Skip to main content

हाक

रोरावत्या रूटीनाचे
यंत्र अखंड घुमते
दंतचक्र त्याचे रोज
नवी जखम करते

अनावर त्या रेट्यात
पिचलेल्या माझ्यासाठी
वाटेवरच्या झाडाची
वाटते सोबत मोठी

त्याचा मायाळू संभार
घाले हिरवी फुंकर
रंगीबेरंगी पाखरू
झुले उंच फांदीवर

इवल्याश्या कंठातून
किती तरल लकेरी
हाक आभाळाची येता
झेपावते दिगंतरी