Skip to main content

गोष्टीवेल्हाळ लेखकाने बेमालूम रचलेल्या कथा

गोष्टीवेल्हाळ लेखकाने बेमालूम रचलेल्या कथा

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट - सतीश तांबे

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट - सतीश तांबे

मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी

सतीश तांबे यांचे आत्तापर्यंत पाच कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांची शीर्षकं - १) राज्य राणीचं होतं २) माझी लाडकी पुतना मावशी ३) रसातळाला ख.प.च. ४) मॉलमध्ये मंगोल ५) ना. मा. निराळे. ही शीर्षकं पाहिली तरी लक्षात येतं की यातल्या कथा आगळ्यावेगळ्या असणार! अलीकडेच रोहन प्रकाशनने त्यांचा सहावा “मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट” हा गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या पाच कथांचा संग्रह प्रकाशित केलाय. त्यांच्या इतर प्रकाशनाप्रमाणेच हेही एक सुबक आणि सुंदर प्रकाशन आहे. यात चार दीर्घकथा आहेत तर उरलेली पाचवी तुलनात्मकदृष्ट्या लहान आहे. पहिल्याच ‘यत्र-तत्र-सावत्र’ या कथेत माणूस गर्वाने सांगत असलेल्या ईश्वरदत्त जमिनीवरच्या मालकीतला फोलपणा उघड केलाय, ‘नाकबळी’ या दुसऱ्या कथेत स्त्रीपुरुष संबंधांतल्या लैंगिकतेचं अनोखं परिमाण समोर आणलं आहे, तिसऱ्या ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ या कथेतून समाजातल्या सांस्कृतिक विभिन्नतेचा साहित्यिक अंगाने आढावा घेतला आहे, चवथ्या ‘संशयकल्लोळात राशोमान’ या कथेतून सत्य ही एक अगम्य गोष्ट आहे याची प्रचिती आणून दिलीय तर पाचव्या ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ या कथेत पाच पांडव आणि द्रौपदी या पौराणिक कथेला आधुनिक परिवेषात सादर करून त्यातून माणसाच्या भटकेपणाच्या प्रवृत्तीचा वेध घेण्यात आलाय.

सतीश तांबे यांना गोष्टी सांगण्याची हौस आहे. तुम्हाला सांगणार आहे मी ही गोष्ट, ही झाली केवळ माझ्या नावाची गोष्ट, तर ही गोष्ट आहे एका तांड्याची (रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा), गोष्ट सांगायला कुठून सुरुवात करावी (संशयकल्लोळात राशोमान), मालसामग्री घेऊन नवीन गोष्ट रचायची, तशी ही आपली पहिलीच गोष्ट (मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट), लहानपणच्या गमतीशीर गोष्टींतदेखील, रामाच्या वनवासाची गोष्ट आठवायची, ध्रुवबाळाची गोष्ट हमखास आठवायची (यत्र-तत्र-सावत्र) असे अनेक “गोष्ट”संदर्भातले स्पष्ट निर्देश दिसतात, तर गोष्टीला समानार्थक असलेले कथा, कथानक, कथावस्तू, कथावास्तू, प्लॉट हे शब्दही पुष्कळ वेळा येतात. या गोष्टीवेल्हाळ कथाकाराने बेमालूम रचलेल्या कथा आहेत; आणि त्या तितक्याच वास्तवदर्शी आहेत.

या कथांतून समाजातल्या विविध थरांमधल्या लोकांच्या जीवनातल्या संघर्षांचा, अडीअडचणींचा, समस्यांचा, नात्यांमधल्या ताणतणावांचा नेमकेपणाने वेध घेण्यात आलाय. लैंगिकतेविषयी मोकळेपणाने, आडपडदा न ठेवता बोलणारे तरुण-तरुणी इथे आहेत. किंवा, या कथासंग्रहातल्या कथांचे नुसते गोषवारे पाहा : मावशी हीच सावत्र आई असल्याने ती आणि तिचा सावत्र मुलगा यांचे मध्यमवर्गीय पार्श्वभूमीवरचे अवघडलेले संबंध आणि नंतर मुलगा बंगलेवाला बनत जाताना सावत्रपणाच्या भावनेला बळी पडताना रडू लागतो; नाट्यसंस्था चालवताना इतरांना अज्ञात असलेले आपापसांतले गुप्त संबंध मर्यादित स्वरूपात उघड होतानाही सत्य बहुतेकांना अज्ञातच राहतं; दलित लेखकाला जे वास्तव भोगावं लागलेलं असतं ते त्याला विसरता येत नाही आणि उच्चवर्णीयही ते त्याला विसरू देत नाहीत; मैत्रीखातर एकत्र जमलेली चौकडी नंतर घरदार सोडून भटकंतीला निघते आणि मुक्कामाच्या एका ठिकाणी रस्त्यात भेटलेल्या एका बाईच्या पोटी एका बाळाला जन्माला घालतात - हे गोषवारे पाहिले तरी लक्षात येतं की समाजाच्या व्यापक समूहाला या कथा कवेत घेतात; त्या समूहांच्या विविध प्रश्नांचा उभा-आडवा आलेख मांडतात. अर्थातच त्यातून वास्तवाचं जे दर्शन होतं ते वाचकाच्या कल्पनेपलीकडचं आहे. कल्पनेला वास्तवाचं कोंदण दिल्यामुळे कल्पना आणि वास्तव यांच्या सरमिसळीतून एक नवंच वास्तवदर्शी जग तयार होतं. हे जग या कथांनी निर्माण केलेलं आपलं स्वत:चं एक वेगळंच जग आहे. त्यात सामान्य माणसाच्या आयुष्यातले नेहमीचे प्रसंग घेऊन त्यातून जीवनातल्या शाश्वत मूल्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आहे.

पस्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ कथा लिहीत असल्यामुळे सतीश तांबे यांनी कथा या साहित्यप्रकारावर एवढं प्रभुत्व स्थापित केलं आहे, की ते कथेला हवी तशी वाकवतात, कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवतात. 'संशयकल्लोळात राशोमान' या कथेत त्यांनी याचा उघडउघड प्रत्यय आणून दिलाय. उदा. -

“काही गोष्टी अशा असतात की, कुठून सुरुवात करावी ते कळता कळत नाही. खूप चाचपडायला, धडपडायला, गोंधळायला होतं. मग जरा वेळाने लक्षात येतं की, ह्या ‘काही गोष्टीं’तल्या ‘थोड्या गोष्टी’ अशा असतात की, त्या कुठूनही सांगितल्या तरी त्यांतून जे अधोरेखित होणार असतं त्या आकलनाला काहीही बाध येत नाही.”

हे त्यांचं कथेवरच्या प्रभुत्वाचं सूत्र सुरुवातीलाच विशद करून ते कथेला ‘मध्यंतरा’पासून सुरुवात करतात, मध्येच ‘पूर्वार्ध’ आणतात आणि शेवटी ‘उत्तरार्ध’ देतात. कथेला आपल्या इच्छेप्रमाणे वळवण्याचा हुकमी, यशस्वी प्रयोगच त्यांनी इथे केलाय असं म्हणावं लागेल.

‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही या संग्रहातली नावाप्रमाणेच वैचित्र्यपूर्ण आणि मराठी कथासाहित्यातली एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. पौराणिक कथेला वेगळ्या प्रकारे परिभाषित करण्यात मोठेच धोके असतात. जनमानसात तिचं जे रूप घट्टपणे सामावलेलं असतं, त्याला धक्का लागू शकतो हा एक धोका. शिवाय, लेखकाकडून दिला जाणारा अर्थ तेवढा समर्पक होईलच याची काहीच शाश्वती नसते, किंवा मूळ अर्थाच्या मानाने नवा अर्थ तोकडाही ठरू शकतो. महाकाव्याच्या गाभ्यात असलेल्या कथानकाला हात घालणं हे एक धाडसच आहे, ते मोठ्या जोखमीचं काम आहे. इथे तांबे कथाकार म्हणून नव्या रूपात उजळून येतात. मराठीत याला समांतर प्रयोग आहे का हे शोधावं लागेल. मूळ कथावस्तूच्या व्यामिश्रतेला त्यांनी योग्य तो न्याय दिलाय आणि दोन कथावस्तूंतलं अंतर प्रातिभिक ताकदीनं मिटवलं आहे. इथे त्यांच्या गोष्टीवेल्हाळपणाचं नेमकं स्वरूप प्रकर्षाने दृग्गोचर होतं आणि कथाप्रकारावरचं त्यांचं प्रभुत्व वाचकाच्या मनावर जे गारुड करतं त्याला तोड नसेल.

तांबे यांच्या कथेची नेहमीची वैशिष्ट्यं म्हणजे - कथेत पेरलेली चमकदार वाक्यं, दैनंदिन जीवनातल्या साध्यासाध्या गोष्टींचे सांगितलेले / लावलेले वेगळेच अर्थ, प्रसंगोपात केलेली काही वेगळ्याच शब्दांची निर्मिती, भाषेला समृद्ध, संपन्न करणारा, अतिशय चपखलपणे केलेला वाक्प्रचार आणि म्हणी यांचा प्रचुर वापर - ही या कथांतूनही भरपूर प्रमाणात आढळतात. इथे ‘यत्र-तत्र-सावत्र’ या पहिल्याच कथेतला अर्धाच परिच्छेद वानगीदाखल :

“आईला दिलेला शब्द न पाळणं हे चालत्या गाड्याला खीळ घालणं ठरू शकेल अशी धास्ती त्याच्या मनात होती. आणि जे विषय वाढवून वस्तुस्थिती बदलत नसते, त्या विषयांच्या बाबतीत ‘अळी मिळी गुपचिळी’ हेच धोरण सुज्ञपणाचं ठरतं हे तो समजून होता. बरं, त्याला तोंड दाबावं लागत असलं तरी बुक्क्यांचा मार अजिबात सहन करावा लागत नव्हता.”

यातली वाक्प्रचार आणि म्हणी यांची बेमालूम गुंफण लेखकाच्या भाषाकौशल्याची प्रत्ययकारक जाणीव करून देते.

संग्रहातल्या दीर्घ कथांतून गोष्ट सांगण्याच्या सतीश तांबे यांच्या अनोख्या कौशल्याचंही पुरेपूर दर्शन होतं. मुख्य नदीला मिळणाऱ्या उपनद्या जशा मुख्य नदीला सघन आणि संपन्न करतात तशी कथेच्या ओघात येणारी उपकथानकं त्यांच्या कथेला अर्थसघन आणि आशयसंपन्न करतात. कथेवर मुळात असलेली त्यांची पकड यातून आणखीच घट्ट होत जाते आणि वाचकाला एखाद्या अद्भुत अनुभवाची जादुई सफर केल्याचा परिणाम जाणवतो.

चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ या कथासंग्रहाचं एक अधिकचं आकर्षण आहे.

----
युसुफ शेख

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट
लेखक - सतीश तांबे
प्रकाशक - रोहन प्रकाशन
१५७ पाने
किंडल आणि छापील आवृत्ती उपलब्ध
प्रकाशनाचा दुवा

समीक्षेचा विषय निवडा