कस्त्वम् आणि कोऽहम् या प्रश्नांची काही (पडल्यापडल्या स्वतःच्या बेंबीला न्याहाळत) सापडलेली उत्तरं.
राजन बापट
( कस्त्वम् आणि कोऽहम् हे प्रश्न - म्हणजे मुळात हे शब्दच - संस्कृत आणि पर्यायाने भटबामणी कॉन्स्पिरसीचा एक भाग आहेत. त्यामुळे, त्याचं भाषांतर अनुक्रमे "ऐला, कोण रे तू?" आणि "तेजायला, तोच मी ए!" असं वाचावं)
तर असं मानलं जातं की "तू कोण" नि "मी नक्की कोण" ह्या प्रश्नांचा शोध घेणं हा माणसांनी चालवलेला प्रकार हजारो वर्षं चाललेला आहे. किमान "आपण तो प्रकार चालवतोय" असं सांगण्यादाखवण्याची फॅशन गेली काही हजार वर्षं आहे ती अजून व्होगमधे आहेच्चए.
तर अशा, कधी न संपणार्या प्रश्नांची विशिष्ट संदर्भातली *आपल्यापुरती* उत्तरं नवनीत गायडासारखी आयती मिळाली की कधीकधी मज्जा येते. तसं माझ्याबाबतीत न्यूयॉर्कर नियतकालिकातल्या एका लेखावर सहज नजर गेली असतां झालं. म्हण्टलं सोशलमिडियावरच्या आपल्यासारख्याच फॅशनेबल मित्रमैत्रिणींना ते दाखवावं. मूळ लिखाण इंग्रजीसारख्या साम्राज्यवाद फैलावणार्या भाषेत आणि अमेरिकेसारख्या भांडवलशाहीवादी वैट्ट देशातलं आहे. शिवाय हा लेख Nicole Rose Whitaker नावाच्या एका यःकश्चित स्त्रीने लिहिला आहे - या सर्व घटकांचं निवारण म्हणून मीच त्याचं भाषांतर येथे देत आहे.
---------------------
तुम्ही नक्की कोण आहात?
सिंकमध्ये पडीक राहिलेली भांडी :
तुमचं आयुष्य - ते आहे त्यापेक्षा - अधिक कठीण करण्याची तुमची क्षमता अतुलनीय आहे. जर सोपा उपाय उपलब्ध असेल—तो कितीही धडधडीतपणे समोर दिसत असला —तरी तुम्हाला वाटतं की कुठलाही पर्याय, हा इतका सोपा असूच शकत नाही, म्हणूनच तुम्ही गोष्टी काही दिवस तश्श्याच्या तश्श्याच ठेवण्याचा निर्णय घेता. मग कसला ना कसला निर्णय घेण्याची ती नवसाची वेळ येईपर्यंत गोष्टी ह्या मस्तपैकी कुजट झालेल्या असतात. अजिबातच कुठलाही असा निर्णयच म्हणून न घेण्यामुळे त्या टाळाटाळीच्या दलदलीत बुडालेल्या (आणि कधीकधी अक्षरशः कुजलेल्या अन्नाने भरलेल्या) असतात. आणि इतका अनन्वित वेळ तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करेपर्यंत, कोणी तरी मग त्या गोष्टी येऊन साफसफाई करून गेलेलं असतं—मुळात जे अर्थातच तुम्हाला सुरुवातीपासूनच हवं होतं.
पोस्टाने आलेली पत्रं न उघडता तशीच वाढू देणं :
तुम्ही बहुधा त्यापैकी आहात जे व्हॉइस मेल ऐकत नाही कारण त्याने तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतं. तुम्हाला अज्ञात गोष्टींची प्रचंड भीती सतत वाटत असते. तुम्ही तुमच्या आईच्या भाषेत "इतका घोडा होऊनही" प्रौढ लोक जे किमान आपलं जीवन सांभाळण्याकरता प्रयत्न करतात त्याची तुमची मुळात तयारीच फारशी झालेली नाही. एखाद्या अट्टल दारुड्याप्रामणे, तुम्हीही कुठलाही निर्णय घेण्याचे टाळता. यापुढची पायरी म्हणजे, समस्यांची जाणीव होऊन मग त्यांना पुढे ढकलण्याऐवजी, तुम्ही समस्या मुळात लक्षात येऊ नयेत यासाठी प्रयत्न करता. आणि मग काहीना काही निर्णय घेण्याची अटळ वेळ येतेच कारण पाणी नाका तोंडात गेलेलं असतं. अर्थात तरी तुमचा आवडता प्रश्न शिल्ल्लक उरतोच : जर एखादे बील पोस्टाने आले आणि कोणी ते उघडलेच नाही, तर ते मुळात अस्तित्वात आहे का?
स्वयंपाकघरातील कपाटे उघडी ठेवणं :
तुमच्यात धाडस आणि भीती ह्या दोन्हींचा समसमां संयोग झालेला आहे. तुमच्या अतिविकसित मेंदूमधे जी पहिली गोष्ट येईल ती सुरू करण्याइतकी धडाडी तुमच्यात खचितच आहे, पण कुठलीच गोष्ट पूर्ण करण्याइतके व्होल्टेज त्यात नाही. "एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडतो, एक संधी गेली तर दुसरी मिळेल" या विचारालाही तुम्ही भीतीमुळे थारा देण्याचं नाकारता ; कारण चुकून चुकीचा निर्णय घेतला जाईल आणि सर्वोत्तम पर्याय हातातून निसटेल या भीतीने तुम्ही सर्व दरवाजे अर्धवट उघडे, किलकिले, थरथरते, लटपटते ठेवता. तुमचं पूर्ण आयुष्यच मुळी ' पण ह्या ऐवजी ते केलं तर...अमुक एक घडलं किंवा तमुक घडलंच नाही तर.... ' या विचारांनी व्यापलेलं आहे, आणि जोपर्यंत कपाटाच्या कोपऱ्यात तुमच्या डोक्याचा जोरदार धक्का बसत नाही , किमान तोपर्यंत तरी तुम्ही ठामपणे कुठलाही निर्णय घेणे कधीच शिकणार नाही.
काही घास , काही घोट नेहमीच शिल्लक ठेवणं:
तुम्ही स्वतःला हावरट बकासुर आहात असं मानता का? छे छे, कालत्रयी नाही. . तुम्ही आत्ममग्न स्वतःत बुडून जाणारे कुणी अवलिये आहात का? हां. ही स्वतःची ओळख तुम्हाला चांगलीच मानवते. कधीही खाल्लंत तरी तुम्ही बशीमध्ये एक चमचाभर पुडिंग आणि बाटलीत थोडासा संत्र्याचा रस उरवताच कारण तुम्ही स्वतःच्या गोष्टींत इतके गुंतलेले असता की इतरांचा विचार करण्यास वेळ नसतो. तुम्ही एक फार्फार मस्तमौला आहात, कारण तुम्ही फक्त त्या त्या क्षणापुरते उत्कट जगणारे असतां. तुमच्या कृतींच्या परिणामांचा सामना करावा लागल्यावर "It’s not my problem" हा अद्भुत मंत्र तुम्हाला आठवतो. Nothing is your problem हे अर्थातच खरं आहेच. कारण तुम्ही जिकडे कुठे जाल तिकडे खुद्द तुम्ही, हाच तुमच्या आजूबाजूच्या सर्वांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो.
तात्पुरते आणि सर्वात आळशी पर्याय निवडण्याची तुमची अपरिमित क्षमता :
तुम्ही एक अतिदूरदर्शी व्यक्ती आहात. कुठल्याही समस्येवर कुठलाही उपाय कुणीही नीट सुचवला, सांगितला, तो समोर आला तरी "याहून चांगला मार्ग असायलाच हवा" या तत्त्वावर तुम्ही जगता. आणि तो जो काही मार्ग असेल तुमचा स्वतःचा असणार. त्यावर तुमची मुद्रा उमटलेली असणाअर. तुमचा बिनधास्त आणि निराधार आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक बाबतीत नवनवे अनोखे मार्ग शोधण्यास प्रवृत्त करतो. मग ते मार्ग अन्य सर्वांना कितीही मूर्खपणाचे नि निरर्थक वाटले तरी. तुमच्या क्रिएटिव्ह पण आळशी उपायांसाठी तुम्ही स्वतःला इजा होण्याचा धोका पत्करता. उदाहरणार्थ स्वतःच्या हाताने जमिनीवर सांडलेलं व्यवस्थितपणे ओल्या, सुक्या पोतेर्याने पुसणं, ते निर्जंतुक करणं आणि त्याचा दुर्गंध नष्ट करणं हे भ्याडपणाचं आहे. तिथल्या तिथे एखाद्या हाती लागेल त्या कागदाने कसंतरी बोळा करून तेव्हढ्यापुरतं - शक्य झालं तर मोजा घातलेल्या पायानेच - पुसणं ह्यात खरा पुरुषार्थ आहे.
फ्रिजमध्ये अन्न आवश्यकतेपेक्षा जास्त काळ साठवण्याची कला :
एक गोष्ट समोर ठेवलेल्या, वर्षानुवर्ष सडत ठेवलेल्या लसूणाच्या दुर्गंधीइतकी सणसणीत खरी आहे : तुम्हाला कुठलीही गोष्ट टाकून देता येतच नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीला चिकटून राहता. समोरच्याला उपाशी पाठवायच्या ऐवजी तुम्ही अनन्वित काळ तसंच पडून असलेल्या अन्नाला किंचित मीठमिर्ची लावून सादर करणं हे योग्य वाटतं. त्यामुळे अन्न टाकून देण्याची भीती तुम्हाला वाटते. तुम्हाला नेहमी वाटते की थोडा वेळ थांबूया, आहे नाही त्या गोष्टीचा फोडणीचा भात, फोडणीची पोळी करता येईल. किंवा ठेपल्यांमधे उरलेली भाजी भरून ते समोरच्याला देता येईल. तसं कधीच होत नाही ते सोडा. याबद्दलचा धडा तुम्ही शिकल्यासारखं दाखवता. पण खरा कधीच शिकत नाही.
तर आहे हे असं आहे. आणि तुम्ही हे असे आहात.
ठिगळ
रविवारची संध्याकाळ आहे. तुमच्या ड्राईव्ह वे मध्ये बर्फ पडला आहे. रात्री झोपायच्या आंत तो काढला नाही तर उद्या सकाळी गाडी काढण्यात वेळ जाऊ शकेल. पण कंटाळा आलेला आहे. बर्फ काढला नाही आणि मीठ टाकलं नाही तर उद्या त्याचा काही जागी आईस होऊन निसरडं होणार आहे. तरी तुम्ही तसेच झोपता. सकाळी गजर न ऐकु आल्यामुळे घाईने आवरता आणि तसेच बाहेर पडता. कारच्या जवळ पोचायच्या आंत तुमचे दोन्ही पाय हवेत जातात आणि तुम्हाला अस्मान दिसते. कण्हत, कुथत तुम्ही तसेच उठुन गाडीत बसता आणि चालु करायचा प्रयत्न करता, पण चाके बर्फात रुतली आहेत. शॉव्हेल गॅरेजमध्ये जाऊन शोधावे लागणार आहे. तर, तुम्ही असे असता!