Skip to main content

या अशा उद्विग्न वेळी

एकही कविता आताशा
काळजाला भिडत नाही
शब्द मोहक विभ्रमांनी
भ्रमित आता करीत नाही

कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही

प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,
बीजअक्षर श्रांतलेले
भंगलेल्या देवतांना
आळवूनी भ्रष्टलेले

मार्गदर्शी ध्रुव अन्
सप्तर्षी आता लोपलेले
दीपस्तंभांचे दिवेही
भासती मंदावलेले

या अशा उद्विग्न वेळी
दाटुनी येते मनी
विफलता, जी रोज उरते
रोमरोमा व्यापुनी

एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी
शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी

'न'वी बाजू Fri, 07/05/2021 - 22:02

कवितेच्या नादामुळे वाचायला मजा येते. एखादे दिवशी अर्थसुद्धा समजावून सांगितलात, तर बहार येईल. (मला कवितेतील काहीही कळत नाही, म्हणून. माय ब्याड.)

बाकी...

मार्गदर्शी ध्रुव अन्

येथे वृत्ताचा पाय किंचित घसरला आहे. बोले तो, तीन मात्रा कमी पडतात. 'मार्गदर्शी' आणि 'ध्रुव' यांच्यामध्ये एक गलात्कार - एक ग-ल जोडी - पाहिजे.

जुन्या काळातला पादपूरणार्थाचा तोडगा वापरून 'मार्गदर्शी वै-च ध्रुव अन्' जमते काय, पाहा.

त्याच्याच पुढच्या पंक्तीत...

सप्तर्षी आता लोपलेले

...वृत घसरून सपशेल तोंडावर आपटलेले आहे. माझा हिशेब चुकला नसेल, तर इथे तीन मात्रा जास्त झाल्यात. 'सप्त' आणि 'आता' यांच्यामध्ये तो 'र्षी' बळेच कोंबलाय.

'सप्त आता लोपलेले' करता आले, तर पाहा. निदान वृत्तात तरी बसेल. (अर्थ लागणार नाही, परंतु... तसेही आत्ता तरी कोठे लागतोय?)

त्यानंतर...

या अशा उद्विग्न वेळी
दाटुनी येते मनी

या कडव्यापासून पुढे शेवटपर्यंत वृत्ताने रूळ बदललेत. 'गालगागा गालगागा गालगागा गालगागा' होते, ते 'गालगागा गालगागा गालगागा गालगा' झालेय. Consistency is the virtue of an ass, असे एमर्सनसाहेब म्हणून गेलेलाच आहे.

असो. पुढील कवितेस शुभेच्छा.