बनारस - काही नोंदी. - काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरीडोर वगैरे.
“नमामी शमिशान निर्वाणरूपम, विभू व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम …”
संतकवी तुलसीदासने लिहिलेलं रुद्राष्टकम धीरगंभीर आवाजात सुरू असतं आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिरातली रांग हळू हळू पुढे सरकत असते.
देवाच्या रांगेत असताना डोळे मिटून नामस्मरण वगैरे करावं म्हणतात. पण मला ते जमत नाही . मी डोळे अगदी उघडे ठेवतो. त्याने अनेक गोष्टी अशा दिसतात ज्या दिसू नयेत म्हणून कदाचित भगवंताने डोळ्यावर पट्टी बांधून घ्यावी.
मंदिरात जायला अनेक मार्ग आहेत पण सगळ्यात प्रशस्त मार्ग घाटाच्या समोरचा. जिथून काशी विश्वनाथ कॉरिडोर आहे तो.
गंमत बघा . आधी म्हणजे खूप खूप आधी फक्त गंगा होती . मग मंदिर झालं, घाट झाले , मंदिराभोवती , मंदिराला लागून घरं झाली , वस्ती झाली अगदी दाट . मग मंदिर भ्रष्ट झालं , पिंडीवर घाला घातला गेला , मशीद उभी राहिली , काळाच्या ओघात मंदिर पुन्हा उभं राहिलं. पुन्हा आजूबाजूला तशीच दाट वस्ती , घरं, दुकानं सगळं तसंच. मंदिरात मंत्र म्हटले जाऊ लागले आणि मशिदीत शुक्रवारचे नमाज. मग मशिदीतल्या वादग्रस्त भागाला कुलूप लावण्यात आलं. मग मंदिराला भव्य दिव्य बनवण्यासाठी कॉरिडोर झाला. कॉरिडोर म्हणजे काय तर मंदिराचं नूतनीकरण. आजूबाजूची घरं, दाट लोकवस्ती , दुकानं हे सगळं योग्य मोबदला देऊन हटवून मंदिराचं प्रशस्तीकरण. रांगेत उभं राहिल्यावर मंदिर प्रांगणाचा प्रशस्तपणा दिसतो , भव्य काशी , दिव्य काशी चे स्लोगन्स दिसतात. भारतमातेचा पुतळा आहे मंदिर प्रांगणात. शिवाय इतर ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती असलेली छोटी मंदिरे, सगळं चकाचक , सुंदर. कौतुक करायचं फक्त.
रांग पुढे पुढे सरकत राहते. पुढे मागे एखादा बनारसीया असतोच. हातात दुधाचा प्याला आणि बेलपत्र. “पैतीस साल से आ रहे है. रोज. दूध चढाते है और पत्री. फिर निकल जाते है रोज के कामकाज को. अब तो खैर मोदीजी ने सब बदल दिया. लेकिन आच्छा है. बदलाव होना चाहिये. दो चार घर दुकाने टूटी है लेकिन उसका पैसा भी बोहोत दिये है सरकार. इसिलिये तो जिताया मोदीजी को. वापस जितायेंगे. मंदिर तो खूब बढिया बन गया अब. लेकिन भगवान का असल स्थान तो आज भी भ्रष्ट है. भोलेबाबा चाहेंगे तो वो भी शुद्ध होगा. “ मग आपण विचारायचं, “भोलेबाबा या फिर मोदी और योगी बाबा ? “. मग तो फक्त हसतो.
रांग पुढे सरकत राहते.
मंदिराला भव्य दिव्य बनवताना झालेल्या घरांच्या , दुकानांच्या पडापडीचे अवशेष आहेत थोडेफार आजूबाजूला. रांगेतून ते दिसतात. साधारणपणे तीनशे घरं, त्यापेक्षा दुप्पट दुकानं, बरीचशी छोटी मोठी मंदिरे सुद्धा आणि जवळपास ६०० परिवार याना आर्थिक मोबदला देऊन हटवण्यात आलं आणि मंदिर प्रशस्त केलं गेलं. स्वच्छ, सुंदर केलं गेलं. त्यातही आता चार वर्षं झाली. भाविकांची संख्या आता वाढलीये. काशी मध्ये या आधी भाविक येत होतेच पण आता त्यांची संख्या दुप्पट, तिप्पट झालीय. रांग पुढे सरकत राहते.
“क्या सोच रहे हो भय्या??” बनारसिया पुन्हा गप्पा मारायला चालू करतो. “कुछ साल पहले ऐसे पिंडी को हाथ लगाकर दूध चढाते थे. अब थोडा दूर से. मंदिर जितना बडा हो जाये, भगवान उतना दूर से देखना पडता है. लेकीन सही है , मोदीजी इतना सुंदर मंदिर बनाये, सनातन धर्म का डंका बज रहा है विश्व में. और क्या चाहिये ??
और रही बात बाबा की , तो बाबा विश्वनाथजी तो दिल में है हमारे” .
रांग पुढे सरकत राहते.
आपण कधी पिंडीच्या समोर उभे राहिलो आणि कधी पुजाऱ्याने आपल्याला ओढून बाजूला केलं हे आठवत नाही . मग मी मंदिराच्या प्रांगणात सावलीखाली शांत बसतो. ज्ञानवापी मशिदीकडे कडे तोंड करून असलेल्या नंदीकडे बघत बसतो.
आज दोन महिने झाले. आज महाशिवरात्र. मी आठवून आठवून थकलो पण मला अजूनही विश्वनाथाच्या मंदिराचा गाभारा आठवत नाही किंवा पिंड सुद्धा आठवत नाही.
मला फक्त आठवतात बनारसच्या त्या सामान्य माणसाचे शब्द. “विश्वनाथजी तो दिल मे है हमारे. और क्या चाहिये”.
-अभिषेक राऊत
चांगला लेख
चांगला लेख