Skip to main content

गोंदलेला हात मऊ टापटिपीचा..

आयुष्यात पहिल्यांदा गोंदण बघितलं ते मला सांभाळणाऱ्या विमलमावशीच्या कपाळावर. कधीकधी तिची मोठी टिकली पडायची आणि त्याजागी एक हिरवं तुळशीवृंदावन दिसायचं. हे काय आहे, असं विचारल्यावर गोंदण असं उत्तर एकदा मिळालं. तिच्या कपाळावरचं ते लाल कुंकवामागचं हिरवं कुंकू साबणानं तोंड धुतलं तरी जात नाही, कारण ते तिच्या कपाळात कायमचं बसवलं आहे हे समजल्यावर मला त्यापुढे विचारण्यासारखे अनेक प्रश्न पडले. नाही म्हणायला, आमच्या त्या भाड्याच्या घराच्या जवळपास सगळ्या भिंती माझ्या उंचीपर्यंत, मी काढलेल्या चित्रांनी भरल्या होत्या. ती चित्रं पुसून टाकायचा किंवा खोडून काढायचा उपक्रम अजून तरी कुणी हाती घेतला नव्हता. त्यामुळे तिच्या गोंदणासारखीच माझीही चित्रं होती. पण त्यांना भविष्यातल्या रंगकामाचं, घरमालकांच्या इन्स्पेक्शनचं आणि भिंती पडण्याचं भय होतंच. त्यामुळे कधीच न पुसता येणारं ते तुळशीवृंदावन माझ्या आठवणीतही गोंदलं गेलं. तिच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर एक हिरवा ठिपका होता. तोही साधारण तुळशीवृंदावनाच्या रंगाचा आणि पोताचा असल्यानं मी तिला तेही गोंदण आहे का असं विचारलं.

"असा ठिपका ज्या बायकांच्या हातावर असतो, त्यांचा स्वयंपाक कधी कमी पडत नाही."
ही एक नवीन माहिती मिळाली. तिच्या घरी हादडलेल्या गरम भाकरी आठवून हेही खरंच असावं अशी लगेच खात्री पटली.

कोल्हापूरजवळ अंकली नावाच्या एका खेड्यात माझ्या आजीची मोठी बहीण राहायची. तिच्या मनगटांत सदासर्वकाळ किमान दोन डझन काचेच्या बांगड्या असायच्या. इतक्या बांगड्या का घालायच्या, याला काही उत्तर नव्हतं. पण त्या बांगड्यांच्या पलीकडे गोंदण होतं. आजीजवळ बसून एक एक बांगडी सरकवत ते वाचायला लागायचं. आधीच्या ओळीत काय होतं हे लक्षात ठेवून पुढे जावं लागायचं. असं बांगड्यांनी तयार केलेलं जिगसॉ कोडं सोडवत जायचं. सुरुवातीला देवाचं नाव. मग नवऱ्याचं. मग तुळशी वृंदावन. मग देवीचं. असं करत करत एकदाच्या त्या बांगड्या संपायच्या. हे असं हातावर का लिहायचं? याला खेड्यातल्या बायका वेगवेगळी उत्तरं द्यायच्या. काहींच्या हातावर पत्ताही लिहिलेला असायचा. आपण कधी हरवलो तर पत्ता सांगता यावा म्हणून तो 'गजनी'सारखा असा कायमचा हातावर लिहून ठेवायचा! काही बायका सांगायच्या की मेल्यावर चितेवर जळून जाईपर्यंत हे गोंदणच राहतं. त्यामुळे हाच खरा दागिना. घरात कधी कुणी मेलं, तर सुतक संपेपर्यंत बायका टिकली लावत नसत. आणि त्यांची हिरवी गोंदणं दिसत असत. त्यामुळे केवळ आपण मेल्यावरच नव्हे, इतर कुणीही मेलं तरी घालता येणारा असा दागिना गोंदण आहे अशी एक महत्त्वाची नोंद त्या वेळी मी करून ठेवली होती.

तो दागिना घालण्यासाठी मात्र आपल्या त्वचेत अनेकदा सुई खुपसून घ्यावी लागते ही माहिती आधी एकदम विचित्र वाटली. पण कालांतरानं आपण सहज अशी सुई टोचून घेऊ शकू अशी खात्रीही वाटू लागली. माझा पहिला 'टॅटू' केला तेव्हा मी चांगली बत्तीस वर्षांची होते. त्या टॅटूचा आणि माझ्या सौभाग्याचा काहीही संबंध नाही. पण कधीच न पुसता येणारा मजकूर विचारपूर्वक लिहावा असं मी ठरवलं होतं. त्यामुळे विसाव्या वर्षी टॅटू करून घेण्याची इच्छा असली तरी मी चांगली बारा वर्षं थांबले. आणि आज आठ वर्षांनी तो पहिला टॅटूदेखील थोडा 'प्रिटेन्शियस' आहे असं लक्षात आलं आहे. मध्यंतरीच्या काळात माझ्यासमोर अनेक अविचारी टॅटू येऊन गेले. उदाहरणार्थ, दीपिका पदुकोणनं रणबीर कपूरच्या प्रेमात असताना मानेवर 'आरके' असा टॅटू करवला आणि नंतर त्यांचं फाटलं. पुढे जाऊन तिनं रणवीर नावाच्याच माणसाशी लग्न केलं. त्याचं खरं आडनाव भावनानी आहे हे कळल्यावर आलेला पहिला विचार, रोमन 'के'चा 'बी'करता येणं सोपं आहे हाच होता. आपल्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय तिनं त्या टॅटूमुळे तर घेतला नसेल ना, अशी शंका लगेच मनात आली. ‘प्रेम’ ही गोंदून घेण्यासारखी चीझ नव्हे हे मला शिकवल्याबद्दल मी दीपिकाचे आभार मानले. फिरंगी लोकांचे देवनागरी (संस्कृत) टॅटू, आणि त्यांवर चुकलेले अनुस्वार तर डझनावारी बघितले. आपण काय काय करायचं नाही हे ठरवता ठरवता खूपच वेळ निघून गेला. पण पहिला टॅटू आणि त्यानंतर केलेल्या सगळ्याच नक्षींबद्दल अजून तरी टोकाचा पश्चात्ताप झालेला नाही.

या महिन्यात हातात पडलेल्या 'मार्ग' या नियतकालिकानं या सगळ्या गोंदण-आठवणी जाग्या केल्या. या वेळच्या अंकाचं शीर्षक, 'इंडियन टॅटूज, ओन्ली स्किन डीप?' असं आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण ते अगदी अर्थशास्त्रातही जिथे गोंदणाच्या नोंदी आहेत त्यांचा उल्लेख या अंकात आहे. स्वतःच्या शरीराला 'अंकित' करून घेण्यामागच्या कोणकोणत्या प्रेरणा असू शकतात त्या शोधून काढण्याचा प्रयत्न या अंकात दिसतो, आणि त्या जोडीला असलेल्या छायाचित्रांमुळे डोळ्याचं पारणं फिटतं.


Tattoo Marg 01
चित्रश्रेय : शताब्दी चक्रवर्ती

वैष्णवांमध्ये, शंख, चक्र अशा विष्णूशी संबंधित चिन्हांच्या धातूचे ठसे तापवून त्यांचे डाग पुरुषांच्या शरीरांवर दिले जात. हेही एक प्रकारचं गोंदण. हे डाग देण्याआधी बरेच विधी केले जायचे आणि ही चिन्हं शरीरावर धारण करायचा अधिकार केवळ ब्राह्मणांना होता. काही पंथांमध्ये स्त्रियांनी आणि क्षुद्रांनी कोणती चिन्हं धारण करावीत यासाठीही नियम होते. हे डाग जसे पावित्र्य दाखवण्यासाठी होते तसेच कधीकधी असे डाग शिक्षा म्हणूनही दिले जायचे. वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळी चिन्हं असत.शिक्षेचे व्रण बदलून घ्यायच्याही क्लृप्त्या त्या काळात उपलब्ध होत्या. आजही बिघडलेले टॅटू कलात्मकतेनं दुरुस्त करून देणारे अनेक तज्ज्ञ बाजारात आहेत. तसेच ते तेव्हाही असतील! पुरातन काळातल्या अशा काही प्रथांचा धावता आढावा संपादकीयात घेतला आहे.


Tatoo Marg 02
चित्रश्रेय : शिल्पी बत्रा-अडवाणी

एकेकाळी बलुचिस्तानातल्या हिंदू आणि मुसलमान स्त्रिया एकत्र येऊन एकमेकींच्या चेहऱ्यांवर गोंदणं काढत असत. पश्तुन भाषेत त्याला 'शीनखालाई' असं नाव आहे. शीन म्हणजे निळी आणि खाल म्हणजे त्वचा. ज्या स्त्रीची त्वचा गोंदणामुळे निळी असते तिला शीनखाल म्हणतात. लग्नसमारंभांत, रात्र जागवून स्त्री-पुरुष या गोंदणांची गाणीही म्हणत असत. स्त्रीनं सुंदर दिसावं, पुरुषाला ती आकर्षक वाटावी या हेतूनं चेहऱ्यावर काढलेल्या या नक्षीचे पुढे काही विपरीत परिणाम होतील असा विचार या बायकांच्या मनातही आला नसेल. शिल्पी बत्रा-अडवाणी यांच्या लेखात या बलुच स्रियांच्या, आधी पाकिस्तानात आणि मग १९४७ नंतर भारतात झालेल्या स्थलांतराची गोष्ट आहे. भारतात आल्यानंतर, चेहऱ्यावरच्या गोंदणामुळे या बायकांना सतत भेदभाव सहन करावा लागला. या गोंदणामुळे लोकांना त्यांची भीती वाटायची. त्यांनी आपल्या घरात येऊ नये, स्वयंपाकघरात तर अजिबात येऊ नये अशी काळजी त्यांचे शेजारीपाजारी घ्यायचे. बऱ्याच जणींनी ते गोंदण जावं म्हणून चेहऱ्याला वेगवेगळी आम्लं लावण्याचेही प्रयोग करून बघितले. आता या सगळ्या आज्या आहेत. त्या त्यांच्या मायदेशात अतिशय सुस्थितीत, श्रीमंत घरात वाढल्या होत्या. त्यामुळे भारतात येऊन मिळालेल्या वागणुकीचा घाव अजूनही भरून आलेला नाही. लेखिकेच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांचे पारंपरिक पोशाख करून तिला काही छायाचित्र घेण्याची परवानगी दिली. गोंदण हा विषय जितका त्रासदायक आहे तितकाच हा पोशाख आहे. या दोन्ही गोष्टींबद्दल त्यांना प्रेमही आहे आणि आकसही. स्थलांतरित पिढीतल्या काही स्त्रियांची सुंदर छायाचित्रं लेखात आहेत.


Tatoo Marg 03
चित्रश्रेय : जॉयदीप मित्रा

एकीकडे चेहऱ्यावर नक्षी आहे म्हणून अवहेलना सहन कराव्या लागणाऱ्या बलुच स्त्रिया आहेत तर दुसरीकडे १९१२च्या आसपास (सध्याच्या) छत्तीसगडमध्ये उदयाला आलेला 'रामनामी' पंथ आहे. जॉयदीप मित्रा यांनी या समाजाचा अभ्यास करून एक लेख लिहिला आहे. संत कबीरांनी नामस्मरणाला कर्मकांडांपेक्षा श्रेष्ठ मानलं. कबीरपंथातून पुढे घडत गेलेल्या अनेक पंथांमधला एक म्हणजे रामनामी पंथ. राम हा उच्च-नीच न मानणारा सर्वसामान्यांचा देव आहे असं या पंथातले लोक समजतात. स्त्री-पुरुष समानता; सर्वांना शिक्षणाच्या संधी; स्वच्छता; जातिव्यवस्थेला पूर्ण विरोध; कर्मकांडांना विरोध - अशा तत्त्वांवर या समाजाची स्थापना झाली. या समाजाचा स्थापक - परशुराम - त्याच्या काही अनुयायांना एकत्र आणून रामचरितमानस वाचत असे. परशुराम आणि त्याचे अनुयायी दलित होते. त्यांनी रामाबद्दल काही बौद्धिक चर्चा करणं उच्चवर्णीयांना न आवडल्यानं त्यांनी परशुराम आणि त्याच्या अनुयायांवर हल्ला केला. १९१२ साली उच्चवर्णीयांच्या विरोधात ब्रिटिश कोर्टात जाऊन केस जिंकून येणारी पहिली दलित व्यक्ती म्हणजे परशुराम! त्यानंतर 'रामनामी' पंथाला राजकीय वजन लाभलं. पण मुद्दा हा नव्हेच! या पंथाची ओळख म्हणजे पांढऱ्या सुती कापडावर 'रामनाम' लिहिलेलं वस्त्र आणि शरीरावरची रामनामाची गोंदणं. काहीजण संबंध शरीरावर रामनाम गोंदून घेतात. अर्थात हे पूर्ण करण्यासाठी त्यांना काही वर्षं लागतात. पण अशा रीतीनं संपूर्ण शरीर 'रामनामानं' भरून टाकणाऱ्या रामनामींना 'पूर्णनक्षिक' म्हणतात.


Tatoo Marg 04
चित्रश्रेय : शताब्दी चक्रवर्ती

वेगवेगळ्या समाजांमध्ये गोंदण का केलं जातं याचा शोध या अंकात घेतला आहेच पण ते कसं केलं जातं याचाही शोध घेतला आहे. डोळ्यांत घालायचं काजळ जसं सगळ्या संस्कृतींत साधारण एकाच प्रकारे तयार केलं जातं तशीच गोंदणाची शाई तयार केली जाते. ज्यांना कापूर परवडतो, ते कापराच्या ज्योतीवर एखादी वाटी धरून तिची काजळी गोळा करतात. ही काजळी वेगवेगळ्या द्रव्यांनी पातळ करून घेतली जाते आणि तिची शाई होते. काही ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या पानांचे अर्कही शाई म्हणून वापरले जातात. पण काळी शाई काजळीतूनच तयार केली जाते. ज्यांना कापूर परवडत नाही ते रॉकेलची ज्योत लावतात. ही शाई द्रवरूपात आणण्यासाठी भारतभरात, खोबरेल तेलापासून ते अगदी लहान मुलाच्या लघवीपर्यंत अक्षरशः काहीही वापरलं जातं! या शाईनं आधी नक्षी काढून मग एखाद्या तीक्ष्ण टोकेरी अवजारानं ती कातडीच्या आतपर्यंत पोहोचवायची. बाभळीच्या काट्यापासून ते धातूच्या सुयांपर्यंत अनेक प्रकारच्या सुया यासाठी वापरल्या जातात. काही आदिवासी समाजांमध्ये गोंदण झाल्यावर त्यावर शेण आणि हळद असं मिश्रण थापतात. हे सगळं वाचताना मला कोरेगाव पार्कमधला टॅटूवाला आठवत होता, जो नक्षी काढून झाल्यावर आपल्यावर वापरलेली सुई आपल्याला 'आठवण' म्हणून बांधून देतो (आणि परिणामी, तो एकाची सुई दुसऱ्यासाठी वापरत नाही याची हमी देतो!).

एल. के अनंतकृष्णन यांच्या 'द मैसूर कास्ट्स अँड ट्राइब्स (खंड १)' या पुस्तकातून दक्षिणेकडच्या गोंदणांची काही चित्रं अंकात घेतली आहेत. प्रथमदर्शनी त्या ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत असं वाटलं पण नीट वाचल्यावर लक्षात आलं की त्यातलं कोणतं चिन्ह कोणत्या जातीच्या स्त्रीनं किंवा पुरुषानं धारण करावं याचेही नियम दिलेले आहेत. शिवाय, त्या चिन्हांना देवदेवतांचे संदर्भदेखील आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमांवर राहणाऱ्या भिल्ल आणि बैगा जमातीतल्या लोकांची गोंदणं अग्नी, पाणी, मयूर, गायीचे डोळे अशी निसर्गाच्या जवळ असलेली आहेत. केवळ नक्षी म्हणून या अंकातील अनेक चित्रं आवडली पण ती नुसती नक्षी नाहीच. काही काही प्रथा वाचून आपण 'गोंदण' या प्रक्रियेकडे नेमकं किती 'बाहेरून' बघत होतो याचा प्रत्यय आला. उत्तर भारतात अनेक ठिकाणी 'दो गोंदना' असं एक गोंदण नवविवाहितांच्या हातावर केलं जातं. शेजारी शेजारी असलेल्या दोन जुळ्या आकृती काढून हे पूर्ण होतं. पहिलं गोंदण पहिल्यांदा सासरी गेल्यावर करायचं. आणि दुसरं, सासरहून पहिल्यांदा माहेरी आल्यावर करायचं. हे काढून देणारी बाईच असते आणि तिच्या पोटी एक मुलगा आलेला असावा ही पूर्वअट असते. म्हणजे गोंदून घेणारीलाही मुलगाच होईल. 'सीता की रसोई' नावाचं एक गोंदण बायकांनी स्वयंपाकघर समर्थपणे सांभाळावं म्हणून करण्यात येतं. अशी अनेक मी लहानपणी महाराष्ट्रातही बघितली आहेत. पण या लेखांत असणाऱ्या मुलाखती वाचून आपण ही सगळी संस्कृती लहानपणी कितीही जवळून बघितली असली तरी आपण तिचे प्रेक्षकच होतो हे प्रकर्षानं जाणवलं.

लहानपणी, गोंदणं बघायला आणि वाचायला कितीही आवडत असली, तरी शहरात राहणाऱ्या, आपल्या नात्यातल्या, त्यातल्या त्यात सधन म्हणाव्यात अशा बायका गोंदून घेत नाहीत हेदेखील लक्षात आलं होतं. इतकंच नव्हे, तर गोंदण ही अशिक्षित, गावाकडच्या बायकांनी करायची गोष्ट आहे असंच आजूबाजूच्या सगळ्या मोठ्यांना वाटतं याबद्दल खात्री झाली होती. पण आता माझ्या वयाच्या आणि आर्थिक वर्गातल्या अनेक शहरी स्त्रियांच्या हातावर अगदी अद्ययावत आणि रंगीत गोंदणं असतात. गंमत म्हणजे, सहज येता जाता केलेल्या निरीक्षणातून असं लक्षात आलं की ती बऱ्याचदा पाश्चात्य घडणावळीत गोंदलेली त्यांच्या नवऱ्यांची नावंच असतात. अगदीच क्वचित कधीतरी एखादीच्या मानेवर किंवा ब्लाउजच्या खोल गळ्यातून डोकावणारं एखादं गोंदण दिसतं. अंकात घेतलेल्या मुलाखतींमध्येही, "आम्हाला आकर्षक दिसायचं आहे म्हणून आम्ही गोंदून घेतो", असं स्पष्टपणे फक्त आदिवासी बायका सांगतात. ज्यांच्या हातावर 'दो गोंदना' किंवा 'सीता की रसोई' आहे त्या, "हे असं करायचं असतं म्हणून आम्ही केलं" अशीच उत्तरं देतात.

बदलत्या समाजरचनेमुळं आणि आर्थिक संधींसाठी केलेल्या स्थलांतरामुळं आता गोंदणाच्या पारंपरिक पद्धती लुप्त होऊ लागल्या आहेत. ही कला आधुनिक माध्यमांमध्ये आणायचा प्रयत्नही होतो आहे. या कलेला 'आदिवासी कला' या सरसकट लेबलमधून सोडवून तिला कॅनव्हास आणि इतर माध्यमांत आणण्यासाठी झालेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांबद्दल शान खोसला यांचा एक लेख अंकात आहे. पण गोंदणरूपात ही कला जपण्यासाठी गोंदून घेणारी जिवंत शरीरं लागतात याचा विचार केला तर इतर कलांपेक्षा ही कला किती वेगळी आणि विलक्षण आहे हे लक्षात येतं. कदाचित त्यामुळेच त्याबद्दल इतकं कुतूहल आणि आकर्षण वाटत असावं.या विषयाला वाहिलेला एक संबंध अंकच, तोही इतका सकस आणि देखणा, हातात पडेल असं कधी वाटलं नव्हतं. आता असं काही आपण वाचलं आहे हे कायमचं आठवणीत ठेवण्याचा मार्ग या अंकातूनच जातो!

समीक्षेचा विषय निवडा

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/12/2024 - 04:40

आमच्या आजोळच्या गावी कातकरी लोकांची वस्तीही आहे. तिथे माझ्या वयाच्या मुलींच्या कपाळावरही गोंदण दिसायचं.

मी लहानपणी फार खोदून खोदून त्याची चौकशी केली होती, आणि त्या मुलींच्या तोंडून "आम्हांला हे आवडत नाही, पण काय करणार", असं वदवून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना त्यात काही वावगं वाटत नव्हतं, त्यांच्यासाठी हेच नॉर्मल होतं.

मध्ये काही वर्षं गेली. त्यांना गोंदण का नॉर्मल वाटतं, हे मला समजायला लागलं. आपल्याकडे उदारीकरण वगैरे झालं. मग मी आजोळी गेले तेव्हा सगळीकडे 'फेअर अँड लव्हली' हमखास दिसत होतं. फ्लेक्सवर आणि घरांघरांमध्ये. आता त्यांना 'नका हे वापरू' असं सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती.