निबिडात दडलेल्या
निळ्याभोर पाखराची
लवलवती लकेर
जेव्हा कानावर येते....
निळ्यासावळ्या निर्झरा
फेसाळत, कवळून
पाणभोवर्याची माया
जेव्हा पैंजण बांधते...
मावळतीच्या बिलोरी
आभाळाला तोलूनिया
एक इवले पाखरू
जेव्हा पंखावर घेते...
काजळल्या नभावर
निळी रेष रेखाटत
दिशा, कोन झुगारून
जेव्हा उल्का कोसळते....
.....काळजात रुजलेल्या
कुण्या कवितेची ओळ
ध्यानीमनी नसताना
तेव्हा ओठावर येते