Skip to main content

डॉ. श्रीराम लागू

Dr. Shriram Lagoo

डॉ लागू

आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो. डॉ श्रीराम लागू यांच्या जाण्याने माझ्यासाठी या भावनेची एक वरची, मोठी पायरी ओलांडली गेली.

मी नाटक पहायला लागलो, किंवा मला नाटकं पहाण्याची अक्कल आली; त्याच्या अगोदरपासून डॉ लागू नाटकं करत होते. रंगायनमध्ये विजया मेहतांबरोबर (तेव्हा त्या विजया खोटे असणार) त्यांनी केलेल्या प्रयोगांची माहिती मला ऐकून वाचूनच आहे. ‘खुर्च्या’ किंवा ‘अजगर आणि गंधर्व’ या एकांकिकांमधला त्यांचा अभिनय मी पाहिलेला नाही. इतकंच काय, ‘मी जिंकलो मी हरलो’ हे बऱ्यापैकी चाललेलं नाटकही मी पाहिलं नाही. जरी मी अगदी शाळकरी वयात, चौथी पाचवीत नाटकं बघायला लागलो, तरी. मी तेव्हा मुंबईच्या गिरणगाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कामगारवस्तीत रहात असे. आमच्या घरापासून नायगावातलं ‘रंगमंदिर’ हे उघडं नाट्यगृह चालत जाण्याच्या अंतरावर होतं. तिथे दर वर्षी, बहुधा याच दिवसांत ‘चिंतामणराव कोल्हटकर नाट्यस्पर्धा’ होत असे. आम्हीच नव्हे, तर काही इतर शेजारीसुद्धा या स्पर्धेचा ‘पास’ काढत, ज्यामुळे मला रात्री घरी परत येताना सोबतही मिळत असे. तेव्हा राज्यनाट्यस्पर्धा सुरू झाली नव्हती आणि या स्पर्धेचा स्तर चांगला होता.

पण लागूंचं मी पाहिलेलं पहिलं काम कोणतं, हे मला सांगता येणार नाही. त्यांची पुष्कळच नाटकं पाहिली. कालानुक्रमे सांगण्याचा प्रयत्न करत नाही; जसं आठवेल तसं लिहीत जातो.

‘वेड्याचं घर उन्हात’ हे बहुधा पहिलं असावं. अभिनयातले बारकावे निरखून त्यात डावंउजवं ठरवण्याइतकं भान मला आलं नव्हत; पण नाटकाशी समरस व्हायला काही आडकाठी नव्हती. हे, मला वाटतं, वसंत कानेटकरांचं दुसरं नाटक असावं. पहिलं, ‘देवांचे मनोराज्य’ पहाण्याचा योग आला नाही. ‘वेड्याचं घर उन्हात’ हे कानेटकरांच्या संदर्भात सरळ सरळ प्रायोगिक नाटक होतं. एका सुखवस्तूच नाही, तर त्यापेक्षा वरच्या आर्थिक स्तरावर पोचलेल्या माणसाला एक खोल बोच असते, ती म्हणजे स्वत:च्या लहान भावाला घरातून हाकलून दिल्याची. त्या लहान भावाचं भूत त्याला वेळोवेळी छळत असतं आणि प्रत्येक वेळी लहान भाऊ भिकाऱ्याच्या, भणंगाच्या रूपात समोर येत असतो. आपण इथे श्रीमंतीची सगळी सुखं उपभोगत आहोत पण या क्षणी भाऊ कुठे, कसा असेल; उपाशी असेल का, त्याच्या डोक्यावर छप्पर असेल का, हे प्रश्न त्याला त्रास देतात आणि सगळं सुख कडू करून टाकतात. अशा वेळी तो भाऊच घरी येतो! पण तो मुळीच गरीब राहिलेला नसतो. त्याची सांपत्तिक स्थिती चांगली असते आणि भावाने घराबाहेर काढलं म्हणून त्याला अजिबात राग नसतो.

याचा स्वीकार करणे, हे या माणसाला जमत नाही. मनातल्या अपराधगंडातून सुटका होण्याऐवजी तो भावाला ओळख द्यायचंच नाकारतो आणि वास्तवाचा भक्कम आधार सोडून अधिकाधिक प्रमाणात स्वत:च्या दु:स्वप्नरंजनात गुरफटत जातो. जणू त्याच्या जगण्यातला वैभवाकडे झुकलेला ‘अन्याय्य’ तोल सांभाळण्याचं काम तो अपराधगंड करत असतो आणि त्याच्या मनाला स्वास्थ्य देत असतो.

लागूंना मराठी नाटक चाहते आता इतकी वर्षं पहात आले आहेत की ही तर त्यांची हातखंडा भूमिका होय, असं म्हणून हात झटकण्याची प्रतिक्रियासुद्धा येऊ शकेल. पण ही व्यक्तिरेखा सरळसोट नाही आणि ती विश्वसनीय करण्यासाठी सुुरुवातीपासून एक बेअरिंग सांभाळावं लागलं असेल आणि ते बेअरिंग ढोबळ होण्यातून सगळा विचका झाला असता, इतका विचार आपण करू शकतो.

लागूंच्या कोणत्या आठवणी काढाव्यात? एकेक नाटक घेण्यापेक्षा लक्षात राहिलेले काही क्षण आठवावेत. उदाहरणार्थ, एलकुंचवारांच्या ‘गार्बो‘मध्ये गार्बो त्यांना, म्हणजे ‘इंटुक’ला त्वेषाने म्हणते, “तू भेकड आहेस!” आणि तो उत्तरतो, “मला माहीत आहे.” उसाच्या कांड्यातून रसाचा अगदी शेवटचा थेंब काढून पार चिपाड शिल्लेक ठेवावं, तसा सगळा नाटकीपणा वजा करून आधीपासूनच पडलेले असलेले खांदे घेऊन कोरड्या, एकसुरी आवाजात विनाविलंब दिलेलं हे उत्तर मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. अभिनय म्हणजे ‘नाटकीपणा’ नव्हे, अभिनय म्हणजे पात्र जिवंत करणे; सगळ्या गुणदोषांसह, सुसंगती-विसंगतींसह नाटककाराने निर्माण केलेलं पात्र प्रेक्षकाच्या गळी उतरवणे, हे नटाचं काम. ही जाण मला आली, हे लागूंचे उपकार.

‘गिधाडे’ हे तेंडुलकरांचं एक अत्यंत भडक नाटक. मुख्य पात्रांचा भडकपणा प्रेक्षकाला भाजल्यासारखा सणसणीत जाणवावा म्हणून दोन नॉर्मल पात्रं इतरांच्या विकृतीच्या आगीत पोळत ठेवलेली. लागू अर्थातच नॉर्मलांपैकी नव्हेत. त्यातला आठवणारा क्षण म्हणजे होंडुरचा राजा मेला आणि आपल्या ब्लॅकमेलिंगच्या कचाट्यातून सुटला, हे सहन न होणारा रमाकांत उठतो आणि उमाकांतला म्हणतो, ‘होंडुरचा राजा मेला नाही! तो जिवंत आहे! तिच्या पोटात जगतो आहे!’ असं म्हणून दोघे भाऊ सख्ख्या बहिणीच्या पोटावर लाथा घालून तिचा गर्भपात करतात. या कृत्याची स्पष्ट पूर्वसूचना लागूंनी रंगवलेल्या रमाकांतच्या उद्गारांमधून मिळते. मुळात हे नाटक पहाताना इतर प्रेक्षकांप्रमाणे मीसुद्धा भयंकर तणावाखाली होतो. तशात ही पूर्वसूचना मला अगदी उघडच जाणवली. आणि पुन्हा अंगावर काटा आला.

असा अनुभव प्रेक्षकाला देण्यासाठी लागूंना आवाज चढवण्याची, गर्जना करण्याची, नाटकी, प्रक्षोभग्रस्त अविर्भाव करण्याची गरज पडत नव्हती. अर्थात, हे ते लीलया, विनासायास करत असं मानण्याचं कारण नाही. वेळ पडली तर नाट्यगृह गदगदा हलवून सोडणारं ‘नाटय’ रंगवण्याची क्षमता त्यांच्यात होतीच. ‘नटसम्राट’ बघून तृप्त झालेले असंख्य्र नाट्यचाहते याची साक्ष देतील. ‘नटसम्राट’मध्ये मराठी मध्यमवर्गाला प्रिय असलेली जवळ जवळ सगळी ‘जीवनमूल्यं’ आहेत. एक मॅनरबिनर नसलेला पण नातीवर जिवापाड प्रेम करणारा म्हातारा. एखाद्या अस्सल पतिव्रतेप्रमाणे त्याचे सगळे गुणदोष पोटात घेऊन, त्या गुणदोषांना दागिन्यांसारखं मिरवणारी त्याची बायको. नटाला साजेसा बाहेरख्यालीपणा करून ‘कितीही देश फिरलो तरी शेवटी याच बंदराला लागणार आमची बोट’ अशापैकी डायलॉग मारणारा हा नवरा बायकोच्या मरणाने उद्ध्वस्त होतो. हे कमी म्हणून की काय, मराठी साहित्याला परमेश्वरासम वाटणाऱ्या शेक्सपिअरची एकापेक्षा एक भारदस्त, प्रक्षोभक, भाषिक अलंकारांनी नटलेली स्वगतं. आणि अशा या नटसम्राटाची किंमत ओळखू न शकणाऱ्या त्याच्या आप्तस्वकीयांना शरम वाटायला लावणारा एक सामान्य बूटपॉलिशवालासुद्धा आहे. ‘नटसम्राट’ हा एक मेलोड्रामा आहे, फक्त‍ तो कोल्हटकरी मेलोड्रामा नसून शिरवाडकरी मेलोड्रामा आहे. आणि त्याला भव्यत्वाचा आभास देणारे लागू आहेत.

आता ‘होते’.

शांता जोग यांच्या ‘कावेरी’चं योगदान मान्य करूनही ‘नटसम्राट’ हे नाटक लागूंच्या गणपतराव बेलवलकर या व्यक्तिरेखेवर उभं होतं, हेच खरं. लागूंच्या नंतर दत्ता भट आणि इतरांनी ‘नटसम्राट’ केला, समर्थपणे केला, लागूंची नक्कल न करता केला; पण लागूंनी एक मानदंड निर्माण केला आणि इतरांच्या क्षमतेला प्रेरणा देईल, असं आव्हान निर्माण केलं, हे तर खरंच.

खास लागूंचं असं आणखी एक नाटक आठवतं. मोहन राकेशचं ‘आधे अधूरे’. दिग्दर्शक सत्यदेव दुबे. काय कास्ट होती! लागू, ज्योत्स्ना कार्येकर, अमोल पालेकर आणि भक्ती बर्वे. मी अशा वयात हे नाटक पाहिलं, की मला ते परिपूर्ण वाटलं. हे एक कुटुंब. मध्यवर्ती व्यक्तिरेखा स्त्रीची. तिला दोन मोठी मुलं. आणि तिच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व पुरुषांचं काम करणारे लागू. दोन तीन वेळा तरी पाहिलं मी हे नाटक. नंतर मूळ हिंदी पाहिलं. त्यात अमरिश पुरी होता. पण मला लागूच सरस वाटले.

इथे ओशाळला मृत्यू, काचेचा चंद्र, सूर्य पाहिलेला माणूस, प्रेमाची गोष्ट, ... लागूंनी अनेक प्रकारची अनेक नाटकं केली. ते उत्तम नट असण्याबरोबर इमानदार नटही होते. नाटकाच्या प्रयोगांची संख्या जशी वाढू लागते, तसं नाटक दिग्दर्शकाच्या ताब्यातून निसटतं आणि नटांचं होऊन जातं. लागूंनी तसं कधी होऊ दिलं नाही. कितीही प्रयोग झाले तरी त्यांची नाटकाशी असलेली बांधिलकी पातळ झाली नाही. त्यांचा अभिनय वेळ मारून नेणारा, टाळी पकडणारा झाला नाही.

विक्रम गोखले आणि विनय आपटे, दोघेही मला लागूंचे डेरिवेटिव्ज वाटतात. हे दोघेही स्वत: चांगले, कल्पक आणि दमदार नट असल्याकारणाने लागूंच्या छायेतून बाहेर पडले आणि स्वत:ची अशी स्वतंत्र शैली दोघांनी निर्माण केली. कदाचित माझ्या वयाचा दोष असेल, रंगमंचीय अभिनयाच्या आठवणीच तेवढ्या मागे रहातात, हे कारण असेल; मला मराठी रंगभूमीवरच्या अभिनयपद्धतीचे दोन भाग दिसतात: एक लागूपूर्व आणि एक लागूपश्चात. लागूंच्या नंतर रंगभूमीवर जो कोणी आला, तो लागूंच्या संयतपणाचा, अंडरस्टेटमेंटचा, आवाज वा अंगविक्षेप वा हालचाली यांच्यावर जोर देणं शक्यतो टाळण्याचा प्रभाव नाकारूच शकलेला नाही. परिणामी अभिनयाच्या कितीही पठड्या निर्माण झाल्या, तरी प्रत्येकात कुठेतरी, कुठल्यातरी प्रमाणात लागू होतेच. याचा एक विचित्र परिणाम असा झाला की खुद्द लागूंचाच अभिनय काहींना घिसापिटा वाटू लागला! त्याला अगदी गुळगुळीत नाही म्हटलं, तरी ‘एवढं कौतुकं करण्यासारखं काय आहे यात?’ अशी प्रतिक्रिया सहजी उमटू लागली. कारण लागू जे करत होते, ते आता सगळीचकडे दिसू लागलं होतं. पण अभिनयात हा प्रौढपणा - ही मॅचुरिटी लागूंनीच आणली होती. त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर नंतर सगळेच चालू लागल्याने वाट मळलेली दिसू लागली!

डॉ. श्रीराम लागू म्हणजे नाटकातला नट. त्यांनी सिनेमात कामं केली आणि सामना, पिंजरा, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमधलं त्यांचा काम लक्षणीय होतं, हे जरी खरं असलं तरी लागू म्हणजे नसिरुद्दीन शहा नव्हेत की नाटकापेक्षा त्यांचा सिनेमा जास्त ठळकपणे आठवावा. तरी त्यांनी चित्रपट हे माध्यम सहजी आत्मसात केलं, हे खरं. हिंदी चित्रपटात लागू ‘भव्य’ नाही झाले; पण त्यांचा दरारा होता. मी ऐकून आहे की ते तासावर पैसे घेत आणि ठरलेल्या वेळी सेटवर हजर होऊन शांतपणे वाचत बसत. मीटर चालू! मस्करी नाही; पण लागूंनी कुठल्या दिग्दर्शकाची, नटाची, निर्मात्याची शेपटी धरलीय आणि कमाई देणार्‍या भूमिका मिळवल्यात, असं चुकूनही कानावर आलं नाही. एका मराठी नटाचा देशपातळीवरच्या सिनेमात असा वचक होता, ही गोष्ट आपल्यासाठी सुखावणारीच!

आणखी एक. डॉ. लागू अंगचोर नव्हते. आपण मास मीडियात आहोत, आपली लोकप्रियता आपली कमाई ही लोकांमध्ये आपल्याबद्दल किती अनुकूल मत आहे, यावर अवलंबून आहे, या गणितावर लोकभावनेला दुखावण्यापासून दूर रहाण्याबद्दल त्यांची ख्याती नव्हती. त्यांनी आणि निळू फुलेंनी सामाजिक कृतज्ञता निधीसाठी काय केलं, याच्या कहाण्या ऐकू येतातच; लागू तर त्यापुढे गेले. ‘परमेश्वराला रिटायर करा’ असा, एक प्रकारे लोकांची मुद्दाम खोडी काढणारा लेख त्यांनी वर्तमानपत्रात लिहिला. पुन्हा यामागे खळबळ माजवणे, लक्ष वेधून घेणे, असला उद्देश नव्हता. त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं की ‘परमेश्वर’ ही संकल्पना समाजासाठी उपकारक असण्याऐवजी अपकारक ठरते आहे. आणि तसं वाटल्यावर आपलं म्हणणं लोकांसमोर मांडायला ते कचरले नाहीत.

स्वत:च्या मूल्यांशी इमानी रहात जीवनात यशस्वी होणारे लागूंसारखे लोक नवोदिताला दीपस्तंभासारखे असतात. डॉक्टर श्रीराम लागू अमर रहे!

बातमीचा प्रकार निवडा

गवि Wed, 18/12/2019 - 17:16

आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो.

वाक्य मार्मिक आहे. लेख समयोचित.

आदरांजली.

'न'वी बाजू Thu, 19/12/2019 - 00:52

In reply to by मारवा

(हा प्रतिसाद मारवाश्रींच्या या प्रतिसादास उपप्रतिसाद म्हणून दिलेला आहे.)
..........‌.
@मारवाश्री:

(दुवा.)

नाही म्हणजे, आपण वर जे लिहिलेत, ते आपले प्रामाणिक मत असू शकेलही. (आणि कदाचित त्यात तथ्य असू शकेलही - मला कल्पना नाही; आणि निदान या मुद्द्यावरून तरी तुमच्याशी वाद घालण्यात मला स्वारस्य नाही. माहितीअभावी म्हणा, किंवा मताअभावी म्हणा. सबब, आपल्या म्हणण्यातील तथ्याबद्दल मला वन वे ऑर द अदर काहीच प्रतिपादन करायचे नाही.)

मात्र, आता ते आपणांत नाहीत, म्हटल्यावर, बाकी काहीही न म्हणता, 'चला, आता त्यांच्याबद्दल चांगले लिहिण्याची सोय झाली', एवढेच मतप्रदर्शन करण्याचे किमान सौजन्य जर आपण दाखविले असतेत, तर ते सार्वजनिक शिष्टाचारास धरून झाले असते, तथा त्याचबरोबर आपलाही कार्यभाग साधला असता; अशा रीतीने एकाच दगडात दोन पक्ष्यांची शिकार पदरी पडली असती. तरी इतःपर नोंद घ्याल, अशी आशा आहे.

इत्यलम्|

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/12/2019 - 07:33

लेख आवडला. विशेषतः लागूंचा अभिनय घिसापिटा का वाटत असे, ह्याबद्दल तुमचं मत रोचक वाटलं. माझ्या वयाचा परिणाम असल्यामुळे मला लागू फार परिणामकारक वाटले नाहीत; पण त्याचा 'दोष' विक्रम गोखले आणि विनय आपटेंवर लादता येईल.

त्यांचं मत 'परमेश्वराला रिटायर करा' पटलं नाही तरी त्यामागचा त्यांचा प्रामाणिकपणा जरूर पटला.

चिमणराव Thu, 19/12/2019 - 08:13

"माझ्या अभिनयापेक्षा दीपा'चा अभिनय अधिक आवडायचा प्रेक्षकांना" हे वाक्य वाचल्याचं आठवतय आत्मचरित्रात. त्यांनी केलेल्या किलिमांजरो पर्वताचे (५००० मि) ट्रेकिंग हाइकिंग विशेष आवडले होते.

'न'वी बाजू Thu, 19/12/2019 - 10:33

@३_१४ विक्षिप्त अदिती:

लेख आवडला. विशेषतः लागूंचा अभिनय घिसापिटा का वाटत असे, ह्याबद्दल तुमचं मत रोचक वाटलं.

मारवाश्रींचे मत मलाही रोचक वाटले. किंबहुना, त्यावर मी जी प्रतिक्रिया दिली, त्यातून त्यांनी आपला प्रतिसाद खारिज करावा असा माझा उद्देश नव्हता, तशी इच्छा तर नव्हतीच नव्हती. त्यांचे मत मला अत्यंत प्रामाणिक (ऑल्दो, या लेखावरील प्रतिसादांच्या माहौलात किंचित विसंवादी) वाटले. त्या विसंवादाला विरोध अर्थातच नाही. आणि, त्यांच्या मतात कदाचित तथ्यही असू शकेल, हे लक्षात घेता, त्या प्रामाणिक (आणि खरे तर अत्यंत संयत शब्दांत मांडलेल्या, अल्बीट विसंवादी) अभिव्यक्तीस आक्षेप घेण्याचे खरे तर काहीच कारण दिसत नाही; शिष्टाचार बी डॅम्ड.

किंबहुना, माझ्या प्रतिक्रियेचा रोख त्यांच्या प्रतिसादाकडे नव्हताच. रादर, प्रस्तुत लेखावरच्या प्रतिक्रियांच्या माहौलाकडे त्यांच्या प्रतिसादाच्या खांद्यावरून मारलेली कोपरखळी होती ती. जो तथाकथित शिष्टाचार केवळ संबंधित व्यक्ती नुकतीच दिवंगत झाली, या कारणास्तव, 'पण ते अत्यंत भिकार नट होते ना!' अशा (फॉर व्हॉटेवर रीज़न झालेल्या, परंतु प्रांजळ) मताची राजनग्नत्वघोषणा करू देत नाही, उलट 'छान छान' अशीच प्रतिक्रिया देणे भाग पाडतो, त्या शिष्टाचाराची ती खिल्ली होती. ('चला, आता त्यांच्याबद्दल चांगले लिहिण्याची सोय झाली' या वाक्याच्या पोटात, 'त्यांची एरवी जर मी प्रशंसा केली असती, तर लोकांनी मला वेड्यात काढले असते, परंतु आता त्यांची प्रशंसा करून, मृताबद्दल वाईट बोलू नये या शिष्टाचाराआड मला दडता येते' हा गर्भितार्थ आहे.) हे उकलून सांगावे लागेल, असे खरोखरच वाटले नव्हते. आणि म्हणून, मारवाश्रींच्या प्रतिसाद खारिज करण्यामुळे वाईट वाटले.

..........

असो. लागूंबद्दल, त्यांच्या अभिनयाबद्दल माझी बरी किंवा वाईट अशी कोणतीच मते नाहीत. त्यामुळे, लेखातील कंटेंटबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. मात्र, लागूंच्या मृत्यूनंतर ज्या त्वरेने हा लेख आला, त्याबद्दल आश्चर्य तथा कौतुक वाटते. इतक्या कमी वेळात इतका सविस्तर तथा वेल-डिफाइन्ड लेख लिहिणे हे येरा गबाळाचे काम नोहे.

(अवांतर: अनेक वर्तमानपत्रे प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्युलेखाचा आराखडा तयार ठेवतात, नि आयत्या वेळेस काही बारीकसारीक तपशिलांची त्यात भर घालून छापून देतात, असे ऐकून आहे. असो.)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/12/2019 - 03:58

In reply to by 'न'वी बाजू

मारवाश्रींचा प्रतिसाद मलाही पटला नव्हता आणि त्यांनी तो काढून टाकणंही पटलं नाही. मात्र त्याची आठवण माझ्या प्रतिसादासंदर्भात का व्हावी?

लोकांनी डोक्यावर घेतलेला अभिनेता आणि प्रामाणिक माणूस आपल्याला नट का वाटत होता, ह्याची एक शक्यता लेखामुळे समजली. एवढंच. किमान आता तरी लागूंच्या अभिनयाकडे मी निराळ्या नजरेनं, स्वच्छपणे बघण्याचा प्रयत्न करेन.

प्रकाश घाटपांडे Thu, 19/12/2019 - 11:35

‘परमेश्वराला रिटायर करा’ असा, एक प्रकारे लोकांची मुद्दाम खोडी काढणारा लेख त्यांनी वर्तमानपत्रात लिहिला. पुन्हा यामागे खळबळ माजवणे, लक्ष वेधून घेणे, असला उद्देश नव्हता.>>>> बरोबर! हे टायटल श्रीराम लागूंचे नव्हते. मटा च्या संपादकाने सनसनाटी शीर्षक दिले आहे. म्हणजे तेवढाच टीआरपी वाढतोय

तिरशिंगराव Fri, 20/12/2019 - 11:31

लेख आवडला, लागूंच्या अभिनयातल्या काही मर्यादा लक्षांत घेऊनही, मला त्यांचा अभिनय आवडायचा कारण त्यांचा प्रयत्न प्रामाणिक वाटायचा. पण,

विक्रम गोखले आणि विनय आपटे, दोघेही मला लागूंचे डेरिवेटिव्ज वाटतात
हे वाक्य काही पटलं नाही.
विक्रम गोखले हे सतत, सहज, नैसर्गिक अभिनयाचा अभिनय करतात, असे मला कायम वाटत आले. विनय आपटेला तर मी शाळेपासून ओळखतो. त्याचा अभिनय मला कधीच आवडला नाही. असो. हे माझे वैयक्तिक मत.

प्रभाकर नानावटी Fri, 20/12/2019 - 15:50

लेख आवडला.
गो .पु. देशपांडे यांच्या उध्वस्त धर्मशाळा या नाटकातील लागूंच्या अप्रतिम अभिनयामुळे ते नाटक अजूनही स्मरणात आहे.
त्यांच्या सक्रीय पाठिंब्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला बळ मिळाले.
.

सामो Fri, 20/12/2019 - 23:22

डॉ लागू यांच्या अभिनयाची फॅन मीही नव्हते. त्यांचे व्यक्तीमत्व सुद्धा इतके ठाशीव, ठळक एका छापाचे व तेही अनायकी होते की बहुतेक त्यामुळे त्यांच्या वाट्याला नायक वगैरे भूमिका फारशा आल्या नसाव्यात. पिंजरामध्ये जरी मध्यवर्ती अर्थात नायकाची भूमिका असली तरी तीही पारंपारीक नायकाची नव्हतीच. त्यामुळे त्यांचे स्वत:चे व्यक्तीमत्व त्यांच्या काही भूमिकांत (नटसम्राट?) बलस्थान ठरले असले तरी बऱ्याच भूमिकांत लंगडेपण ठरले असल्याचे असू शकते.

चिमणराव Sat, 21/12/2019 - 06:55

नटाला फक्त बुलंद आवाज आणि पाठांतर लागते. बाकी नाट्य कथानक, घडामोडी, त्यावर पात्रे कशी वागतात हेच प्रेक्षकांना आवडते, नाटकास तरून नेते.