Skip to main content

किमयागार...

किमयागार

“ती बघ, केव्हढी मोठी लाट आलीय…”
“१..२…३..”
“ पकडली .. पकडली..”
खाली वाकून त्या फेसाळ लाटेला हातात पकडायचा प्रयत्न करत तो म्हणाला..
आणि लगेच परत ताठ झाला….
लाट परत जाताना पाऊले किंचित त्या ओल्या वाळूत अजून थोडी रुतली तशी तो चित्करला. “बघ बघ मी कसा खाली चाललोय… हा हा हा..” आहे

आज पहिल्यांदाच इतकं मनसोक्त हुंदडला होता तो.
लांबून पळत यायचं आणि येणाऱ्या लाटेवर अचूक उडी मारायची..
ओल्या वाळूचा मोठा किल्ला बनविताना तर इतकी धमाल केलेलीi- ती गार गार मऊ मऊ वाळू हातांनी चापून चोपून बसवत, एकावर एक थर करत असताना मध्येच ती फुटायची मग परत पहिल्यापासून, तर कधी मध्येच एखादा गोळा निमिष वर फेकून मारायचा.. कित्येक तास खपून झाला एकदाचा तो दिमाखदार किल्ला… पण कसचं काय थोड्याच वेळात पुढे पुढे येणाऱ्या लाटांनी त्या किल्ल्याला आपल्यात सामावून घेतले. पण त्याला अजिबात वाईट वाटलं नाही. कारण वाळूचा किल्ला बनवतानाच इतकी मजा आली होती..
पिशवीभरून गोळा केलेले शंख, शिंपले, कवड्या.. मैलोनमैल किनाऱ्यावर चालून त्या दोघांनी ती सागरसंपत्ती गोळा केली होती.
वाळूमध्ये दोघांनी आपापले पाय लपवून टाकलेले ते तर फारच मजेशीर.. ती गार गार, मऊ मऊ वाळू, सुळकन् सरकायची आणि पायांना गुदगुल्या करायची..हाऊ फनी..
सगळ्यात कहर म्हणजे शेजारच्या ग्रुप मधल्यांनी तर इतका मोठा, खोल खड्डा खोदला की एक अख्खा मुलगा त्यात उभा राहायला. त्याच डोकं तेवढं वर ठेवून बाकी अख्खा त्याला वाळूत गाडला. तो आपला खदाखदा हसतोय.. ते बघताना ह्यां दोघांच्या वासलेल्या ‘आ’ मध्ये माशी जाता जाता राहिली.

अजुन थोडंसं लांब, समुद्रात निमिषाचा मोठा भाऊ आणि त्याचे मित्र येणाऱ्या प्रत्येक उसळत्या लाटेवर स्वार होऊ पाहत होते.

“घु घुं… भों..”
“कुठून येतोय हा आवाज? “ ते एकमेकांना विचारत असतानाच
“ दादा, काय झालं… पळतोयस का? “ निमिष ओरडला..

आजू बाजूला बघितलं तर सगळीकडेच पळापळ सुरू झालेली..
लोकं किनाऱ्याकडे पळत सुटले, किनाऱ्यावरचे लोकं त्या वाळूच्या वाळवंटातून वाळू उडवत पळतायत..
“ बघताय काय? पळा.. पळा… पुढे बघा समोरून काय येतय ” दादा पळतानाच जीवाच्या आकांतानी दोघांना ओरडुन सांगत होता.

आणि समोर साक्षात एक प्रचंड मोठ जहाज त्यांच्या दिशेनी येत होत…
इतका वेळ दुरून दिसणारा तो ठिपका म्हणजे ते हे होत तर… पण ते किनाऱ्याच्या इतक्या जवळ कस आल? इतक्या पटापट हे सगळं कसं बदललं… सगळे प्रश्न मनात खोलवर गाडत तो ही निमिषबरोबर धावायला लागला..

“वाचवा.. वाचवा.. मला बाहेर काढा…”
अस्फुट किंचाळी त्याच्या कानात घुमली.. आवाजाच्या दिशेने बघितलं तर तो मगाचा पुरलेला मुलगा ओरडत होता ..
त्याच्या ग्रुपमधले बहुदा त्याला विसरून, तसंच मागे सोडून पळाले होते.

निमिष आणि त्याची पाऊले नकळतच त्या मुलाच्या दिशेने वळली. बाजूला पडलेल्या खेळण्यातल्या फावड्याने ते दोघे वाळू उपसायला लागले.
इकडे तो आवाज अजूनच मोठा झालेला, अगदी कानठळ्या बसायला लागलेल्या, ती मोठी मोठी होत जाणारी सावली त्यांच्याचकडे येत होती जणू..
सप्.. सप्.. त्यांचे हात चालूच आहेत.. वाळू उपसतायत..
तो मुलगा जोरात किंचाळतोय, “ मला सोडा… तुम्ही पळा…”

“भो भो भो… घुं.. घुं…” आता कानाचे पडदे फाटतायत…
अचानक सगळं बधीर झालंय… सगळीकडे मिट्ट काळोख…

**

नित्याने खोलीत डोकावून बघितलं तर त्याचा डोळा लागलेला. तिने त्याच्या हातातलं पुस्तक बाजूला काढून ठेवलं आणि त्याच पांघरूण सारखं केलं.
“कितीतरी महिन्यांनी आज इतका शांत झोपलाय. मगाशी खुदू खुदु हसतही होता. डोळ्यात परत चमक दिसायला लागलीय.. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने त्याच बालपण त्याला परत गवसू लागलंय.. आणि मला माझा सोनू..!
नाहीतर गोळ्या, इंजेवशन, ह्यांच्या माऱ्याने किती कोमेजून गेलं होत माझं बाळ ..”
तिने दीर्घ उसासा सोडला. व्हीलचेअर भिंतीच्या कडेला नेऊन ठेवली. परत पुस्तक उचललं आणि लेखिकेचा ईमेल आयडी नोट केला.

***

झोपायला जायच्या आधी तिने नेहेमीप्रमाणे ईमेल्स चेक करायला घेतले.
“Thank you, खूप आवडलं पुस्तक, मी तुझा/ तुझी फॅन आहे” छापाच्या त्या सगळ्या इमेल्स मध्ये एका मेलशी ती थबकली..
”तुम्ही माझ्या विकलांग झालेल्या बाळाच्या आयुष्यात रंग भरताय, त्याच हसू परत आणलय, त्याला त्याच बालपण परत मिळतयं आणि मला माझं लेकरु.. ‘
वाचताना अक्षर अस्पष्ट होत गेली, एक थेंब हातावर पडला आणि ती सावरली. समाधानाने हलकेच हसली. लॅपटॉप बंद केला. चाकं ढकलत बेडशी आली, सराईतपणे खुर्चीच्या दोन्ही हातांवर जोर देऊन स्वतःला बेडवर झोकून दिले.. आंतरिक समधानाने तिने डोळे मिटले..आज छान झोप लागणार होती तिला.

_______

मनोगत :

घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे..
कित्येक वर्षे अनेक लेखकांनी/ लेखिकांनी इतकं भरभरून दिलय, हसवलय, रडवलय, सोबत दिलीये…

वाचता वाचता कधीतरी लिहायला लागले आणि त्यातूनच आता सुचलेली ही गोष्ट,
त्या सर्व लेखक/ लेखिकांसाठी ज्यांनी त्यांच्या कळत नकळत अनेकांच्या आयुष्यात आनंद पसरवला आहे..

_________
चित्रावर आधारीत लिखाण ह्या Monologue ग्रुप वरील उपक्रमाअंतर्गत ही कथा लिहिली होती.

-----

ही कथा ग्रंथालीच्या विश्व दिवाळी अंकात प्रथम प्रकाशित.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

4 minutes