पार्लेमेनिया

"राष्ट्रगीताचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे," अनंत सांगत होता.
"हो बाबा," शौर्य म्हणाला, "मी नीट उभा राहीन. मस्ती करणार नाही."
अनंतनं लेकाला टाटा केलं, आणि घड्याळाकडे कटाक्ष टाकला. प्रीती त्याला पिकअप करणार होती त्याला अजून थोडा वेळ होता. अनंतनं फेसबुक चाळायला सुरूवात केली, इतक्यात पार्ले इंटरनॅशनल स्कूलच्या पीए सिस्टीमवरून राष्ट्रगीताचे धीरगंभीर सूर ऐकू आले. अनंत अटेन्शनमधे उभा राहून गाऊ लागला,
"Mer Hayreniḱ, azat ankakh,
जे युगानुयुगे जपले आहे.
Yur vordiḱə ard kanchum en
स्वतंत्र, सार्वभौम आर्मेनियाला."

राष्ट्रगीत संपलं तेवढ्यात प्रीती शाळेजवळ पोहोचली. अनंत कारमधे बसला, आणि पाचेक मिनिटांतच कार कस्टम्स चेकपोस्टला पोहोचली. प्रीती आणि अनंतनं आपापली नॅशनल आयडी कार्ड स्कॅन केली आणि स्क्रीनवर अंगठे ठेऊन बायोमेट्रिक चाचणी पूर्ण केली. गाडी चेकपोस्टमधून निघाली, आणि डॅशबोर्डवरच्या मॅपकडे पाहत प्रीती म्हणाली, "तुझ्या ऑफिसला वीस मिनिटांत पोचू. नंतर मला अजून पाच मिनिटं लागतील."
अनंत हसला. "आज काही घाई नाही. उद्या पंधरा ऑगस्ट. भारताचा स्वातंत्र्यदिन. आपले बरेचसे भारतीय कलीग लाँग वीकेंडसाठी आज रजा घेऊन गेलेत."
प्रीतीनं सुस्कारा सोडला. "शौर्यला स्वातंत्र्यदिनाचा काय प्रोजेक्ट आहे ते लवकर कळलं तर बरं होईल."
"२१ सप्टेंबर – पाच आठवडे आहेत गं अजून!"
अनंतला त्याच्या ऑफिसकडे ड्राॅप करून प्रीती पुढे निघाली. ट्रॅफिक फारसा नव्हता, आणि ती काही वर्षांपूर्वीच्या आठवणींना मनातच उजाळा देऊ लागली.
—
लग्नाच्या रिसेप्शनसाठी प्रीती तयार होत होती. हा दिवस फक्त तिचा होता – आणि कधीचा तयार होऊन मेसेजेस करणाऱ्या अनंतचा. आरशात पुन्हा एक नजर टाकून प्रीती खोलीबाहेर आली. अनंतच्या हातात हात गुंफून ती स्टेजकडे जाऊ लागली, पण बऱ्याचशा उपस्थितांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. ते पाहत होते आपापल्या मोबाईलकडे.
इतक्यात स्टेजजवळचा मोठा पडदा झळकला, आणि त्यावर पंतप्रधानांची छबी अवतरली. ते सांगत होते,
"भारत आणि आर्मेनिया यांचे मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आर्मेनियामधली शंभर चौरस किलोमीटरचा भाग एकशेनव्याण्णव वर्षांसाठी लीजवर भारताला मिळणार आहे. यामुळे केवळ आर्मेनियाशीच नव्हे, तर काॅकेशस, पश्चिम आशिया आणि पूर्व युरोपमधल्या देशांसोबत भारताचे संबंध दृढ होतील. याबदल्यात, आर्मेनियाला हिंदी महासागरात व्यापार करणे सोपे जावे यासाठी, मुंबईतील विलेपार्ले हे उपनगर आर्मेनियाला एकशेनव्याण्णव वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे."
हलकल्लोळ माजला नसला तरी मोठमोठ्यानं चर्चांना आणि वादांना सुरुवात झाली. त्या चर्चांच्या पार्श्वसंगीतावरच प्रीती आणि अनंतचा विवाहसोहळा संपन्न झाला. पुढचे बरेच महिने विलेपार्ल्यात सर्वत्रच असे वाद-चर्चा झडत होते. पण दिल्लीत निर्णय घेतला गेला होता, आणि तो बदलणे आता शक्य नव्हते. यथावकाश कागदपत्रं तयार झाली, आणि विलेपार्ले आर्मेनियाचा भाग झालं.
आता विलेपार्लेच का, याचं मुख्य कारण म्हणजे एअरपोर्टजवळचं स्थान. एअरपोर्टचा भाग आर्मेनियाला दिला जाणार नव्हताच. विलेपार्ल्याचे पूर्व आणि पश्चिम असे भाग करणारी रेल्वे लाईनही भारताच्या अखत्यारीतच राहिली. रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी किंवा आर्मेनिया-भारत यांतील हद्द ओलांडण्यासाठी, स्वयंचलित कस्टम्स चेकपोस्टवर नॅशनल आयडी कार्ड स्कॅन करणं बंधनकारक केलं गेलं.
सुरुवातीला अशक्यप्राय भासलेली सर्व प्रक्रिया पंतप्रधानांच्या भाषणानंतर दीडेक वर्षांतच पूर्ण झाली. २१ सप्टेंबरला, आर्मेनियाच्या स्वातंत्र्यदिनी हस्तांतरणाचा सोहळा पार पाडण्यात आला, आणि विलेपार्ल्यात आर्मेनियाच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. (त्यापूर्वी, १५ ऑगस्टला आर्मेनियातील शंभर चौरस किलोमीटर भागाचे हस्तांतरण भारताला करण्यात आले होते, आणि त्या प्रदेशाच्या राजधानीवर भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकू लागला होता.)
विलेपार्लेकरांना दोन पर्याय होते – भारतीय नागरिकत्व ठेवून आर्मेनियाचा दीर्घ मुदतीचा व्हिसा घेणं, किंवा सरळ आर्मेनियन नागरिकत्वाचा स्वीकार करणं. आर्मेनिया हा युरेशियन इकॉनॉमिक युनियनचा भाग असल्यानं आर्मेनियन नागरिकांना रशिया आणि इतर काही देशांत व्हिसाशिवाय जाऊन राहणे आणि काम करणे शक्य होते. पुढेमागे आर्मेनिया हा युरोपियन युनियनचा भाग झाल्यास आर्मेनियन नागरिकांना जर्मनी, इटली, फ्रान्स वगैरे देशांत जाऊन राहणे शक्य झाले असते. या कारणांमुळे अनंत-प्रीतीसारख्या अनेक तरुणांनी आर्मेनियन नागरिकत्व स्वीकारलं.
तसं पाहिलं तर, गेल्या दोनतीन पिढ्यांपासून विलेपार्ल्यातल्या बऱ्याच जणांची सख्खी-चुलत-मावसभावंडं अमेरिकेत आणि इतर देशांत स्थायिक झाली होती, आणि त्यामुळे परदेशाचं नागरिकत्व स्वीकारणं ही काही अप्रूपाची बाब राहिली नव्हती. पण त्या प्रक्रियेला वेळ लागत असे. आधी वर्क व्हिसा, पुढे ग्रीन कार्ड, आणि यथावकाश नागरिकत्व अशा दीर्घ प्रवासाऐवजी, इच्छुक पार्लेकरांना आर्मेनियाचं नागरिकत्व अवघ्या सहा महिन्यांत मिळालं होतं. आणि तेही घरबसल्या!
या अचानक बदलाचा लोकांनी स्वीकार करावा यासाठी सरकारनं समुपदेशन केंद्रं सुरू केली होती. याशिवाय टीव्ही आर्मेनियानं आपल्या ओटीटी चॅनेलवर आणि सोशल मीडियावर मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीत आर्मेनियाबद्दल माहिती देणारे रोचक कार्यक्रम सुरू केले होते. त्याचबरोबर, आर्मेनियन भाषा हा शाळांत आणि कॉलेजात अनिवार्य विषय झाला. आर्मेनियन भाषेचे वर्ग संध्याकाळी व शनिवार-रविवारीही आयोजित केले जाऊ लागले.
कॉकेशसमधील काही आर्मेनियन नागरिक विलेपार्ल्यात येऊन राहू लागले. यांत प्रामुख्यानं सरकारी कर्मचारी, आणि वित्तसंस्था आणि मीडियाचे पदाधिकारी होते; पण काही तरुण मंडळीही विलेपार्ल्यातील नामवंत कॉलेजांमध्ये शिकायला आणि समुद्रकिनाऱ्याची हवा चाखायला इथे आली होती. कॉकेशियन आर्मेनियन आणि विलेपार्लेकर आर्मेनियन यांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यात या पायोनियर्सचा मोठा वाटा होता.
कोणीतरी निर्माण केलेला, विलेपार्ले + आर्मेनिया या अर्थाचा पार्लेमेनिया हा शब्द व्हायरल होऊन रोजच्या बोलण्यात रूढ झाला. मूळच्या कॉकेशसमधील आर्मेनियाला लोक आर्मेनियाच म्हणत.
भारतीय नागरिकत्व ठेवून आर्मेनियाचा दीर्घ मुदतीचा व्हिसा घेणाऱ्या पार्लेमेनियाकरांनाही कॉकेशियन आर्मेनियन जनतेबद्दल काही आक्षेप नव्हते. त्यांतील काहींचा आक्षेप होता तो आपली मुळं विसरून आर्मेनियन नागरिकत्व घेणाऱ्या अनंत आणि प्रीतीसारख्या पार्लेमेनियाकरांबद्दल!
अनंतच्या शेजारचे जोग काका-काकू हे अशांपैकीच एक होते. पार्लेमेनियाच्या स्थापनेला आठेक वर्षं होऊन गेल्यानंतरही ते भारतीय नागरिक होते. बँकांचे व्यवहार, इन्शुरन्स, पोस्ट यांसाठीच नव्हे तर रोजच्या किराणामालाच्या खरेदीसाठीसुद्धा ते संध्याकाळी अंधेरी किंवा सांताक्रूझला जात असत.
अनंत लहानपणापासून जोग काका-काकूंचा लाडका होता. त्याच्या लग्नानंतर प्रीतीदेखील त्या निवासी संकुलात चांगली रुळली होती. पण अनंत-प्रीतीनं आर्मेनियन नागरिकत्व घेतल्यावर मात्र जोग काका-काकूंच्या वागण्यात काहीशी अढी आली होती. ते शौर्यचे लाड करत, पण त्याला भेटवस्तू देतानाही अट्टाहासानं भारताच्या इतिहासाबद्दल पुस्तकं, गेम्स, वगैरे देत.
जोगकाकांनी एकदोनदा अनंतशी नागरिकत्वाबद्दल बोलायचाही प्रत्यत्न केला होता, पण अनंतनं त्यांचं बोलणं हसण्यावारी उडवलं होतं.
जोगकाकूदेखील प्रीतीशी बोलल्या होत्या. "अहो काकू, आम्ही एवढा विचार नाही करत हो. आपलं आयुष्य नीट चालू असलं की झालं. आता तुमची अनघा ऑस्ट्रेलियात सेटल झालीच ना? तिचा नवराही तिथलाच आहे. मग इथे कसली अडचण आहे?" प्रीतीनं थेट बोलून विषय संपवला होता.
एका संध्याकाळी जोग काका-काकू गच्चीतल्या बाकावर वारा खात बसले होते. अनंत आणि शौर्य पतंग उडवण्यासाठी गच्चीत आले. जोगकाकाम्हणाले, "पतंग सांभाळून उडव रे! नाहीतर काटाकाटी होऊन सांताक्रूझमध्ये पोचायचा." अनंत हसून म्हणाला, "तसं झालं तर सांताक्रूझवाल्यांची चंगळ होईल. आमच्यासारखे पतंग सहज मिळत नाहीत तिथे!" काकांचा चेहरा पडला, पण ते काही बोलले नाहीत.
एवढ्यात जोगकाकूंचं लक्ष शौर्यच्या पायाकडे गेलं. "काय रे बाळा, पायाला काय लागलं?" त्यांनी विचारलं.
"वर्गातल्या एका मुलानी पाडलं. एकदम अझ्झू आहे तो," शौर्यनं उत्तर दिलं.
"म्हणजे? हे कुठलं नाव?" जोगकाकूंनी विचारलं.
"त्याचं नाव आशिष बर्वे. ॲक्चुअली अझ्झू नाहीये, पण तसाच वागतो. अहो तो उगाच मारामाऱ्या करतो. टीचरचं ऐकत नाही. एकदम वेडा मुलगा आहे. एकदम अझ्झू! आईनी सांगितलंय मला, अशा मुलांशी बोलायचं नाही म्हणून!"
जोगकाकूंचा भाचा पेट्रोकेमिकल इंजिनीअर होता आणि अझरबैजानची राजधानी बाकू इथे काम करत होता. त्यांना शौर्यचं बोलणं बिलकुल आवडलं नाही. लहान मुलाशी वाद नको म्हणून त्या गप्प बसल्या, पण त्यांच्या डोक्यात विचार आलाच – आईवडिलांनी मुलावर बरे संस्कार करायला हवेत!
२१ सप्टेंबरची संध्याकाळ होती. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत चाललं होतं. शौर्यनं शाळेत "स्वातंत्र्य" या विषयावर केलेल्या प्रोजेक्टला दुसरं पारितोषिक मिळालं होतं, त्यामुळे प्रीती अधिकच खूष होती. रेडिओ येरेव्हानवरच्या टीव्ही चॅनेलवरची गाणी ऐकत ती स्वैपाकाची तयारी करत होती. आज जोग काका-काकूंनाही तिनं जेवायला बोलावलं होतं. जोगकाकाआणि अनंत हॉलमध्ये जॉर्जियन वाईन पीत बसले होते, आणि काकू शौर्यचं प्रोजेक्ट जरा नाखुषीनंच बघत होत्या.
इतक्यात टीव्हीवरचं गाणं अचानक थांबलं. गंभीर आवाजात अनाउन्समेंट सुरु झाली. किचन टॉवेलला हात पुसून प्रीती हॉलमध्ये आली, तोवर आर्मेनियन भाषेतील अनाउन्समेंट संपून इंग्रजीत अनाउन्समेंट सुरू झाली होती. "पूर्वेकडील सरहद्दीवर शत्रूसैन्याची जमवाजमव मोठ्या प्रमाणात होत आहे. शत्रूला प्रत्युत्तर देण्यास आर्मेनियन सैन्य समर्थ आहेच, पण शत्रू हा पाठीत खंजीर खुपसणारा हलकट देश आहे. या कसोटीच्या क्षणी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. गरज लागल्यास सैन्यभरती अनिवार्य करण्यात येईल."
अनंतनं वाईनचा ग्लास टेबलवर ठेवला, आणि तो ताडकन उठून उभा राहिला. तो क्षुब्ध होऊन येरझारा घालू लागला, आणि एकदम म्हणाला, "मी सैन्यात भरती होणार. ताबडतोब!"
"अरे पण तुझा परिवार इथे पार्ल्यात..." जोगकाका एवढं बोलले इतक्यात अनंत त्यांचं म्हणणं तोडत म्हणाला, "तुम्हाला कळत नाही का? देशाला माझी गरज आहे. पण तुम्हाला कसं कळणार म्हणा? ज्या देशात राहता, ज्या देशाचं अन्न खाता, त्या देशाचं नागरिकत्वही तुम्ही घेतलं नाही. आज सोसायटीत ध्वजवंदनालाही दिसला नाहीत तुम्ही दोघं!"
"अनंत, शांत हो!" प्रीती म्हणाली. अनंताचा चढलेला आवाज ऐकून जोगकाकूदेखील बाहेर आल्या होत्या, आणि चकित होऊन अनंतकडे बघत होत्या.
जोगकाका उठून उभे राहिले. "नव्हतो आलो तुमच्या ध्वजवंदनाला! आणि येणारही नाही. हे पार्लं आमचं आहे, कळलं? कोणी कागदाच्या चिठोऱ्यांवर सह्या केल्या म्हणून संस्कृती बदलत नाही, समजलास? चल गं, घरी जाऊ. या पार्लेमेनियाक लोकांकडे अजून एक क्षणभरही थांबणार नाही मी!"
जोग काका-काकू निघून गेले. अनंत अजूनच रागावला होता. "साले अँटीनॅशनल. समजतात काय स्वतःला? जेलमध्ये टाकलं पाहिजे एकेकाला!"
"तू आधी शांत हो! शौर्य घाबरलाय," प्रीती कळवळून म्हणाली.
अनंत गप्प बसला, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यानं सैन्यात भरती होण्याचा अर्ज भरला. युद्ध पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं. भारतीय व आर्मेनियन पंतप्रधानांची खलबतं झाली, आणि पार्लेमेनिया आणि कॉकेशियन भारत यांत स्थायिक असलेल्या नागरिकांना पुढची तीन वर्षं भारतीय किंवा आर्मेनियन सैन्यात घेतले जाणार नाही असा निर्णय जाहीर करण्यात आला.
अनंतनं शौर्यला मित्राकडे स्लीपओव्हरला पाठवले, आणि रात्री उशीरापर्यंत व्हिस्की पीत त्यानं भारतीय आणि आर्मेनियन सरकारला शिव्यांची लाखोली घातली. प्रीतीनं त्याला शांत करायचा फारसा प्रयत्न केला नाही. खरं तर नवरा सैन्यात जाणार नाही याचा तिला प्रचंड आनंद झाला होता, पण हे बोलून दाखवू नये हे समजण्याएवढी सुज्ञ ती निश्चितच होती.
आर्मेनियाच्या पूर्व सीमेवरचं वातावरण काही आठवडे तप्त होतं. रशियाच्या मध्यस्थीनं तोडगा काढला गेला, आणि युद्धाचे ढग विरले. या काळात पार्लेमेनियामध्ये निरनिराळ्या चर्चा झडत होत्या, येरेव्हानच्या समर्थनार्थ मोर्चे निघत होते, या मोर्च्यांना विरोध करणारे लोक आपलं म्हणणं हिरीरीनं मांडत होते, आणि आर्मेनियाचं गुप्त पोलीस दल या साऱ्यांची नोंद घेत होते. तिथे कॉकेशियन भारतातही अशाच घडामोडी चालू होत्या.
पुन्हा भारत आणि आर्मेनियाच्या सरकारांच्या चर्चांची आवर्तनं झाली, आणि त्यातून एका महत्त्वाच्या निर्णयाची निष्पत्ती झाली. पार्लेमेनियामध्ये राहण्याचा मूलभूत अधिकार फक्त आर्मेनियन नागरिकांना आहे असं प्रतिपादन करण्यात आलं. भारतीय व इतर नागरिकांना येथे राहायचे असल्यास व्हिसा लागेल, आणि टुरिस्ट व्हिसाशिवाय इतर व्हिसा केवळ विशेष कौशल्याच्या व्यक्तींना देण्यात येईल असे धोरण जाहीर झालं. विलेपार्ल्यात घरं वा इतर संपत्ती असलेल्या पण व्हिसा नाकारल्या गेलेल्या भारतीय नागरिकांना त्यांची घरे आर्मेनियन सरकारला बाजारभावानं विकण्याचा पर्याय दिला गेला. (अर्थातच, असंच धोरण कॉकेशियन भारतातही लागू करण्यात आलं.)
जोग काका-काकूंना विलेपार्ले सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला फ्लॅट आर्मेनियन सरकारला विकला, आणि ते पुण्यात शिफ्ट झाले. जाण्यापूर्वी त्यांनी सोसायटीतील इतरांचा निरोप घेतला, पण अनंत आणि प्रीती यांना भेटायचं कटाक्षानं टाळलं. पूर्ण आयुष्य जगले ते पार्ले वयाच्या पंचाहत्तरीत सोडून जाताना जोग काका-काकूंचे डोळे पाणावले होते. टॅक्सी कस्टम्स चेकपोस्ट पार करून सांताक्रूझमध्ये पोचली तेव्हा काका म्हणाले, "आपल्याला आवराआवर करायला वेळ मिळाला. घराचा मोबदला बाजारभावानं मिळाला. पण तरीही आपण निर्वासित झालो. आता वाटतं, सीरियातल्या आणि म्यानमारमधल्या निर्वासितांबद्दल थोडा सहानुभूतीनं विचार करायला हवा होता."
जोग काका-काकूंचा फ्लॅट आर्मेनियन सरकारनं विकत घेतला, आणि येरेव्हानमधून बदली होऊन नुकत्याच विलेपार्ल्यात आलेल्या एका बड्या सनदी अधिकाऱ्याला दिला. अनंतनं एडवर्ड कास्परयानशी ओळख करून घेतली, आणि त्याला एक-दोनदा घरी जेवायलाही बोलावलं.
न्यू इयर इव्हला, नववर्षाचं स्वागत आणि नवीन घरात मित्रांचं स्वागत अशा दुहेरी हेतूनं एडवर्डनं घरी पार्टी आयोजित केली होती. त्याचे सहकारी, मित्र, विलेपार्ल्यातील काही प्रतिष्ठित व्यक्ती असे पंधरा-एक जण पार्टीला उपस्थित होते. सोसायटीतल्या फक्त अनंत आणि प्रीतीला आमंत्रण होतं.
उंची व्हिस्कीचे आणि वाईनचे चषक पुन्हापुन्हा भरले जात होते. पार्टीला रंग चढत होता तसं बरंचसं संभाषण आर्मेनियनमध्ये होऊ लागलं. अनंत आणि प्रीतीला तसं आर्मेनियनमध्ये बोलता येत असलं तरी बरेचसे संदर्भ कळत नव्हते.
पार्टी पहाटेपर्यंत चालू होती. पाहुणे आपापल्या घरी जाऊ लागले तेव्हा अनंत आणि प्रीती एडवर्डला मदत करण्यासाठी थांबले. एडवर्ड म्हणाला, "अनंत, यू आर अ ट्रू आर्मेनियन! ऑर आत लिस्ट यू आर ट्रायिंग टू बिकम वन. आय कान्ट से दॅट फॉर मेनी पार्लेमेनियाक्स. दे स्टिल हॅव डिव्हायडेड लॉयल्टीज."
अनंतला काय बोलावं कळेना. उरलेलं सॅलड फ्रिजमध्ये ठेवायच्या निमित्तानं तो किचनमध्ये गेला, आणि नंतर लवकरच एडवर्डचा निरोप घेऊन घरी गेला.
शौर्य गाढ झोपला होता. प्रीतीनं झोपेत कूस बदलली आणि तीही पुन्हा झोपली. अनंत मात्र पंख्याकडे बघत बराच वेळ जागाच होता.
?
लोकसंख्येचे आदानप्रदान करण्याचा प्रश्न उभा रहिला नाही??????
काका-काकू पार्ल्यातले घर विकून पुण्याला राहायला गेले, ते काय होते मग?
(‘लोकसंख्येचे आदानप्रदान अहिंसेच्या मार्गाने झाले’, इतकेच म्हणता येईल, फार फार तर.)
(अवांतर: पार्ल्याहून पुण्याला स्थलांतर काका-काकू मंडळी तशी तर खूप पूर्वीपासून करत आलीत. (परांजप्यांनी गबर पैसा बनवला, त्यांच्या जिवावर.) फक्त, तेव्हा त्याला ‘लोकसंख्येचे आदानप्रदान’ म्हणत नसत, इतकेच. चालायचेच. काळ बदलतो, झाले.)
मला एक समजत नाही..,
…की, मुंबईत मराठी माणसाच्या हक्कांच्या नावाने बोंबाबोंब करणारे किमान दोन पक्ष असताना, मुंबईतला एक भाग — आणि, त्यातही, विलेपार्ले (पूर्व)-सारखा मराठमोळा भाग — दुसऱ्या देशाला देऊन टाकण्याची हिंमत केंद्रसरकारने केलीच कशी?
ते काही नाही. फ्रॉम द रेल्वे लाइन टू द एअरपोर्ट, विलेपार्ले (पूर्व) विल बी मुंबई!
बाकी, काहीही कारण नसताना राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱ्यांचेच सरकार केंद्रात आहे, म्हटल्यावर, मुंबईचा एखादा तुकडा केंद्रसरकारने दुसऱ्या एखाद्या देशाला देऊन जरी टाकला (आणि, आर्मेनियालाच कशाला, अगदी पाकिस्तानला जरी देऊन टाकला), तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही नसावेच, म्हणा! (शिवाय, मोदी है, तो (साला कुछ भी) मुमकिन है-इच, त्यामुळे..,)
असो चालायचेच.
ऑपरेशन सिंदूर…
बाकी, मुंबईचा भाग आर्मेनियाला देऊन टाकण्याची प्रेरणा केंद्रसरकारला कोठून झाली असावी, याचे मूळ ऑपरेशन सिंदूरमध्ये आढळते. कसे झाले, की त्या हाणामारीत अजरबैजानने पाकिस्तानची बाजू घेतली, म्हटल्यावर चिडून जाऊन आमच्या देशभक्त भारतीय (स्वस्त) टूरिष्टांनी अजरबैजानवर बहिष्कार टाकला. (अन्यथा, त्यापूर्वी भारतीय टूरिष्टांकरिता बाकूसारखे स्वस्त आणि मस्त डेस्टिनेशन दुसरे नसावे. (इस्तंबूल होते म्हणा, परंतु तुर्कियेनेसुद्धा ऐन वेळी पाकिस्तानला मदत करून गोची केली.) तर ते एक असो.)
तर सांगण्याचा मतलब, भारतीय टूरिष्टांच्या (यात पार्ल्यातले भरपूर असावेत.) देशभक्तिपर अजरबैजान-बहिष्कारातून केंद्रसरकारला कल्पना सुचली असावी. लोकांच्या (पुन्हा: यात पार्लेकरसुद्धा मोठ्या प्रमाणात आले.) देशभक्तीच्या लाटेवर स्वार होऊन, ‘माझ्या शत्रूच्या मित्राचा शत्रू तो माझा मित्र’ या तत्त्वास अनुसरून, आर्मेनियास प्रोमोट करण्याचे त्यांनी ठरविले असावे. (‘दक्षऽ-आरमऽ’मधील ‘आरमऽ’ हे मुळात आर्मेनियावाचक आहे, अशी ‘आतल्या गोटा’तली फुसकुलीवजा सुचवण या ठरावास होणाऱ्या क्षीण अंतर्गत विरोधास डावलण्यास कामी आली असावी.)
आणि, एकदा आर्मेनियास प्रोमोट करायचेच, म्हटल्यावर… ‘भले तरी देऊ गांडीची लंगोटी’ असे तुकोबा म्हणून गेलेलेच आहेत. देऊन टाकलानीत् पार्ल्याचा एक तुकडा, नि काय!
मोदी है, तो (साला कुछ भी)…
असो चालायचेच.
मला नाव पाहून वाटलं पार्ले…
मला नाव पाहून वाटलं पार्ले बिस्किटांची आवड यावर लेख आहे. पु.लंना ती आवडायची नाहीत असं लिहून ठेवल्यानी. ती म्हणे चहात बुडवून खाताना चहात काडेपेटी बुडवून एक वेळ खाईन पण पार्ले बिस्किटे नाही असा पणही केला त्यांनी आणि पुण्याला शिफ्ट झाले. तिथून मग कोलकात्याला बोंगाली शिकायला गेले. ( बहुतेक मासे खाण्यासाठी गेले असतील.)
तर ते एक असो. कथानक एकदम पुढील पाच दहा वर्षांत( ५०ही असेल)काय होईल हे भाकित धरून सरकत आहे. सांस्कृतीकच नव्हे तर भूभागाची अदलाबदल कल्पना आणि परिणामांवर बेतली आहे. जियो आणि झोहोसुद्धा.
पार्ले नाही पण धारावी
धारावी इथली शेकडो एकर जमीन एका महान उद्योजकला देण्यात आली असून तिथे राहणार्या अनेक लोकाना आता धारावी सोडून जावी लागणार आहे असे ऐकण्यात आले आहे. धारावीचे नागरिकत्व मिळवायचे असेल तर कमीत कमी ५-१० कोटी तरी लागतील असे आतल्या गोटातून समजते.
* कथा आवडली हे आवर्जून नोंदवतो.
कथा आवडली
विचारप्रवण करणारी कथा. थोडी अजून पुढे गेली असती तर...
(तरी बरं,आर्मेनियन भारत आणि भारतीय आर्मेनिया यांच्यात लोकसंख्येचे आदानप्रदान करण्याचा प्रश्न उभा रहिला नाही.
नाहीतर...
असो!)