Skip to main content

बखरीच्या पानाआड

बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर

प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून

जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी

बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
मला भुलवी गारूड

मारवा Sun, 27/07/2025 - 20:36

एक निरीक्षण
तुमच्या कवितेचे ढोबळमानाने दोन प्रकारात विभाजन करता येईल.
एक अनंततेच्या संदर्भातील कविता ज्यात भव्य अशा वैश्विक कल्पनांचा संकल्पनांचा समावेश असतो.
दुसऱ्या मानवी कविता म्हणजे ज्यात अनंत ब्रह्मांड किंवा किंवा कविता तिची सृजनशक्ती आदी विषय नसून मानवी विषय असतात ज्यात वरील कविता पण येते (नअनंत कविता)
मला तुमच्या दोन्ही प्रकारातील कविता आवडतात पण जेव्हा तुम्ही दुसरा प्रकार घेतात तो नेहमीचं अधिक आनंद देतो.
आता एक अती अवांतर पण जी ए कुलकर्णींच्या उत्तरकालीन जी ए च्च्या. विदूषक इस्किलर पेक्षा त्यांच्या पूर्वकालीन जी ए च्या काकणे बळी इत्यादी मनाला अधिक भिडतात