Confession
anant_yaatree
रोज तो जुळवून अपुली
एक कविता ठेवतो
वृत्त-मात्रा-अर्थ-लय-
-छंदात दुनिया विसरतो
स्थळ नि काळाचा जगाला
अटळ छळ जो जाचतो
मात त्याला देऊनी तो
बहुमिती ओलांडतो
जे न दिसते रविस तेही
मिटुनी डोळे पाहतो
काव्य अन् शास्त्रामधे तो
क्षण नि प्रतिक्षण डुंबतो
कल्पनांचे भव्य इमले
सुबकसे तो बांधतो
(मी तयांची द्वारपाली
आपखुशीने निभवितो)
शब्द धन मोजून अविरत
थकून कधि तो थांबतो
(मी ही त्या दुर्मिळ क्षणाची
वाट गुपचूप पाहतो)
आजवर कोणा न कथिले
तेच आता सांगतो
कल्पना उचलून त्याच्या
मीच कविता प्रसवितो
.
.