नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)
anant_yaatree
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली.
काय नाहीये माझ्या पाच शशकांत?
माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल. "मद" वाचून ट्रम्पतात्याही सर्वोदयी होतील.
पण माझी गाडी मत्सराशी अडलीय कारण मला मेलीला मत्सर म्हायतीच नाय ना.
आता "मत्सर" शशक लिहिण्यासाठी इतर शशक "लिहिण्या"पूर्वी लावला तसा कौल डीपसीकला लावला.
..मग आठवलं की त्यालाही बिचाऱ्याला मत्सरस्पर्श झालेलाच नाहीय.
आता जाते
चॅट जीपीटीच्या वाटे
जे डीपसीकचा मत्सर करते ...
वा!
जॉन्र जमून राहिलीय!
आवडली.
——————————
टीप: ही पुणेरी प्रतिक्रिया नाही. म्हणजे, ‘कविता करू नका’ असे (आडून किंवा समोरून) सुचवायचा उद्देश नाही. फक्त, (१) ही जॉन्र साधली आहे, आणि (२) कविता बऱ्यावाईट कशाही असल्या, तरी अनेकदा मला त्या समजत नाहीत (कविता चांगली असली, तरी तिच्या आकलनाचे वा आस्वादाचे अंग माझ्यात नाही, ही माझी मर्यादा!); उलट, हा प्रकार चांगला कळतो (असे तूर्तास तरी वाटते; चूभूद्याघ्या.); एवढेच मांडायचे आहे. (तुम्ही कविताही लिहा, नि शशकही लिहा. किंवा, आणखीही काही लिहा. मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाही. तो अर्थातच सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माझी मर्यादा मी सांगितली, इतकेच.)
असो चालायचेच.