Skip to main content

एक शांतिप्रिय अवलिया... नितीन सोनवणे!

MMBA च्या संक्रांतीच्या कार्यक्रमात त्यांनी एका तरुणाला स्टेज वर बोलावलं. नितीन सोनावणे, शिक्षणाने इंजिनिअर आणि काय करतात - चालतात.. पडलात ना बुचकळ्यात!

हा माणूस गेली सात-आठ वर्ष चालतोय, म्हणजे त्याने अनेक देशा-विदेशात हजारो मैल पदभ्रमंती केली आहे. आणि आता तो सॅन फ्रान्सिसको ते वॉशिंग्टन डीसी, तीन ते साडेतीन हजार मैल, ही यात्रा पायी करणार आहे. 

स्टेजवरून ते सांगत होते आणि मला इतकं आश्चर्य वाटायला लागलं..

खरं तर ह्या वयाचे तरुण नोकरी, प्रमोशन, पगारवाढ झालच तर (नवीन ?) संसार, घर, गाडी ह्यात व्यग्र असतात. प्रसंगी लवकरात लवकर आणि कमीत कमी कष्टात पैसा, प्रसिद्धी, लौकिक कसा मिळेल यामागे धावताना सारासार विचार केव्हा मागे पडतो आणि तारतम्य भाव, सद्सद्विवेक बुद्धी कधी लोप पावते त्यांचं त्यांनाही कळत नाही.

भवताली दिसणाऱ्या अशा वातावरणात मनात कुतूहल दाटलं. ह्याच काय हे वेगळं? का करावस वाटतं असेल ह्याला? काय मिळतं असेल हे करून ? असे अनेक प्रश्न मनात आले.

लोक नर्मदा परिक्रमा किंवा मानसरोवर परिक्रमा करतात वगैरे ऐकलं होतं. पण हे काहीतरी निश्चित वेगळंच होतं. 

कार्यक्रमानंतर त्याच्याशी बोलायला थांबले. 

काही मिनिटातच लक्षात आलं की हा माणूस एकदम डाउन टू अर्थ आहे. त्याच्या उपक्रमाविषयी, उद्दिष्टांविषयी अधिक जाणून घ्यायचं होतं त्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट घेतला आणि त्यांना काही प्रश्न विचारले. कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनीही अगदी मनापासून वेळ काढून माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. 

खरंतर या गोष्टीला आता महिना उलटून जातोय. 26 जानेवारीला त्यांनी सुरू केलेला प्रवास आता जवळ 42 दिवसांनी सॅन डियागो  पर्यंत आलाय.. 

त्यांनी व्हॉईस मेसेजेस पाठवलेले त्याचे शब्दांकन करून खाली प्रश्न उत्तरे दिली आहेत.

***

प्रश्न १. असा कोणता क्षण होता की तुम्हाला हे असं करावसं वाटलं? त्यामागील उद्देश काय होता?

मी अहमदनगर जवळच्या राशिंग गावचा. लहानपणापासूनच फक्त गावातच नाही तर घरातही वेगवेगळे धर्म आणि पंथ मानणारे लोक होते. त्यामुळे ते सगळे एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदताना अनुभवले होते. 

पुढे हायस्कूल मध्ये विज्ञानाशी ओळख झाल्यावर जाणवलं की शेवटी हे जग, माणसं हे सगळं अणू रेणूनी बनलेल आहे. मग हे सर्व धर्म, जाती, वंश काय आहे. तेव्हापासून सतत मनात प्रश्न येऊ लागला की माणसाच्या जगण्याचं खरं सत्य काय आहे हे मला समजेल का? 

गौतम बुद्धांची गोष्ट माहीत होती, ते २९ व्या वर्षी सत्याच्या शोधात सर्वत्याग करून बाहेर पडले होते. मी ही १७ व्या वर्षीच घर सोडून बाहेर पडलो सत्याच्या शोधासाठी.. परंतु एकच दिवसात परत घरी आलो. पण तो दिवस मला बदलवून टाकणारा होता.

पुढे मी युक्रांदशी जोडली गेलो. डॉ कुमार सप्तर्षी ह्यांच्या  मार्गदर्शनाखाली दीड वर्ष गांधी स्मारकासाठी काम केलं त्यावेळी गांधींजींचा जवळून परिचय झाला. 

२०१९ ला गांधीजींची १५०वी जयंती साजरी होणार होती. तेव्हा त्यांचे आचार, विचार -  गांधीजींची कमीत कमी गरजा असलेली अत्यंत साधी रहाणी, आणि अहिंसा -  मनुष्याशी, प्राण्यांशी, निसर्गाशी, अन्नाशी.. - लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सत्याचा शोध घेण्यासाठी मी बाहेर पडलो. सुरुवातीला सायकल वरून  यात्रा केली आणि नंतर २ वर्षांनी मग पदयात्रा सुरू केली. 

 

प्रश्न २.  चालत जायच ठरवलंत आणि तुम्ही ते सातत्याने काही वर्ष करताय म्हणजे तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळत असणार तर त्याविषयी थोडं काही सांगा..

चालणं हे माझ्यासाठी दोन प्रकारे काम करतं. 

एक तर मला ते अत्यंत सशक्त असे अध्यात्मिक साधन वाटत. 

चालताना मला माझ्या अंतर्मनात घेऊन जात. मनाची अनेक कवाडं, कप्पे उघडतात, एक वेगळंच बळ मिळतं.

आजूबाजूच्या घटना, निसर्ग टिपत असताना मनात कुठेतरी एक आंतरिक शोध चालू असतो, जो मला वाटतं सत्याच्या शोधाच्या जवळ घेऊन जातो.  जे मला नेहेमीच हे प्रेरणादायी वाटतं. 

दुसरं म्हणजे चालणं हे लोकांना भेटण्याचं, त्यांच्याशी संवाद साधण्याचं उत्तम माध्यम आहे. 

त्या दरम्यानच मला जाणवत गेलं किंवा मी ते अनुभवलं की आपल्या मनाची, बुध्दीची पर्यायाने मेंदूची मर्यादा आपल्या कल्पनेपेक्षा ही खूप जास्त आहे. 

आपल्याकडे भारतात चालण्याची / पदयात्रेची एक मोठी परंपराच आहे-  अनेक साधू संत,  भगवान बुद्ध, तीर्थनकर, गांधीजी अशी कित्येक उदाहरण आहेत. 

 

प्रश्न ३. तुम्ही अनेक देशाविदेशांमध्ये पदयात्रा केली आहेत. या प्रवासात तुम्हाला कसे अनुभव आले त्याविषयी थोडक्यात सांगाल का?

महाराष्ट्र फिरून झाल्यानंतर पहिलाच विदेश म्हणजे थायलंड. तिथपर्यंत विमानाने गेलो. पुढे थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन असा प्रवास सायकलने केला. थायलंडमध्ये 'पीस फाऊंडेशन'शी ओळख झाली. व्हिएतनामहून चीनला जाताना सीमेवर मी रॉ एजंट असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यांनी माझे सगळे साहित्य तपासल्यावर सोडून दिलं. 

प्रवासात मला एक चिनी आई भेटली, तिच्यासोबत बुद्धविहारात राहिलो. तिने माझी खूप काळजी घेतली, पुढच्या प्रवासातही तिने मला मदत केली. तिने तिच्या भावा- बहिणीशी संपर्क करून मला त्यांच्याकडे पाठवलं. ती आई, चिनी आई, माझ्या अजूनही संपर्कात आहे. एका चिनी सायकलपटूने तर पुढच्या प्रवासासाठी सायकल भेट दिली. 

पुढे विमानाने दक्षिण कोरियाला आलो. तिथे चीनच्या समुद्रावर जेजू नावाचं बेट आहे. भविष्यात तेथे युद्ध होऊ नये  म्हणून सत्याग्रह करताहेत. त्यांच्यासोबत १५ दिवस होतो.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानींमुळे असुरक्षित वाटले पण भारतीय म्हणून प्रेम मिळाले. तिथे कुणाला भेटलात 

तर प्रेमाने वागा असं म्हणतात. काय माहिती परत तुम्ही त्याला भेटाल की नाही. इतकी असुरक्षितता तालिबानींमुळे आहे. तेथे पैसे एक्सचेंज करताना मला काउंटरवर फाटक्या नोटा मिळाल्या. त्याबद्दल मी त्याला विचारले. तेव्हा तो अफगाणी नागरिक म्lहणाला की, अफगाणिस्तानची परिस्थिती या फाटक्या नोटांपेक्षा वेगळी नाहीये.

देशाबाहेर गेल्यावर भारतातील दोन व्यक्तींची ओळख नकळतपणे आपल्यासोबत असते ती म्हणजे तथागत बुद्ध आणि महात्मा गांधी. 

आजही बऱ्याच तरुणांना वाटते की गांधीजींनी देशासाठी काय केलं. पण ४६ देश फिरल्यानंतर याचे उत्तर मी  देऊ शकतो. संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत गांधीजींचा फोटो सतत असे. या फोटोमध्ये इतकी ताकत आहे की त्या परकीय लोकांनाही मी पहिल्यांदा भेटत असूनही हा चांगलाच माणूस असणार हा विश्वास वाटत असे. अनेक ठिकाणी भाषा समजत नसतानाही केवळ गांधीजींचा फोटो पाहून लोक मदत करायला तयार होत असत. 

जपानमधील तीन महिन्यांचा प्रवास माझ्यासाठी वेगळा होता. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये फिरलो. महायुद्धच्या दाहकतेमुळे त्यांना शांततेचं महत्व सगळ्यात जास्त समजले आहे. तेथील स्थानिकांनी मला खूप मदत केली. तेथील बौद्ध भिक्खू संघाने माझ्या एक महिन्याच्या पदयात्रेचा खर्च उचलला, ही माझ्याबरोबरच तेथील लोकांच्या दृष्टीनेही खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्यामुळे मला अनेक शाळा, विद्यापीठे, संस्था व इतर ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. 

 

प्रश्न ४. अशा प्रवासाला तुम्ही काही वर्षांपूर्वी सुरुवात केलीत. मग आतापर्यंत या काही वर्षात तुम्हाला तुमच्यात काही बदल झालेले

 जाणवतात का? कसे? 

वैयक्तिक पातळीवर तर मला ह्या शांतीयात्रेने नेहेमीच आंतरिक समाधान मिळते, मनोबल वाढत जाते, कक्षा रुंदातात त्यातूनच पुढील यात्रेसाठी प्रेरणा मिळत जाते. 

पण त्याच बरोबर गेल्या काही वर्षांत मी वेगवेगळ्या खंडातील, देशांतील लोक जोडत गेलोय. अनेक लोकांना, विशेषतः  कॉलेज मधील मुलांना गांधीजींचे अहिंसा, संपूर्ण शाकाहार, चालण्याचं महत्त्व समजावून देऊ शकलो. कितीतरी जणांना ते पटलं त्यांनी ते अंगिकारल किंवा त्यांना असा काही वेगळा विचार / मार्ग असू शकतो हे नव्याने कळले. 

लोकांचे प्रेम मिळत गेले की अजून यात्रा करायला आणखीनच बळ मिळत जातं. 

त्यामुळ देश, सीमा, प्रांत वगैरे काही नसतं माणूस इथून तिथून एकच आहे. आपण सगळेच वैश्विक नागरीक आहोत या हा विचार पक्का होत गेला. 

 

प्रश्न ५. तुम्हाला स्थानिक लोकांकडून, संस्थांकडून कोणत्या सहकार्याची अपेक्षा आहे? 

कोणाला छोटेखानी / खाजगी कार्यक्रम आखता आले किंवा  इकडच्या शाळा, कॉलेजेस्, विद्यापीठे त ह्यामध्ये काही कार्यक्रम करायला मिळाले, विद्यार्थ्यांशी, तरुणांशी बोलायला मिळाले, तर नक्की आवडेल.  तसेच जर कुणाला माझ्याबरोबर एखाद दिवस किंवा काही तास पदयात्रेत सामील व्हायचे असेल तर त्या सगळ्यांचेच स्वागत आहे. 

मी माझ्या फेसबुक पानावर आणि Instagram वर माझे रोजची खुशाली टाकत असतोच. 

***

 नितीन सोनावणे यांचा प्रवास सुरू झालाय ऊन पाऊस थंडी वादळ या सगळ्यावर मात करत ते पुढे मजल दरमजल करत आहेत. या काही दिवसातील त्यांचा प्रवास बघितला तरी आपल्या लक्षात येतं की ते इतकी वेगवेगळी माणसे जोडत चाललेत. 

जात, धर्म, देश, वंश, भाषा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसातला माणूस शोधत, त्याच्यातील माणुसकीला साद घालत, शांततेचा संदेश घेऊन निघालेला हा एक अवलिया.

त्यांना तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्युब वर फॉलो करू शकता. संपर्क करू शकता. 

https://www.facebook.com/nitin.sonawane.338?mibextid=ZbWKwL

https://www.instagram.com/slowman_nitin?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=ZDNlZDc0MzIxNw==

https://youtube.com/@slowmannitin?si=9X04zGy5n0Vd-sfG

 

 

 

Node read time
5 minutes
5 minutes