Skip to main content

लवचिकता आणि स्वास्थ्य

2 minutes

लवचिकता आणि स्वास्थ्य
================

-राजीव उपाध्ये

माझे विद्वान मित्र डॉ० जगन्नाथ दीक्षित (एम०डी०, वय ८५) आणि मी यांच्यात एक समान धागा म्ह० आम्ही दोघेही दीर्घायुष्याची रहस्ये आधुनिक संशोधनाच्या मदतीने शोधण्यात गुंतलेले आहोत. मिळालेली माहिती नवे ज्ञान एकमेकांमध्ये वाटायचे आणि शक्य तेव्हढे आपल्या आणि आपल्या आप्तेष्टांच्या कल्याणासाठी उपयोगात आणायचे हे आम्हाला आवडते. त्यांनी मला सांगितलेले दीर्घायुष्याचे एक महत्त्वाचे रहस्य म्हणजे "लवचिकता" - शरीर जेव्हढे लवचिक तेव्हढे आयुष्य आरोग्यपूर्ण आणि दीर्घ आणि अर्थपूर्ण.

खरं तर, ’लवचिकता’ शरीराची असो वा मनाची किंवा विचारांची - ती यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हे मला तरी आता, उशीरा का होईना, पूर्ण पटलेले आहे. आम्ही दोघांनी लिहीलेल्या प्राणायामावरील पुस्तकाच्या निमित्ताने माझा हृदयगतीच्या लवचिकतेचा (हृगल) परिचय झाला. या लवचिकतेचे स्वास्थ्य रक्षणातील महत्त्व पटल्यानंतर मी या संदर्भातील संशोधनात जगभर काय चालू आहे, हे जाणून घेण्याकरता खोल मुसंडी मारली आणि अनेक मौलिक रत्ने हाती लागली. दुर्दैवाची गोष्ट अशी मुख्य प्रवाहातले वैद्यकशास्त्र अजुनही याकडे कानाडॊळा करते.

स्वायत्त नाडी संस्था

मेंदूकडुन शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूचे संदेश शरीराला पोचविण्यासाठी आणि शरीराच्या अवस्थांचे मेंदूला ज्ञान होण्यासाठी एका संदेशवहन यंत्रणेची गरज असते. ही यंत्रणा ’स्वायत्त नाडीसंस्था’ (autonomus nervous system) रुपाने शरीरात निसर्गाने निर्माण केली आहे.

स्वायत्त नाडीसंस्था प्रामुख्याने दोन घटकांनी बनलेली असते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर तिच्या दोन शाखा असतात—अनुकंपी (सिंपथेटिक) आणि परानुकंपी (पॅरासिंपथेटिक). अनुकंपी प्रणाली शरीराला दैनंदिन संघर्षासाठी सज्ज करते—धावणे, लढणे किंवा तणावाला प्रतिसाद देणे यासाठी. त्यामुळे हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो आणि शरीरात ऊर्जा तत्काळ उपलब्ध होते. दुसरीकडे परानुकंपी प्रणाली शरीराला विश्रांती, पुनर्बांधणी आणि संतुलनाकडे घेऊन जाते. या अवस्थेत हृदयाची गती कमी होते, पचन चालू होते आणि शरीर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करते. स्वायत्त नाडीच्या शाखा अगदी हाडांमध्ये पण पोचलेल्या असतात. तणावग्रस्त व्यक्तींची हाडे लवकर ठिसूळ होतात.

स्वास्थ्य रक्षणात स्वायत्त नाडीसंस्थेच्या दोन्ही शाखांचे संतुलन महत्त्वाचे असते. आधुनिक जीवन धकाधकीमुळे, ताणामुळे व्यापून राहीले आहे. त्यामुळे अनुकंपी नाड्या अतिक्रियाशील बनतात आणि अनारोग्याला आमंत्रण देतात. यामुळे दीर्घकालीन आजार (हृदयरोग, दाह, मधुमेह इ.) येण्याची शक्यता वाढते. अपुर्‍या विश्रांतीमुळे परानुकंपी नाडीसंस्थेचे कार्य बिघडेले असते. त्यामुळे शरीराच्या पुनर्बांधणीमध्ये व्यत्यय निर्माण होतो.

अनुकंपी नाड्याना संमातर पण विरुद्ध कार्यकरणारी आणखी एक नाडी शरीरभर पसरलेली असते - ती म्हणजे परानुकंपी नाडी संस्था! या नाडीसंस्थेतील मुख्य नाडी - चर नाडी - द्विदिशात्मक कार्य करते. चर नाडीला इंग्रजीत व्हेगस नर्व्ह अशी संज्ञा आहे. चर नाडी उद्दीपित झाल्यावर मुख्यत: स्वास्थ्य रक्षणाचे काम करते. चर नाडी सक्रिय झाल्यावर ॲसिटीलकोलीन हे रसायन स्रवू लागते. हा स्राव इतका ताकदवान आणि महत्त्वाचा आहे की याचे स्वास्थ्यरक्षणातील महत्त्व ९९% लोकांना ठाऊकच नसते.

क्रमश:...

Node read time
2 minutes

तर्कतीर्थ Tue, 17/03/2026 - 16:37

In reply to by अबापट

श्री० बापट

डॉ० दीक्षित एक दूर्मीळ कॅटेगरीमधले अस्सल विद्वान आहेत. बाकी जगातल्या असंख्य विद्वानांबद्दल असे म्हणता येईलच याची खात्री नाही. बरेचसे उंटावरून शेळ्या हाकतात.

डॉ० दीक्षितांनी माझ्यातले गुण ओळखले, ** आमचे एका विषयावर कडाक्याचे भांडण होऊनही आपणहून माझ्याशी ओळख वाढविली, मी त्यांचा सहलेखक होईन का? असे विचारले** आणि माझ्या प्रयत्नांना दिशा दिली. आम्ही आतापर्यंत एकदाही भेटलेलो नाही, पण आमचा लेखन प्रकल्प "एकमेकांवरचा विश्वास" या भांडवलावर यशस्वी झाला. त्यांनी मला भरभरून दिले आणि अजुनही देत आहेत. अजुन ही माझ्या लिखाणावर १ली प्रतिक्रिया डॉ० दीक्षितांचीच असते.

माझ्या ’मित्र’ म्हणवणार्‍या हितशत्रूंनी माझ्या भोवती वणवा पेटवला तेव्हा डॉ० दीक्षित लांब असूनही माझ्या पाठीशी उभे राहिले. विषारी लोकांना खड्यासारखे बाजूला कसे काढायचे, हे त्यांनी शिकवले. आजकाल समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते, यावर तिचे माझ्या आयुष्यातले महत्त्व ठरते. जे काही आयुष्य उरले आहे, ते मला शांततेत आणि आनंदात घालवायचे आहे.

तात्पर्य - प्रत्येक विद्वान आपल्या प्रकृतीला मानवेलच असे नसते.

अबापट Tue, 17/03/2026 - 17:01

In reply to by तर्कतीर्थ

हे मान्य.

या डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्याविषयी आणि यांच्या कार्याविषयी थोडी माहिती सांगाल काय ?
गुगल केल्यावर डाएटवाले जगन्नाथ दीक्षित यांच्याच लिंक्स येत आहेत.

सई केसकर Tue, 17/03/2026 - 13:41

तणावमुक्त जगण्यासाठी आधी मोदी, ट्रम्प आणि बीबी यांनी स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करायला हवी. तरच आमच्या अनुकंपी आणि परानुकंपी व्यवस्थांमध्ये समतोल राहील.

anant_yaatree Tue, 17/03/2026 - 14:30

कधी करतील (किंवा कधी करतील का?) हे खात्रीपूर्वक समजण्यासाठी त्या महामानवांचे "नाडीशास्त्रा"च्या सहाय्याने ताडपत्रांवरील भविष्य बघितले पाहिजे.