Skip to main content

प्रयागराज , ७,८,९ फेब्रुवारी २०२५.

आयुष्यात कधी मी कुंभ मेळ्याला जाईन असं वाटलं नव्हतं.  डोंबिवलीतल्या टिपिकल मध्यमवर्गीय घरात मी वाढलो. देवाबद्दल श्रद्धा असली तरी देवभोळेपणा वगैरे नव्हता. 

 

शिवाय वडिलांचे विचार बऱ्यापैकी धर्मनिरपेक्ष आणि थोडेफार समाजवाद वगैरे कडे झुकणारे. अनेक वर्ष , “गंगेत स्नान केल्याने पुण्य पदरात पडेल याची शाश्वती नाही मात्र दोन चार त्वचेचे रोग नक्की होतील” असं माझं ठाम मत होतं. (अजूनही आहे ). इतकंच काय , दोनेक महिन्यांआधी वाराणसीला गेलेलो तेव्हा वडील म्हटलेले, जातोच आहेस तर अलाहबाद ला जाऊन ये. नेहरुंचं “आनंद भवन “ पाहण्यासारखं आहे. संगम वगैरेला त्यांच्या लेखी फार महत्व नव्हतं.  


 

पण मी ठरवलं की जायला पाहिजे , बघायला पाहिजे , अनुभवायला पाहिजे. एक दिवस का होईना , जीवाचा कुंभमेळा केला पाहिजे. 


 

तर आता , मी पाहिलेल्या कुंभ मेळ्याची कहाणी… 


 

समुद्र मंथन झालं आणि त्यातून अमृत बाहेर आलं. अमृताने भरलेला घडा म्हणजेच कुंभ जसजसा  समोर दिसू लागला तसं देव आणि दानवांमध्ये त्यावरून जुंपली. त्यांच्या खेचाखेचीत त्या कुंभातून अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले. पुढे विष्णूने मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचं रूप घेऊन राक्षसांना वेड्यात काढत सगळं अमृत देवांना पाजलं. 

पण ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब सांडले तिथे , म्हणजे हरिद्वार , इलाहाबाद , नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी एका विशिष्ट तिथीला स्नान केलं की त्याचं पुण्य अमृत स्नानाएवढं मानलं जाऊ लागलं. आणि तिथे भरू लागले अर्ध कुंभ , पूर्ण कुंभ आणि महा कुंभ . दर काही वर्षांनी आलटून पालटून. 

आता ही गोष्ट खरंतर एखादी फँटसी कथा वाटेल पण 

धर्माची ताकद काय असते तर एरवी एखाद्या फँटसीच्या पुस्तकात शोभेल अशा गोष्टीला धर्माची , पाप-पुण्याची आणि थोडीफार देवाच्या भीतीची जोड दिली की त्या गोष्टीवर पिढ्यानपिढ्या , हजारो वर्षं लोक विश्वास ठेवतात. प्रयागराजच्या रस्त्यावरून गंगा आणि यमुनेच्या संगमाकडे जाताना धर्माच्या या ताकदीचा प्रत्यय पावलागणिक येत जातो. 

संगम -

 गंगा आणि यमुनेचा. दोन महत्वाच्या नद्या. भारताची आणि त्यातही उत्तर भारताची  संस्कृती या दोन नद्यांभोवती विणली गेलीये.

कितीतरी गोष्टी , गाणी , मिथकं या नद्यांबद्दल जनमानसात रुजली आहेत. 

तर संगम…. एका बाजूला यमुना , भगवान कृष्णाच्या बालपणीच्या लीला बघितलेली, तिच्याच डोहात उतरून कृष्णाने कालियामर्दन केलं, गवळणींच्या मडक्यातलं दही दूध लोणी खाल्लं अशी कृष्णलीलांची साक्षीदार यमुना. तर दुसऱ्या बाजूला गंगा. साक्षात भगवान शंकराने जटेत धारण केलेली, फक्त भगीरथाच्याच नाही तर अख्ख्या भारतभूमीच्या उद्धारासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेली गंगा , गंगामैया.  आणि गुप्तपणे वाहणारी सरस्वती. त्रिवेणी संगम. 

होडीतून संगमाकडे जायचं. लाकडी होड्या , एका होडीत ८-१० जण. होडीवाला तुमच्या तोंडाकडे बघून सांगतो , माणशी हजार रुपये. त्याला माहीत असतं कोणाला काय भाव सांगायचा. 

त्याच्या मागच्या कित्येक पिढ्यांनी श्रद्धाळूना गंगापार सोडलं असेल. केवट जातीचे हे लोक. पिढ्यांपिढ्या गंगेत नाव चालवून पोट भरणारे. त्यांचा आद्य निषादराज. श्रीराम वनवासात निघाले तेव्हा त्यांना शरयू पार करून देणारा. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.  तर तुमच्याकडून माणशी हजार रुपये घेणारा परत नेताना तुम्हाला बजावतो , “आपने कितना पैसा दिया किसी को बताओ मत”.  त्याला माहीत 

असतं, श्रद्धा प्रत्येकाची सारखी असली तरी त्याचं मोल मोजण्याची कुवत प्रत्येकाची वेगवेगळी. नुसत्या श्रद्धेने पोट भरत नाही पण त्याला पैशांची जोड मिळाली की कित्येक भुकेली पोटं सहज भरतात. 


 

स्नान - 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमावर स्नान. लाखो करोडो लोक येतात रोज. सगळ्यांचं ध्येय एकच. एक डुबकी मारायची. कोण कोण कुठून कुठून येतं. ज्याला जसं जमेल तसं येतं. चालत , बसने, ट्रेन ने , विमानाने, हेलिकॉप्टरने, स्वतःच्या विमानाने. ज्याला जसं जमेल आणि मानवेल तसं. 

महंत येतात , आचार्य येतात , शंकराचार्य येतात , नागा साधू येतात.  साहजिक आहे ना , मेंढ्यांचा कळप निघाला की मेंढपाळ सुद्धा निघतातच.

अतिसामान्य येतात , सामान्य येतात आणि असामान्य येतात. फक्त प्रत्येकाची सोय वेगवेगळी. अतिसामान्य चेंगराचेंगरीत मरतात,(किती मरतात , कसे मरतात,ते विचरायचं नाही बर का ) . सामान्य जिथे जमेल तिथे पटकन स्नान करून इन्स्टाग्राम वर ,”चलो कुंभ चले” वगैरे चे स्टेटस टाकतात. असामान्य मात्र उंचावर बसून या सगळ्या मेळ्याचे नियोजन किती उत्तम झाले म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेतात. धर्म सांगतो सगळे समान आहेत पण धर्म रक्षकांना असं वागून चालत नाही. 


 

प्रयागराज - 

काही वर्षांपूर्वी इलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचं नुकतंच नामांतर झालं. कुंभ मेळा कित्येक शतकांपासून इथे भरतोय पण हा कुंभ मेळा विशेष. १४४ वर्षांनी आलेला महा कुंभ वगैरे. शहरासाठी आणि शहरातल्या प्रत्येकासाठी पैसे कमवण्याची संधी. शहरातला प्रत्येक जण या संधीचं सोनं करून घेत असतो. मग तो “हा हा बिलकुल संगम घाट पे छोडेंगे” म्हणत तिथून पाच किलोमीटर दूर सोडून ५०० रुपयाला चुना लावणारा बैटरी रिक्षावाला असू दे किंवा जेमतेम चार माणसं झोपतील एवढ्याशा खोलीचे वर तोंड करून माणशी १००० रुपये मागणारा हॉटेलवाला असू दे. 

इतकंच काय , कुंभमेळ्यातला साधू सुद्धा हातावर दहाची नोट ठेवल्याशिवाय पिशवीतून अंगारा काढून देत नाही.

एकूण काय तर , धर्म, श्रद्धा आणि त्यामागचं अर्थकारण समजून घ्यायचं असेल तर प्रयागराज ला जायला पाहिजे. 


 

तरी आम्ही संत आणि महंत पहिले नाहीत. स्वतःच स्वतःला अभिषेक करून घेणारे महामंडलेश्वर पहिले नाहीत. नागा पहिले नाहीत किंवा अघोर पण पहिले नाहीत.

गांजा पिऊन प्रवचन देणारा आयआयटी बाबा पहिला नाही.  किंवा ती सुंदर डोळ्यांची मोनालिसा पाहिली नाही.

आम्ही साधू पाहिले ते पण चार पैशे काढून दिल्यावर आशीर्वाद म्हणून रुद्राक्ष देणारे. गर्दीत हात पकडून हातावर मंत्र पुटपुटत काहीतरी बोलणारे आणि “वो देखो उसने पैसा निकाला “ म्हटल्यावर तुमचा हात सोडून पैशेवाल्याचा हात पकडणारे. साधूंच्या वेषातले सामान्य!!!


 

माहिती ला ज्ञान समजण्याच्या आजच्या जगात कुंभ मेळा म्हणजे सनातन धर्माचा फार मोठा सोहळा वाटूच शकतो एखाद्याला. मला मात्र राहून राहून एक गोष्ट आठवली 

अस्सी घाटावरच्या एका पुस्तकांच्या दुकानात बसलो होतो गप्पा मारत. “ये कुंभ के दो माह और उसके आगे और दो माह, कोई भी बनारसी गंगा में डुबकी लगाने से डरता है, इतनी मैली हो जाती है मैया” हे ऐकलं आणि एकदम चंद्रभागा आठवली. वारीनंतर तिची अवस्था सुध्दा गंगेसारखीच होत असेल किंवा मग सिंहस्थानंतर जशी गोदावरी. 

जसं सिंहस्थ आठवला तसं कुसुमाग्रज आठवले. आणि आठवली त्यांची कुंभमेळ्यावरची कविता. त्यातली चार कडवी पुढे देतो आणि थांबतो. पूर्ण कविता नक्की मिळवून वाचा 


 

 व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर

संताचे पुकार | वांझ झाले ||


 

रस्तोरस्ती साठे | बैराग्यांचा ढीग

दंभ शिगोशीग | तुडुंबला ||


 

हे साधू नाहतात | साधू जेवतात

साधू विष्ठतात | रस्त्यावरी ||


 

यांच्या लंगोटीला | झालर मोत्याची

चिलीम सोन्याची | त्यांच्यापाशी ||


 

अशी झाली सारी | कौतुकाची मात

गांजाची आयात | टनावारी ||


 

तुका म्हणे ऐसे | मायेचे माईंद 

त्यापाशी गोविंद | नाही नाही ||

'न'वी बाजू Sun, 02/03/2025 - 21:23

In reply to by सुधीर

कविता/अभंग कुसुमाग्रजांनी लिहिलेला असता, मक्त्याच्या ओळीत ‘तुक्या’चे नाव कशासाठी, हा आपला प्रश्न, म्हटले तर अतिशय रास्त आहे. मात्र, अशा प्रकारच्या अभंगांच्या मक्त्यात सहसा ‘तुका म्हणे’ हे हमखास आढळते, त्या परंपरेस अभिवादन म्हणून हे केले असावे, असा तर्क करण्यास जागा आहे.

आपले शाळेतील दिवस आठवा. (आपण महाराष्ट्रात आणि त्यातही मराठी माध्यमाच्या शाळेत (आणि त्यातही शक्य तोवर फक्त मुलांच्या शाळेत) शिकलात, असे गृहीत धरले आहे. नसल्यास, क्षमस्व.) त्या दिवसांत, ‘तुका म्हणे’ असा मक्ता असलेली पौगंडीअश्लील कवने विद्यार्थिवर्गात अगदी परंपरेने सर्रास फिरत. त्यांच्या प्रत्यक्ष कर्तृत्वात संत तुकारामांचा काही हातभार असणे शंकास्पद वाटते. (‘तुका म्हणे जगज्जेठी/लागावे पोरीच्या पाठी/जावे नदीच्या काठी/सोडावी चड्डीची…’ (जाऊद्यात!) अशी काहीबाही सुरुवात असलेले (आणि सरतेशेवटी त्याची परिणती ‘पोरहि यावे त्याच्या पाठी’मध्ये होणारे) कवन हे खरोखर खऱ्याखुऱ्या तुकोबांनी लिहिले असेल, हे, का कोण जाणे, परंतु, संभाव्य वाटत नाही. हे वाङ्मय (अपौरुषेय असावे, तथा) तुकोबांचे खचितच नसावे.) परंतु, केवळ परंपरेचा आदर म्हणून त्यांचा मक्ता तुकोबांच्या माथी मारलेला असेच, ना? तसेच आहे हे. कोणी अनामिक विद्यार्थी जर हे करू शकतो, तर कुसुमाग्रजांनीच तेवढे काय घोडे मारून ठेवले आहे?