Skip to main content

देशप्रेमासाठी शेजारच्या काकांनी सहकुटुंब लस घेतली.

रेशीमबाग, १८ सप्टेंबर.

शेजारचे काका आजवर, अतिशय नेमानं आयुर्वेदाचं पालन करत आले होते. आयुर्वेद ही फक्त उपचारपद्धती नसून ती जीवनपद्धती आहे यावर काकांचा पूर्ण विश्वास आहे. काका रोज सकाळी लवकर उठतात, चालायला बाहेर पडतात आणि बाजारहाट करून येतात. काका रोज ताज्या भाज्या आणि फळं खातात. काका अंडं आणि माँगिनिसचा केक खात नाहीत म्हणून काकू मुद्दाम रव्याचा, बिनअंड्याचा केक करायला आणि खायला शिकल्या. काकांच्या जीवनपद्धतीमुळे काकूसुद्धा तेच करतात; त्यामुळे काका-काकूंना सर्दी-पडसं, बीपी, डायबेटिस, कॅन्सर, खरूज, नायटा होत नाहीत. शेजारचे काका आणि काकू वारंवार निरोगी राहून सतत आयुर्वेद सिद्ध करून दाखवतात.

करोनाकाळातही शेजारच्या काका-काकूंनी अनेक आयुर्वेदिक काढे, आणि औषधं घेऊन आयुर्वेदच काय ते अंतिम-आरोग्य-सत्य असल्याचं सिद्ध केलं. त्यांच्या वैद्याचा लशीला विरोध असल्यामुळे त्यांचाही लशीला विरोध आहे. काका त्यांच्या सोसायटीच्या व्हॉट्सॅप ग्रूपवर म्हणाले की आयुर्वेदात कुठेही लशींचा उल्लेख नाही. शिवाय हे एम-आरएनए आणि डीएनए यांचाही यजुर्वेदात उल्लेख नाही. तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही; आपल्या, भारतीय जीवनपद्धतीत हे बसत नाही.

मोदी लस वाढदिवस

पण गेला आठवडाभर त्यांच्या व्हॉट्सॅप ग्रूपात मोदीजींच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. जोशी वहिनींनी माँगिनीसचा केक जसाच्या तसा घरी कसा बनवायचा याची रेसिपी दिल्यावर मात्र काका-काकूंना त्यांचं मत सांगितल्याशिवाय राहवलं नाही. "माँगिनीसचा केक मोदीजींच्या वाढदिवशी करू नका. मी सगळ्यांसाठी बिनाअंड्याचा केक आणेन", असं काकूंनी सांगूनही लोक काका-काकूंच्या आनंदाबद्दल शंका घ्यायला लागले. तेव्हा काकांनी राणा भीमदेवी घोषणा केली.

"मी खरा देशभक्त आहे. माझ्या देशभक्तीमुळे माझं मोदीजींवर खरं प्रेम आहे. मोदीजींच्या वाढदिवसाला मी आणि काकू लस घेणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी आधीच लशी घेतलेल्या होत्या. कुणीही मोदीजींसाठी थांबला नव्हतात. माझ्याएवढा देशभक्त कुणीही नाही. त्यामुळे काकूंचा बिनअंड्याचा केकच तुम्हाला सगळ्यांना खावा लागेल."

हे वाचल्यावर सगळ्यांनी पार्टी, केक आणि मोदीजींचे इमोजी व्हॉट्सॅपवर पाठवून काकांची राष्ट्रभक्ती आणि मोदीजींचे वाढदिवस साजरे केले.

#शेजारचे_काकू_काका

Rajesh188 Mon, 20/09/2021 - 22:00

आहार,विहार,आणि विचार उत्तम असेल तर आरोग्य उत्तम राहते हे सर्व च मान्य करतात.
अगदी आधुनिक विज्ञान सुद्धा.
आणि लस स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी घेणे गरजेचे आहे
त्या मधून देश हित साधले जात असेल तर तो दुय्यम हेतू झाला.

माचीवरला बुधा Wed, 22/09/2021 - 23:46

In reply to by Rajesh188

“लस स्वतः ला सुरक्षित ठेवण्यासाठी घेणे गरजेचे आहे”

काय हो राजेशभाऊ, अगदी कालपरवापर्यंत लसीच्या विरोधात होता, आणि आता अचानक? म्हणजे लेखातील “काका” तुह्मी तर नव्हे?