Skip to main content

All we imagine: स्वचा शोध

मध्यंतरी 'साईनफेल्ड'चा एक निर्माता लॅरी डेव्हिड ऑस्टिनात आला होता. बऱ्या अर्ध्याच्या मित्राच्या मित्रानं त्याच्या तोंडून ऐकलं, "उत्तम लोक चांगले वागतात, कारण त्यांना तसं वागावंसं वाटतात. चांगले लोक चांगलं वागतात; कारण तसंच वागायचं असतं, हे त्यांना माहीत असतं. वाईट लोक त्यांना हवं तसंच वागतात. उत्तम आणि वाईट लोक समाधानी असतात, कारण त्यांना हवं तसं ते वागतात. चांगले लोक असमाधानी असतात." लॅरी डेव्हिड म्हणाला, "मी चांगला माणूस आहे."

'लोक काय म्हणतील', 'हे असं वागायचं असतं म्हणून मी असं केलं', ह्या प्रेरणेतून दाखवलेल्या चांगुलपणामुळे आपण खरंच चांगली व्यक्ती ठरतो का?

All We Imagine As Light हा पायल कपाडियांचा सिनेमा बघायला जाताना मी याचा काही विचार केला नव्हता. वाट वाकडी करून मी नीनाला लिफ्ट दिली आणि आम्ही एकत्र सिनेमा बघायला गेलो कारण मला एकटीला थिएटरमध्ये जायचं नव्हतं.


पोस्टर

देशाच्या अनेक भागांमधून लोक मुंबईत येतात. काही लोक शिकून ठरावीक नोकरी करण्यासाठी येतात. काही लोक नातेवाईकांच्या आधारानं येतात आणि पडेल ती कामं करतात. अशांमध्ये असतात प्रभा आणि अनु या दोन मल्याळी नर्स. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बहुतेकशा नर्स मल्याळीच आहेत. प्रभा असेल २८-३० वर्षांची. शांत आणि सोशिक, कामाच्या बाबतीत अगदी चोख आणि वेळ आलीच तर पेशंटना दम देणारी प्रभा. तिच्याबरोबर राहणारी अननुभवी, अल्लड स्वभावाची अनु. प्रभानं तिच्या नवऱ्याला लग्न ठरल्यावरच पहिल्यांदा बघितलेलं; लग्नानंतर तो जर्मनीत गेला तो गेलाच. प्रभा आणि त्याचं गेल्या वर्षभरात बोलणं झालेलं नाही. अनुचा बॉयफ्रेंड मुंबईत राहणारा मल्याळी मुसलमान. प्रभाला त्याबद्दल समजतं तेव्हा ती अनुला एकदा अनुला अनुदार शब्दांत दम देते.


अनु आणि प्रभा
अचानक प्रभाच्या नावानं आलेला चकचकीत कुकर तपासताना अनु आणि प्रभा


लोकलमध्ये प्रभा
लोकलमधून प्रवास करताना प्रभा

हॉस्पिटलमधे प्रभाची स्वयंपाकी मैत्रीण असते पार्वती. पार्वतीनं तिला सांगून झालेलं असतं की त्या नवऱ्याचा विचार आता सोड. आपण दोघीही आता "एकटा जीव सदाशिव". प्रभा विरोध करत नाही, पण तिला ते मान्यही करायचं नसतं.

पार्वतीला गावी जाण्यात मदत करण्यासाठी प्रभा आणि अनु रत्नागिरीला येतात. सिनेमात तेव्हा पहिल्यांदा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळं आकाश दिसतात. मुंबईतली गर्दी, मुंबईतला पाऊस आणि या तिघी दिवसभर हॉस्पिटलात, कामांत असतात; तिथे मोकळेपणाची सोय नसते. आजूबाजूला सतत आवाज असतात; गाड्यांचे, गर्दीचे, पेशंटचे, आंदोलनांचे, खेळणाऱ्या मुलांचे. ते सगळे आयुष्याचा भाग झालेले असतात.

मात्र रत्नागिरीत येऊनही प्रभा पार्वतीबरोबर समुद्रात जात नाही. किनाऱ्यावर वाळूत उभी राहून कोरडीच राहते. समुद्रात बुडलेल्या अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी ती त्याच्या तोंडात हवा भरताना मागेपुढे बघत नाही, आणि त्याचा जीव वाचतो.

रत्नागिरीत पार्वती आणि प्रभाचा डोळा चुकवून आलेला शियाझ प्रभाला दिसतो. शियाझचं अनुवर प्रेम आहे हे तिला दिसतं. आपण ज्याला नवरा समजतो, तो आपल्यावर प्रेम करत नाही, हे प्रभा स्वतःशी मान्य करते. प्रभा तिच्या नवऱ्याला तिच्या मनातून टाकते. प्रभा अनुला सांगते, शियाझला बोलावायला.

सरतेशेवटी दिसतं की रात्र होत आलेली आहे. समुद्रकिनारी एका पडवीवजा टपरीत प्रभा, पार्वती, अनु आणि शियाझ समाधानानं बसले आहेत; टपरी चालवणारा पोऱ्या कानात हेडसेट घालून कुठल्याश्या गाण्यावर नाचतो आहे. टपरीत लावलेल्या दिव्यांच्या माळ्यांच्या प्रकाशात हे दृश्य दिसतं. आणि वर स्वच्छ आकाशातले तारे आहेत.

सिनेमा संपल्यावर नीनानं मला विचारलं, "पायल कपाडिया म्हणजे बाई का बुवा?" मी तिला विचारलं, "सिनेमात थोडं अंगप्रदर्शन आहे; एक संभोगदृश्य आहे. ते बघून तुला काय वाटलं? ही नजर बाईची आहे का बुवाची?"

नीना म्हणाली, "आपण दोघींनी बहुतेक दोन सिनेमे बघितले. मला सगळीच सबटायटल्स वाचायला लागली." ते तितकंसं खरं नाही. बहुतेकसे संवाद मल्याळममध्ये आहेत. पण पार्वतीसारख्या बायका मी बघितल्या आहेत. गरीब घरांतल्या, परिस्थितीमुळे खचून न जाणाऱ्या, कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही victimसारख्या न वागणाऱ्या, आणि कधीमधी कचकून दारू पिऊन नाच करणाऱ्याही. ५ नोव्हेंबरला अमेरिकी निवडणुकांचे निकाल आल्यापासून, पावणेदोन महिन्यांत नीनाला मी आता तिसऱ्यांदा टोकलं, "ट्रंप निवडून आला आहे; राजकीय वातावरण फार बरं नाही. पण त्यामुळे आपण खचून गेलो आणि दुःख करत बसलो तर आपण आपल्या आयुष्यावर त्यांना ताबा मिळवून देतो."

नीना हसली. "या थिएटरमध्ये चांगले सिनेमे लागतात म्हणून मी नेहमी जाते. पण हल्लीच्या काळात बरं काही बघायला मिळालं नव्हतं. हा सिनेमा मात्र मला आवडला."

मी आधी सिनेमा बघायला जायचा म्हणून मनातून थोडी नाखुश होते. केवढं काम पडलं आहे, याचं दडपण अजूनही आहे.

सिनेमात एक प्रसंग आहे. मुंबईतली एक संध्याकाळ. अनु शियाझबरोबर बाहेर फिरत आहे, दोघंही आनंदात आहेत. आणि प्रभा घरी एकटी आहे, आणि बाथरूममध्ये हातानं साडी धुवत आहे.

मी नीनाला सांगितलं, मी अमेरिकेत आल्यावरही सुरुवातीला शॉर्ट्स वापरायचे नाही. पण बऱ्या अर्ध्याच्या एका नातेवाईकानं मी छोटे कपडे त्यांच्यासमोर घालणार नाही ना, असा प्रश्न विचारल्यावर मी शॉर्ट्स आणल्या. माझ्यावर भलत्या कल्पना लादणाऱ्या व्यक्तीनं मला माझ्यापासून स्वातंत्र्य दिलं.

सिनेमा बघितल्यावर दुसऱ्या दिवशी एका मित्राबरोबर जेवायला गेले होते. त्यालाही सिनेमाबद्दल सांगितलं. आम्ही शुक्रवारी दुपारी बरेचदा जेवायला भेटतो. मी बऱ्या अर्ध्यासाठी बरोबर पार्सल घेऊन जाते. म्हणून तो मला एकदा 'गुड वाईफ' म्हणाला होता. मी त्याला म्हणाले, "मला हे गुड वगैरे लेबल आवडत नाही. एकदा चांगली अशी प्रतिमा निर्माण केली की ती जपावी लागते. मला त्यापासून स्वातंत्र्य हवं असतं."

नीनाबरोबर एकदा 'आंखो देखी' सिनेमाही मला बघायचा आहे. मी तो सिनेमा बघितल्यालाही बरीच वर्षं झाली आता. स्वतःपासून, स्वतःच्या धारणांपासून स्वातंत्र्य मिळवता आलं पाहिजे. आपुला संवाद आपुल्याशी आणि आपलं स्वातंत्र्य आपल्यापासूनच.

समीक्षेचा विषय निवडा

चिमणराव Wed, 25/12/2024 - 10:43

नातेवाईक, शेजारी आणि त्या देशाचा समाज यांनी काही पिंजरे उभे केलेले दिसत असतात. महिलांना हे अधिक जाणवतं. सिनेमा केरळी नर्सेस यांच्यावर आहे. केरळी मुलींची लग्न हा फार गहन विषय आहे. याचबरोबर इतर काही राज्यांतही महिलांचे प्रश्न गडद आहेत. जिथे नाहीत आणि मुलींच्या आयुष्याच दडपण आइवडलांवर नाही त्या आनंदात असतात. केरळमध्ये हुंडा. महाराष्ट्रात काही भागांतही हुंडा भयानक वास्तव आहे. गुजरातमध्ये लग्नाचा खर्च अर्धा वाटणे एवढेच आणि जरा तोलामोलाचे स्थळ हुडकणे एवढेच.
समाजातील असमानता आणि अन्याय चित्रपटांना विषय पुरवतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/12/2024 - 22:59

In reply to by चिमणराव

सिनेमा केरळी नर्सेस यांच्यावर आहे

पण नाही, हा अजिबातच विषय नाही ह्या सिनेमाचा.

समाजातील असमानता आणि अन्याय चित्रपटांना विषय पुरवतो.

याचाही फारसा संबंध नाही ह्या विशिष्ट सिनेमाशी.

पण बरोबर आहे तुमचं!

पॉर्न ओके प्लीज Wed, 25/12/2024 - 15:56

सिनेमाची ओळख आवडली. पुष्पा सारख्या सवंग लोकप्रिय सिनेमांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, All We Imagine As Light सारखा संयत मांडणी करणारा सिनेमा म्हणजे वाळवंटातील मरुभूमी* म्हणावा लागेल.

-
* Oasis साठी मराठीत मरुभूमी हा शब्द योग्य आहे का?

चिमणराव Thu, 26/12/2024 - 13:13

In reply to by पॉर्न ओके प्लीज

साधं सोपं म्हणजे वाळवंटातील हिरवं बेट.
वादी म्हणजे साधारण मोठी लांबलचक अशी जागा असावी.

पॉर्न ओके प्लीज Sun, 05/01/2025 - 20:10

This is a test comment.

'न'वी बाजू Mon, 06/01/2025 - 01:21

कोणीतरी अगोदर (नव्याने) प्रतिसाद दिलेला असताना दुसऱ्या कोणी जर प्रतिसाद दिला, तर प्रत्येक वेळेस धाग्याची नवी प्रत निघते, किंवा कसे, हे तपासण्याकरिता केलेला प्रयोग. (वात्रटपणा म्हणा, हवे तर.)

पर्स्पेक्टिव्ह Fri, 07/02/2025 - 08:47

मला नाही आवडला फारसा. उगाच ताणला आहे असं वाटतं. रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनु आणि तिचा बॉयफ्रेंड दिवसाढवळ्या संभोग करतात हे काही पटले नाही. बरं, अनु प्रभाच्या समोर मुद्दाम ब्लाऊज आणि ब्रा काढते आणि ह्या दृश्याच्या वेळी मात्र ब्रा व पँटी तशीच असते, हा उलटा प्रकार का केला दिग्दर्शिकेने हे कळत नाही. दुसरे म्हणजे मुंबई इतकी काही गडद अंधारी जागा नाहीये. त्यामुळे मुंबईतलं सगळं चित्रीकरण गडद निळसर रंगछटेत आहे आणि त्यांची एसटी बस कोकणात शिरते तेव्हा अचानक लख्ख ऊन पडतं वगैरे काही पटत नाही. दिग्दर्शिकेने उगीच आपला ‘टच‘ दाखवायला हा तांत्रिक खेळ केला आहे असं वाटतं. छाया कदम यांचा अभिनय छान आहे. बाकी व्यक्तिरेखा ठीकठाक. चित्रीकरण लाँग शॉट्सचा अतिरेक झाल्यामुळे कंटाळवाणं वाटतं. बाकी ठीक.

'न'वी बाजू Sat, 08/02/2025 - 10:23

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनु आणि तिचा बॉयफ्रेंड दिवसाढवळ्या संभोग करतात हे काही पटले नाही.

ही संकल्पना चेतन भगतच्या ‘टू स्टेट्स’वरून ढापली असावी काय? (‘राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिवसाढवळ्या समुद्रकिनाऱ्यावर संभोग करा!’)

(अतिअवांतर: चेतन भगत या इसमास नागडा करून, छपराला उलटा टांगून, खालून मिरच्यांची धुरी देतादेता त्याच्या ढुंगणावर चाबकाचे फटके मारले पाहिजेत. किंवा काही कारणास्तव हे जर का शक्य नसेल, तर मग गेला बाजार त्याचे घर उन्हात बांधले पाहिजे. असो.)

प्रीति छत्रे Sat, 22/02/2025 - 15:07

परदेशी चित्रपटमहोत्सवांमध्ये याचा इतका गाजावाजा झाल्यामुळे माझ्या अपेक्षा अंमळ जास्तच वाढल्या की काय माहिती नाही, पण मला हा सिनेमा खूप काही ग्रेट वाटला नाही.

अशा प्रकारचे आणि अशा पद्धतीने आपल्याकडे इतरही बरेच सिनेमे बनत असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 15/03/2025 - 05:48

बरं, अनु प्रभाच्या समोर मुद्दाम ब्लाऊज आणि ब्रा काढते आणि ह्या दृश्याच्या वेळी मात्र ब्रा व पँटी तशीच असते, हा उलटा प्रकार का केला दिग्दर्शिकेने हे कळत नाही.

याचं मला जाणवलेलं उत्तर - स्त्रीची नजर. अनु प्रभासमोर बिनदिक्कत कपडे बदलते; ही दोन स्त्रियांमधली जवळीक आहे. प्रभा तिच्याकडे बघणं मुद्दाम टाळते, कारण तिनं स्त्रीचं शरीर आणि अनुची मैत्री पूर्णपणे स्वीकारलेले नाहीत. म्हणूनच कदाचित, प्रभाला नवऱ्याची आठवण येते तेव्हा ती फक्त तो कोरा-करकरीत कुकर जवळ धरते. 

अनुचं तसं नाही. अनुनं आपलं शरीर, लैंगिकता, कुतूहल, सगळं स्वीकारलं आहे. त्यामुळे तिला मोठ्या बहिणीसारखी असणाऱ्या प्रभासमोर कपडे बदलायला काही वाटत नाही. त्या कृतीमध्ये लैंगिकतेचा संबंध नाही.

हेटरोनॉर्‌मेटिव्ह संभोगदृश्यात बाईचं शरीर बाईच्या नजरेतून बघायला फार काही त्रास होऊ नये. सदर सिनेमा चाळवण्यासाठी किंवा पॉर्नपट नाहीच.

अशा प्रकारचे आणि अशा पद्धतीने आपल्याकडे इतरही बरेच सिनेमे बनत असतात.

मी फार सिनेमे बघत नाही. (हजारों ख्वाहिशें ऐसी, पण त्यात चांगल्या सिनेमासाठी वेळ होत नाही.) 

एरवी सुस्वभावी असणारी प्रभा स्वतःपासूनच स्वातंत्र्य मिळवते; ते मला आवडलं. तिच्या मैत्रिणी तिला उद्मेखून काही सांगतात, ते ती ऐकत नाही; पण त्यांच्या वागण्यातून ती शिकते. वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि वयाच्या स्त्रियांची मैत्री लोभस आहे. मला हे बघायला आवडलं. सिनेमा ग्रेट आहे का नाही, हा प्रश्न मला पडत नाही. 

भारतातर्फे ऑस्करसाठी हा सिनेमा न पाठवता 'लापता लेडिज' पाठवला म्हणून म्हणे बवाल झाला. त्या समितीच्या अध्यक्षांचं म्हणणं की हा सिनेमा भारतीय वाटत नाही. मला 'लापता लेडिज'ही आवडला. आणि 'ऑल वी इमॅजिन'ही आवडला. शिवाय हे काही विज्ञान किंवा गणित नाही, एकच एक उत्तर योग्य असायला!

(काही लोकप्रिय कलाकारांची कला मला सहनही होत नाहीत; अशीही बरीच उदाहरणं आहेत. चालायचंच.)