात्र आहे या जगी पण -
सूक्ष्मता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?

- कुमार जावडेकर

उज्ज्वला Tue, 26/02/2019 - 16:37

शेवटून दुसरं कडवं घालून बाकी कवितेची उंची पार खुजी करून टाकलीत ! इतरत्र मनुष्य स्वभाव / वृत्तीवरचं भाष्य आहे आणि इथे एकदम सरकारी धोरणधुरंधरांवर !!