Skip to main content

शब्दधसका

तुम्ही एखाद्या विशिष्ट नावाचा किंवा शब्दाचा धसका घेतला आहे का? ओनोमाटोफोबिया (Onomatophobia)म्हणजे विशिष्ट शब्दांची किंवा नावांची त्यांच्या कथित महत्त्वामुळे होणारी असामान्य वा असाधारण भीती . ही विशिष्ट नावे वा शब्द ऐकण्याची उच्चारण्याची  दुर्भिती  आहे. ओनोमाटो (म्हणजे शब्द) आणि फोबिया (म्हणजे भीती) या शब्दांचे मूळ ग्रीक आहे.
फोबिया लिस्ट वेबसाइटवर ५०० हून अधिक नामांकित फोबिया आहेत, त्यांची ग्रीकाळलेली नावे व वैशिष्ट्ये पाहिले तर चक्क हास्यास्पद वाटावीत असे ते फोबिया आहेत.
जब पचास-पचास कोस दूर गांव में, जब बच्चा रोता है, तो मां कहती है बेटा सो जा, सो जा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा हा शोले मधील डायलॉग खूप फेमस झाला होता. त्यामुळे अनेक मुलांनी गब्बर या नावाचा धसका घेतला असेल. सुदैवाने अशा नावाची व्यक्ती त्यांच्या परिचयात व संपर्क क्षेत्रात नसल्याने या धसक्याचे रुपांतर ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) मधे झाल नसाव. काही माणसे विशिष्ट नावांनी किंवा शब्दांनी ट्रिगर होतात. अस्वस्थ होतात. ही अस्वस्थता वाढली की ते संभाषण दुसरी कडे वळवतात किंवा कलटी मारतात. लोकांच्या ते लक्षात ही येत नाही. कॉलेज मधे माझा एक मित्र होता तो डुक्कर या शब्दाने फार अस्वस्थ व्हायचा. घाणेरडा प्राणी म्हणून ई असे उदगार येण्या इतपत ते मर्यादित नव्हत. त्या मागे काही तरी इतिहास असावा असे मला वाटायचे. कदाचित "डुक्कर" असे संबोधून त्याचा एखाद्या सुंदर मुलीने चारचौघात अपमान तर केला नसावा? ही शंका मला यायची. पण मी त्याला तसे विचारले नाही. म्हणल कशाला मित्राला दुखवा? मी कधी मग त्याच्या समोर तो शब्द उच्चारला नाही. दुर्दैवाने तो आज हयात नाही. भेटला असता तर मी त्याला इतक्या वर्षांनंतर सुद्धा तुला डुक्कर या शब्दाचा फोबिया आहे का? असे विचारले असते.
आमच्याकडे बिट्टू नावाचा एक भुभु होता. नावाला फक्त भुभु  घरातला मेंबर . बायको वा भुभु यातले एकच जण घरात राहू शकते असा तिढा निर्माण झाला असता तर मी बायकोला सोडले असते. तर अशा या बिट्ट्याला अंघोळीचा जाम फोबिया होता.जबरदस्तीने अंघोळ घालायला लागायची. त्याला आपल बोलण पण समजायचे. आता बिट्टूला अंघोळ घातली पाहिजे असे आम्ही आपापसात बोलत असलो तर "अंघोळ" शब्द आला की हा लगचे खोलीतून कलटी मारायचा. कधी पलंगाखाली लपून बसायचा. म्हणजे बिट्ट्याला पण ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) होता. त्याच्या मृत्युनंतरच त्याची त्यातून सुटका झाली.
ताई माझी सवात मोठी बहिण. ही मी लहान असताना तिचे लग्न झाले. त्यानंतर लगेचच बाळंतपणात ती वारली. तिची नुकतीच जन्मलेली मुलगी पण वारली. ताईला सासुरवास होता अशी कुजबुज नातेवाईकात होती.ताईचे सासर दुष्ट होते का? तिचा छळ करायचे का?  हे मला माहित नाही. पण  नंतर च्या काळात माझ्या  दोन नं च्या बहिणीने माईने जेव्हा तिच्या मुलीचे लग्न जुळवताना स्थळ पहाताना ताईच्या नवर्‍याचे नाव किंवा आडनाव येणार नाही अशीच स्थळे पाहिले. चुकून जरी ती नावे दिसली तरी ती त्यावर काट मारत असे. 
पुवानुभवातील एखाद्या कटु स्मृती मुळे वा अनुभवामुळे किंवा समजुतीमुळे एखादे भय मनात इतके घर करुन राहते की नामसाधर्म्यामुळे पुढील आयुष्यात येणार्‍या संबंधित नावाच्या व्यक्तिशी संपर्क देखील टाळला जातो. अगदीच न टाळण्यासारखी असेल तर किमान आपण स्वत:ला तिच्या पासून दूर ठेवतो.
मी 1995 च्या दरम्यान कॉंप्युटर घेतला. त्या नंतर पुढे इंटर नेट ही आले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणून त्याबरोबर व्हायरस देखील आले. त्यावेळी अशा व्हायरस पासून आपला संगणक वाचवण्यासाठी ॲंटीव्हायरस चे प्रोग्राम पण आले. दै.सकाळ मधे त्याच्या छोट्या जाहिराती यायच्या. त्यात एक जाहिरात यायची आपला संगणक व्हायरसपासून मुक्त करण्यासाठी आमचा हा प्रोग्राम इन्स्टॉल करा. संपर्क *** असे म्हणून एका सेल्स गर्ल चा फोन नं दिला होता. आता *** ही माझ्या ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) चा विषय होती. त्यामुळे मला गरज असतानाही मी antivirus टाकण्याचे टाळत आलो. कारण त्यासाठी मला *** ला फोन करावा लागणार होता. आपण फोन केला अन "ती"नेच उचलला तर? नको बाबा! रिस्क! अरे पण आता ती व्यक्ती लग्न होउन पुणे सोडून गेली आहे. ती कशाला तुझ्याशी बोलेल? आणि तिचे हे क्षेत्रही नाहीये. पण फोबियाला तर्कसुसंगती मानवत नसते. दुधाने तोंड पोळले तर माणूस ताकही फुंकून पितो. मी शेवट पर्यंत फोन केला नाही. मी antivirus सुद्धा अगदी अलिकडे म्हणजे 8-10 वर्षात टाकला. Quick Heal हे नाव बघून on line install केला म्हणजे कुणाला फोन करायला नको.कदाचित  Quick Heal या नावाचा परिणाम माझ्यावर होउन माझाओनोमाटोफोबिया (Onomatophobia)दूर होईल.
पुर्वी मी रहात होतो तिथे सोसायटीत *** नावाची एक बाई होती. मी तिची नजरानजर सुद्धा टाळत असे. नकोच ती भानगड!  तुम्हाला हसू येत असेल. कदाचित मी अतिशयक्ती करत आहे असेही वाटत असेल. पण तसे नाहीये. मलाही आता ते आठवले की हसू येते. कदाचित हे फोबिया प्रदीर्घ काळानंतर सौम्य होत असतील.  मी त्यासाठी स्वयंउपचार केले. मी स्वयंघोषित मानसशास्त्राचा वाचक विद्यार्थी असल्याने मला मानसशास्त्रातील काही भाग माहिती आहे. ओसीडी, फोबिया यासाठी मानसशास्त्रातील अनेक थेरपी वापरतात. अशाच एका थेरपीच नाव आहे ERP exposure response prevention  ज्यात रुग्णाला ज्याची भीती वाटते वा रुगण ज्या परिस्थितीपासून पळ काढतो त्याच परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्याला प्रवृत्त करुन त्याची भीती घालवायची. पुर्वी पोहायला शिकवताना मुलाला तलावात काही सुरक्षितता बाळगून ढकलून द्यायची पद्धत वापरत. असे केल्याने त्याची पाण्याची भीती मरते असे सांगितले जाई. तसेच काहीसे.
अरे पुरुषासारखा पुरुष अन बाईच्या नावाला घाबरतो? अरे हाड! थू! तुझ्या जिंदगानीवर! एवढं संवेदनशील राहून चालतय का आजच्या जगात? कोलायला शिक! घंटा तुला काही फरक पडत नाहीये. लोक अनेक धंदे करुन जगाला कोलतात. तू म्हणजे साने गुरुजींचा शाम आहेस झालं! दरोडेखोरांच्या टोळीत एखाद्या उचल्याने पापक्षालनासाठी आत्मपीडन करुन स्वत:ला शुद्ध व सिद्ध करण्याचा यडपटपणा आहे. अरे जग तुला मोजत पण नाही. कोण तू?उगीच जगाला स्वत:ला दखलपात्र करण्याच्या प्रयत्नात मेषपात्र होउ नकोस! साला बाई -बाटली मधली  बाटली तुला चालते अन बाई म्हणल्यावर का रे टरकते? जा "बुधवार पेठे"त जाउन नळकुंडी साफ करुन ये. असा आत्मसंवाद करुन विद्रोही मनाने मला दिलासा देखील दिला. ERP ची देखील मदत घेतली. ज्या *** पासून लांब पळत होतो त्यांच्याशी जाणीव पुर्वक जवळीक करण्याचा प्रयत्न केला. काही दगाफटका झाला असता तर विद्रोही मन सोबत होतेच. सुदैवाने दगा फटका झाला नाही.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे;  अरे बाबा, नावात बरंच काही आहे! नाव सोनुबाई अन हाती कथलाचा वाळा अशी आपल्याकडे म्हण आहे. एखादे नाव डोळ्यासमोर आले कि त्याची गुणवैशिष्ट्ये मेंदुत तयार होत असतात.  आपल्या साधनेत व्यत्यय तर आला नाही ना असे म्हटले की ‘सखाराम गटणे’आठवतो. पायजमा-झब्बा घालणारा, जाड भिंगाचा चष्मा घालणारा, हातातली पुस्तकं सावरणारा, गळ्यात शबनम काहीसा धांदरट आणि डोळ्यांत ‘छप्पन सशांची व्याकुळता’ एकत्र साठलेला मनुष्यविशेष मग डोळ्यांसमोर येतो.मधुशालेतून लटपटत्या पायांनी बाहेर पडणाऱ्या,  चप्पल घालण्यासाठी स्वत:शी झटापट करणार्‍या , संध्याकाळ झाली की टाकण्याची भाषा करणार्‍या मद्यप्रेमीला पाहताच, त्याला आपण ‘तळीराम’ म्हणून संबोधतो. सूट बूट कोट, गळ्यात स्टेथोस्कोप असणार्‍या डॉक्टर चे नाव तळीराम आपल्या पचनी पडेल का? मी काळे नावाची अत्यंत गोरेपान माणसे पाहिली आहेत व गोरे नावाची काळी ढुस्स माणसे ही पाहिली आहेत. अशा विसंगतीतून विनोद निर्मिती फार पटकन होते. या विसंगती कदाचित  ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) कमी करायला मदत करत असावीत. 
पुर्वी जन्माला आलेली मुले फारशी जगायची नाहीत. चांगली देवादिकाची नावे ठेवून ही जगायची नाहीत. मग त्याच्यावर उतारा म्हणून मुलाचे नाव दगडू, धोंडू, भिकु अशी ठेवली जात. मग ही मुले जगली व मोठी झाली व मान्यवर झाली कि दगडोपंत, धोंडोपंत, भिकाजीपंत अशा नावारुपाला येत. नथुराम हे नाव असेच आले. नथुरामच्या आईने तिला  सारख्या मुली होत. मुलगा व्हावा म्हणून नवस बोलली कि जर मुलगा झाला तर मी त्याला नथ घालेन. नथ घालणारा मुलगा तो नथुराम. गांधीजींच्या खुनामुळे तो बदनामरुपाला आला. बदनाम हुवा तो क्या नाम तो हुवा।

टिळकस्मारकला मी व्याख्यानांना जायचो. मी जिकडे जाईल तिकडील भुभु मंडळी  एका शिट्टीवर माझी दोस्त बनतात. तिथे असाच एक कोब्रा भुभ्या होता.गोरा आणि घारा. मी त्याला शिट्टी वाजवून बोलावले. तिथल्या एका माणसाने मला सांगितले की त्याचे नाव मोदी आहे. मी त्याला "मोती" "मोती" म्हणून बोलवायला लागलो. तर तो माणूस म्हणाला कि "मोती" नाही त्याचे नाव "मोदी" आहे. मी म्हटल मोती काय मोदी काय माझ्यासाठी तो भुभु मित्रच आहे. मी मोदी भक्त ही नाही व मोदी द्वेष्टाही नाही. मग त्याने त्याचे तपकिरी गार गार नाक हुंगताना माझ्या हाताला लावले. मग मी खाली वाकून त्याच्या गार गार नाकाचा स्पर्श माझ्या कानाला व गालाला करुन स्वत:ला सुखावून घेतले. हे भुभु लोक्स जेव्हा गार गार नाकाने माझा कान हुंगतात तेव्हा त्यांच्या मिशीमुळे होणारा गुदगुल्या करणारा स्पर्श व गार गार नाकाचा स्पर्श यांचा एकत्रित परिणामाने अंगावर रोमांच उभे राहतात.स्वर्ग सुख म्हणतात ते हेच!
उगाच का तुकाराम महाराज म्हणतात
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।।
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ।।
 

पॉर्न ओके प्लीज Wed, 05/03/2025 - 16:53

मी स्वयंघोषित मानसशास्त्राचा वाचक विद्यार्थी असल्याने मला मानसशास्त्रातील काही भाग माहिती आहे.

मला मानसशास्त्र माहित आहे; म्हणजे "मानसशास्त्र हे काहीतरी एक entity आहे आणि हे प्रकरण आपल्या रस-परिघाच्या बाहेरचे आहे" हे माहित आहे.

तथापि, साधे मानसशास्त्र आणि स्वयंघोषित मानसशास्त्र असे काही प्रकार असतात हे माहित नव्हते! 
 

'न'वी बाजू Wed, 05/03/2025 - 18:51

In reply to by पॉर्न ओके प्लीज

साधे मानसशास्त्र आणि स्वयंघोषित मानसशास्त्र असे काही प्रकार असतात हे माहित नव्हते!

साधे मानसशास्त्र हे एक शास्त्र (science) आहे, तर स्वयंघोषित मानसशास्त्र हे एक छद्मशास्त्र (pseudoscience) आहे. शास्त्राचा अभ्यास असावा लागतो, तर छद्मशास्त्रात कोणीही काहीही ठोकून देऊ शकते (अगदी ‘एक्स्पर्ट कमेंट्स’सुद्धा!), आणि ते ‘विद्वत्तापूर्ण लेख (किंवा प्रतिक्रिया)’ म्हणून तत्काल मान्यता पावू शकते.

तस्मात्, प्रस्तुत लेख (किंवा खरे तर प्रस्तुत लेखकाचे काहीही) हे छद्मशास्त्र (तथा, (प्रस्तुत लेख) मानसशास्त्र या विषयात कडमडू पाहात असल्याकारणाने, स्वयंघोषित मानसशास्त्र) आहे, हे सहज मान्य व्हावे.

(प्रस्तुत प्रतिसादकाचे – अर्थात yours trulyचे (किंवा, मराठीत, ‘अस्मादिकां’चे) – काहीही हे नेहमीच छद्मशास्त्र अत एव स्वयंघोषित कशाचेतरी उत्तम उदाहरण असते, हे अगोदरच सर्वज्ञात असल्याकारणाने, त्याचा मुद्दाम वेगळा ज़िक्र न करता, केवळ It takes one to know one एवढेच ओझरते म्हणून घेऊन खाली बसतो.)

——————————

(अवांतर: (‘अस्मादिक’) हा शब्दप्रयोग मराठीत सर्वप्रथम ज्याने (किंवा जिने) कोणी लोकप्रिय केला, ‘तेहाची माय समस्त पाकिस्ताने ***’ अशी एक गधेगाळ (किंवा खरे तर पाकिस्तानगाळ) या निमित्ताने लोकप्रिय करू इच्छितो. (गरजूंनी त्यासोबतचे चित्र स्वतः कल्पून पाहावे.))

पॉर्न ओके प्लीज Wed, 05/03/2025 - 16:53

डुप्रकाटाआ

पॉर्न ओके प्लीज Wed, 05/03/2025 - 17:03

onomatopoeia म्हणजे नादमाधुर्य असे काहीतरी असते हे माहित होते. तथापि onomatophobia असेही काहीतरी असते, विशेषतः मेगॅबाइटी लेख लिहिण्याइतके काहीतरी विशेष असते हे माहित नव्हते.

म्हणून चॅटजीपीटीला, दोन्हींत काय फरक आहे ते सांग बाई असे विचारले!  

ता क: एखादा शब्दप्रयोग हा कौतुक, तक्रार किंवा केवळ वर्णन असू शकतो. वरील "मेगॅबाइटी लेख" हा शब्द हा केवळ वर्णन आहे, कौतुक किंवा तक्रार नाही. 

'न'वी बाजू Wed, 05/03/2025 - 17:51

In reply to by पॉर्न ओके प्लीज

‘मोदी’ या शब्दाची कुत्र्याशी तुलना करण्यासाठी हा सर्व आटापिटा आहे.

तसे केल्याने कुत्र्याचा अपमान होतो, हे या स्वयंघोषित कुत्र्यांच्या प्रेमीला लक्षात येऊ नये, याहून मोठा दैवदुर्विलास तो काय असावा?

——————————

स्वयंघोषित मानसशास्त्र, तसेच स्वयंघोषित कुत्रे.

प्रकाश घाटपांडे Wed, 05/03/2025 - 18:26

In reply to by 'न'वी बाजू

स्वयंघोषित भुभु प्रेमी राहिले.

मानसशास्त्राचा स्वयंघोषित वाचक वा स्वयंघोषित मानसशस्त्राचा वाचक दोन्ही   अथ लागू

'न'वी बाजू Thu, 06/03/2025 - 06:46

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वयंघोषित भुभु प्रेमी राहिले.

याचा अर्थ ‘स्वयंघोषित भूभूंचे प्रेमी’ असा घ्यायचा, की ‘भूभूंचे स्वयंघोषित प्रेमी’ असा घ्यायचा, की ‘स्वयंघोषित भूभूंचे स्वयंघोषित प्रेमी’ असा घ्यायचा?

(स्वयंघोषित नक्की कोण? भूभू, की प्रेमी, की भूभूही आणि प्रेमीही?)

पॉर्न ओके प्लीज Wed, 05/03/2025 - 18:40

In reply to by 'न'वी बाजू

‘मोदी’ या शब्दाची कुत्र्याशी तुलना करण्यासाठी हा सर्व आटापिटा आहे.


ते तर स्पष्टच आहे हो! आणि त्याची काही तक्रारही नाही (कारण ती व्यक्ती "त्यां"ची तुलना कुत्र्याशी करू शकते तर मग अजून कुणी त्या व्यक्तीची तुलना कुत्र्याशी करण्यात काय गैर आहे?). पण onomatophobia असं काहीतरी औपचारिक प्रकरण असते हे माहित नव्हते.

 

 

'न'वी बाजू Wed, 05/03/2025 - 18:55

In reply to by पॉर्न ओके प्लीज

(कारण ती व्यक्ती "त्यां"ची तुलना कुत्र्याशी करू शकते तर मग अजून कुणी त्या व्यक्तीची तुलना कुत्र्याशी करण्यात काय गैर आहे?)

या संदर्भात कुत्र्यांची मते विचारात घेतली आहेत काय?

——————————

स्वयंघोषित, ऑर अदरवाइज़.

प्रकाश घाटपांडे Thu, 06/03/2025 - 10:01

मोती व मोदी यातील श्राव्य अंतर अत्यंत कमी असल्याने अधिक बुद्ध्यांक असलेल्या भुभु लोकांना देखील ते समजणार नाही. अशा कमी श्राव्य अंतर असलेल्या अनेक शब्दांच्या आविष्कारातून चावट विनोद सेन्सॉर मधून सुटून जातात. अगदी स्वयंघोषित संस्कृतीरक्षक देखील काही करु शकत नाहीत. पुर्वी मुद्राराक्षसाचे विनोद साहित्यात येत असत. माझ्याकडे चित्रमय जगत चे 1921 चे काही अंक आहेत. ते ज्योतिषाच्या संदर्भाने मी मिळवले होते. ज्योतिषावर वाद विवाद होते. त्यात एका विद्वान ज्योतिषाचा सामान्य असा उल्लेख झाला. त्यावर वाद झाल्याने सन्मान्य असे लेखकाने लिहिले होते पण मुद्रणदोषामुळे ते सामान्य झाले असा उल्लेख आहे.