Skip to main content

हरपले श्रेय

अनिलने झोपेतच कूस वळवली आणि त्याला जाग आली. आपण कुठे आहोत ते आठवायला त्याला क्षणभर वेळ लागला. त्याने साईडटेबलवरचा नाईटलॅम्प लावला, तिथे ठेवलेला चष्मा लावला, आणि फोनच्या डिस्प्लेत वेळ बघितली. पहाटेचे तीन वाजले होते. "विचिंग अवर" अनिल स्वतःशीच पुटपुटला.

अनिल फक्त दोन तास झोपला होता, पण तरी त्याला थकवा जाणवत नव्हता. पार्टीत एका ब्लडी मेरीनंतर व्हर्जिन मेरी प्यायची त्याची नेहमीची ट्रिक होती. आणि आफ्टरपार्टीत तर तो फक्त आईस वॉटर प्यायला होता. लाँग स्टोरी शॉर्ट, त्याला फ्रेश वाटत होतं आणि बिलकुल झोप येत नव्हती.

बेडमधून उठून अनिलने क्रॉक्स घातल्या, आणि दरवाजा उघडून तो बाहेर गेला. या रिसॉर्टची रचना अशी होती, की प्रत्येक कॉटेजमधून दरीतला तलाव दिसत असे. अनिलने आजूबाजूला नजर फिरवली. सगळ्या कॉटेजेसमध्ये सामसूम होती, आणि व्हरांड्यातल्या मंद दिव्यांव्यतिरिक्त बाकी अंधार होता. मंद वारा वाहत होता आणि पानांची हलकीशी सळसळ ऐकू येत होती.

अनिल पायऱ्या उतरत तलावाकडे जाऊ लागला. जिन्याच्या दोन्ही बाजूंना झुडपांचं आखूड कुंपण होतं आणि दर दहाबारा पायऱ्यांनंतर झुडपांत लपवलेले फिकट पिवळे दिवे पुरेसा प्रकाश देत होते. अनिल सवयीने पायऱ्या मोजत उतरला - एकूण चौसष्ट पायऱ्या उतरल्यावर तो तलावाकाठी पोहोचला. नक्षीदार लोखंडी बाकावर बसून त्याने डोळे मिटले, आणि तो मेडिटेशन करत काही मिनिटं स्तब्ध बसून राहिला.
========================

साईडटेबलवरचा फोन खणखणला आणि अनिलला जाग आली. बेडमधून न उठता त्याने हात लांबवून रिसीव्हर उचलला.

"मॉर्निंग अनिल. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण अर्ध्या तासात निघावं लागेल. सगळ्यांचा ब्रेकफास्ट आटपलाय. तू दिसला नाहीस आणि तुझा मोबाईलही स्विच्ड ऑफ आहे, म्हणून फोन केला."

"थॅंक्स पूजा. मी पंधरा मिनिटात तयार होतो. ब्रेकफास्टला फारसा वेळ मिळणार नाही. त्यांना ऑरेन्ज ज्यूस आणि कॉफी तयार ठेवायला सांगशील प्लीज?"

"शुअर अनिल. ब्लॅक कॉफी, विथ वन शुगर, राईट?" पूजा गेली पाच वर्षे त्याची ईए होती आणि प्रचंड कार्यक्षम होती. या ऑफसाईटचीही बरीच जबाबदारी तिनेच निभावली होती.

अनिल भरभर तयारी करू लागला. दाढी करताना त्याने आरशात बघितलं, आणि त्याला एकदम काहीतरी आठवलं. त्याच्या हातातला रेझर सिंकवर पडला, आणि त्या आवाजाने अनिल भानावर आला. काहीशा भांबावलेल्या मन:स्थितीतच त्याने बाकीची तयारी केली, आणि बॅग पॅक करून तो कॉटेजबाहेर आला. त्याची नजर तलावाकडे वळली, पण तलावाच्या पृष्ठभागावर नाचणाऱ्या सूर्यकिरणांशिवाय त्याला काहीच दिसलं नाही.
================

अनिलसोबत इनोव्हात बसलेले सहकारी कालच्या पार्टीच्या आठवणी काढत होते. अनिल मात्र गप्पच होता. तसाही तो मितभाषी असल्याने कोणाला काही वावगं वाटलं नाही. पण तासाभरानं अनिलने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली, पूजाला फोन करून दुसऱ्या गाडीची सोय करायला सांगितलं, आणि तो इनोव्हातून पायउतार झाला.

"टेरिबली सॉरी, बट आय नीड टू टेक केअर ऑफ समथिंग अर्जंटली," आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेत अनिल म्हणाला. इनोव्हा पुढे निघून गेली. फारशी रहदारी नसलेल्या त्या रस्त्यावर स्ट्रोलर बॅग घेऊन सुटाबुटात उभा राहिलेला अनिल विजोड दिसत होता; पण लवकरच पूजाने पाठवलेली कार आली आणि अनिल रिसॉर्टला परतला. पूजाने त्याचं एका दिवसाचं बुकिंग करून ठेवलं होतं. रिसेप्शनिस्टला विनंती करून अनिलने तलावाच्या अगदी जवळचं कॉटेज निवडलं.

तीनचार तास काम करून, दुपारचं जेवण करून अनिल झोपी गेला आणि गजर लावून रात्री दहाला उठला. रविवार असल्याने कामाचे कॉल्स वगैरे नव्हते, आणि अजून एखादा दिवस रहावं लागेल हे त्याने सकाळीच घरी कळवून ठेवलं होतं.

अनिल रात्रभर जागा होता आणि तलावाकडे बघत बसला होता. तसं नाईट मारायचं वय राहिलं नाही हे त्याला जाणवत होतं, पण मिनीफ्रीजमधल्या तीनचार रेडबुलच्या मदतीनं रात्र निघाली. तांबडं फुटेपर्यंत काहीच दिसलं नाही तेव्हा तो झोपी गेला. पावणेनऊ वाजता उठून त्याने तयारी केली, रिसेप्शनला फोन करून अजून एक दिवस मुक्काम वाढवला, आणि ऑफिसच्या कामाला सुरूवात केली.

सोमवार रात्रही अशीच गेली. मंगळवारी संध्याकाळी एका मोठ्या क्लायंटला भेटणं आवश्यक होतं. अनिल जरा घुश्श्यातच मुंबईला परतला.

अनिलने आठवड्यातली कामं कशीबशी पार पाडली, पण त्याच्या डोक्यात शनिवारचे विचारच घोळत होते. शुक्रवारी लंचनंतरच्या मिटींग्स रद्द करून तो रिसॉर्टला परतला.
========================

शुक्रवारची रात्र जागून निष्फळ ठरली. शनिवार रात्रीबद्दल अनिलला अधिक आशा होती - गेल्या आठवड्यातील घटना शनिवारीच घडली होती. पण शनिवारची रात्रही तशीच गेली. आता आलोच आहोत तर अजून एक दिवस प्रयत्न करावा, या विचाराने अनिल रविवारी रात्रीही जागला. पण कुठेतरी त्याला वैफल्याची जाणीवही होत होती. पहाटे चार-सव्वाचार वाजता त्याने चेकआऊट केलं व तो मुंबईला परतून तडक ऑफिसलाच गेला. पुढच्या वीकेंडलाही याचीच पुनरावृत्ती झाली.

"अनिल, प्लीज डोन्ट माईन्ड मी आस्किंग, बट आय यू ऑलराईट?" पूजानं काळजीच्या स्वरात विचारलं. "तुझ्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आलीयेत."

अनिलने काहीतरी थातूरमातूर सबब देऊन पूजाचा प्रश्न टाळला. पण दुपारच्या टीम मीटींगनंतर त्याचा पार्टनर राजीव त्याला भेटायला आला.

"अनिल, आय वोन्ट बीट अराऊंड द बुश. यू लुक अनवेल. काही स्ट्रेस आहे का? मी काही मदत करू शकतो का?" राजीवने विचारलं.

"काही नाही रे. जस्ट द रूटीन," अनिल म्हणाला.

"इट्स डेफिनिटली नॉट द रूटीन. ऑफिसमधे ॲनालिस्टसपासून सगळ्यांनाच जाणवतंय, समथिंग इज ऑफ!"

अनिल दोन मिनिटं गप्प बसून राहिला. राजीव आणि तो बारा वर्षं पार्टनर होते आणि तरीही मित्र होते. राजीवला सांगितलं तर तो ऐकून घेईल हे शक्य होतं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ऑफसाईटच्या वेळी, शनिवारी रात्री रिसॉर्टवर काय घडलं हे कोणालातरी सांगितलंच पाहिजे असं अनिलला वाटू लागलं होतं.

"धिस स्टेज ओनली बिट्विन अस," अनिल म्हणाला आणि बोलू लागला.

"ऑफसाईटच्या शेवटच्या रात्री मी साधारण एक वाजता झोपलो. बरोब्बर तीन वाजता मला जाग आली. मला नेमकं आठवतंय, कारण वेळ बघताच माझ्या मनात विचार आला होता - विचिंग अवर.

मला झोप येईना. सहज चालायला म्हणून मी कॉटेजबाहेर पडलो, आणि तलावाकाठी गेलो. मी चौसष्ट पायऱ्या उतरलो होतो हे मला आठवतंय - दुसऱ्या दिवशी मी पुन्हा पायऱ्या मोजल्या आणि त्या बरोबर होत्या. हे सगळं सांगायचं कारण एवढंच, की मी पूर्ण जागा होतो.

तलावाकाठी मी एका बाकावर बसलो, आणि डोळे मिटून मेडिटेशन केलं. मला अचानकच जाग आली आणि तलावाच्या मधोमध काहीतरी - रादर कोणीतरी आहे हे जाणवलं. त्या आकृतीचा आकार मला समजत नव्हता, कारण ती विलक्षण प्रकाशमान होती. मी दुसऱ्या दिवशी विचार केला, तेव्हा मला आठवलं की त्या प्रकाशाचा रंगही मला कळला नव्हता.

मी त्या आकृतीच्या दिशेने चालत गेलो. पाण्यावर कसा चाललो ते मला ठाऊक नाही. आणि पुढे नेमकं काय झालं हे तर त्याहूनही ठाऊक नाही. पण हे नक्की, की त्या स्थळ-काळात मला अद्वितीय आनंदाची अनुभूती झाली.

आनंद हा शब्दसुद्धा कदाचित योग्य नसेल. जे झालं त्याचं वर्णन मी करू शकत नाही. ते जे काही होतं ते पंचेंद्रियांच्या पलीकडचं होतं. तलावांमधलं ते अस्तित्त्व कोणाचं होतं, त्या अस्तित्त्वाला माझी जाणीव झाली का, आमचा संवाद झाला का, नंतर मी या विश्वात होतो का दुसऱ्याच एखाद्या विश्वात किंवा मितीत गेलो होतो, तिथे क्षणभर होतो का युगानयुगं होतो - काहीच सांगता येणार नाही.

मी तिथून कधी, कसा, आणि का बाहेर आलो ते मला माहीत नाही. त्यानंतरची माझी आठवण म्हणजे सकाळी आलेला पूजाचा फोन.

नंतर बऱ्याचदा मी तिथे गेलो, पण तो अनुभव अद्याप आला नाहीये. आय विल कीप ट्राइंग!"

राजीवने घसा खाकरला. "तू हे अजून कोणाशी बोलला आहेस?" त्याने विचारलं.

अनिल किंचित हसला. "तुझा पहिला प्रश्न हा असेल याची खात्री होती मला! पण नाही, याबाबत अद्याप कोणाशी बोललो नाहीये. बायकोशीसुद्धा नाही."

"गुड. बोलूही नकोस. हे असं सुपरनॅचरल बोलल्याचे परिणाम काय होऊ शकतील हे मी तुला सांगायला नको. प्रोफेशनल आणि पर्सनलसुद्धा," राजीव शब्द मोजून-मापून बोलत होता, पण त्याच्या बोलण्यातला अविश्वास अनिलला जाणवलाच.

"पण मग मी तो अनुभव डिस्काउंट करू? ते शक्य नाही!" अनिल त्वेषाने म्हणाला.

"ओके, ऐक. आपण लॉजिकली विचार करूया. एक शक्यता आहे की तुला एकदम विव्हिड स्वप्न पडलं. किंवा एखादा सायकेडेलिक अनुभव आला. तू काही मॅजिक मश्रूम्स वगैरे घेत नाहीस ना?"

"नो वे. आणि अरे, जर स्वप्न असतं तर मला किती पायऱ्या ते कसं कळलं असतं?"

दोन्ही हात उंचावत राजीव म्हणाला, "लेट्स लुक ॲट द एव्हिडन्स. आपण दोघेच त्या रिसॉर्टमध्ये जाऊन तिथलं सीसीटीव्ही फूटेज पाहूया. मी त्यांना सांगीन की तुझी अंगठी गायब झालीये. आपण त्यांना भरपूर बिझनेस देतोय; सीसीटीव्ही फूटेज मिळेलच."
================

पुढचे काही दिवस विचित्र गेले. अनिलचं कामातलं लक्ष उडालं होतं, त्यामुळे राजीववर सगळीच जबाबदारी पडत होती. पण अनिल कामाचा, क्लायंट्सचा विचार करतच नव्हता. "रिसॉर्टला कधी जाऊया" हे तो रोज तीनचार वेळा राजीवला विचारायचा. अखेरीस काम कसंबसं आटोक्यात आलं, आणि राजीव आणि अनिल रिसॉर्टला गेले. राजीवने बायकोचं क्रेडिट कार्ड वापरून कारपासून सगळी बुकिंग स्वतः केली होती. "कंपनीच्या रेकॉर्ड्समध्ये या ट्रिपचं काहीही येता कामा नये," त्यानं अनिलला जरा त्राग्यानंच सांगितलं होतं.

रिसॉर्टच्या मॅनेजरशी बोलणं राजीवने एकट्यानंच केलं, आणि मगच अनिलला कॉफीशॉपमधून बोलावून घेतलं. रिसॉर्टच्या सेक्युरिटी ऑफिसरसोबत बसून त्याच्या लॅपटॉपवर दोघेजण फूटेज बघू लागले.

"अरे! तू काय रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडलास वाटतं!" राजीव बळेच हसत म्हणाला.

"हो, हॅन्गओव्हर जायला सगळ्यात चांगला उपाय!" अनिलनेही खोटं हसत उत्तर दिलं.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये अनिल पायऱ्या उतरताना दिसला. तलावाजवळच्या कॅमेऱ्याच्या व्ह्यूमध्ये तो बाकावर बसलेला दिसला, आणि मेडिटेशन करतानाही दिसला. पंधरा मिनिटं तो मेडिटेशन करत होता. तेवढ्यात तलावापाशी धुकं वाढत होतं. अनिल उभा राहून तलावाच्या दिशेनं गेला, पण दोनतीन पावलं टाकेस्तोवर तो धुक्याआड दिसेनासा झाला. चारपाच सेकंदांतच तो पुन्हा धुक्यातून येताना दिसला. जातानाचा अनिल कॅमेर्‍याने पाठमोरा टिपला होता; पण येतानाच्या अनिलचा चेहरा दिसत होता. त्याचे डोळे अर्धवट मिटलेले, स्वप्नात असल्यासारखे होते.

इतर थोडं फूटेज उगाचच बघून राजीव आणि अनिल रिसॉर्टबाहेर पडले. "यू वेअर स्लीपवॉकिंग आफ्टर यूवर मेडिटेशन. आणि चारपाच सेकंदांतच बाहेर आलास तू. नॉट इनफ टाईम फॉर अ लाईफ-चेंजिंग एपिफनी! काही दिव्य अनुभव वगैरे नव्हता. स्वप्न पडलं तुला फक्त. लेट्स गो होम."

अनिलने मान नकारार्थी हलवली. "एवढं सोपं नाहीये ते," तो निग्रहानं बोलला. "तू जा. मी इथे थांबतोय. मला आठवलं, तो दिवस पौर्णिमेचा होता. आता चार दिवसांत परत पौर्णिमा आहे. काहीतरी थांगपत्ता लागेल."

राजीवने सुस्कारा सोडला. काही न बोलता तो पार्किंग लॉटकडे चालू लागला.
================

पौर्णिमेची रात्र येऊन गेली, तरी अनिलला काही दिसलं नाही. आदल्या पौर्णिमेच्या आठवणींनी - खरंतर आठवणींच्या अभावाने - तो बेचैन झाला होता. आपल्याला काहीतरी आठवणं, काहीतरी समजणं आवश्यक आहे असं त्याला सतत वाटत होतं. अचानक काहीतरी सुचलं, आणि त्यानं रिसेप्शनला फोन करून विचारलं, "तलावाकडे बऱ्याचदा धुकं असतं का? म्हणजे मला दाट धुक्यातले फोटो काढायचे आहेत म्हणून विचारलं."

"नाही सर. क्वचित कधी हलकंसं धुकं असतं, पण तुम्ही म्हणताय तसं दाट धुकं कधीच पडत नाही."

अनिलने फोन ठेवला, सुस्कारा सोडला, आणि घरी परतण्यासाठी तो पॅकिंग करू लागला.

तो घरी पोचला तेव्हा रचना त्याची वाट बघत होती. अनिलनं दार बंद केल्यावर तिनं ताबडतोब विचारलं, "कुठे अफेअर चाललंय तुझं?"

"काहीही! अफेअर वगैरे काही नाही. जस्ट कामात बिझी आहे." अनिलने बचाव केला.

"अच्छा? मग पूजाला तुझं शेड्यूल कसं माहीत नाही? मी काल तुझ्या ऑफिसात गेले शेवटी. राजीवसुद्धा काहीतरी गुळमुळीत बोलला. आफ्टर ऑल, तो तुझा जुना मित्र! तुला प्रोटेक्ट करणारच!" रचना भलतीच रागावली होती.

"ओके. आय विल कम क्लीन. पण तुला वाटतंय तसं काहीच नाहीये. बस, आणि प्लीज ऐक," अनिलनं रचनाला हात धरून सोफ्यावर बसवलं आणि रिसॉर्टचा प्रसंग सांगितला.

अनिलचं बोलणं संपलं तेव्हा रचना डोकं गच्च धरून बसून राहिली. काही मिनिटांनी ती अनिलकडे एकटक बघत बोलू लागली, "तू हे खोटं बोलत असशील तर यू आर अ चीटर ॲन्ड अ पथेटिक लूझर. आणि तुला हे सगळं खरं वाटत असेल तर यू नीड युवर हेड एक्झामिन्ड. काहीही असलं तरी मला आता हे झेपत नाहीये. तू कित्येक दिवस गायब असतोस, घरी असतोस तेव्हाही तंद्रीत असतोस. काल तुझ्या ऑफिसात गेले होते तेव्हा सगळेजण माझ्याकडे दयेनं बघत होते. आय कान्ट टेक धिस एनीमोअर. मी चाललेय."

रचना घराबाहेर पडली तरी अनिल काहीच बोलला नाही.
=================

पुढचे काही दिवस अनिल वर्क फ्रॉम होम - तेही जमेल तेवढंच - करत होता. झूम कॉल्सवरही तो व्हिडिओ बंद ठेवून जॉईन व्हायचा. कॉल्सवर फारसा बोलायचा नाही. कोणी प्रश्न विचारले तरी थातुरमातुर उत्तरं देऊन जबाबदारी झटकायचा. राजीव जबाबदारी घेत होता, पण कधीतरी कॉल्सवर डाफरतही होता. इंटर्नल आणि क्लायंट कॉल्सवरही राजीवचा बदललेला अप्रोच त्याला कळत होता. आणि त्याचा निरुत्साह आणि राजीवचा त्रागा टीमला कळतोय हेदेखील त्याला कळत होतं. पण त्याबद्दल काही करावं असं त्याला बिलकुल वाटत नव्हतं. तो फक्त वीकेंडची वाट बघत होता.

गुरूवारी संध्याकाळी तो नुसताच बसून विचार करत होता, तेवढ्यात बेल वाजली. अनिलने दार उघडलं, तर पूजा आली होती.

"यू लुक टेरिबल! काही खाल्लं तरी आहेस का आज?" ती कळवळून म्हणाली आणि उत्तराची वाट न बघता तिनं सेंटर टेबलवर सोबत आणलेल्या ग्रिल्ड चीझ सॅन्डविच, कॉफी आणि कुकीज मांडल्या. "सिट ॲन्ड ईट!"

अनिल काही न बोलता खाऊ लागला. पहिला घास घेताच त्याला पोटातल्या भुकेची प्रकर्षाने जाणीव झाली. त्याचं खाऊन होईपर्यंत पूजानं लिव्हिंग रूम आवरली. बाजूच्या खुर्चीत बसून तिनं पर्समधले वेट वाईप्स अनिलला दिले. अनिल किंचित हसला, आणि त्यानं तीनचार वेट वाईप्सनी चेहरा पुसला. "थॅंक्स पूजा," तो मनापासून म्हणाला.

"यू आर व्हेरी वेलकम, अनिल. आता मला सर्व सांग. डोन्ट होल्ड बॅक एनिथिंग. आय वोन्ट जज."

अनिलने कृतज्ञतेने मान तुकवली, आणि तो बोलू लागला. रिसॉर्टचा प्रसंग, सीसीटीव्ही फूटेज, राजीवची प्रतिक्रिया, रचनाचं घर सोडून जाणं, सगळं सांगून तो शेवटी म्हणाला,

"तूसुद्धा मराठी लिटरेचर शिकली आहेस ना? मला कॉलेजात केशवसुतांची "हरपले श्रेय" कविता होती - कदाचित तू वाचली असशील:

त्रिखंड हिंडुनि धुंडितसें,
न परि हरपलें तें गवसे
स्वभाव दावुनि
परि तें झटदिनिं
जाई लोपुनि !
मग मी हांका मारितसे !
न परि हरपलें तें गवसे !

माझं तसंच झालंय. ऑफसाईटच्या वेळी तलावात जाणवलेलं जे श्रेय होतं ते शोधल्याशिवाय मी राहू शकत नाही. तुला वाटत असेल की मी दु:खी आहे. पण तसं नाहीये. कुटुंबाचा पाश आपोआप सुटला. राह्यलं करियर - मी आत्ताच रेझिग्नेशनचा ईमेल राजीवला पाठवलाय. मला ताबडतोब रिझाईन होऊ दिलं तर त्याला दहा टक्के जास्त शेअर कबूल केलाय. यू नो हिम - तो या टर्म्स नक्की स्वीकारेल.

मी तुला पॉवर ऑफ ॲटर्नी देतोय. माझे असेट्स विकून टाक. तुला योग्य वाटेल तेवढी फी घे; आणि बाकी रक्कम रचनाला पाठवून दे."

पुढच्या आठवड्याभरात अनिलने सगळी आवराआवर केली, आणि तो निघून गेला. कोणताही फॉरवर्डींग ॲड्रेस न ठेवता.

अनिलने दिलेली जबाबदारी पूजाने पार पाडली, आणि मग राजीवकडे राजीनामा देऊन ती दुबईला शिफ्ट झाली. करीअर, लग्न, मुलं यांत रूळली, रमली.
================

दहाएक वर्षांनंतर प्रथमच पूजा भारतात परतली. नातेवाईकांच्या भेटींमध्ये एक दिवस मुद्दाम काढून ती एकटीच ड्राईव्ह करत रिसॉर्टला आली आणि एक रात्र राहिली. सामसूम झाली तेव्हा शाल लपेटून ती तलावाकडे आली आणि नक्षीदार लोखंडी बाकावर बसली.

थोडा वेळ लागला, पण तिची अटकळ खरी ठरली. चेहरामोहरा बदलला असला तरीही सेक्युरिटी गार्डच्या गणवेषातील अनिलला तिनं ओळखलं. त्यानंही तिला ओळखलं.

पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चकाकणाऱ्या तलावाच्या पाण्याकडे बघत अनिल बाकाजवळ उभा राहिला. आपल्या काठीवर किंचित रेलत तो म्हणाला,

" यू नो - मला अजूनही आशा आहे. पण ती आशा फोल ठरली तरी मला वाईट वाटणार नाही.

तुला ती कविता ठाऊक आहे?

Jenny kiss’d me when we met,
Jumping from the chair she sat in;
Time, you thief, who love to get
Sweets into your list, put that in!
Say I’m weary, say I’m sad,
Say that health and wealth have miss’d me,
Say I’m growing old, but add,
Jenny kiss’d me."

========================
(या गोष्टीच्या संपादनात मदत करणाऱ्या सुहृदांचे मन:पूर्वक आभार.)

'न'वी बाजू Sun, 09/03/2025 - 22:34

पूर्णपणे डोक्यावरून गेली.

असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/03/2025 - 07:47

मी आत्ता थोड्या वेळापूर्वी Creeping Jenny नावाचं झाड बागेत लावलं. त्याचा काही संबंध आहे का?

चिंतातुर जंतू Tue, 11/03/2025 - 12:02

या अनिलला जे काही झालं त्याबद्दल काही प्रश्न पडले. तो पूजापाशी कबुली देतो तेव्हा केशवसुतांची 'हरपले श्रेय' उद्धृत करतो. तलावापाशी जे जाणवलं ते श्रेय तो शोधतोय असं सांगतो. ते तलावापाशीच मिळेल म्हणून तो करियर, कुटुंब, मालमत्ता सगळं सोडून देतो. पण दहा वर्षांनंतर जेव्हा ते पुन्हा भेटतात तेव्हा तो 'Jenny kiss’d me when we met' उद्धृत करतो. पण त्यात तर जगताना सहज (म्हणजे : मुद्दामहून शोध न घेता) मिळालेलं साधंसोपं सुख सेलिब्रेट केलेलं आहे. परिचित व्यक्तीने अनपेक्षितरीत्या प्रेमाने मुका घेतल्याची अनुभूती त्यात केंद्रस्थानी आहे. पण हे श्रेय हवं असलं तर सर्वसंगपरित्याग करून तलावापाशी एकटंच राहून कसं चालेल? म्हणजे जणू जेनीनेच परत किस केलं तरच मला त्या सुखाची पुन्हा अनुभूती मिळेल, असं? पण कवितेत तर ते सेलिब्रेट केलेलं नाही. तिथली जेनी निमित्तमात्र आहे. मग ह्या बिचाऱ्या अनिलने कवितेचं आणि आपल्याला मिळालेल्या अनुभूतीचं चुकीचं अर्थनिर्णयन करून आपलं आयुष्य नासवून तर नाही घेतलेलं? 'आशा फोल ठरली तरी मला वाईट वाटणार नाही' असं तोच म्हणतोय. मग बाकी आयुष्य पूर्वीसारखं चालू ठेवून पुन्हा अशी अनुभूती मिळेल अशी आशा बाळगून जगला असता तरीही चाललं असतं की, कारण - 'आशा फोल ठरली तरी मला वाईट वाटणार नाही'. मग हे सगळं करण्यामागचा कार्यकारणभावच गंडलेला नाही का?

देवदत्त Tue, 11/03/2025 - 19:09

In reply to by चिंतातुर जंतू

कदाचित "म्हणूनि मी आक्रंदीतसे, न परी हरपले ते गवसे" ची फेज पार केल्यानंतर नंतरचं 'Jenny kiss’d me when we met' हे जस्टिफिकेशन किंवा अक्सेप्टन्स असेल? किंवा पूजाने आपल्याला जज करू नये म्हणून लावलेलं बँड-एड?

चिंतातुर जंतू Tue, 11/03/2025 - 19:46

In reply to by देवदत्त

कदाचित "म्हणूनि मी आक्रंदीतसे, न परी हरपले ते गवसे" ची फेज पार केल्यानंतर नंतरचं 'Jenny kiss’d me when we met' हे जस्टिफिकेशन किंवा अक्सेप्टन्स असेल? किंवा पूजाने आपल्याला जज करू नये म्हणून लावलेलं बँड-एड?

हं. बरं.

'न'वी बाजू Tue, 11/03/2025 - 19:54

अनिलने स्वतःच्या आयुष्याचे जे काही बरेवाईट करायचे (आणि कशाकरिता), हा सर्वस्वी अनिलचा प्रश्न असल्याकारणाने, त्याबद्दल आनंद नाही, तसेच दु:खही नाही. (किंबहुना, त्याबद्दल काहीही सोयरसुतक नाही, असे म्हणता येईल.) त्याने कोठल्याही डबक्यात मरावे, नाहीतर, डबक्यासमोर बसून (पर्वतमुहम्मदन्यायाप्रमाणे) "आज डबके येऊन मला बुडवेल, उद्या डबके येऊन मला बुडवेल" म्हणून जगाच्या अंतापर्यंत वाट पाहत राहावे; मला काय त्याचे!

मात्रः

"मी तुला पॉवर ऑफ ॲटर्नी देतोय. माझे असेट्स विकून टाक. तुला योग्य वाटेल तेवढी फी घे; आणि बाकी रक्कम रचनाला पाठवून दे."

म्हणजे? जे काही अ‍ॅसेट्स होते, ते अनिलच्या एकट्याच्या नावावर होते? अनिल आणि रचनाच्या जॉइंट नावांवर नव्हते? रचनाच्या नावावर काहीही नव्हते?

अशी पद्धत असते "त्यांच्या"त? या एकविसाव्या शतकातसुद्धा?

नो वंडर, या एकविसाव्या शतकात ट्रंप निवडून येऊ शकतो! (नि भारतातले लोक "आमचा ट्रंप! शेठजींचा दोस्त! भारताचा नि जगाचा तारणकर्ता! (ओबामा नि बायडेन भारताची मारीत होते, परंतु, या पठ्ठ्याने येऊन) तिसरे महायुद्ध थांबवलेनीत्!" वगैरे काहीबाही बरळत त्याला डोक्यावर घेऊ शकतात!)

(अतिअवांतर: यंदाच्या भारतभेटीत, असली मुक्ताफळे बरीच ऐकायला मिळाली. तीही, असल्यातसल्यांकडून नव्हे, तर पूर्वी अमेरिकेत राहून गेलेल्या चांगल्याचांगल्या सुशिक्षितांकडून! म्हणजे, भारतभेटीत भारतीयांकडून अमेरिकेतल्या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटेल ती मुक्ताफळे ऐकण्याची आता सवय झालेली आहे, नि त्यातून छान करमणूकही होते, म्हणून तोंड बंद ठेवून (नि जीभ गालात ठेवून) नि 'आम्हाला त्यातले काही कळत नाही, ब्वॉ! अमेरिकेत काय चालते, ते तुम्हां भारतीयांनाच ठाऊक!' अशी अ‍ॅटिट्यूड धारण करून शांतपणे ऐकून घेतो, झाले. परंतु, या खेपेला करमणूक अंमळ जास्तच झाली. असो चालायचेच.)


(तशीही ही गोष्ट बहुतेकांच्या डोक्यावरून जात आहेच, त्यामुळे, या धाग्यावर अवांतर करायला (लेखकासकट) कोणाचाही आक्षेप नसावा, असे गृहीत धरून चालीत आहे. (तसेही, कोठल्याही धाग्यावर अवांतर करायला कोणाच्याही आक्षेपाची पर्वा येथे कोणी नि कधी केली होती, म्हणा! परंतु, एका एरवी चांगल्या लेखकाचा आदर, वगैरे... असो.))