Skip to main content

शॉडेनफ्रॉयडा (Schadenfreude) : परदुःख शीतल

आपल्या जवळपास कुठेही एखादी छोटी-मोठी दुःखद घटना घडलेली कळल्यास आपल्यातील बहुतेक जणांना विषाद वाटतो. अगदीच जवळचे मित्र, नातेवाईक, परिचित असल्यास दुःखही वाटत असेल. अपघातात वा नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असल्यास थोडी फार हळहळ वाटेल. (परंतु शत्रु म्हणून आपण अगोदरच ठरविलेले असल्यास चार शिवी देत उत्सव साजरा करण्यासही आपण मागे पुढे पाहणार नाही.) त्या घटनेत ज्यांच्यावर दुःख कोसळले असेल त्यांच्याबद्दल सहानुभूती, करुणा, दया वाटणे स्वाभाविक असते. परंतु अगदी खोल मनात जाहीरपणे उच्चारता न येणारे कुठेतरी समाधानही वाटत असते, हे नाकारण्यात अर्थ नाही. कारण ते दुःख वा कुणाचे तरी नैराश्य, वा दुसऱ्याला झालेला वा होत असलेला त्रास, कुणावर तरी कोसळलेले संकट, आपल्यावर कोसळले नाही, याचे एक छुपे मानसिक समाधान त्यात असते. यात मुद्दाम दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद घेणाऱ्या सेडिस्टची वा कुणाच्याही सुख-दुःखाशी देणे-घेणे नाही अशा मनोरुग्ण (सायकोपाथ) असलेल्यांची गणना केली नाही. परंतु इतरांच्या संकटात समाधान वा (काही वेळा) आनंद मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. असे एकाच वेळी होत असलेल्या सुख-दुःखाच्या भावनेला इंग्रजीत शॉडेनफ्रॉयडा असे म्हटले जाते.

मुळात हा शब्द इंग्रजीत नव्हता. जर्मनमधील शॉडेन म्हणजे दुःख वा त्रास आणि फ्रॉयडा म्हणजे आनंद. हे दोन्ही शब्द जोडून शॉडेनफ्रॉयडा हा शब्द इंग्रजीत रूढ झाला असावा. दुसऱ्यांच्या संकटाचा आनंद घेणारा या अर्थाने हा शब्द वापरला जात असावा. १८व्या शतकात यासाठी इंग्रजीत ‘epicaricacy’ हा शब्द होता. तरीही शॉडेनफ्रॉयडालाच इंग्रजांची पसंती होती.
शॉडेनफ्रॉयडा हा भावना सुचविणारा शब्द पाश्चिमात्य व आधुनिक काळातला आहे. चीनच्या मँडरिन भाषेत इ.स.पू चौथ्या शतकात ‘xing zai le huo’ हा शब्द असून तो आजही वापरला जातो. इ.स.पू. ५०-४०मधील लुक्रेटियस या ग्रीक तत्वज्ञाच्या De Rerum Natura या निसर्गावरील काव्य संग्रहात समुद्राच्या प्रक्षुब्ध वादळ वाऱ्यात हेलकावणाऱ्या होडीत धडपडणाऱ्यांच्याकडे सुरक्षित अशा किनाऱ्यावरून पाहतानाची मजा और असते. या अर्थाच्या ओळी सापडतात.

दुसऱ्यांना त्रास झाल्याबद्दल आपल्या मनात आनंदाचे फवारे उडतात यात काहीतरी अप्रतिष्ठित, लाजिरवाणे, निंदनीय आहे असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु आपल्याला हवे म्हणून काम, क्रोध, मत्सर, हेवा उत्स्फूर्तता इत्यादी भावना सहजासहजी जात नाहीत. कदाचित जैविक उत्क्रांतीच्या वेळच्या जीवघेण्या अस्तित्वाच्या लढाईत शॉडेनफ्रॉयडाची गरज भासली असेल. कारण अस्तित्वाच्या लढाईत कोण वरचढ ठरतो याला महत्व असते. गंमत अशी आहे की ही स्पर्धा सापेक्ष व त्यावेळेपुरते असते. या स्पर्धेत कोण वरचढ ठरतो वा कोण समोरच्यापेक्षा उजवा ठरतो याला महत्व असते. यात फक्त तुम्हीच धडधाकट असून चालत नाही तर तुमचा प्रतिस्पर्धी कमकुवत असण्याची गरज असते. ही जनुकीय स्पर्धाच शॉडेनफ्रॉयडाला उत्तेजन दिले असेल. हा फक्त मनुष्यप्राण्यात आढळणारा जनुकीय स्वभावविशेष आहे. प्रतिस्पर्ध्याला शत्रू मानून त्याचा सर्वनाश व्हावा ही इच्छा फक्त माणसातच असू शकते. एखादा ससा केळीच्या सालीवरून घसरून पडल्यानंतर समोरचा ससा आनंदाने उड्या मारत असल्याची उदाहरणं शोधूनसुद्धा सापडणार नाहीत.

या संबंधात आपल्याच देशाचे उदाहरण घेता येईल. जे मोदीभक्त नाहीत त्यांनी जेलमध्ये सडून उर्वरित आयुष्य काढावे, अशी मोदी भक्तांची (एकमेव!) इच्छा असू शकते. जे मोदीचे विरोधक आहेत त्यांना या माणसाला सत्तेच्या खुर्चीवरून खाली ओढावे, अशी इच्छा असते. खरे पाहता यात वैयक्तिकरित्या सामान्य जनतेला काही देणे घेणे नसते. मोदी गेले काय वा राहिले काय त्यांना कुठलाही फायदा वा तोटा नसतो. मात्र शॉडेनफ्रॉयडा हे कुठेतरी मनात दडलेले असल्यामुळे अशा इच्छेतून मानसिक समाधान मिळत असावे. त्यासाठी आपण सर्व मोदींच्या व त्यांच्या विरोधकांच्या बातम्या ऐकण्याची सवय लावून घेतो. अमेरिकेतील ट्रंपच्या बाबतीतही अमेरिकेत असेच घडत असते. रशियात पुतिनच्या बाबतीतही तेच!

ही आंतरिक इच्छा फार तीव्र असू शकते. या सत्ताधाऱ्यांनी आपल्या ध्येय-धोरणामुळे, वक्तव्यामुळे, वर्तणुकीमुळे, कृतीमुळे जनसामान्यात अस्वस्थता निर्माण करत आहेत. व ते फार वेदनादायक असते. या अस्वस्थतेचा वा वेदनेचा बदला म्हणूनच याविषयी सामाजिक, कायदेशीर वा जैविक न्याय मिळायलाच हवे असे वाटू लागते.

काही तज्ञांच्या मते शॉडेनफ्रॉयडा व स्वतःविषयीच्या कल्पना या व्यस्त प्रमाणात असतात. ज्या व्यक्ती यशाच्या वरच्या पायरीवर आहेत त्यांना खालच्या पायरीतील व्यक्तींच्या यशापयशाविषयी काही देणे घेणे नसते. त्यामुळे या पायरीवरील लोकांच्या यशाबद्दल त्यांना असूयाही नसते वा त्यांच्या अपयशाबद्दल सहानुभूतीही नसते. कारण ही वरची मंडळी सत्तेच्या खुर्चीच्या जवळ असल्यामुळे त्यांचे कुणीही वाकडे करू शकत नाही, अशी त्यांची स्वतःबद्दलची कल्पना असते. परंतु जे वंचित आहेत वा आयुष्यात अपयशी ठरलेले आहेत ते मात्र इतर यशस्वी होत असल्यास मत्सर करू लागतात व अपयशी ठरल्यास आनंदित होतात.

शॉडेनफ्रॉयडाला न्यायाचा एक आयाम आहे. दुष्टांना शिक्षा झाल्यास शॉडेनफ्रॉयडा-बाधितांना भरपूर आनंद होतो. त्यांची चांगलीच जिरली ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. कुठलाही गल्लाभरू चित्रपटाचा शेवट नेहमीच दुष्ट शक्तींना त्याच्या दुष्कृत्याबद्दल जबरदस्त शिक्षा (कदाचित न्यायालयाकडून वा समाजाकडून) व सुष्ट शक्तींचा विजय असे समीकरण ठरलेले असते. बहुतेक वेळा हा अनुभव सार्वत्रिक असतो. चित्रपटातील नायक हा नेहमीच सुस्वभावी, खरे बोलणारा, सोज्वळ, बहुतेकांच्या उपयोगी पडणारा अगदी जंटलमन असतो. त्या तुलनेने खलनायक सर्व दुर्गुणांचा पुतळा असतो. त्यामुळे शेवटी जेव्हा नायकांचा विजय होतो तेव्हा प्रेक्षकांना न्याय मिळाल्याचा आनंद मिळतो व पिटातल्या शिट्यातून तो आनंद व्यक्त होतो.

जगभरातील पुराणकथा व मिथ्यकथा याच गोष्टीवर भर देतात. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पवित्र-अपवित्र इत्यादी संकल्पनाशिवाय कुठलीही कथा रंगत नाही. दुसऱ्या शतकातील चर्चच्या टेर्टुल्लियन या प्रीस्टच्या मते चांगल्या क्रिश्चियनांच्यासाठी येशू क्रिस्त स्वर्गात वाट पहात असतो व वाईट क्रिश्चियनांना कायमचे त्रास भोगायला लावतो. (त्याच्या मते वाईट क्रिश्चियनांमध्ये टेर्टुल्लियनशी असहमती दर्शविणारेसुद्धा असतील!) आपल्या येथील रामायण, महाभारतसारख्या महाकाव्यात याच गोष्टीवर भर देण्यात आला आहे. १२व्या शतकातील Vision of Tundale या पुस्तकातील संपूर्ण मजकूर क्लेशदायक गोष्टी कसे असतात याच्या वर्णनानी भरलेले आहे. आपल्या येथेसुद्धा रौरव नरकाची वर्णनेसुद्धा याच प्रकारचे आहेत. प्रसिद्ध कवी डांटे याचे the Inferno काव्यसंग्रहातील शॉडेनफ्रॉयडाच्या विविध प्रकारच्या (नरकातील नऊ वर्तुळ याबद्दलच्या) कवितांना मिळालेली लोकप्रियता त्याच्याच Purgatorio पुस्तकाला वा १८व्या शतकातील मिल्टनच्या पॅराडाइज लॉस्ट वा पॅराडाइज रीगेनड या कवितासंग्रहांनासुद्धा मिळाली नाही.

तसे पाहता शॉडेनफ्रॉयडाला कधीच चांगली प्रसिद्धी मिळाली नाही. बायबलमध्येसुद्धा शत्रुचा बीमोड झाल्यास वा घसरून पडल्यास आनंद मानू नका. कारण परमेश्वर त्यामुळे नाराज होतो व त्याच्यापासून दूर जातो. असा इशारा दिला आहे. अर्थर शॉप्पेनहॉर हा तत्वज्ञ अगदी निराशावादी असे समजत असला तरी तोसुद्धा शॉडेनफ्रॉयडा हा एक माणुसकीला काळिमा फासणारी भावना आहे. दुसऱ्याबद्दल मत्सर वाटण्याची शॉडेनफ्रॉयडा ही भावना अत्यंत क्रूरपणाची आहे, असे मत व्यक्त करतो.

काही वेळ हे बाजूला ठेवले तरी न्युरोलॉजिकली याची चाचणी घेता येते, हेही लक्षात आले. न्यूयार्कच्या यांकी व बोस्टन रेड सॉक्स या बेसबॉलच्या पिढ्यान पिढ्या स्पर्धक असलेल्या दोन गटांच्या कट्टर चाहत्यांची यासंबंधीची fMRIवरून २०११साली चाचणी घेतली. यात त्यांच्या आवडीची टीम जिंकू लागल्यास त्याच्या चाहत्यांच्या मेंदूतील आनंद दर्शविणारा भाग उजाळत होता. अजून एका २००६च्या fMRI चाचणीत विरुद्ध टीमवर त्यांची आवडती टीम चाल करून हरवण्याच्या पावित्र्यात असल्यास चाहत्यांच्या मेंदूमधील काही भाग सकारात्मकरित्या कार्य करू लागतो. याच चाचणीत महिलांच्यापेक्षा पुरुष जास्त उद्रेकयुक्त होतात हेही लक्षात आले.

कुठल्याही विनोदी चित्रपटांचा वा नाटकांचा शॉडेनफॉयडा पाठीचा कणा असतो. या भावनेचा उद्रेक न केल्यास विनोद निर्मिती होऊ शकत नाही असेच सर्व संबंधितांना वाटत असावे. चार्ली चॅप्लिनचा कुठलाही चित्रपट घेतले तरी याची प्रचीती येते. प्रेक्षक त्याच्या धडपडीला इतके का हसतात? कुणाच्या तरी चेहऱ्यावर केक आपटल्यास इतके हसू का फुटते? मोडक्या खुर्चीवर बसायसा गेल्यास मोठा आवाज होऊन बसणारा धडपडत खाली पडल्यास प्रेक्षक एवढे आनंदित का होतात? (खरे पाहता यात कुणालाही इजा झालेली नसते) The Three Stooges वा लॉरेल हार्डी सारख्या चित्रपटामधील शॉडेनफ्रायडाला वजा केल्यास ते चित्रपट निर्जीव भासतील.

अंत्यसंस्कार हे केवळ मृतांच्या नातेवाइकांच्या दुःखात सहभागी होण्याचे, सहवेदना दाखविण्याचे व मृताप्रती आपले आदर व्यक्त करण्याचे प्रसंग एवढेच नसतात. हे प्रसंग अनेक वेळा इतरांच्यासाठी रिलीफ वाल्वसारखे काम करतात. अगदीच खरे बोलण्याचे ठरविल्यास सहभागी होणाऱ्यांच्या खोल मनात आनंदित झालेलेही दिसेल. त्या मृताऐवजी मी तिरडीवर आडवा झालो नाही ही भावना सुखकारक वाटत असेल. मृताच्यावर जो प्रसंग गुदरला आहे तो प्रसंग माझ्यावर गुदरला नाही याचे एक आंतरिक समाधान त्यात असते. हॅराल्ड कुश्नर या अमेरिकेतील ज्यू धर्मगुरुच्या Bad Things Happen to Good People (1981)या पुस्तकात शॉडेनफ्रॉयडाच्या भावनेमुळे इतरावर कोसळलेले संकट माझ्यावर कोसळले नाही याचे एक समाधान मिळते, असा उल्लेख आहे. आपण आपल्या मित्रांचे वाईट कधीच चिंतित नाही. परंतु एखादा मित्र संकटात असल्यास आपल्याला तसले काहीही झाले नाही याचे एक लाजिरवाणे समाधान मनात रेंगाळत असते.

जर शॉडेनफ्रॉयडाच्या विरोधातील भावना असल्यास काय होऊ शकेल याचाही विचार करता येईल. ती भावना तितकीच वाईट असेल का? या विरोधी भावनेला ‘फ्रॉयडेनशॉडा’ असे म्हणता येईल. यात दुसऱ्याच्या सुखात आपलेही सुख शोधणे असेल. पाली व संस्कृत भाषेत याला मुदिता असे म्हटले जाते. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातील करुणा दया याच्याही पलिकडे जाणारी मुदिता ही भावना असते. शॉडेनफ्रॉयडाला डोके खाली व पाय वर अशा अवस्थेला नेणारी ही भावना आहे. निस्वार्थ भावनेने दुसऱ्याच्या सुखात आपणही सुखी होणे यात अपेक्षित असते. आपली मुलं मोठी होऊन समृद्ध जीवन जगत असल्याचे पाहून पालकांच्यात निर्माण होणारी अशी ही भावना असते. मुलांच्या सुखात पालक सुख बघतात. ज्यूंच्या यिडिश भाषेतील nachas हा शब्दसुद्धा हेच सुचवतो.

शॉडेनफ्रॉयडाच्या या इतिहासाकडे नजर टाकल्यास ही एक नैसर्गिक भावना असून ती तिरस्करणीय नाही असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु जे काही नैसर्गिक आहे ते सगळे स्वीकारार्ह आहे असे म्हणता येणार नाही. उत्क्रांतीच्या वाटचालीतील आदीमानवासारखा कुठेही शौच न करता प्रगत माणूस शौचालयाचा वापर करण्याचे शिकतो. परंतु रस्त्यावरील कुत्रा हवे तेथे (अजूनही) शौच करतो व ते नैसर्गिक आहे असे आपण म्हणतो. माणसाला मात्र शौचालयाची सवय लावून घेण्यासाठी काही काळ लागतो. त्यामुळे जे नैसर्गिक आहे ते सगळेच योग्य वा चांगले आहे असे म्हणता येणार नाही. म्हणूनच ‘Know thyself’ हे महत्वाचे ठरेल.

त्यामुळे शॉडेन फ्रॉयडेनच्याविषयी आपल्याला वेगळा विचार करण्याची गरज आहे.

सई केसकर Tue, 01/04/2025 - 15:09

>>या विरोधी भावनेला ‘फ्रॉयडेनशॉडा’ असे म्हणता येईल
तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे जर फ्रॉइडं म्हणजे आनंद असेल तर हा शब्द फ्रॉईडनफ्रॉइडं असा नाही का होणार?

ही भावना नक्कीच चांगली 'होलसम' वगैरे नाही. पण नावडत्या माणसाची जिरल्यावर मला मनापासून आनंद होतो. तो लपवण्याची मॅच्युरिटी अजूनही मला साध्य करता आलेली नाही. उलट मी असं म्हणेन की आपल्याला एखाद्याचा मत्सर वाटतो हे स्वतःशी मान्य केल्यानं त्या मत्सराचा आपल्या मनःस्थितीवर होणारा विपरीत परिणाम कमी होतो.

प्रभाकर नानावटी Tue, 01/04/2025 - 15:48

अगदी बरोबर. ‘फ्रॉयडेनशॉडा’ मध्ये दुसऱ्याच्या सुखात आपल्याला दुःख होते. परंतु फ्रॉईडनफ्रॉइडंमध्ये दुसऱ्च्या सुखात आपल्यालाही सुख मिळते. हा शब्द मुदिताच्या जवळपासचा आहे. Thanks!

'न'वी बाजू Wed, 02/04/2025 - 17:30

In reply to by प्रभाकर नानावटी

पु.लं.चे ‘फेरम फॉस’ (नि त्याचेच ‘फॉसम फेर’, ‘फेसम फेस’, ‘फेमस फेस’ वगैरे पाठभेद) आठवले. (संदर्भ: ‘माझी पाठ धरते’; संग्रह: ‘नस्ती उठाठेव’.)

'न'वी बाजू Wed, 02/04/2025 - 17:21

In reply to by anant_yaatree

आपल्या जवळपास कुठेही एखादी छोटी-मोठी दुःखद घटना घडलेली कळल्यास आपल्यातील बहुतेक जणांना विशा वाटते.

संस्कृत/मराठी शब्द विषा असा आहे, आणि तो पुल्लिंगी आहे. (विशाद वाटते नव्हे; विषाद वाटतो.)

परंतु, जौद्याहो! नानावटींचा लेख आहे; या गोष्टी चालायच्याच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. (वरचे ‘प्रभाकर नानावटी’ असे नाव वाचून आम्ही आख्ख्या लेखाकडेच दुर्लक्ष करतो, तो भाग वेगळा. चालायचेच.)