Skip to main content

नॉर्मल पीपल: सॅली रूनी

Sally Rooney

सॅली रूनीचं मी काहीच वाचलं नव्हतं. तिची 'नॉर्मल पीपल' ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा माझा मुलगा लहान असल्यानं मी २-४ वर्षं फार कमी वाचन केलं. नंतर जेव्हा आंतरजालावर 'मीम्स'चा काळ आला तेव्हा मला तिचं नाव मिलेनियल लोकांच्या भावनिक आंदोलनांशी जोडून त्याची खिल्ली उडवल्याची अनेक मीमं दिसली. या बाईंनी मिलेनियल पिढीतल्या वाचकांना वेडं केलं आहे इतपत माझ्या लक्षात आलं. त्यामुळे नॉर्मल पीपल वाचायला घ्यायच्या आधी 'आपण त्यातले नाही' (वास्तविक, मी व्यवस्थित मिलेनियल आहे) असा एक तटस्थ आणि कडवट पवित्रा उगाचच घेऊन ती वाचायला घेतली. पहिल्या पन्नास पानांतच माझा तो तटस्थपणा उडून गेला. आपल्याला असं लिहिता यावं इथपासून ते आपणच मेरिअन आहोत का - इथपर्यंत अनेक विचारांनी मला ग्रासून टाकलं आणि मी तात्काळ रुनीची पंखी झाले!

 

नॉर्मल पीपल एक प्रेमकथा आहे. एका श्रीमंत मुलीचं (मेरिअन) तिच्याच वर्गातल्या एका गरीब मुलाशी (कॉनेल) प्रेम जुळतं. कॉनेलची आई मेरिअनच्या घरी सफाई करायला येत असते, इतका त्या दोघांच्या आर्थिक परिस्थितीत फरक असतो. पण आयर्लंडमधल्या एका छोट्या गावातल्या शाळेत कॉनेल एक सर्वगुणसंपन्न, मुलींना हवाहवासा असा मुलगा असतो आणि मेरिअन मात्र एकलकोंडी, सगळ्यांच्या चेष्टेचा विषय असलेली 'अनकूल' मुलगी असते. अशा परिस्थितीत असूनही त्या दोघांमध्ये नाजूक आणि हळव्या नात्याची सुरुवात होते (नाजूक आणि हळवे हे शब्द मला अजिबात वापरायचे नव्हते. पण इथे त्या दोन्ही शब्दांना पर्याय नाही). पण ते नातं सुंदर जरी असलं तरी ते शाळेत कळू द्यायचं नाही याबद्दल कॉनेल अतिशय आग्रही असतो. कदाचित त्यांच्या आर्थिक परिस्थितीतला फरक याला कारणीभूत असेल असं वाटलं, तरी कादंबरी वाचताना ते एकच कारण असावं असं वाटत नाही.  मोठ्या शहरातल्या विद्यापीठात गेल्यावर, तिच्या वाचनामुळे, व्यासंगामुळे, मेरिअन लोकप्रिय होते आणि कॉनेल मात्र तितका चमकत नाही. आणि शाळेतलं प्रेम उघडपणे न व्यक्त करण्याचं कारण केवळ आर्थिक परिस्थिती हे नव्हतं, हे हळूहळू वाचकाच्या लक्षात येऊ लागतं. कादंबरीची वाट त्यांच्यातल्या लहान मोठ्या प्रसंगांनी आणि स्थित्यतरांनी पुढे जात राहते. त्या कोणत्याच प्रसंगांमध्ये लक्षवेधी किंवा नाट्यमय असं काहीच नाही. पण प्रत्येक प्रसंगाचं त्या दोघांच्याही नजरेतून विश्लेषण आहे जे अनेकदा घटकाभर विचार करायला लावतं. गोष्टीतली पात्रं अशी का वागतात याचं उत्तरही गोष्टीतच मिळतं म्हणून ती विशेष आहे. 

 

एखाद्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित झाले याचा अर्थ त्यांच्यावर आपलं प्रेम असायलाच पाहिजे असा नाही - हा आमच्या पिढीतल्या बऱ्याच नात्यांचा पाया होता. प्रेम आणि शारीरिक आकर्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे केवळ एखाद्याबरोबर आपण झोपतो आहोत याचा अर्थ त्याच्याकडून आपण प्रेमाची अपेक्षा करावी असा अजिबात होत नाही - या गृहीतकातूनच आम्ही प्रेमं केली. ती प्रेमं होती किंवा नाही याचंही उत्तर नेहमी मिळालं नाही. त्यामुळे प्रेम म्हणजे नक्की काय हा प्रश्न, चाळिशीतही आम्हाला पडतो!

 

समोरच्याला निवड स्वातंत्र्य आहे, आणि त्याआड आपण येऊ शकत नाही हे स्वतःला बजावत आम्ही नात्यांकडे बघत आलो. कदाचित आमच्या आधीच्या पिढीतही असे लोक असतील पण कोणत्याच वचनाविना आणि भविष्याची काहीही शाश्वती नसताना, केवळ वर्तमानकाळात प्रेम करायला आम्हाला आमच्या परिस्थितीनंही शिकवलं. कारण आम्हाला लांबच्या पल्ल्याचे प्रवास, स्थलांतरं सहजसाध्य होती. जगाच्या एका टोकावर स्थलांतरित म्हणून राहत असताना, जगाच्या दुसऱ्या टोकावर आम्हाला एका ईमेलवर नोकरी मिळत होती. आमच्यासमोर आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक खुलं जग होतं. इतरांच्या मनाचा, त्यांच्या दुःखाचा विचार करण्याची आमच्या पिढीनं सवय करून घेतली. त्यातूनच ‘मध्यमिलेनियल’ ‘वोक’ पिढी तयार झाली. 

 

मला या कादंबरीतले प्रेमप्रसंग आवडले. ते अतिशय हळुवार तर आहेतच पण जसं पात्रांचं वय आणि परिचय वाढेल तसे ते प्रसंग खुलत आणि बदलतही जातात. पण त्याहीपेक्षा अधिक, अनेकवेळा होणाऱ्या पुनर्मिलनाआधी त्यांनी भोगलेल्या विरहाचं वर्णन मला आवडलं. प्रेमिक म्हणून एकत्र नसताना ते दोघेही मित्रत्वाच्या नात्यानं एकमेकांच्या आयुष्यात वावरत असतात आणि त्याच वेळी तुटलेल्या नात्याला आपापल्या पद्धतीनं एकट्यानं मलमपट्टी करत असतात. समोरच्याचं स्वातंत्र्य मान्य करताना स्वतःची सतत समजूत कशी घालावी लागते हे सॅली अगदी चिमटीत पकडून आपल्याला दाखवते. नाकारल्याचा राग नाही. सूडबुद्धी नाही. आपल्याबरोबर नसली तरी आपण जिच्यावर प्रेम केलं ती व्यक्ती आनंदी असावी असं अंतर्बाह्य वाटणारे हे दोघंजण आतून एकटेपणाच्या व्याकुळतेने ग्रासलेले असतात. कदाचित दुसऱ्याला इतकं स्वातंत्र्य देण्याचा अट्टाहास नसता, तर हा आत्मछळ कमी झाला असता असं अनेकदा वाटतं. पण अशा आवर्तनांतून जाणारी ही दोन पात्रं नात्यांचे सगळे ऋतू बघून शहाणी होतानाही दिसतात. 

 

कादंबरीच्या प्रकरणांची नावं म्हणजे तारीख आणि साल अशा नोंदी आहेत. शेवटचं प्रकरण २०१४ सालचं आहे. त्यामुळे यानंतर ज्या वेगानं तंत्रज्ञान माणसांच्या प्रेमात शिरलं ते या कादंबरीत येतच नाही. तरीही, समाजमाध्यमं, त्यामुळे होणारे गैरसमज यांची झलक दिसतेच. एखाद्याला काहीही स्पष्टीकरण न देता सोडून जाण्याला आता ‘घोस्टिंग’ असा शब्द आलेला आहे. आता एखाद्याला आयुष्यातून बाजूला करायचं असेल तर केवळ चारपाच वेगवेगळ्या ॲपवर जाऊन काही बटणं दाबावी लागतात. नकार पचवणं आता कदाचित आणखीन सोपं झालं असावं. हे नक्की प्रेम आहे किंवा अजून काही याचं विश्लेषण करणं अजून अवघड झालं असावं. अलीकडे एखाद्याच्या वागण्याचं विश्लेषण करून देणारी माहितीही आपल्याला आंतरजालावरच मिळते. कुणी ‘नार्सीसिस्ट’ असतं; कुणी ‘गॅसलायटिंग’ करत असतं; कुणाची ‘अव्हॉयडंट अटॅचमेन्ट’ असते - ही सगळी उत्तरं आपण जालावरच शोधतो. 

 

आपल्याला ज्यांच्याकडून उत्तरं हवी आहेत, ज्यांना आपण खरंतर आपल्याला दुखवल्याबद्दल स्पष्टीकरण मागू इच्छितो, त्या सगळ्यासाठी आपण इन्स्टाग्रामवरचे तीस सेकंदांचे चटपटीत मनोविश्लेषक उभे केले आहेत. या परिस्थितीत, कदाचित एक पाऊल मागे टाकणं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी हिताचं ठरेल याची जाणीव ही कादंबरी वाचताना सतत होत राहिली. ‘हॅपिली एव्हर आफ्टर’ कोणत्याच पिढीत नव्हतं, पण प्रेमाच्या पहिल्याच पायरीवर इतका वेळ घालवणाऱ्या, पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येऊन वैतागणाऱ्या आणि विरक्त होऊ बघणाऱ्या, व्याकुळ पिढीचं अचूक वर्णन ही कादंबरी करते. आणि म्हणूनच ती महत्त्वाची वाटते. 

 

साधारण दीड दशकापूर्वीच, विद्यापीठातून सकाळ-संध्याकाळ ये-जा करत असताना मला अनेक गोऱ्या बायका दिसायच्या. ट्रेनमध्ये धावण्याचे बूट घालून चढणाऱ्या पण खांद्यावरच्या पिशवीत उंच टाचेचे नाजूक स्टिलेटो घेऊन जाणाऱ्या; ट्रेनमध्ये बसल्यावर आपल्या पिशवीतून ओटमील किंवा तत्सम काहीतरी सुबक, निगुतीनं केलेला पदार्थ काढून खाणाऱ्या; त्यांच्या डाव्या हाताच्या अनामिकेत एखादी हिऱ्याची अंगठी असायची - जी ताबडतोब माझ्या नजरेत त्यांची प्रतिष्ठा वाढवायची. संध्याकाळी त्यांना नेमक्या वेळी कुणीतरी फोन करायचं - ट्रेन कुठे आली आहे हे विचारायला. या सगळ्या बायका त्या काळात मला 'नॉर्मल' वाटायच्या. त्यांची आयुष्यं ही गाउसियन बेलकर्व्हच्या गतिरोधकाखाली बरोबर बसायची. माझ्या आयुष्यात त्या काळात जी काही उलथापालथ चालली होती ती बघता मी त्या नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनमध्ये कधीच बसणार नाही असा विश्वास मला वाटायला लागला होता. पण यथावकाश मीही 'नॉर्मल' आयुष्य जगू लागले. आणि ते लांबून जितकं आकर्षक वाटायचं तितकं ते चकचकीतही नाही, आणि नॉर्मलही नाही, हे माझ्याही आता लक्षात आलं आहे. म्हणून मला कादंबरीचं शीर्षक विशेष आवडलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/02/2025 - 06:59

सध्या 'विटगेनष्टाईन्ज मिस्ट्रेस' नावाची अतरंगी कादंबरी वाचत आहे. त्यात काय सुरू आहे हे मला अजूनही समजलेलं नाही. पण ती सोडवतही नाहीये. ती झाल्यावर ही वाचायला घेईन.

 

मला सॅली रूनीचं नावही माहीत नव्हतं.  बरं झालं लिहिलंस.

प्रीति छत्रे Fri, 21/02/2025 - 15:03

किंडलवर हे पुस्तक मागे कधीतरी विश-लिस्टला टाकलंय. त्याच्या description मध्ये त्यावर एक टीव्ही सिरीज आल्याचं समजलं. त्याच्या इमेजेस वगैरे पाहून पुस्तक विकत घेऊन वाचावं की नाही ठरत नव्हतं.

तू लिहिलेलं वाचून पुस्तक वाचावंसं वाटलं.

स्वयंभू Sat, 22/02/2025 - 00:29

लेखन आवडले. 

मी ज्या पार्श्वभूमीतून येतो त्या वातावरणात अशा कादंबरीत घडतं किंवा अशा प्रकारे लिहिलेले जे असतं ते वाचून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्हिज्युअलाईज करावे लागते. त्यामुळे कधीकधी असं साहित्य मनाला भिडणारे असते तर कधी अशा साहित्यातील वर्णिलेल्या मंडळींचा उगाचंच तिरस्कार करावासा वाटतो. 

अवांतर: तसंही 'टचलेस' प्रेम करणारे आणि केवळ नजरेतून भावना व्यक्त केल्या जाणाऱ्या पिढीच्या साहित्याचा भोक्ता असल्याने शरीरसंबंध वगैरे वगैरे जेव्हा लिखाणात आढळतात तेव्हा उगाचंच असं साहित्य म्हणजे पोट भरलेल्या अभिजनांचं असतं असं मनात कोंबल्यासारखं वाटतं. :-) 

अति अवांतर: एकूणच मिलेनियल लोकांना विशेषतः ज्यांना प्रेम वगैरे तारुण्यसुलभ भावनांचा रसरशीत अनुभव पाठीशी आहे अशा लोकांना एकाकी, एकटं, रिकामं असणं, इन लेट थर्टी बिइंग सिंगल सेलेब्रेट करणं वगैरे सारख्या गोष्टी म्हणजे कल्पनाविलास वाटतो. ही माझी कैक वर्षांची (गैर) समजूत आहे.

सई केसकर Sat, 22/02/2025 - 06:13

In reply to by स्वयंभू

इन लेट थर्टी बिइंग सिंगल सेलेब्रेट करणं वगैरे सारख्या गोष्टी म्हणजे कल्पनाविलास वाटतो. ही माझी कैक वर्षांची (गैर) समजूत आहे.

सिंगल असणं काय; लग्न काय - कुणीच काहीच १००%  सेलेब्रेट करत नसतं. वाढदिवस असला तरी आदल्या दिवशी आपण या जागात येऊन नेमकं काय करून दाखवलं असा प्रश्न मला पडतो. 

'न'वी बाजू Sat, 22/02/2025 - 08:09

In reply to by सई केसकर

वाढदिवस असला तरी आदल्या दिवशी आपण या जागात येऊन नेमकं काय करून दाखवलं असा प्रश्न मला पडतो. 

हम्म्म्म्म्म्… चांगला प्रश्न आहे!

(अवांतर शंका: तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी जन्माला आलात??????)

उलटपक्षी, वाढदिवस किंवा इतर काहीही, साजरे करण्याकरिता, काहीतरी करून दाखवि(लेले अस)णे ही पूर्वअट नक्की काय म्हणून असावी? (पीने वाले को पीने का बहाना चाहिए…)

सई केसकर Sat, 22/02/2025 - 10:00

In reply to by 'न'वी बाजू

(अवांतर शंका: तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी जन्माला आलात??????)

 

:D म्हणजे असं सोमवारी ऑफिसला जायचं म्हणून रविवारी संध्याकाळी वाईट वाटतं तसं!  कदाचित प्रत्यक्ष जन्मदिवसाच्या आदल्या दिवशी मला आईच्या उदरातही असंच वाटलं असेल. 
 

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 22/02/2025 - 06:33

In reply to by स्वयंभू

हे वाचायला मला दोन मिनिटं लागली. मग ते नक्की काय आहे हे समजायला आणखी दोन मिनिटं.

 

लग्न केलेले लोकही आपण न वर्षं (न > २, किंवा न > २०) साजरे करतात तेही मला अवास्तव वाटतं. इतर वेळी फालतू कारणांवरून भांडणारे किंवा एकमेकांवर फार अवलंबून असणारे लोक का साजरा करत असतील, हे मात्र मला समजतं. कोव्हिडकाळात लोकांना एकत्र येता येत नव्हतं; त्यानंतर लोक जोरदार महोत्सव साजरे करायला लागले होते. 

मग समाजाच्या रीतीनुसार लग्न न केलेल्या लोकांनी पार्ट्या का झोडू नयेत!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 22/02/2025 - 06:37

सध्या हे पुस्तक ग्रंथालयात उपलब्ध नाही. २०१९चं पुस्तक आहे, ५०+ प्रती आहेत संपूर्ण शहरभरातल्या शाखांमध्ये, पण मोठी रांग लागली आहे पुस्तकासाठी.

 

स्पॅनिशमध्ये आहे उपलब्ध. पण मला स्पॅनिश तेवढं नाही येत. शीर्षकावरून हेच ते पुस्तक इतपतच समजण्याइतपत स्पॅनिश मला येते.

सई केसकर Sat, 22/02/2025 - 07:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऑस्टिनात खूपच अब्नॉर्मल पीपल राहत असतील. त्यामुळे त्यांना नॉर्मल माणसं कशी असतात याबद्दल उत्सुक्ता असेल. 

'न'वी बाजू Sat, 22/02/2025 - 08:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्पॅनिशमध्ये आहे उपलब्ध.

ट्रंपबाबाची मोहीम इतक्यातच फत्ते होऊ लागली काय?

(अतिअवांतर: बाकी, ट्रंपबाबा आजकाल कोणालाही हाकलण्यासाठी पकडू लागला आहे, म्हणे. केवळ कातडीच्या रंगावरून. पोर्टो रिकन, नेटिव अमेरिकन वगैरेंसारखी ‘आमच्या देशा’त राहण्याचा जन्मजात, नागरिकत्वसिद्ध हक्क असलेली मंडळीसुद्धा त्याच्या कचाट्यातून सुटलेली नाहीत, म्हणतात.)

पण मला स्पॅनिश तेवढं नाही येत. शीर्षकावरून हेच ते पुस्तक इतपतच समजण्याइतपत स्पॅनिश मला येते.

गूगल ट्रान्स्लेट कशासाठी आहे मग?

shantadurga Sat, 22/02/2025 - 10:54

In reply to by 'न'वी बाजू

>त्यामुळे प्रेम म्हणजे नक्की काय हा प्रश्न, चाळिशीतही आम्हाला पडतो!

- मिलेनिअल्सच्या पूर्वी आणि नंतरच्या पिढ्यांना देखील हा प्रश्न पडत असणार आणि पडणार. त्यात विशेष ते काय??

ग़ालिब उगीच का म्हणाला - इश्क़ पर जोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब',
कि लगाये न लगे और बुझाये न बुझे!