Skip to main content

"लता" माझ्यासाठी कोण होती ?

तिला अगं जागं म्हणणं हा खरंतर अगोचरपणा ! पण स्वतःचं अस्तित्व जाणवलं तेव्हापासून जिचे स्वर स्मृतींच्यात सामावलेले आहेत तिला आणखी काय म्हणणार? तिनी गायलेली काही गाणी माझी आईही फार सुंदर म्हणायची. आईचा आवाज कितीही प्रिय असला तरी "लताच्या" आवाजातला दैवी स्पर्श अगदी त्या बालवयातही जाणवल्यावाचून राहिला नाही. त्यासाठी कोणालाही विशिष्ट भाषा, वय,संगीताची समज अगर अभ्यास असणं अजिबात गरजेचं नव्हतं. प्रेमगीतं, विराण्या, देशभक्तीपर गीतं, भजनं सगळं सगळं तितक्याच समर्पकपणे म्हणणारी ही एकमेव गायिका! मंगेशकर भावंडानी एकेकाळी हिंदी - मराठी संगीतविश्व व्यापूनच टाकलं होतं. त्यात मग हिरिरीने आशा की लता श्रेष्ठ असे वाद सुद्धा चालायचे. पण मला मात्र "मन क्यूँ बहेका " सारखी गाणी म्हणजे दोघी बहिणींची जुगलबंदी नसून एकमेकींच्या साथीने रंगवलेली मैफिल वाटायची.
नर्गिस - नूतन - लीला नायडू-वहिदा वगैरे नटयांना लाभलेला लताचा स्वर आणि माझ्या शाळा- कॉलेज जीवनातल्या माधुरी, जूही, करिष्माना मिळालेली तिची स्वरसोबत अगदी निराळ्या तऱ्हेची ! तिचा थकत चाललेला आवाज आणि नट्यांचं वय याचं समीकरण जुळायचं नाही.त्यामुळे तिनी यापुढे गाऊ नये असं वाटून जायचं. पण तिच्या जुन्या गाण्यांची इतकी जबरदस्त मोहिनी मनावर होती की तिने केवळ या जगात "असणं" फार आश्वासक वाटायचं. तिच्या व्यक्तिमत्वात तिच्या आवाजाप्रमाणे काहीतरी अत्यंत शुद्ध तत्व असणार असं वाटत राहायचं. तिनी बालपणापासून केलेली कठोर तपस्या, सोसलेली दुःख, आघात आणि आरोप यापलीकडे तिच्या आतून उमलणारं निर्मळ हास्य ऐकून आणि पाहून नकळत 'ऑल इज वेल विथ द वर्ल्ड' असा दिलासा मिळायचा. तिचं जाणं अपेक्षित असलं तरी चटका लावून जाणारं ठरलं. इतकं की, आपल्या घरातलं सगळ्यांना बांधून ठेवणारं एक पिकलं पान गळून गेलं असं वाटावं .. बालपणापासून सोबत असलेला तिचा स्वर हरवला ही हळहळ मनाला लागून राहिली आहे. तिची गाणी आपण पिकलं पान होऊन गळून जाईपर्यंत सोबत असणार हा आश्वासक आधारसुध्दा ती जाण्याचं दुःख हलकं करू शकत नाहीये. माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनात "लता" बद्द्ल वादातीत कृतज्ञता आणि आपुलकी आहे. 'मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा' म्हणणारी गान सरस्वती लता खरोखरच भारताचा सुरेल आवाज होती..

Node read time
2 minutes
2 minutes

Rajesh188 Fri, 11/02/2022 - 14:42

ह्या खूप उत्तम गायिका होत्या त्यांनी जी उत्तम दर्जा ची गाणी गायली त्या बद्धल काय बोलणार .
ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.
विज्ञाना च्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या आवाजाची जी वारंवारता होती ती असामान्य होती
त्यांच्या आवाजाचा परिणाम माणसाच्या मनावर होत असे .
अगदी शरीरावर रोंगटे खडे (मराठी मध्ये अंगावर काटा यायचा)होत होतें
.
अशी नैसर्गिक देणगी त्यांना लाभली होती.
तरी भावनेच्या भरात न जाता प्रॅक्टिकल मत पण माणसाचे असावे ह्या मतचा मी आहे
म्हणून माझी मत न आवडणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे
जेवढे श्रेय लता जी ना मी देईन तेवढेच श्रेय .
त्या वेळचे संगीतकार ,त्या वेळचे गीतकार ,काय शब्दीक रचना ,खूप खूप सुंदर ,वादक ,डायरेक्टर सर्वांना देईन .
ह्यांची साथ नसती तर उत्तम गाणी निर्माण च झाली नसती.

shantadurga Wed, 16/02/2022 - 11:40

>अगदी शरीरावर रोंगटे खडे (मराठी मध्ये अंगावर काटा यायचा)होत होतें
अंगावर काटा भीतीने अगर किळस वाटल्याने येतो अशी माझी समजूत आहे. तुम्हाला रोमांच आले असे म्हणायचे असावे.
शिवाय, सुंदर गाणी तयार होण्यामागचे कारण हा या लेखाचा विषय नव्हे.
@सामो, आभार !

रवींद्र दत्तात… Thu, 17/02/2022 - 21:49

छान लिहिलंय...
त्यांच्या आवाजाची माेहिनी लहानपणापासून अनुभवत आलोय...
त्याला भाषेची बंधनं नव्हती.
मग ते हिंदी चित्रपटातील गीत असो, मराठी भावगीत असो...हिंदी गैरफिल्मी गजल असोत...
त्यांचा आवाज कायम आठवणीत राहणार आहे...