कायापालट
"रॅमसेचा शो बघितलायेस का?" चायनीज भेलचा बकाणा भरत मह्यानी विचारलं.
"ते जुने हाॅरर मूव्ही?"
"नाही रे. गाॅर्डन रॅमसेचा शो. म्हणजे हाॅरर इन इट्स ओन वे. हाॅटेलमधे शिळ्या भाज्या आहेत, नाहीतर माशा उडतायेत, असं कायतरी भेंजो. मग रॅमसे मालकाला आणि स्टाफला शिव्या घालतो, आणि हाॅटेलचा कायापालट करतो असं."
"पण ते आत्ता का आठवलं?"
"भेंजो या सद्गुरू स्टाॅलचा कायापालट करायला पाहिजे ना कोणीतरी!" मह्या सात्विक संतापाने बोलला.
तसा त्याचा पाॅइंट बरोबर होता. आम्ही जनरली फक्त कटिंग आणि सुट्ट्यासाठी बाहेरच उभे राहतो. पण कधी भूक लागली असली नाहीतर बनमस्क्याची तल्लफ आली असली तर आत बसून खातो. चव बरी असते, पब्लिक ओळखीचं आहे, पण नवीन कोण आला तर नाक मुरडेल अशी जागा. सीटच्या कव्हरचा रंग कधीतरी हिरवा होता तो ग्रे झालाय, टेबलचे पाय डुगडुगतात म्हणून टिशूपेपरच्या घड्या ठेऊन बॅलन्स केलंय, असले प्रकार. त्यात कोणतरी मागच्या टेबलवर बसून कांदे चिरत असला की त्याचा वास.
"बरोबर आहे. पण कोण करणार? अण्णा तर बिलकुल करणार नाही कायापालट वगैरे."
"हो. आपल्यालाच कायतरी करायला पाहिजे."
मह्याची चायनीज भेळ संपली होती. आम्ही चहा मागवला आणि बाहेर उभे राहून प्यायलो.
पंधरा दिवसांनी रविवारी पहाटे आठ वाजता मह्याचा फोन आला.
"भेंजो लवकर चल. खूप काम आहे!"
मह्या एक्साईट झाला असला की कोणाचं ऐकत नाही. मी पटकन काॅर्न्फ्लेक्स खाल्ले आणि खाली उतरलो.
"कुठे स्वारी काढलीस?"
"स्वारी नाय भेंजो. मोहीम. सद्गुरू स्टाॅल साफसफाई. डोन्ट वरी. मी जावेदचे हाऊसकीपिंगचे लोक बोलावलेत."
"अण्णा ओके म्हणाला?"
"फुकट क्लिनिंग करायचा वायदा केला, तो कशाला नाही म्हणेल?"
मी मुकाट्याने बाईक काढली आणि मह्या मागे बसल्यावर सद्गुरू स्टाॅलला गेलो.
माझ्या पाहण्यात पहिल्यांदा शटर हाफडाऊन होतं. आम्ही वाकून आत गेलो. तिकडे जवळपास युद्ध चाललं होतं. कोणीतरी सीटकव्हर काढून आतल्या गाद्या साफ करत होतं. कोणी सीटचं मेटल पाॅलिश करत होतं. एकजण मागे तीनफुटी पार्टिशन ठोकत होता. मह्यानी मुकादमाला सूचना दिल्या आणि आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो.
"कसं वाटलं?" मह्यानी विचारलं.
"छानच! पण ही कोणाची करामत?"
"रूको जरा! सबर करो! आधी काम तर पूर्ण होऊ दे."
मग मी रूकलो आणि सबर केला.
बारा वाजता परत आत गेलो. दोनतीन लोक जमीन घासत होते. "इथे मोझाईकच्या टाईल्स आहेत?" एवढं मी बोलतोय तेवढ्यात चेटकीण बसते तसा लांब दांडीचा झाडू घेऊन एकजण आला आणि सीलिंग पुसायला लागला.
"गुड गुड" एवढंच बोलून मह्या बाहेर पडला, तसा मीपण. मग आपापल्या घरी गेलो, जेवलो.
मी मटण खाऊन झोपून उठलो तर मह्याचे तीन मिस्डकॉल होते. मी त्याला फोन लावला.
"भेंजो पेंटरने टांग दिली. तुझ्या घरी काम केलं होतं त्याला बोलाव ना अर्जन्टली!"
मी परेशभाईला फोन केला आणि लगेच मह्याला फोन करायला सांगितलं.
मग आईनी सांगितला तो किराणामाल आणि भाजी वगैरे घरी आणून दिली, आणि मग परत सद्गुरू स्टाॅलला आलो.
एक क्षण कुठे आलो हे कळलंच नाही. भिंतींना क्रीम रंग लावला होता. बेंच आणि खुर्च्यांवर नवीन लाल कव्हर लावली होती. टेबलांचे पाय बॅलन्स झाले होते. प्रत्येक टेबलवर पाण्याचा जग आणि नवंकोरं मेनूकार्ड ठेवलं होतं.
"गॉर्डन रॅमसे झिंदाबाद!" मी म्हणालो.
"रॅमसे सोड रे. इथे सगळं रामभरोसे. पेंटरने टांग दिली पण परेशभाई आणि बाकी पंटर वेळेत आले हे बरं झालं."
"आणि सगळा खर्च? ती कोणाची कृपा?" मी विचारलं.
"तिथे बघ!" मह्यानी बोट दाखवलं आणि मी अवाक झालो. अण्णा काऊंटरवर बसून हसत होता, आणि काऊंटरच्या बाजूला काळ्या दगडात सोनेरी अक्षरात कोरलेली पाटी होती -
********************************
सद्गुरू स्टाॅलचा जीर्णोद्धार
मे २०२६
महेशभाई ठाकूर यांच्या सौजन्याने
********************************
"भेंजो एवढी पाटी? प्रसिद्धीपराङ्मुख का काय तो आहेस ना तू?!"
"पाटी नाही. शिलालेख. आणि बाकी प्रसिद्धीपराङ्मुख असलो तरी इथे प्रसिद्धीप्रमुख व्हायला लागलं." मह्या हसत म्हणाला.
"म्हणजे?" मी विचारलं.
"म्हणजे गेले पंधरा दिवस जमतील तेवढ्या बेट लावत होतो - पंधरा दिवसांत गावात माझं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल अशा!"
"काहीही!"
"अरे खरंच! आता ती रिकव्हरी केली की सगळा खर्च निघून दोन हजार रूपये उरतील."
"मग पार्टी पाहिजे महेशभाई!"
"आज किचन बंद," मह्या म्हणाला. "उद्या इथेच बनमस्का खिलवतो तुला!"