आय.आय.टी. मद्रास : चार वर्षांचा प्रवास
माझ्या मुलाला २०२२ साली Computer Science and Engineering B. Tech कोर्स साठी IITMला प्रवेश मिळाला आणि एक पालक म्हणून माझा ह्या संस्थेशी संबंध आला. वेळोवेळी मुलाबरोबर मारलेल्या गप्पा, कॅम्पसला दोन-तीन वेळेला दिलेल्या भेटी ह्यातून हे विश्व मला कसे दिसले, हे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे.

२०२२च्या batchला कॅम्पसला यायला ऑक्टोबर महिन्याचा शेवट उजाडला. आईबाबांबरोबर आलेली मुलं. एकाच वेळेला आपले स्वप्न पूर्ण झाले, IITमध्ये आलो, त्याचा आनंद. पण नजरेत कुठेतरी भांबावलेपण, थोडी बावचळलेली देहबोली. रूम पार्टनर कोण मिळेल याची काळजी. हॉस्टेल ॲडमिशन, सायकल खरेदी ह्यात संपूर्ण दिवस गेलेला असतो. आता घरचे आजूबाजूच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला जाणार असतात. विद्यार्थी / विद्यार्थिनी त्यांच्या हॉस्टेलमध्ये. मुलांची हॉस्टेलमधली पहिलीच रात्र. डोळ्यात पाणी आले तरी ते लपवण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो. काही लागले तर फोन कर, आम्ही बाजूलाच आहोत असे पालकांनी सांगितलेले असते. कितीही वाटले तरी फ़ोन केला जात नाही. खिन्न मनस्थितीत कधीतरी डोळा लागतो. मधेच जाग येते तेव्हा बाजूच्या कॉटवर असाच कोणीतरी छताकडे उदास नजर लावून पडलेला असतो. Hi hello होते, थोड्या गप्पा होतात, दोघेही रूममेट थोडे रिलॅक्स होतात आणि तिथेच हॉस्टेल लाइफला रुळायला सुरुवात झालेली असते.
सकाळी कॅम्पसची वॉकिंग टूर organize केलेली असते. IIT Madras गिंडी नॅशनल पार्कच्या जमिनीवर असल्यामुळे कॅम्पस म्हणजे raw जंगल आहे. आपल्या रस्त्यावर कुत्रे दिसावेत तशी हरणे बागडत असतात. (आश्चर्य म्हणजे IIT Madras मध्ये अजिबात कुत्रे नाहीत). रात्रीच्या नैराश्याचा आता मागमूस नसतो. ओरिएंटेशन सेशन उत्साहाने अटेंड केले जाते, प्रत्येक प्रोफेसर अभिमानाने आम्ही NIRF-1 आहोत, स्पोर्टसमध्ये overall championship बरेचदा आम्ही जिंकतो असे सांगत असतात. उत्साहाच्या त्या दणक्यात मेसमधले जेवणही चांगले लागते. आई वडील निघून जातात, क्लासेसना सुरुवात होते. पहिल्याच आठवड्यात गजेंद्र सर्कलचा तिसरा तुटलेला हत्ती कोठे आहे, एरोवेल कुठे आहे अशा सगळ्या सीक्रेट गोष्टी सगळ्या फ्रेशर्सना कळतात. मराठी मित्रमंडळात शिरकाव होतो. कॅम्पसचे फोटो, वीडियो काढून घरी पाठवले जातात. पहिल्या काही दिवसातच वेगवेगळे क्लब असतात, त्यांचे इंटरव्यू चालू होतात. एकमेकांच्या खोलीत येजा चालू होते. आपल्याला वाटते त्याहून खूप लवकर मुले सेट होतात.
एखाद्या कोंडवाड्याचे दार उघडावे आणि आतील वासरे चौफेर उड्या हाणत उधळावीत, तशी काहीशी अवस्था पहिला महिना संपताना होते. JEE परीक्षेसाठी केलेली अचाट मेहनत आणि दोन वर्षे पूर्ण कोविडमधे घरी बसलेली ही बॅच. पहिल्यांदाच मुले on his / her own असतात. IITमध्ये आल्यावर काही दिवसातच गर्लफ्रेंड नाही मिळाली तर आयुष्यात काही राम नाही, फारच वर्षे (!) आपण सिंगल राहिलो, असा साक्षात्कार बऱ्याच मुलांना होतो. त्या दृष्टीने प्रयत्न चालू होतात. इथे काही जोड्या कायमच्या जुळतात, काही ब्रेकअप होतात. तर काही सिंगलच राहतात. असो.
करत करत पहिला महिना संपतो आणि Quiz 1ची वेळ येते. IITमध्ये आल्यावरची पहिली परीक्षा. मुले कसून अभ्यास करतात. पेपर सोपे होते की अवघड, किती मार्क मिळाले, हे लगेच घरी कळवले जाते. ह्याच दरम्यान घरचे भेटायला यायची एक लाट चालू होते. “या तुम्ही, पण मी हॉस्टेलवरच राहणार आहे.” असा मेसेज आधीच आलेला असतो. पाखरू आता पंख फुटून घरातून उडून गेलेलं आहे. आईबापाला जाणीव व्हायला वेळ लागत नाही. कुठेतरी थोडेसे वाईट वाटते.
End sem होते. एक सेमिस्टर संपते. पहिल्या semला आपल्या deptचा एक introductory course असतो आणि physics, chemistry, maths हे विषय असतात. मुलं हे विषय कोळून प्यायलेली असतात. Academic challenges ह्या semला कमी असतात. घर सोडून राहणे हा मुख्य challenge. घरोघरच्या लाडोबांना आणि लाडूबाईंना कपडे आपले आपणच धुवायचे असतात, खोली साफ ठेवायची असते. इन्स्टिट्यूट पूर्ण प्रयत्न करते मुले चांगली रहावीत, खुशीत रहावीत. तीन मुलांमागे एक senior दादा असतो. काही अडचण आली तर तो मदत करतो. माझ्या मुलाचे mentor sir तर पहिल्या semमध्ये मेसमध्ये party द्यायचे. काही मुलं इथे आल्यावर अठरा पूर्ण होतात. कितीही मोठं झाल्याचा आव आणला तरी एक लहान मूल अजून दडून बसलेलं असतं.
एकदा अशाच एका फ्रेशर्सच्या groupला एक mentor sir कॅम्पसवरच्या एका ठेल्यावर दुपारी चहासाठी घेऊन गेले. तुम्हाला काय हवे ते घ्या, सरांनी सांगितले. ठेल्यावर सगळ्या पाट्या वाचल्या आणि काही आवाज आले, बोर्नविटा, बूस्ट, कॉम्प्लान. असाच आणखी एक किस्सा सांगते. एकदा एक फ्रेशर मुलगा आईला फोनवर म्हणाला, आमच्या हॉस्टेल मधे काल लाइट गेले. मग काय केलेत तुम्ही, आईने विचारले. मग आम्ही लपाछपी खेळलो. असे ते मूल अधूनमधून डोके वर काढते.
पहिल्या वर्षी एकूण क्लब ह्या गोष्टीला फारच महत्त्व असते. आपल्याला position of responsibility मिळावी, त्याहीपुढे आपण क्लब हेड व्हावे. किंवा एखादा नवीन क्लब चालू करावा, असे धुमारे फुटत असतात. कोणाला मराठी मित्र मंडळाचा अध्यक्ष व्हायचे असते.
म्हणता म्हणता एक वर्ष संपते. ह्या काळात मुलांचे सामाजिक वजन वाढते आणि शारीरिक घटायला लागते. एकदा IIT Madrasचा एक मुलगा कुठलेच आइडेंटिटी प्रूफ न घेता चेन्नई एयरपोर्टला (campusच्या आत Madras आणि बाहेर Chennai) विमान पकडायला गेला होता. नशिबाने IIT Madras चे ICARD त्याच्याकडे होते. त्या जोरावर त्याला आत प्रवेश मिळाला. एकूण Chennai मध्ये तमिळ लोकांना IIT Madrasचा खूप अभिमान आहे, ते जाणवते.
मुलांचे वजन कमी होण्यामध्ये मेसचा खूप मोठा वाटा आहे. कुठलीही भाजी असली तरी त्याची चव सारखीच असते. ग्रेवी (म्हणजे पाणीच) unlimited असली तरी पनीर, चिकन असा शेलका माल रेशन केलेला असतो. तो कँटीनवालेच वाढतात. पोळ्यांना कुठल्याही स्निग्ध पदार्थाचा अंशही नाही. ब्रेकफास्टला एकच अंडे मिळते. (बाकी इडली, उपमा वगैरे अनलिमिटेड असते). एक अंडे किंवा कॉर्नफ्लेक्स ह्यापैकी एकच घेता येते. (ह्यामागे काय फंडा आहे ते अजून मला कळले नाही). मेसचं साम्य मुंबईच्या IPL टीमशी आहे. कागदावर मेन्यू जबरदस्त असला तरी performanceच्या नावाने पूज्य. कुठल्याच गोष्टीची चव मराठी जिभेला रुचत नाही. रविवारी sweet या सदरात एक गुलाबजाम मिळतो किंवा छोटासा ice cream चा कप. मेसचा न बिघडणारा हातखंडा पदार्थ म्हणजे ब्रेड, बटर, जॅम. मेसमधे एखादा पदार्थ unlimited घेता येणं आणि त्याला चव असणं हे गुलबकावलीच्या योगाइतके दुर्मीळ आहे. निदान 2022 सालची ही सत्यपरिस्थिती होती. असो.
त्यात भर घालणारी इथली हवा. कडक उन्हाळा आणि अतिकडक उन्हाळा, एवढे दोनच ऋतू. सूक्ष्म घाम सतत पाझरत असतो. एप्रिल, मे महिन्यात एकीकडे घामाच्या धारा आणि त्याच वेळी गरम लू. रात्री हॉस्टेलच्या खोलीत झोप लागणे अशक्य होते. मुलं बिचारी लायब्ररी किंवा लॅब (AC असतो) कुठेतरी रात्री थांबतात. पहाटे दोन अडीचला थोडासा थंड वारा सुटला की खोलीत येऊन झोपतात. मनापासून सुट्टीची आणि घरी जायची अगदी वाट पाहत असतात.
सुट्टीत घरी आलेली पोरं दोन महिन्यात अगदी टवटवीत होतात आणि परत दाखल होतात कॅम्पसमध्ये तिसऱ्या sem साठी.
आता बरेचसे मुलगे येतात कावेरी हॉस्टेलला. पहिल्या वर्षी मुलगे मंदाकिनीला होते आणि मुली सुवर्णमुखीला. दोन्ही हॉस्टेल नवीनच बांधलेली आहेत. IIT Madras ची सगळ्यात चांगली हॉस्टेल आहेत. कावेरी मात्र सगळ्यात जुने, IIT Madrasचे पहिले आहे. लांबलचक पसरलेले आहे आणि अगदी निसर्गातच आहे. दार उघडल्यावर समोर हरीण असू शकतं आणि क्वचित खोलीत विंचू येऊ शकतात. कावेरीला आल्यावर मुलांचा सामना होतो IIT Madrasच्या आदिम रहिवाशांशी, माकडांशी. मंदाकिनीपेक्षा living conditions खूप वाईट होतात. आपलं चांगलं घर सोडून इकडे का आलो, असं परत एकदोन दिवस वाटतं.
इकडली माकडं खूपच aggressive आहेत. खोलीचं दार चुकून उघडं राहिलं तर आत घुसून खाणं पळवतात. कोणाच्या हातात खाऊ आहे असा संशय आला तर corridorमध्ये झुंडीने हल्ला करतात. आतापर्यंत त्यांना चितळे बाकरवडी, काका हलवाई बाकरवडी असे चवीचे फरक समजले असणार. (पुण्याची खूप मुलं आहेत कॅम्पसमध्ये). डार्विनचा सिद्धांत ह्या माकडांकडे बघून अगदी पटतो. माकडं कडी काढून खोलीत शिरतात, कुलरला तोंड लावून थंड पाणी पितात. खोलीत शिरली तरी phone, laptop ह्याकडे ढुंकून बघत नाहीत.
एक मुलगा हातात साबणाची पेटी घेऊन आंघोळीला जात होता. माकडं खाणं समजून मागे लागली. त्याला पटकन काय सुचलं, त्याने पेटी उघडून आतला साबण दाखवला, माकडं निघून गेली. एक मुलगा कूर्गला फिरायला गेला, घरी न्यायला त्याने दालचिनी आणली होती. माकडांनी खोलीत शिरून ती पिशवी फोडली पण खाता येत नाही हे कळल्यावर तिथेच ठेवली. एका महाशयांनी खिडकीत ठेवलेली डेटॉलची चपटी बाटली माकडांनी काय समजून प्यायली ते माकडंच जाणोत. त्या दिवशी बऱ्याच माकडांची पोटं बिघडली असणार.
तिसरे सेमिस्टर चालू होते. अभ्यासाची व्याप्ती आणि काठिण्य पातळी वाढते. Assignments आणि submissions वाढलेली असतात. कॉलेजचीही वेळ वाढून आता जवळपास 8 ते 6 झालेली असते. Entrance exam एवढी कठीण का घेतली जाते, त्याचं उत्तर आता मिळायला लागतं. करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. पण वेळ मिळत नाही. घरी रोज होणारा फोन आता आठवड्यातून एक किंवा दोन अशा frequencyवर येतो. कुठलीच IIT study leave देत नाही. शेवटच्या दिवशी शिकवलेला अभ्यासक्रमही दुसऱ्या दिवशी परीक्षेला विचारू शकतात.
IITच्या आत शिरल्यावर खूप अभ्यास नसतो, एकदा आत आलं की life set असा एक गैरसमज आहे. दुसऱ्या तिसऱ्यापासून ते सातव्यापर्यंत प्रत्येक सेमिस्टर चढत्या क्रमाने कठीण होत जातं. त्यात आणखीन इकडली relative grading system. त्यामध्ये तुमच्या grades स्वतःबरोबर course-mateच्या performanceवर अवलंबून असतात. course-mateचा performance खाली गेला आणि आपला तेवढाच राहिला तरी आपली grade वर सरकते. RGगिरी करणे, हा ह्या जगातला रोजचा शब्द आहे. आठवतोय ना Three idiots मधला चतुर?
इकडलं जग super competitive आहे. जे आपले खास मित्र असतात, wing mate असतात, तेच closest competitor असतात. एकीकडे मैत्रीही खरी असते आणि दुसरीकडे पाय ओढाओढी चालू असते. (दोस्त fail हुआ तो बुरा लगता है, लेकीन दोस्त first आए तो उससेभी बुरा लगता है।)
इथे चांगलं टिकायला कुठल्या तरी groupचा भाग बनावं लागतं. हे group साधारण पहिल्या वर्षातच तयार होतात. तेच एकत्र wingmate म्हणून राहतात. हॉस्टेल मधे single room मिळणं, हॉस्टेल sports teamचा captain ह्या गोष्टी networkingच्या आधारेच होतात.
इकडे येणारी मुलं कशी असतात? बरीचशी मुलं मध्यमवर्गीय मानसिकता असणाऱ्या घरातील असतात. पुस्तकी किडे नक्की नसतात. एखादा national levelचा chess player असतो, एखादा संगीतज्ञ असतो तर एखादा sportsman असतो. जे काही काम हातात घेतील, ते ही मुलं खूप dedicationने करतात. परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करणं, फसवाफसवी, हॉस्टेलमधे चोऱ्या होणं हे प्रकार अर्थातच सर्रास होतात. शेवटी मनुष्यस्वभाव आहे. सगळीकडे सारखाच असणार.
एकूण पहिल्या वर्षी फुटणारे धुमारे दुसऱ्या वर्षी जरा मंदावायला लागतात. मुलं club मधे coordinator वगैरे होतात. ऐटीत freshersचे interview घेतले जातात. बऱ्याच clubना IITकडून दरवर्षी ठरावीक budget sanction झालेलं असतं. Club ज्या स्पर्धा घेतात, जी काही session conduct करतात त्यासाठी ते पैसे दिलेले असतात. ही सगळी कामं साधारण दुसऱ्या, तिसऱ्या वर्षातली मुलं करतात. Budget मुलंच calculate करतात. (बऱ्यापैकी budget स्पर्धक मुलांना frooti देणं अशा कामालाही जातं). करण्यासारख्या इथे खूप गोष्टी आहेत पण सगळ्यात आपण हात घालू शकणार नाही, हे जाणवायला लागतं. तरी interhostel, interbranch tournament होतात, त्यात जोरात भाग घेतला जातो.
दुसरं वर्ष संपतं. काही ब्रँचेसना internship करायची असते. ती असते तिसऱ्या वर्षानंतर. पण selection होतं जवळपास वर्षभर आधी. मुलं घरी आली तरी दोन महिने तयारी करत असतात. साधारण July महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लेखी परीक्षा चालू होतात. Semester चालू व्हायच्या दहाएक दिवस आधी मुलं कॅम्पसला पोचतात. रोजच्या चार पाच परीक्षा आणि interviewच्या प्राथमिक round होतात. कुठे गाडी पुढे पुढे सरकत असते तर कुठे initial round लाच rejection होतं. D dayच्या एकदोन दिवस आधी अगदी रात्रंदिवस बॅक टू बॅक interview चालू असतात. कुठे तिसरी राऊंड कुठे चौथी तर कुठे अगदी पाचपाच राऊंड होऊनही नकारघंटा मिळते. आशा निराशेचा खेळ चालू असतो. मुले प्रचंड प्रेशरखाली असतात. पालकांशीही अगदी सगळे शेअर करत नाहीत. Seniors चे सल्ले मात्र मुलं घेत असतात. जेवायला धड वेळ होत नाही. Internshipची drive साधारण एक आठवड्याची असते. त्याच्या पहिल्या दिवसाला day zero म्हणतात. त्या दिवशी अगदी पहाटेपासून ऑफर यायला सुरुवात होते. मग मात्र आनंदाने पहिला फोन घरीच केला जातो. बाबावाक्यम् प्रमाणम् ह्या संस्कृतीत वाढलेल्या पालकांना मुलं आपल्याला consult करत नाहीयेत, निर्णय सांगताहेत हे पचवणं जरा जड जातं.
हे सगळं आयोजित करत असते प्लेसमेंट कमिटी. प्लेसमेंट कमिटीच्या मुलांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. कंपन्यांना invite करणं, त्यांच्या executivesच्या राहण्याची व्यवस्था करणं, गेटवर त्यांना receive करणं, परीक्षा arrange करणं, interviewचे slot पाडणं अशी अनेक कामं असतातच. पण त्याचबरोबर ही मुलं बरोबरीच्या नात्याने कंपन्यांबरोबर negotiate करत असतात. कंपन्या कधीकधी pressure tactics खेळतात. ते झेलावे लागते. वीस वर्षाच्या आसपासची ही मुलं, तिशीच्या maturity नी वागत असतात.
तसेच दुसरे नाव घ्यायलाच पाहिजे मराठी मित्र मंडळाचे. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा अगदी थाटात करतात. विसर्जन मिरवणूक जोरदार काढली जाते. सगळे मराठी सणवार दणक्यात साजरे होतात. मराठी मनाचा मानबिंदू - नाटक. स्वतः मुलांनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं आणि अर्थातच अभिनय केलेलं नाटक दरवर्षी बसवलं जातं. गाण्याचे कार्यक्रम करतात. पहिल्या वर्षाच्या मुलांना हॉस्टेलमध्ये आल्याआल्या साधारण आजारपण येतं. त्यांना सर्वतोपरी मदत, अगदी गरज पडली तर admit करण्यापासून ही मुलं करतात.
2022 सालची बॅच campus मध्ये आली त्या वर्षी IIT Madrasला तीन महिन्यात चार आत्महत्या झाल्या होत्या. मुलंच काय आम्ही पालकही पार हबकून गेलो होतो. मराठी मित्र मंडळाचे दादाताई पालकांशी सतत संवाद साधत होते, त्यांना धीर देत होते.
IIT Madrasला जवळपास 50% तेलुगु मुलं येतात. त्या खालोखालचा मोठा भाषिक group आहे मराठी मुलांचा. आनंदाची गोष्ट अशी की हा मराठी टक्का दिवसेंदिवस वाढतोय.
तिसरं वर्ष चालू होतं. मुलं आता अगदी मुरलेली असतात. इथला अभ्यासक्रम flexible आहे. काही core courses वगळले तर जे elective courses करायचे असतात ते निवडायला खूप वाव असतो. एकदा निवडलेले विषय आवडले नाही तर drop करता येतात. Classmates असले तरी आता time table खूप वेगवेगळी झालेली असतात. तिसऱ्या वर्षी profचा (प्रोफेसर या शब्दाचा इथला short form) under graduate रिसर्च प्रोजेक्ट करता येतो. शिकवणारे सगळेच प्रोफेसर आपापल्या विषयात तज्ज्ञ असतात. तळमळीने शिकवतात. मुलांमध्ये north आणि south असे दोन गट असले तरी professors कधीही भेदभाव करत नाहीत. इथे शिस्त कडक असते. मित्राच्या सह्या मारणे (proxy मारणे) ह्याला कडक शिक्षा केली जाते.
मुलं internship करून सातव्या सेमिस्टरला परत येतात. खिसे गरम असतात, कामाचा अनुभव मिळालेला असतो. Exposure खूप मिळालेलं असतं. काही जणांना pre-placement offer मिळते. ते सातव्या सेमिस्टरला थोडे निवांत असतात. Offer न मिळालेले निराश होतात. फार काळ निराश राहता येत नाही. ती झटकून अभ्यासाला लागावेच लागते. अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तशी आता फक्त placement असते. सगळी मौजमजा बाजूला ठेवली जाते. दिवाळीला घरी ये म्हटलं तर एक दिवसही मी वाया घालवणार नाही, असं उत्तर येतं. त्यातून सातव्या सेमिस्टरचा अभ्यास असतोच. मुलं दडपणाखाली आहेत ते घरच्यांनाही कळत असतं. मगाशी internshipच्या संदर्भात उल्लेख केला त्या grillमधून परत जावं लागतं. तावून सुलाखून घेतल्याशिवाय कुठलीच कंपनी ऑफर देत नाही. IITच्या जगात कुठलीच गोष्ट सहजसाध्य नसते. Opportunities ह्या मुलांना खूप मिळतात. दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत, sky is the limit अशा मिळतात. त्याला आत आल्यावरही तसेच कष्ट करावे लागतात. आपण मोठ्या पॅकेजबद्दल पेपरात वाचतो, त्याच्या पाठची जगाला न दिसणारी ही बाजू आहे.
आठवं सेमिस्टर चालू होताना सगळ्यांच्या हातात नोकरी असते. पुढे शिकणार असतात त्यांच्या ॲडमिशन झालेल्या असतात. वेगवेगळ्या groupsच्या ट्रीपा निघतात. मुलं अगदी रिलॅक्स, थोड्या बेफिकीरीने वागायला लागतात. कारण नसताना lecture बंक करतात. पहिल्या सेमिस्टरला पेपर कसा गेला ते घरी कळवणारी पोरं, आता परीक्षेच्या तारखा त्याला तरी माहीत आहेत का असा प्रश्न पडतो. मेसचं दर्शन जेमतेम दिवसातून एकदा घडतं. बाकी swiggy, zomato जोरात चालू होतं. घरी यायचं तिकीट पहिल्या सेमिस्टरला जर महिनाभर आधी काढलं जात असेल, तर आता ते आदल्या दिवसांवर येतं. आता हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही, मित्रांची ताटातूट होणार म्हणून वाईटही वाटत असतं. इकडे आत शिरताना डोळ्यात पाणी असतं आणि बाहेर पडतानाही.
IIT Madras ह्या संस्थेने माझ्या मुलाला काय दिलं? तर उत्तम शिक्षण, परदेशी internship करायची संधी, उत्तम नोकरी हे तर आहेच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवलं. जगात कसं वावरायचं, माणसं कशी ओळखायची, लोकांशी कसं बोलायचं, कोणाला कसं ॲप्रोच व्हायचं हे जे तो शिकला, ते घरी राहून कधीच झालं नसतं. मुलांचे नेतृत्वगुण घडवण्यात इथल्या क्लब आणि कमिट्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि सगळ्यात मोठा ठेवा असा की त्याला जिवाभावाचे मित्र इथे मिळाले. ही मैत्री आता आयुष्यभराची आहे.
मुलं IIT Madras मधून बाहेर पडतील पण त्यांच्या मनातून institute कधीच बाहेर पडणार नाही.
--
गायत्री वैशंपायन
मे २०२६