अवखळ नदी
तुष्की नागपुरी
दिसणे जसे हसरी मुले
हसणे कसे अवखळ नदी
तुलना कुठे चाफ्या तुझी
दुसरी फुले तर कागदी
.
वावर सुगंधा सारखा
अंतर्मनाला व्यापतो
मर्जी तुझी श्रावण ऋतू
रूसणे रवी जणु तापतो
.
श्रीरंग जो गहुसावळा
मधुपर्क सोज्वळ दाटला
चेहरा निळे आकाश ते
तिळ चंद्र आकाशातला
.
जगणे पतंगासारखे
सुख केवढे मरणातही
येतोच ना तू स्पर्शता
कण कण पुन्हा जन्मासही
.
तुष्की नागपुरी