Skip to main content

शेजारच्या काकूंनी अविधवा नवमीची पुरोगामी पार्टी केली.

३० सप्टेंबर, हडपसर.

शेजारच्या काकूंना फेसबुक मिळाल्यापासून पुरोगामी असणं म्हणजे काय हे समजायला लागलं आहे. दहा वर्षांपूर्वी काकू पारंपरिक हळदीकुंकू करत असायच्या, आणि आपण फार जगावेगळ्या दिसू नये म्हणून फक्त त्यांच्या मुलाच्या मित्रांच्या आयांनाच बोलावायच्या. त्यामुळे लग्न न केलेल्या मैत्रिणी आणि शेजारच्या मुलींना बोलावण्याची आफत त्यांच्यावर ओढावत नसे.

शेजारच्या काकूंनी हल्लीच जिमला जायला सुरुवात केली आहे. त्यांच्या जिमच्या ट्रेनरकडून त्यांना व्हॉट्सॅपवरून परवा अविधवा नवमीबद्दल मेसेज आला. त्यात त्यांनी अविधवा नवमीचं महत्त्व सांगितलं होतं. काकूंना त्यामुळे त्यांची आई आठवली. त्यांची आईसुद्धा अहेवपणी गेली होती. आपल्या आईसाठी विशेष काही पितृपंधरवड्यात करता येईल, या विचारानं काकू थरारून उठल्या.

अविधवा नवमी

पितृपंधरवडा आणि पितृसत्ता या शब्दांचा अनुप्रास आता त्यांच्या नव्या पुरोगामीपणात बसत नव्हता. पण आईसाठी काही पितृपंधरवड्यात केल्यामुळे पुरोगामीपणातच परंपरासुद्धा जपली जाईल, हे काकूंच्या मनानं घेतलं. म्हणून काकूंनी सर्वसमावेशक अविधवा नवमी पार्टी करायची ठरवली.

काकूंनी शेजारच्या कॉलेजकन्यकेलाही बोलावायचं ठरवलं. "आर्या, तुझ्या कूलोट्स घालून आलीस तरी चालेल हं", असं सांगायलाही काकूंनी कमी केलं नाही. पुरोगामीपण निभावायचं तर ते पूर्ण टोकाला जाऊनच, असं काकूंनी सकाळी जिममध्ये ठरवलं. तेव्हा ट्रेनरच्या हस्ताक्षरात फळ्यावर लिहिलेलं No pain no gain त्या वाचत होत्या. पार्टीचा मेन्यूसुद्धा त्यांनी ट्रेनरच्या मदतीनंच ठरवला. आणि पार्टीत पारंपरिक पदार्थांबरोबर प्रोटिन्स असलीच पाहिजेत, म्हणून त्यांनी मटकीच्या उसळीची मिसळ करायचं ठरवलं. "फरसाण असलं तरी बेसन म्हणजे, चणाडाळीत प्रोटीन असतं", हे त्या मनात घोकत होत्या.

काकूंनी त्यांच्या नेहमीच्या हळदीकुंकवाच्या मैत्रिणींना बोलावलंच, शिवाय त्यांच्या ऑफिसातल्या लग्न न केलेल्या मंजूला आणि तुळू का तेलुगु बोलणाऱ्या कविथालासुद्धा बोलावलं. तिच्यासाठी काकूंनी शेजारच्या आर्याकडून इंग्लिशमधून विशेष मेसेज लिहून घेतला.

पार्टीमध्ये सगळ्यांनी शेजारच्या काकूंचं तोंडभर कौतुक केलं. परंपरा आणि पुरोगामीपणा एकत्र नांदू शकतात, हे आता काकूंना पुरेपूर पटलं आहे.

अरविंद कोल्हटकर Sat, 02/10/2021 - 08:37

तिथीनुसार माझा वाढदिवस अविधवा नवमीला पडतो. माझ्या लहानपणी आमच्याकडे माझ्या आजीचे श्राद्ध त्या दिवशी होत असे आणि जेवणात तांदुळाची गोड खीरहि असे त्या मुळे तो काही सणाचा दिवस आहे अशी माझी बालसुलभ समजूत होती. त्या दिवशी शाळेला सुटी का नसते हा माझा दरवर्षीचा प्रश्न असे.

गेले ते दिन गेले!

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 03/10/2021 - 07:50

In reply to by अरविंद कोल्हटकर

मी हा शब्द वाचला कालनिर्णयात. आमच्या घरचेच मुळात तसे ओवाळून टाकलेले म्हणायचे, त्यामुळे आई-वडलांनाही हे प्रकार माहीत होते का कोण जाणे! एरवी माझी एक आजी आणि आई दोघींचेही नंबर लागले असते.

हल्लीच गप्पांमध्ये एका मित्रानं ही अविधवा नवमी असा काही प्रकार असतो, तो काय असतो ते सांगितलं. सहज म्हणून गूगल केलं तर लोकमतमध्ये या प्रकारावर अत्यंत गांभीर्यानं लेख लिहिलेला सापडला. २०२१ सालातच. म्हणजे याच आठवड्यात. मला त्याबद्दल किती आश्चर्य वाटलं हे सांगता येणं अशक्य आहे!

हा फोटोही त्याच लेखातून उचलला आहे.