Skip to main content

‘डाइंग फॉर सेक्स’: कॅन्सर, सेक्स आणि बरंच काही...

‘डाइंग फॉर सेक्स’: कॅन्सर, सेक्स आणि बरंच काही... तेही हसवणारं!

Dying For Sex

नाव ऐकून वाटेल, बापरे! काय असेल हे? पण थांबा मंडळी, 'डाइंग फॉर सेक्स' हे नाव जितकं बोल्ड आहे, तितकीच ही सीरीज मनाला भिडणारी आणि हसवणारी आहे (पण बोल्डही आहे). ही एका पॉडकास्टवर आधारित मालिका आहे. आणि सत्य घटनेवर आधारित. मॉली नावाच्या एका चाळिशीतल्या बाईची ही गोष्ट आहे. मालिकेच्या पहिल्याच भागात नायिकेला कळतं की तिचा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला आहे आणि ती फार तर पाच वर्षं जगेल. आता तुम्ही म्हणाल, कॅन्सर, मृत्यू वगैरे म्हणजे एकदम depressing असणार. पण इथेच ही सीरीज बाजी मारते. मॉलीचं पुढे काय होणार आहे, हे तुम्हाला सुरुवातीलाच माहीत असतं तरीही तिची ही कहाणी खिळवून ठेवते आणि गुदगुल्या करते.

मॉलीचा नवरा खूप सालस आहे, गोड आहे, तिची कसून काळजी घेणारा आहे, पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मॉलीला त्याची काळजी नकोय. तिला काहीतरी वेगळं हवंय. तिच्या लक्षात येतं की कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीबरोबर सेक्स करताना आपण क्लायमॅक्स कधी गाठलेलाच नाही आणि आता त्या दिशेनी प्रवास करायची अखेरची संधी आहे, कारण आपल्यापाशी वेळच नाही. इतर पुरुषही (उदा. डॉक्टर) तिला समजून घेण्यात कमी पडतात, पण इथेच तिची मैत्रीण निक्की आणि तिची पॅलिएटिव्ह कन्सल्टंट सोन्या कामाला येतात. या दोघी जणी मॉलीला आता जे हवंय ते देतात - म्हणजे क्लायमॅक्स नाही, पण तो मिळवण्यासाठी साथ, पुरेसा क्रेझीपणा आणि 'डाइंग फॉर सेक्स'च्या प्रवासात पूर्ण सपोर्ट!

सीरीजमध्ये इतरही स्त्रिया आहेत, त्यात मुख्यतः मॉलीची आई आणि हॉस्पिसमधली एक बाई आहे, त्यांनी आयुष्य पाहिलंय, त्यांचे अनुभव वेगळे आहेत. त्या वेगळ्या पद्धतीने विचार करतात. आणि मॉलीबरोबर त्या हे मिश्रण धमालही आहे.

मॉली या सगळ्या प्रवासात प्रेम अर्थातच शोधत नाहीये. ती स्वतःला म्हणते, “पाच वर्षांत तर मी मरणारच आहे. मग काय फरक पडतोय?” मृत्यू समोर असताना प्रेम शोधण्याऐवजी, ती फक्त तिला जे हवंय ते शोधते. ती डेटिंग ॲप्सपासून सुरुवात करते आणि सीरीज जसजशी पुढे जाते तसतसे वेगवेगळे पुरुष तिला भेटत राहतात. हळूहळू लक्षात येऊ लागतं की हा फक्त सेक्ससाठीचा शोध नाही. पण तो कसला आहे ते प्रत्यक्ष पाहा.

आणि हो, नावाप्रमाणेच या सीरीजमध्ये भरपूर ‘सेक्स’ आहे, आणि तोही जरा हटके, म्हणजे अगदी ‘किंकी’. टीव्हीवर सहसा अशा गोष्टी दाखवल्या जात नाहीत (कॉक केज, हे केवळ एक उदाहरण पुरेसं ठरावं. चारचौघांसमोर गूगल करू नका बरं), पण या सीरीजमध्ये त्या इतक्या सहज आणि विनोदी पद्धतीने दाखवल्या आहेत की त्यात गंमतच येते. थोडक्यात, सासूबाई किंवा मुलं समोर असताना पाहू नका. #nsfw प्रत्येक भाग फक्त तीस मिनिटांचा आहे (आणि आठच भाग आहेत) पण प्रत्येक भागात मॉलीचा प्रवास इतकी अनपेक्षित वळणं घेतो की त्याबद्दल आणखी काही सांगणं म्हणजे बघण्यातली मजा काढून घेणं.

थोडक्यात काय, 'डाइंग फॉर सेक्स' ही सीरीज तुम्हाला खदाखदा हसवेल, कधी कधी थोडं भावूकही करेल, पण ती depressing अजिबात नाही. आयुष्य कसं जगावं, खास करून जेव्हा ते कमी उरलंय, हे मॉली आपल्याला तिच्या हटके स्टाईलमध्ये शिकवते. मॉलीच्या भूमिकेत मिशेल विलियम्स धमाल करते. इतर लोकही आपापलं काम मस्त करतात, विशेषतः निक्की, आणि आईच्या भूमिकेतली सिसी स्पेसेक ही विख्यात अभिनेत्री. तर नक्की बघा! भारतात ती जिओ हॉटस्टारवर आहे. अमेरिकेत बहुधा हुलूवर.

मूळ पॉडकास्ट

ट्रेलर

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 13/05/2025 - 06:33

हुलूवर दिसत्ये मालिका. पुढच्या आठवड्यात वेळ होईल मालिका बघायला.

मात्र बरा अर्धा नसताना मालिका बघावी लागणार. मला आवडणाऱ्या वाह्यात किंवा चांगल्या मालिका त्याला आवडत नाहीत.

मारवा Tue, 13/05/2025 - 10:54

वरील मालिका रोचक दिसतेय नक्कीच बघणार
तसेच जनतेस विनंती आहे की netflix वरील आपण पाहिलेली चांगली मालिका सुचवा. (मेरे पास सिर्फ netflix है)