सांगली साताऱ्यातला शेरलॉक
सांगली साताऱ्यातला शेरलॉक
हे एक चांगलं डिटेक्टिव्ह पुस्तक फारसं नोटीस झालं नाहीय बहुतेक.
आपल्या सगळ्यांच्याच कलेक्टिव्ह अनुत्साहाचं थोडं क्षालन करण्यासाठी ही जुजबी ओळख:
अगदीच अनोळखी लेखकांचं पुस्तक मीही उचलत नाही शक्यतो.
पण ह्याची प्रस्तावना चाळतानाच, "एक वाचक म्हणून मला हे लांबण प्रस्तावना आवडत नाहीत सो कीपिंग इट शॉर्ट"
किंवा तत्सम अर्थाचं लेखकाचं वाक्य वाचलं आणि ह्या लेखकाशी आपली नाळ जुळू शकेल असं वाटलं...
अदमास चुकला नाही आणि मजा आली.
लेखक त्यानेच सांगितल्याप्रमाणे शेरलॉकचा (आणि 'सुशी'चा सुद्धा ) प्रचंड फॅन आहे.
आणि तो प्रभाव फार चांगल्या मार्गाने ह्या छोटेखानी पुस्तकात सुरस झिरपलाय.
त्याचा मानसपुत्र डिटेक्टिव्ह अल्फा (ह्या नावामागची कथा पुस्तकातच कळेल) ची ही पहिली ओरिजिन्स नॉव्हेला.
अगदीच मेनस्ट्रीम झालेली मुंबई - पुणे शहरं सोडून निवडलेला सांगली-साताऱ्याचा सेटअप मला फार आवडला.
शेरलू अण्णांसारखेच पण आपल्या मातीतले निरीक्षण - निष्कर्षाचे मनोहारी माग अल्फा त्याचा मित्र प्रभवच्या साथीने काढत जातो.
शैली थोडी अधिक रंजक आणि वेल्हाळ कदाचित करता आली असती पण आहे तेही छानच.
ऑर्थर कॉनन डॉयलचीही शैली मला अशीच वाटते.
तोही फार काही इमोशन्स किंवा कथाबाह्य अदाकारीच्या (उदाहरणार्थ स्टीफन राजा किंग ) फंदात पडत नाही.
आणि शेरलू अण्णांच्या ऍडव्हेंचर्सच्या खुमारीत त्यामुळे फार काही फरक पडत नाहीच.
मीही ह्या सिरीज मधील बाकी ऍडव्हेंचर्स वाचणारे.
तुम्ही वाचल्या नसतील तर जरूर वाचा.
ता. क.
मी थोडं नेटवर सर्च केलं आणि ही सिरीज थोडीफार लोकप्रियता बाळगून आहे.
तसं असल्यास छानच. लोकप्रियता अजून वाढो.
लेखकाला आणि क्राईम-थ्रिलर जॉनरला खुप प्रेम आणि शुभेच्छा !!!
थोडक्यात…
…हा ‘मालेगाव के शोले’-छापातला प्रकार समजावा काय?
(अतिअवांतर: तो (वरिजनल) ‘शेरलॉक होम्स’-प्रकारसुद्धा मला ग्रोसली ओव्हररेटेड-ओव्हरहैप्ड वाटतो. आणि, तो वॅट्सन, एखादे दिवशी वैतागून उठून त्या शेरलॉक होम्सच्या सणसणीत कानाखाली वाजवून कायमचा चालता कसा काय होत नाही, हे मला आजतागायत न उकललेले गूढ आहे. (इतकेही कसे *डू असावे माणसाने?) असो चालायचेच.)
कदम बोले तो…
…ते टिब्बन-बबन-वाले काय?
त्यांचे तेवढे एकच पुस्तक (काही वर्षांपूर्वी पुण्यास गेलेलो असताना, का, कोण जाणे, परंतु, कधी नव्हे ती दुर्बुद्धी होऊन (बहुधा कुतूहल म्हणून), खिशातले पैसे खर्च करून विकत घेऊन) वाचले होते. (‘बिनधास्त’ की कायसेसे.)
आहाहा! काय ती कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी! त्यानंतर पुन्हा या लेखकाच्या वाटेस जाण्याचे धाडस झाले नाही. (तुमच्या सांगलीचे झाले, म्हणून काय झाले? तुमच्या सांगलीविषयी माझ्या मनात कोठलीही दुर्भावना नाही — एकदोनदा धावत्या भेटीस गेलेलोही आहे तिथे; बरे गाव वाटले एकंदरीत! — परंतु तरीही… असो चालायचेच.)
(आता कथेचे तपशील विसरलो. दोनतीन वर्षे झाली असतील वाचल्याला. पुस्तक बहुधा अजूनही माझ्या संग्रही पडून असेल; धूळ झटकावी लागेल. परंतु, it struck me as utterly ridiculous then, इतके प्रकर्षाने आठवते.)
(भारतीय लेखकांपैकी त्यानंतर इतके ridiculous लिहिणारा केवळ चेतन भगत झाला असावा — आणि तोही मराठीत नव्हे, इंग्रजीत!)
(असो. माझ्याही (दोनतीन वर्षे) जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल आभार.)
भवाळकर आहेत ना
तारा भवाळकर आहेत ना आमच्या सांगलीच्या. मग अजून काय पाहिजे?
तथापि तुम्ही म्हणत आहते ते कदम नक्की कोणते ते समजले नाही. मीही उपरोल्लिखित कदम यांची फार काही पुस्तके वाचली नाहीत पण ते हेमन कर्णिक टाईपचे रहस्यकथाकार होते. बाकी तुम्ही ते प्रसिद्ध साहित्यिक बाबा कदम म्हणत नाही आहात ना? ते सांगलीचे आहेत असे वाटत नाही. लहानपणी भाग्यश्री साठे (ग्रँडमास्टर), बाळ पळसुले व चिंतामणी पोतदार (बहुधा दादा कोंडके यांचे गीतकार) हे सांगलीचे लोक प्रसिद्ध होते.
नीलडीटेक्टिव अल्फा आणि…
नील
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
तुम्ही हे पुस्तक म्हणताहात का?
तस असेल तर हे पुस्तक फुक्कट वाचा.
नसेल तरी हे पुस्तक वाचा. हा घ्या दुवा.
https://bookstruck.app/book/724/37693
ह्या लेखकाच्या सर्व रहस्यकथा तुम्ही इथे वाचू शकता.
https://www.bookstruck.app/book/3045/index.html
लिंक एडीट केजी आहे.