झांटिपी आणि बोका
हे लेख मी फेसबुकवर ही प्रसारित केले आहेत. इथे पुनःप्रसाारण.
मी: तर मी तुम्हा दोघांवर एक सदर लिहिणार आहे. cartoon strip सारखं पण लिहून.
झांटिपी: लिहून का?
मी: मला जे नमूद करायचंय, ते विचारपरिप्लुत असल्याने, शब्द हेच योग्य माध्यम आहे.
बोका: सरळ सांग ना, तुला चित्र काढता येत नाही
मी: आणि तुम्हीही काही फारसे फोटोजनिक नाही. असो. तर मी असं सदर लिहितेय. त्याचं नाव असेल 'झांटिपी आणि बोका'
बोका: झांटिपी कशाला पाहिजे? 'बोक्याचे विचारधन' किंवा नुसतं 'बोका' ठेव. सिर्फ मेरा नाम ही काफी है!
मी: अरे हे सदर लोकप्रिय व्हावं असं मला वाटतं त्यामुळे मी Item girl introduce केलीय.
बोका: मग 'बोका आणि झांटिपी' पहिजे
झांटिपी: अरे तुला 'आणि बोका' चं वजन कळत नाही का? मराठी नाटक सिनेमाच्या जाहिराती वाचतोस ना तू?
बोका: hmm, ठीक आहे, पण लोकप्रियतेसाठी अश्या सवंगपणाला माझा विरोधच राहील!
बोका शेपूट उचलून निघून गेला...
तर अशी under protest tacit agreement घेऊन सुरू होत आहे आमचं विचार परिप्लुत अनियतकालिक सदर
'झांटिपी आणि बोका'
शीर्षक
सदराचं शीर्षक काय असावं यावरून मला पीएचडीच्या थिसीसच्या शीर्षकाबद्दल मिळालेला सल्ला आठवला.
मी काहीशी तक्रार केली होती, 'रेडिओ गॅलेक्स्यांचा अभ्यास' हे काय शीर्षक झालं का?
सुपरवायजर म्हणाला, 'इतपत दाखव की खूपसं झाकलेलं आहे असं वाटेल'.