Skip to main content

वॉशिंग मशीन आणि लिपिस्टिक

(एका फेसबुकी चरित्रापासून मिळालेली प्रेरणा)

आमची छोटीसी फॅमिली. मी, माझा नवरा आणि एकुलता एक मुलगा, तो ही शिक्षणासाठी घरापासून दूर. घरात आम्ही दोघेच. एक दिवस नवरोबा वॉशिंग मशीन घेऊन आले. मी विचारले, ही कशासाठी. नवरोबा उतरले, धोब्याचा खर्च वाचेल आणि तुलाही जास्त कष्ट करावे लागणार नाही. मी मनात म्हंटले, अरे, खरे बोल की, मला कामावर जुंपण्यासाठीच ही मशीन तू घरी आणली आहे. माझे सुख-चैन पाहवत नाही तुला.

मी पण काही कमी नाही, हातात आलेला असा मौका मी सोडणार थोडीच. नवर्‍याला चांगली अद्दल घडायचे ठरविले. मग काय, मी खरीदरी सुरू केली. नवरोबाला खुश करण्यासाठी काही नवे कपडे त्याच्यासाठी विकत घेतले आणि नव्या-नव्या फॅशनचे भरपूर कपडे, मी स्वत:साठी घेतले, फक्त मशीन मध्ये धुवण्यासाठीच. माझ्या चेहरा आणि कपड्यांना शोभून दिसतील अश्या पर्सेस, सेण्डील्स, लिपिस्टिक इत्यादिही मला घ्याव्याच लागल्या.

आता ओठांना लावलेल्या लिपिस्टिकचे डाग कपड्यांना लागणार हे साहजिकच आहे. वॉशिंग मशीन मध्ये हे डाग निघाले नाही. नवरोबा माझ्यावर भडकले आणि म्हणाले तू पूर्वीसारखे धोब्यालाच कपडे धुवण्यासाठी देत जा. मला हेच तर पाहिजे होते. नवरोजीला वॉशिंग मशीन भलतीच महागात पडली. ओठांना लावलेली लिपिस्टिक मी का पुसत नव्हती. हे मात्र नवरोबाला कधीच कळले नाही.