Skip to main content

चुकलो का मी?

दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?

वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?

वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, रेखीव वाट विसरलो
चुकलो का मी?

विस्मरणाची गडद सावली
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
चुकलो का मी?