Skip to main content

बोडण

माझ्या लहानपणी वेटाळातल्या बायका
सतत मानगुटीवर बसून
नियमांचे उपदेश घोकायच्या
डाव्याने वाढू नको- उजव्याने काढू नको
हिला कुंकू लाव- पण तिला लावू नको!
केसांची बट आवर !
गुडघ्यांवर झगा सावर !
हरतालिकेला पत्री आण!
संक्रांतीला देऊन ये वाण !

एरवी कांदेनवमीला झुणका-भजी,
चैत्रात डाळ पन्हं मटकावणाऱ्या खादाडणी
कधीतरी प्रायश्चित्तासाठी घालणार
एक अघोरी प्रकार-
बोडण!

पितळी परातीत अन्नाचं कालवण
पुरणपोळीवर दही, दह्यावर वरण!
माझ्या सूप्त बुलीमियाचं कारण!
काल्यात एकदा हात घातला,
की जाता जात नाही पंचपक्वांनांचंही जेवण.

बायकांचे देहाला जडलेले सोस
त्यांनाच मोडून काढायला लावायचे
भोगू द्यायची नाही
ओटीपोटातल्या विवराची भूक
दुधाच्या पातेल्यावरची साय चोरू
न ओरबाडतांना
शमलेला त्या भुकेचा आनंद!

फराळाच्या वेळी
नेमकी पाळी
ह्यांचं मचामचा चावत
बोलणं कानीकपाळी -
खाखा नको- त्रास होईल !
वजन उतरवा - बास होईल !

आईस्क्रीमचा टबात बुडवणे ह्रदयभंग
अलिप्त थंडगार शिस्तीत
लाड असे सवंग!
आमच्या वेळी येतच नव्हते हे प्रसंग!

आताच्या पोरींना रस्त्यावरच्या चाऊमेन चा
भरून घेता येत असेल
नाकपुडीभर श्वास
कदाचित करतही असतील त्या आता
फक्त स्वत:साठी
रोजे. लेंट. निर्जळी उपवास.

सामो Thu, 18/04/2019 - 22:40

कविता आवडली. लहानपण खूप परावलंबी असते. सतत कोणाचा ना कोणाचा उपदेश ऐकावा लागतो, त्या त्या व्यक्तीला योग्य वाटेल असे वागण्याचे आपल्यावर निर्बंध येतात परत 'हे सगळं तुझ्या भल्याकरता' असे ऐकून घेउन ,ते सहन करावे लागते.

भोगू द्यायची नाही
ओटीपोटातल्या विवराची भूक
दुधाच्या पातेल्यावरची साय चोरून ओरबाडतांना
शमलेला त्या भुकेचा आनंद!

:( :(