२०२५ साली नुक्ताच आलेल्या "छावा" सिनेमा पहातानाचे टिपण
छत्रपती शिवाजीमहाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य, त्यामागचं कर्तृत्व, त्या परंपरेत जन्मलेल्या संभाजी महाराज यांचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम, जुलमी राज्यसत्तेविरुद्ध शिवाजीमहाराजांनी उभा केलेला संघर्ष पुढे नेणं, आणि वेळ आल्यावर शरण न जाता, तडजोड न करता अतिशय हिंसक असा, हालहाल करून आलेला मृत्यु स्वीकारणं. ह्याकरता संभाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करतो.
शिवाजी सांवंतांच्या कादंबरीतून आणि अन्य वेगवेगळ्या नाटककादंबर्या आणि ऐतिहासिक साधनांद्वारे संभाजीमहाराजांचं कर्तृत्व मराठी माणसांकरता चिरपरिचित आहे आणि अभिमानाचाही विषय आहे.
"छावा" कादंबरीवर आधारित बहुचर्चित ठरलेला आणि बराच धंदा करत असणारा , नुकताच रीलीज झालेला "छावा" नावाचाच हिंदी सिनेमा जवळच्या थेटरमधे रविवार संध्याकाळी पाहिला.
हॉल ८०% भरलेला होता. संभाजी महाराजांच्या एंट्रीला आणि अन्य काही प्रसंगी माफक टाळ्या झाल्या. पण थेटर टाळ्या शिट्ट्यांनी खूप दणदणत होते असा प्रकार नव्हता.
ऐतिहासिक राजेमहाराजे घेणे. त्याला "३००" ह्यासारख्या चित्रपटामधल्या दृष्यांची, "लॉर्ड ऑफ द रिंग्ज" पासून वगैरे सुरु झालेल्या आणि मार्व्हल क्रांतीमधून गेलेल्या सीजीआयची फोडणी देणे, बाहुबलीमधून प्रेरणा घेणे आणि नायकाचे मसल्स वगैरे अतिमानवी दाखवणे, मध्यंतरानंतर फक्त मारामार्या दाखवणे आणि उरलेला शेवटाचा वेळ फक्त टॉर्चर दाखवणे, पठाण वगैरे सिनेमामधल्यासारख्या स्लो-मो अॅक्शन्सना उचलणे ह्यात कसर ठेवलेली नाही.
मुघल सत्ता आणि त्यांच्या कारवायांना हिंदूद्वेषाच्या एकाच रंगात रंगवणं आणि "आपण अन्यायग्रस्तच कसे होतो, अत्याचारच कसे आपल्यावर झाले आणि एकंदर हिंदुत्ववादच कसा मस्त" ह्याचं नॅरेटिव्ह जमलं आहे. त्यामधली रंगसंगती, चिन्हं वगैरे यथास्थित.
स्क्रीनप्ले-संवाद वगैरे फालतू गोष्टींना फाट्यावर मारणे वगैरे छान होते. "जे काय थोडंबहुत बोलायचं ते पूर्वार्धात बोला. नंतर बोलायचं फार काय नाय आहे" असं एकंदर सिनेकर्त्यांचं म्हणणं असावं. उत्तरार्धामधे एकामागोमाग आलेल्या ७-८ लढाया - ज्यामधे न्यूटनचे आणि कुणाचेही कसलेही भौतिकशास्त्रीय नियम बियम ह्यांना फाट्यावर मारून, बेंबीच्या देठापासून मारलेल्या आरोळ्यांबरोबरचा रक्तपात आणि मग उरलेला भरपूर वेळ संभाजी महाराजांचं टॉर्चर आणि मग सिनेमा संपवणं.
सर्व सिनेमात लक्षात राहावा असा एकमेव संवाद शेवटचा. औरंगजेब संभाजी महाराजांची जीभ हासडतो आणि त्यानंतर मात्र लाँग टॉर्चर संपतं नि तो मरतो. त्या आधीचा संवाद असा की
औरंगजेब : "हमारे साथ हो जाओ. जान बच जाएगी. सब कुछ मिलेगा तुम्हें. सिर्फ धर्म बदलना पडेगा"
संभाजी : "हमारे साथ हो जाओ. जान बच जाएगी. सब कुछ मिलेगा तुम्हें. और धर्मभी नही बदलना पडेगा".
हा संवाद क्लेव्हर होता. मला आवडला. त्याला टाळ्याही पडल्या.
विकी कौशल आणि अक्षय खन्ना हे अॅक्टर म्हणून मस्त आहेत. तर त्यांचा अभिनय आणि संवादफेक वगैरे छान. बाकी सेट्स वगैरे बाबतीत अति नितीनदेसाई-भन्साळीगिरी दिसली नाही किंवा कदाचित माझी नजर आता मेली असावी. औरंगजेबाचा दरबार पाहिला तर "मुघल ए आझम" मधली भव्यातिभव्य सेट्सची दृश्यं दाखवणार्यांचे आत्मे तळमळले असावेत. एकंदर स्पेशल इफेक्ट्सवर पैसे खर्च केले त्यामुळे सेट्स वरचे पैसे वाचवलेले दिसताएत.
नायिका येसूबाई आणि रहमानचं संगीत ह्या दोन गोष्टी कलरलेस टेस्ट्लेस ओडरलेस होत्याशा भासल्या.
एक आहे. साऊथच्या सिनेमाच्या शोच्यावेळी हैद्राबादेत का कुठेतरी थेटरातच फटाके लावणे किंवा चेंगराचेंगरी करणे वगैरे धोके - इतका उन्माद करूनही - जाणवलेले नाहीत. अजून मराठी इंधन कमी पडते असे दिसते.
"छावा" सिनेमाच्या आर्थिक यशाची तुलना करताना दोन पाच वर्षांपूर्वी आलेल्या "द कश्मीर फाईल्स" ह्या सिनेमाची एका विशिष्ट कारणाने आठवण झाली. त्या सिनेमातही क्लायमॅक्सच्या प्रसंगी दाखवलेलं अत्यंत हिंसक टॉर्चर त्या सिनेमाच्या पाचशे कोटी वगैरे यशामधे महत्त्वाचं योगदान देणारं होतं असं मला वाटतं. "छावा" सिनेमामधेही ते टॉर्चर असं रीतसर, कसलीही कसर न ठेवता दाखवण्यातून जोरदार धंदा केला आहे हे स्पष्ट आहे.
हे राजकारण च आहे
बहुसंख्य हिंदू ना. भारतीय संस्कृती ला समाज वादच्या नावाखाली आव्हान देणाऱ्या राजकीयपक्ष डावे, comunist,
काही समाज घटक जे नेहमी हिंदू द्वेष करतात.
त्यांचे तोंड बंद करणे त्यांचा प्रभाव कमी करणे ह्या साठी बीजेपी अगदी योग्य मार्गाने जात आहे.
आणि लोकांचा खूप पाठिंबा पण त्यांच्या राजकीय डाव पेचना मिळत आहे..
हे वादळ बघून अनेक हिंदू द्वेशी स्वयं घोषित बुद्धी वादी गायब झाले आहेत.
अगदी योग्य मार्गाने bjp राजकीय खेळी खेळत आहे
खरा इतिहास
इतिहासावर बेतलेले सर्वच चित्रपट बघणे, अलिकडच्या काळात मी सोडून दिले आहे. कारण ते वास्तववादी असण्याची शक्यता फार कमी असते. चित्रपटाचा हिरो हा सर्वगुणसंपन्न दाखवावाच लागतो. नाही दाखवला तर तुमची लगेच देशद्रोह्यांत गणना व्हायची भीति असते. ती चित्रपट निर्मात्याची मजबुरी असते. पण त्यावर परखड परीक्षण लिहिले तरी तुम्ही देशद्रोही ठरताच. असो. तरीही बापटांनी खुबीने, त्यांना काय म्हणायचे आहे ते वाचकांबद्दल पोचवले आहे म्हणून त्यांचे अभिनंदन!
हौस दांडगी तुमची!
'द हँडमेड्स टेल' ही मालिका (कादंबरी निराळी) बघणं मी सोडून दिलं. टॉर्चर पॉर्न वगळता त्यात काही आहे, असं वाटलं नाही. सदर सिनेमात तसं हिंसेचं पॉर्न आहे का?