बिल गेट्सची भीति
बिल गेट्सने एका लेखाद्वारे ए०आय० बद्दल व्यक्त केलेल्या भीतिबद्दल सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. एका वृत्तपत्राच्या संपादकांनी माझ्याकडे यावर संपर्क साधून माझे मत विचारले. त्यांना आज पाठवलेले उत्तर प्रसृत करत आहे.
नमस्कार,
तुम्हाला आठवेल की नाही माहित नाही. पण ए०आय० च्या आगमनाचे पडघम वाजायला सुरुवात झाली तेव्हा काही भविष्यवेधी लेखकांनी ५०% नोकर्या ए०आय० खाणार याचे भाकीत केव्हाच वर्तवायला सुरुवात केली होती. मी तेव्हा आपल्या पंतप्रधानाना एक उपहासात्मक पत्र लिहून भारताने ए०आय० वर बंदी घालावी असे सुचवले होते. आपले त्यावेळेला फोनवर बोलणे पण झाले होते.
पण आता जेव्हा घंटानाद बिल गेट सारख्या महात्म्याने सुरु केला तेव्हा या सर्व समस्येची सगळीच परिमाणे, आयाम बदलतात. कारण एकच त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं...
"ए०आय० वापरा वर टॅक्स लावा" असा किती आक्रोश केला तरी यामुळे काही प्रश्न उभे राहतात - सर्वप्रथम, कर नेमका कशावर लावायचा हा प्रश्न उभा राहतो. ए०आय० वापरणाऱ्या व्यक्तीवर कर लावायचा, ए०आय० सेवा देणाऱ्या कंपनीवर, की ए०आय० मुळे वाढलेल्या उत्पन्नावर? उदाहरणार्थ, एखादा वकील ए०आय० च्या मदतीने करारपत्र तयार करतो, तर त्यात निर्माण झालेल्या मूल्याचा किती भाग ए०आय० चा आणि किती भाग वकिलाचा मानायचा?
ए०आय० मुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक उपकारक बदल घडून येत आहेत. अशा करांमुळे त्याचा वैद्यकीय सेवांवर भार पडून त्याचा परिणाम आधुनिक उपचारांपासून वंचित राहण्यात होणार हे निश्चित. भारतासारख्या देशात जिथे संशोधनक्षेत्र पिछाडीला आहे (पहा संशोधनावर होणारा खर्च) तिथे अशा करांच्या झळा जास्त पोचणार हे निश्चित आहे.
चीन सारखे यंत्रमानवांचे ऑलिम्पिक भरवणारा देश[१], सम्पूर्ण हॉस्पिटल ए०आय० कडून संचालित करणारा[२], थोडक्यात "आम्ही म्हणू ती पूर्व" म्हणणारा देश अशा टॅक्समुळे कितीसा प्रभावित होणार?
अशा अभूतपूर्व समस्यांना तोंड देण्यासाठी वेगळा विचार करणार्यांना, कल्पकतेला उत्तेजन देण्याची गरज असते. आपल्याकडे अशा लोकांना ठोकून काढले जाते, "चीनमध्ये जाऊन राहा", असे सांगितले जाते.
जोपर्यंत कल्पकतेचे मोजमाप राजकीय फूटपट्टीने होईल तो पर्यंत अशा प्रश्नांची प्रभावी उत्तरे सापडणे कठीण वाटते. कल्पक लोकांना नामोहरम करायची आता आपण जबरदस्त किंमत मोजणार आहोत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
बिल गेटस च्या प्रत्येक मुद्द्यावर अजुन बरेच लिहीण्यासारखे आहे पण सध्या इतकेच...
कळावे
राजीव उपाध्ये
१. https://www.youtube.com/watch?v=tLzGXy-6-Yo
२. https://www.youtube.com/watch?v=md8bxxOf9ps
जाताजाता: आपण जागतिक हवामान बदल रोखू शकलॊ नाही, प्लास्टिकचा विळखा रोखू शकलो नाही, फार काय डीजे मुळे होणारे ध्वनी प्रदूषण थांबवू शकत नाही. अन्नपदार्थातील भेसळ थांबवू शकत नाही, ए०आय०चे आक्रमण कसे रोखणार?
आपण एक वाळूचा कण
तुम्ही कुणालाही पत्र लिहा. काहीही उपयोग नाही. आता जसं समजा मी तुम्हाला एआय वापरून सतत लिहू नका अशा अर्थाचं काही सांगते त्याला तरी काय किंमत आहे? मी कोण आहे? माझ्या म्हणण्याने काय होणार आहे? लोक एआय वापरून लिहायचे थोडीच सोडणार आहेत? तुमचे अगदी कट्टरातले कट्टर विरोधी घेतले तरी त्यांना काय पावर आहे? काही नाही.
शेवटी आपण काय करायचं तेवढंच आपल्या हातात आहे. आणि तेही कायम जमेलच असं नाही. मी तुम्हाला माझे उदाहरण देते. मी २०२१ पासून सोशल मिडिया सोडायचा प्रयत्न करत होते. कारण मी १६ वर्षांची असल्यापासून सतत कोणता ना कोणता सोशल मिडिया वापरला होता. आधी चॅट रूम (तिथेही आपण कोणत्याही नावाने जाऊ शकायचो), नंतर ऑर्कुट, नंतर फेसबुक, नंतर इंस्टाग्राम. ही सगळी तंत्रज्ञान प्रगती आणि तिची चांगली बाजू (सोशालिडियावर लिहून आपला एक वाचक वर्ग निमार्ण करणे, मैत्री करणे, विविध उपक्रमात सहभागी होणे) मी भरपूर उपभोगली. पण एक गोष्ट मात्र कायम खटकत राहिली. की सोशल मीडियावर आपण नेहमी एक stance घेत असतो. तसे आपण खऱ्या आयुष्यात नसतो. काही लोक लेखक होतात, काही समीक्षक होतात, काही आपले फोटो टाकून लोकांची वाहवा मिळवतात. यापैकी बऱ्याच गोष्टी मी केल्या आहेत. आणि त्याचं व्यसनही लावून घेतलं.
पण तो सोडायचं ठरवलं २०२१ मध्ये. आणि जमलं २०२५ मध्ये. ही चार वर्षं अतिशय क्लेशकारक होती. कारण आपण ठरवलेली एखादी गोष्ट आपल्यालाच सहज जमत नाही हा साक्षात्कार खूप निराशाजनक असतो. अनेकदा मी app काढून टाकायचे. वेळेची मर्यादा ठेवायचे. असे अनेक प्रयोग मी केले. आणि बहुतेकवेळा अपयशी ठरले. पण शेवटी मला एकदाचं जमलं. एक दिवस मी सगळी खाती कायमची डिलिट करून टाकली.
तर स्वतःमध्ये हा बदल घडवून आणायला मला ४ वर्षं आणि एवढी सारी चिकाटी लागली. तर मी सांगून इतर लोक बदलतील ही अपेक्षा मूर्खपणाचा आहे याची मला जाणीव आहे.
कोणत्याही समाजमाध्यमावर तग धरून राहायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे इतरांना शून्य किंमत द्यायला शिकणे. हे मला जमायचं नाही. म्हणून मी त्यातून कायमची बाहेर पडले.
बिल gates
बिल sir व्यापारी व्यक्ती आहेत त्यांना फक्त नफा आणि तोटा इतकेच कळते. Ai मुळे रोजगार विरहित अर्थ व्यवस्था निर्माण झाली तर पहिला ai च बळी जाईल.
रोजगार विरहित, उत्पादन ह्या मुळे काय घडेल हे त्यांना चांगले माहित आहे.
Ai मुळे आज च बेसिक स्किल मध्ये माणूस गाढवाच्या पण मागे गेला आहे.
सर्वच. Ai करणार असेक तर माणूस विचार करण्या ची कल्पना करण्या ची, aakdemod करण्याची, अगदी जुगाड करण्या ची पण क्षमता हरवून बसेल. नवीन टॅलेंट निर्माण होणार नाही हे सर्व gate ह्यांना माहित आहे.
…
ते तुमच्या परीने ठीकच आहे, हो! परंतु, पंतप्रधानांना उपहास वगैरे समजतो, या तुमच्या गृहीतकाला आधार काय?
चीन इज़ द न्यू पाकिस्तान. चालायचेच.
“थांबवू शकत नाही”??? थांबवण्याची (एक लोकसमुच्चय म्हणून) “आपल्याला” मुळात इच्छा तरी आहे काय? कधी होती काय?
नाही म्हणजे, (पूर्वीच्या तुमच्या एआयजनित लेखांच्या रतिबाला मीदेखील जरी कंटाळलो होतो, तरीसुद्धा) तुमची angst मला समजते. (आणि, एआयकडे केवळ ‘एक नवे साधन’ (a new tool) एवढ्या(च) दृष्टिकोनातून पाहिल्यास, एक उत्तम साधन होण्याची त्यात क्षमता आहे, हेदेखील मी मान्य करू शकतो.)
परंतु, उपयोग काय? (As a whole) भारत हा मूलतः न-कर्त्यांचा देश आहे. (एक समाज म्हणून अमेरिकेचीही वाटचाल आजकाल याहून फार वेगळ्या दिशेने चाललेली नाहीच, म्हणा — एके काळी can do attitude असलेल्या go-getter लोकांचा म्हणून नावाजलेला देश कोठे हरवला, कोणास ठाऊक? — परंतु, तो वेगळा विषय झाला. तूर्तास विषय भारताचा चालू आहे.) आणि, न-कर्त्यांचा देश आहे तर आहेच, परंतु, दुधावरची साय म्हणजे, (by and large) जेथेतेथे आपली अक्कल पाजळू पाहणाऱ्या दीडशहाण्या लोकांचा देश आहे. त्यामुळे, हे असेच चालत राहायचे. त्याला नाइलाज आहे.
(नाही म्हणजे, सगळेच भारतीय असे आहेत, असे माझे म्हणणे नाही. परंतु, by and large, राष्ट्रीय मनोवृत्ती ही पूर्वापार अशीच आहे. (दुर्दैवाने, यात काही चुकीचे आहे वा चुकते आहे, हेदेखील अनेकदा बाहेर पडल्याशिवाय लक्षात येत नाही.) आणि, जे असे नाहीत, ते त्या माहौलात राहून दुर्दैवाने (एका मर्यादेपलिकडे) फारसे काही कधीही करू शकणार नाहीत. राष्ट्रालाच (as a whole) मुळात मनापासून जे नको आहे, ते राष्ट्रावर कोण काय लादणार कपाळ!)
त्यामुळे, हे पूर्वापार असेच चालत आलेले आहे, नि जगाच्या अंतापर्यंत हे असेच चालत राहायचे. नाइलाज आहे, हिंदुस्तान है।
अहो, पूर्वापार मोजत आलेलो आहोत — यात नवीन काय सांगितलेत? परंतु, कोणाला पडलेली आहे काय? नि, कधी पडली होती, की आजच पडावी?
(नाही, याचा इतकाच त्रास जर होत असेल (नि शक्य असेल), तर खरोखरच कोठेतरी निघून जा. चीनला जाऊन राहू नका, वाटले तर, परंतु, कोठेतरी चालते व्हा. तुमच्याच भल्यासाठी. देशाला जर आपल्या भल्याची पडलेली नाही, तर तुम्ही आपल्या स्वतःच्या भल्याचे पाहा. गांधीजींचा मार्मिक संदेश लक्षात ठेवा: Quit India!)
असो चालायचेच.