लक्षद्वीपवर साप नाहीत

लक्षद्वीपजवळच्या समुद्रात ऑप्टिकल फायबर केबल घालण्याचं काम अगदी जोरात सुरू होतं. केबलची प्रचंड भेंडोळी लादलेलं ते जहाज पूर्वनियोजित मार्गावरून हळूहळू पुढं सरकत होतं. त्याच्या मागच्या भागातून ती केबल समुद्रात सोडली जात होती. समुद्राच्या तळाशी असलेल्या एका नांगरासारख्या यंत्रानं समुद्राच्या तळाशी एक तास घेतला जात होता. त्या सरीत ही केबल बसवणं, तो पृष्ठभाग पुन्हा पूर्वीसारखा एकसारखा करणं आणि ती केबल स्थिर राहील याची खबरदारी घेणं हे जोखमीचंच काम होतं. एक मीटर केबलचं वजन सुमारे दहा किलो होतं. मेनलँड कोचीपासून लक्षद्वीपवरील अकरा बेटांना जोडणारं ही केबलचं जाळं अठराशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचं होतं आणि एवढ्या लांबीची केबल बसवायचा खर्च एक हजार कोटी रुपयांच्या वर होता. प्रश्न फक्त पैशाचा नव्हता. काम धोक्याचं होतं. पण अशा प्रकारचे धोके स्वीकारून असली कंत्राटं घेणारे लोक असतात. त्या कंत्राटदाराकडे काम करणारे गरजू लोक असतात. लोकांच्या गरजा मोठ्या असतात, लोकांची असाहाय्यतापण मोठी असते. कामं होत राहतात.
अशा प्रकारच्या कामावर आपल्याला कधी जावं लागेल असं स्वप्नील परबला कधीही वाटलं नव्हतं. रत्नागिरीजवळच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या एका लहानशा खेड्यात तो वाढला होता. शिक्षणात त्याला गती होती आणि अगदी मेडिकल, इंजिनिअरिंग नाही तरी सायन्समध्ये ग्रॅजुएशन-पोस्ट-ग्रॅजुएशन करण्याइतपत त्याचं डोकं चाललं असतं. लहानपणापासून जीवशास्त्र आणि त्यातही प्राणिशास्त्र हा त्याचा आवडता विषय होता. तो बी. एससी.च्या शेवटच्या वर्षाला होता. कोकणात आढळणारे प्राणी, पक्षी, समुद्रातले मासे आणि इतर जीव यांचं निरीक्षण करण्यात स्वप्नील गुंगून जात असे. त्याचे वडील मुंबईत नोकरी करत होते आणि त्याची धाकटी बहीण जान्हवी गावातल्या शाळेत सातवीत शिकत होती. त्याच्या घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती आणि त्याची त्याला चांगलीच जाणीव होती. प्राणिशास्त्रात एम.एससी. करावं आणि दापोलीच्या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करावी असा त्याचा बेत होता. त्याचा बी. एससी.चा शेवटचा पेपर झाला आणि अचानकच त्याचे वडील गावी आले. त्यांच्याकडे बघून स्वप्नीलला धक्काच बसला. हाडापेरानं दणकट असलेल्या त्याच्या वडलांची प्रकृती एकदमच खालावली होती. अचानक एवढं वजन कमी होण्याचं सामान्यत: जे कारण असतं तेच त्याच्या वडिलांच्या बाबतीतही खरं ठरलं आणि गावी आल्यानंतर महिन्याभरातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हे सगळंच इतक्या झटपट झालं की त्या धक्क्यातून सावरण्याच्या आधीच आता आपल्याला कमवायला लागलं पाहिजे ही जाणीव स्वप्नीलला झाली. प्राध्यापकी वगैरे सगळी स्वप्नंच राहिली.
दिवाडकर कंत्राटदारानं स्वप्नीलला लक्षद्वीपवरच्या कामाची कल्पना देतानाच पैसे भरपूर मिळतील पण अंग मोडून काम करावं लागेल यांची कल्पना दिली होती. स्वप्नील सडपातळ असला तरी अंगानं काटक होता. श्रमाचं त्याला भय नव्हतं पण आपण दूरदेशी असताना आपल्या आईकडे आणि बहिणीकडे कोण लक्ष देणार याची त्याला काळजी वाटत होती. पण परबांची भावकी मोठी होती. त्यांच्याच पाखाडीत परबांची सहा घरं होती. आईला कधी गोड वाटेनासं झालं तर पेजेची चिंता नव्हती. एवढं सगळं असलं तरी जावं की जाऊ नये हा स्वप्नीलच्या मनातला घोळ संपत नव्हता. दिवाडकरानं कंत्राटाच्या अटी सांगितल्या आणि किती पैसे मिळणार आहेत, याची कल्पना आल्यावर स्वप्नीलच्या घरातल्या सगळ्यांचाच विरोध मावळला. कोचीला निघायच्या आधी स्वप्नील त्याच्या कॉलेजमधल्या प्राणिशास्त्र विभागात जाऊन सगळ्यांना भेटून आला. त्याच्यासारखा गुणी विद्यार्थी फक्त परिस्थितीमुळे पुढं शिकू शकत नाही याचं त्याच्या प्राध्यापकांनाही वाईट वाटत होतं. प्राणिशास्त्र विभागातल्या प्रयोगशाळेतून तर त्याचा पाय निघेना. इथली जिवंत स्पेसिमेन, त्यांची निरीक्षणं करण्यात त्याचे कित्येक तास सुखात गेले होते. किती तरी स्पेसिमेन त्यानं स्वत: पकडून अभ्यासासाठी आणली होती. या सगळ्याचा त्याला अभ्यास करायचा होता, त्यांवर संशोधन करायचं होतं. पण..
**
कोचीला पोचेपर्यंत रेल्वेच्या त्या लांबलचक प्रवासानं स्वप्नील अगदी आंबून गेला होता. समुद्राकाठच्या हवेची त्याला सवय नव्हती असं नाही, पण केरळमधला हा दमटपणा काही वेगळाच होता. कंत्राटी कामावर आलेले त्याच्यासारखे दोनशे कामगार तरी होते. काम कष्टाचं असणार होतं याची दिवाडकरानं कल्पना दिली होती, पण अस्सल कोकणी माणूस कष्टाला कधीच घाबरत नाही. त्यातून आपण काही ही काम आयुष्यभर करणार नाही याची स्वप्नीलला जाणीव होती. कोचीपासून सगळे कामगार एका मोठ्या बोटीतून मिनिकॉय बेटावर आले. इथे कामगारांना राहण्यासाठी एका लांबलचक चाळीसारख्या बराकीत व्यवस्था केली होती. व्यवस्था हे आपलं म्हणायचं म्हणून. बराकीतल्या खोल्या जुन्या होत्या, अंधाऱ्या होत्या. वीस खोल्यांच्या चाळीला मिळून चारच स्वच्छतागृहं होती आणि त्यांची अवस्था तर कल्पनेच्या पलीकडली होती. कामगारांपैकी बरेचसे मल्याळी होते. काही महाराष्ट्रातून आलेले होते. कामगार निवडताना त्यांच्या कौशल्यापेक्षा ते किती गरजू आहेत हाच विचार केलेला होता, हे दिसत होतं. पण स्वप्नील असला विचार करण्याच्या भानगडीत पडला नाही. मराठी बोलणाऱ्या काही लोकांशी त्यानं ओळख करून घेतली. ते सगळे चाळिशीच्या आसपासचे, पूर्वी असली कामं केलेले लोक होते. त्या सगळ्यांत अननुभवी आणि दिसायला सगळ्यात कोवळा स्वप्नीलच होता. त्याचं 'स्वप्नील' हे नाव ऐकून एक-दोघे फिस्सकन हसले, पण असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागणार याची स्वप्नीलला एव्हाना कल्पना आली होती. शेवटी कुणीतरी 'नील' हे नाव सुचवलं. स्वप्नीलची हरकत नव्हतीच. नील तर नील. कामाच्या पहिल्या दिवशी घट्ट इडल्या आणि पातळसर, लालभडक पण बेचव सांबार आणि आंबायला सुरुवात झालेली चटणी खाऊन तो कंपनीच्या ट्रकमधून कामाच्या ठिकाणी आला. दिवाडकरनं स्वप्नीलला कामाचं साधारण स्वरूप सांगितलं होतं. त्याच्या सुपरव्हायझरचं नाव नंबूथ्री होतं आणि स्वप्नीलला 'आपण तो सांगेल ती कामं करायची' एवढंच माहीत होतं. दिवाडकर कोची आणि मिनिकॉयला येऊन जाऊन असणार होता.
नंबूथ्री हा माणसाच्या शरीरातला राक्षस नव्हता, तो राक्षसाच्या शरीरातला राक्षस होता. सहा फुटाच्या वर काही इंच उंची, त्या उंचीला शोभेल अशीच जाडी. एके काळी त्याला व्यायामाची आवड असावी. आता तो व्यायाम सुटला होता आणि त्याचं शरीर पण आडवंतिडवं सुटलं होतं. त्याचा रंग ठार काळा होता आणि त्याचा आवाज ऐकून ट्रकमधून लोखंडी सामान उतरवताना होणाऱ्या आवाजाची आठवण होत असे. त्याला सारखा घाम येत होता आणि आपल्या गळ्याभोवती गुंडाळलेल्या एका मळकट टॉवेलनं तो सारखा घाम पुसत होता. त्याच्या पायात तळाला लोखंडी खिळे बसवलेले काळे बूट होते. त्यानं अंगात एक बिनबाह्याचं निळं जाकीट घातलं होतं आणि त्यावर जागोजागी त्याच्या घामाचे डाग दिसायला लागले होते. काही लोकांना बघताक्षणीच त्यांच्याबद्दल मनात एक अढी बसते. नंबूथ्रीच्या बाबतीत स्वप्नीलचं तसंच झालं. पण मग त्याला त्याचं गाव आठवलं, त्याची आई आठवली, बहीण आठवली आणि मग त्यानं मन घट्ट केलं. कामावर आलेल्या सगळ्या लोकांना नंबूथ्री एक पिवळ्या रंगाचं कार्ड देत होता. त्यावरच्या युनिट नंबरनुसार लोक त्या-त्या कामावर जात होते. स्वप्नीलचा नंबर आला आणि नंबूथ्रीनं त्याची ती जाड, वळ्या पडलेली मान वर करून आपल्या लालसर डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं.
"नाव ?" त्यानं गुर्मीनं विचारलं.
"स्वप्नील. स्वप्नील, परब" स्वप्नील हळूवारपणे म्हणाला.
"गाव?"
"रत्नागिरी. महाराष्ट्र" त्याच्याकडे न बघता स्वप्नील म्हणाला.
"घाटी आहेस काय?" नंबूथ्रीनं त्याच्या त्या तसल्या आवाजात विचारलं. त्यावर काय बोलावं ही स्वप्नीलला सुचेना. तो काहीच बोलला नाही.
"तोंड उघडायला काय होतंय भेंचोद?" नंबूथ्री खेकसला. स्वप्नील एकदम चमकल्यासारखा झाला. त्याला आजवर ही शिवी कुणीच दिली नव्हती.
"शिव्या देऊ नका, साहेब." त्याच्या नकळत त्याच्या तोंडून निघून गेलं.
नंबूथ्रीची पुढची कृती स्वप्नीलला अगदीच अनपेक्षित होती. "शिवी नको? मग हे चालेल?" हे नंबूथ्रीचे शब्द आणि त्याच्या झाडाच्या फांदीसारख्या बळकट हातानं दिलेली एक जोरदार थप्पड ही दोन्ही स्वप्नीलच्या कानावर एकदमच येऊन आदळले. स्वप्नील हेलपाटत खाली कोसळला. नुकतीच ओळख झालेले एकदोघे त्याच्या दिशेनं धावले. नंबूथ्रीनं आपला जाडजूड पाय मध्ये घातला. "तुला पण पायजे का, भेंचोद?" तो त्याच्या त्या तसल्या आवाजात गरजला.
वेदना, अपमान आणि अगतिकता या सगळ्या भावना चेहऱ्यावर घेऊन स्वप्नील कसाबसा उभा राहिला. त्याच्या हाताला आणि पायाला खरचटलं होतं. त्याचे कपडे धुळीनं भरले होते.
"घाटी आहेस काय?" नंबूथ्रीनं पुन्हा विचारलं.
"जी. जी साहेब, जी." स्वप्नील लाचारीनं म्हणाला.
"असं नीट बोलायचं. नाव?"
"स्वप्नील. स्वप्नील परब." स्वप्नील म्हणाला.
नंबूथ्री तुच्छतेनं हसला. स्वप्नीलला कुणीतरी अंगावर थुंकल्यासारखं वाटलं. "वर जायचं, केबल सोडायला." स्वप्नीलच्या अंगावर त्याचं पिवळं कार्ड फेकत नंबूथ्री म्हणाला. त्यानं जहाजाकडं हात केला.
केबलची भेंडाळी उलगडून ती केबल पाण्यात सोडण्याचं काम सगळ्यात कठीण आणि जीव खाणारं होतं. केबलिंगचा अनुभव असलेले लोकही हे काम आपल्या वाट्याला येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करत असत. नुसतंच कष्टाचं नव्हे तर धोकादायक काम. हलत्या जहाजात काम करण्याचा अनुभव नसलेल्या लोकांना तर ही काम करायचं म्हटलं की देव आठवत असे. स्वप्नीलला मच्छीमारी बोटींवरचा थोडासा अनुभव होता, पण त्याचा इथं काही उपयोग होणार नव्हता. पहिल्या दिवशी पाण्यावर हलणाऱ्या बोटीत तोल सांभाळत केबलचं प्रचंड भेंडोळं फिरवून ती जड केबल समुद्रात सोडताना स्वप्नीलला प्रचंड भीती वाटली. या कामाची सवय असणाऱ्या जाणकार लोकांनी त्याला थोडा धीर दिला. जहाज जसजसं समुद्रात पुढं जाईल तसतसं हे काम अधिकाधिक धोकादायक होत जाणार होतं. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी उपाय होते, पण ते अगदीच तुटपुंजे होते. आपल्याला हे काम जमणं शक्य नाही असं लक्षात आल्यावर नाइलाजानं स्वप्नील नंबूथ्रीला भेटायला गेला. दुपारची जेवणाची सुटी झाली होती. नंबूथ्री मेसमध्ये जेवत नसे. त्याचं बिऱ्हाड या बेटावरच होतं. त्याच्या घरून त्याच्यासाठी डबा येत असे. एका कप्प्यात रोट्या, दोन कप्पे भात आणि एका कप्प्यात माशाची चमचमीत आमटी. रोजचा हाच मेनू, त्यात बदल होत नसे. जेवायच्या वेळी नंबूथ्री त्याच्या अंगांतलं ते जाकीट काढून ठेवत असे. जेवण झालं की त्या जाकिटाच्या खिशातलं पाकीट काढून त्यातली कडक सिगारेट ओढत असे. त्याचा डबा नुकताच संपला होता आणि तो खुर्चीत बसून सिगारेट ओढत होता. सिगारेट पेटवलेली काडी अर्ध्यात मोडून तिनं तो आपल्या फटी असलेल्या दातांत अडकलेले अन्नाचे कण साफ करत होता. मध्येच तो थू.. थू.. असे ते कण थुंकून टाकत होता. स्वप्नील त्याच्या समोर जाऊन उभा राहिला तरी नंबूथ्रीनं त्याच्याकडं लक्षही दिलं नाही.
"नंबूथ्री साहेब" सगळं धैर्य एकवटून स्वप्नील म्हणाला. "केबल खाली सोडायचं काम जरा दुसऱ्या कुणाला देता येतं का ते बघता का?"
नंबूथ्रीनं त्याच्या लालभडक डोळ्यांनी स्वप्नीलकडे बघितलं.
"का?" तो गुरकावून म्हणाला. "तुझी फाटते का हे काम करताना?"
स्वप्नीलला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला पण त्याला वाकड्यात शिरायचं नव्हतं.
"नंबूथ्री साहेब, मला या कामाचा अनुभव नाही. खरं तर मला कुठल्याच कामाचा अनुभव नाही. नाइलाज म्हणून मला ही काम करावं लागतंय. हे काम मला झेपत नाही. माझ्या घरी माझी विधवा आई आहे, लहान बहीण आहे. घरची परिस्थिती अजिबात बरी नाही माझ्या. वडील नाहीत मला, पण तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, मला माझ्या वडिलांच्या जागी आहात. तुमच्या पाया पडतो मी." स्वप्नील खरोखर नंबूथ्रीच्या पायाशी वाकला.
नंबूथ्रीनं आपल्या काळ्या, केसाळ पायानं स्वप्नीलला झिडकारून दिलं.
"घाटी साला" तो म्हणाला. "हरामखोर, xxxत दम नाही तर इथं आलास कशाला मरायला? हे काम नको तर मग काय एसीमध्ये बसून करायचं काम पाहिजे?"
"नंबूथ्री साहेब," स्वप्नीलची कानशिलं गरम झाल्यासारखी झाली होती. "तुमचं माझ्याशी काय वैर आहे, कुणास ठाऊक. पण आल्या दिवसापासून मी बघतोय. माझा अपमान करण्याची, मला खाली बघायला लावण्याची एक म्हणजे एक संधी तुम्ही सोडत नाही. मला अनुभव नाही, म्हटल्यावर सगळ्यांत अवघड, सगळ्यांत जास्त धोका असलेलं काम तुम्ही मला दिलंत. मी त्यावरही काही बोललो नाही. बोललो नाही, याचं कारण म्हणजे नंबूथ्री साहेब, मला नोकरीची गरज आहे. तुम्ही कारण नसताना मला शिव्या दिल्या, माझं थोबाड फोडलं, पण तरीही मी गप्प राहिलो. याचं कारण नंबूथ्री साहेब, मला नोकरीची गरज आहे. फार गरज आहे. पण आता फार झालं. तुम्ही कराल तो सगळा अत्याचार मी सहन करेन असं नाही. मी महाराष्ट्रातला, मराठी आहे. शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातले लोक आहोत आम्ही. शहेनशहा आलमगीराला सळो की पळो करून टाकणारी जात आहे आमची. कामाला मी कधी नाही म्हटलं नाही, आणि म्हणणारही नाही, पण माझ्यावर सूड उगवल्यासारखं माझ्याशी वागू नका. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुमच्या वयाचा मान राखून मी तुम्हाला विनंती करतो. प्लीज, माझ्याशी असं दुष्टाव्यानं वागू नका." नंबूथ्री काही बोलेल म्हणून स्वप्नील थांबला.
नंबूथ्रीनं त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलं.
धुळीत पालथा पडलेल्या स्वप्नीलचा ओठ फाटला होता. त्याच्या ढोपरावरची कातडी सोलवटली होती. त्याच्या डोळ्यांत, तोंडात, कानात धूळ गेली होती आणि कानात होणाऱ्या गूं गूं आवाजातून त्याला नंबूथ्रीचं गडगडाटी हसणं ऐकू येत होतं. तो निश्चल पडून राहिला.
दणदण आवाज करत नंबूथ्रीची पावलं दूर गेली. स्वप्नीलनं मान उचलून वर बघितलं. धूळ डोळ्यांत जाऊन, की आणखी कशानं कुणास ठाऊक, त्याच्या डोळ्यांतनं पाणी येत होतं. त्यानं डोळे मिटले तसं ते पाणी ओघळून गालांवर आलं. काही क्षण तो तसाच पडून राहिला. मग त्याला नंबूथ्रीच्या पावलांच्या दणक्यातही घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. त्याला भवानी मातेचं मंदीर दिसलं. धुळीच्या ढगातून त्याला मुघल साम्राज्यावर चढाई करून जाणारे राजे दिसले. बलाढ्य खानाचा कोथळा काढणारी राजांची वाघनखं दिसली. राजांचा गनिमी कावा दिसला. ते सगळे जणू त्याला सांगत होते, सूड, वचपा, बदला … बदला … बदला.
**
पावसाळा अजून लांब होता, पण मान्सूनपूर्व वादळी पावसानं हजेरी लावली होती. सुजलेल्या ओठांचा स्वप्नील त्याच्या कोंदट खोलीतल्या अंथरुणावर पडून बाहेरच्या पावसाचं थैमान ऐकत होता. जोरात वीज कडाडली आणि मोठा गडगडाट झाला. स्वप्नील उठून बसला. बाहेर पहिल्या पावसाचा आवाज सुरू झाला होता. पहिल्या पावसाचा वास त्याच्या खोलीचं दार ओलांडून आत आला होता. त्याच्या खोलीच्या खिडकीचं दार बंद होतं आणि बाहेरून येणाऱ्या पावसाच्या सरी खिडकीच्या तावदानावर आपटत होत्या. तावदानावरची धूळ या पहिल्या पावसानं धुतली जात होती. पावसाचे थेंब तावदानावरच्या धुळीच्या पातळ थरातून खाली ओघळत होते. त्या थेंबांनी तावदानावरच्या धुळीत नागमोडी आकृती तयार झाली होती.
स्वप्नीलनं हात जोडले होते. 'आई, शक्ती दे. भवानी माते, मला बळ दे. मला वाट दाखव. आई. माझी काही चूक नसताना मला हे असलं सगळं सहन करायला लागतंय. याचा बदला घेण्याचा मार्ग मला सांग आई.' तो घुमत होता. लक्कन वीज चमकली आणि त्याची नजर त्या बंद खिडकीवर गेली. विंचू चावावा तसा तो ताडकन उठून उभा राहिला. एकटक नजरेनं त्या खिडकीकडे बघत उभा राहिला. खिडकीतून खाली येणाऱ्या नागमोडी ओघळांतून तयार होणारे आकार त्याला दिसले. त्यातून त्याला काही संकेत मिळाल्यासारखं वाटलं. बाहेर पुन्हा वीज चमकली.

दुसऱ्या दिवशी जेवणाच्या सुटीत स्वप्नील दिवाडकराला भेटायला गेला. दिवाडकरची आणि त्याची काही फारशी ओळख नव्हती, पण स्वप्नील फारशी खळखळ न करता कामावर आला होता, त्यामुळं दिवाडकरला त्याच्याबद्दल जरा सहानुभूती होती. शिवाय स्वप्नीलच्या घरची परिस्थिती त्याला माहीत होती. समोरच्या आकडेमोडीतून नजर वर करून दिवाडकरनं स्वप्नीलकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.
"आईची तब्येत अचानक बिघडली आहे." स्वप्नील म्हणाला. "मला एक आठवडाभर रजा पाहिजे आहे."
"तुला कामावर येऊन अजून महिनापण झाला नाही." दिवाडकर म्हणाला. "एवढ्यात रजा?"
"तसं कारण नसतं तर मी मागितलीही नसती रजा, दिवाडकर साहेब." स्वप्नील म्हणाला. "बिनपगारीसुद्धा चालेल मला. जाणं आवश्यक आहे."
"बिनपगारी तर होईलच, पण नंबूथ्री कसला माणूस आहे तुला माहिती आहे. शिवाय काही गोष्टी माझ्यापण कानावर आल्या आहेत. त्याच्याकडे रजा मागितलीस तर तो कामावरून काढूनच टाकेल तुला." दिवाडकर म्हणाला.
"म्हणूनच मी तुमच्याकडे आलो, दिवाडकर साहेब." स्वप्नील अजिजीच्या स्वरात म्हणाला. "आठ दिवस म्हणजे आठ दिवस. त्यातला एक दिवस मला जायला लागेल, आणि एक दिवस यायला. प्लीज साहेब, बहीण लहान आहे माझी. आईला काही झालं तर..." त्याला पुढे बोलवेना.
रेल्वेच्या जनरल बोगीतून चोवीस तासांचा प्रवास करून स्वप्नील रत्नागिरीच्या स्टेशनवर उतरला तेव्हा त्याचं अंग ठणकत होतं. झोप न मिळाल्यानं त्याचे डोळे तारवटले होते आणि त्याच्या अंगाला रेल्वेचा लोखंडी वास यायला लागला होता. तिथून पुढे गावापर्यंतचा प्रवास कधी एकदा संपेल असं त्याला झालं होतं. त्याला असं अचानक आलेलं बघून त्याची आई आनंदली खरी, पण त्याचवेळी मुलाविषयीच्या काळजीनं तिचं मन भरून आलं. तिला काळजी त्याच्या नोकरीची नव्हती. त्यानं एवढ्या दिक्काला जाऊन नोकरी करावी हे तिला फारसं पसंत पडलेलं नव्हतं, पण स्वप्नीलनंच तिची कशीबशी समजूत काढली होती. आपलं सगळं ठीक आहे, आपण सहज म्हणून एक-दोन दिवसांसाठी आलो आहोत असं तिला सांगून स्वप्नील आंघोळीला गेला आणि तिची समजूत पटली नसूनही एक नि:श्वास सोडून त्याची आई स्वयंपाकाला लागली.
आईच्या हातचं गरम आणि चविष्ट जेवून आणि दुपारची झोप काढून स्वप्नील त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडला. बाहेर जाताना त्यानं एक मध्यम आकाराची काचेची बरणी मागितली तेव्हा ती कशासाठी पाहिजे आहे हे विचारावं असं वाटूनही आईनं विचारलं नाही. स्वप्नीलनं ती घट्ट झाकणाची बरणी घेतली आणि तिच्या झाकणाला दाभणानं लहान लहान भोकं पाडली तेव्हाही ती काही बोलली नाही. स्वप्नील मित्रांना भेटायला जाणार म्हणजे कुणाकडे जाणार हे तिला माहीत होतंच. त्याचा शाळा कॉलेजमधला सवंगडी सूरज. प्राणीशास्त्राचा विद्यार्थी आणि अलिबाग प्राणिमित्र संघटनेचा धडाडीचा कार्यकर्ता सूरज. प्राण्यांची सुटका करणं आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडणं यांची आवडच नव्हे तर वेड असणारा सूरज.
स्वप्नील परत आला तेव्हा त्याच्या हातात ती बरणी नव्हती.
कोचीला जाणाऱ्या गाडीत सेकंड एसीच्या जागा उपलब्ध असूनही स्वप्नीलनं प्रथम वर्गाच्या डब्यातून जायचा निर्णय घेतला होता. आरामशीर सीटस, स्वच्छता, गर्दी नाही असलं सगळं असूनही स्वप्नीलला एक मिनिटही झोप लागली नाही. दर पंधरा मिनिटांनी तो दचकत होता आणि आपल्या सीटच्या खाली ठेवलेल्या एयरबॅगकडे बघत होता. ती बॅग उघडून बघण्याचा मोह त्यानं मोठ्या निग्रहानं टाळला होता. कोचीला उतरून मिनिकॉय बेटावर पोचेपर्यंत स्वप्नीलला चैन म्हणून पडली नाही. मिनिकॉयला तो पोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. घाईघाईनं तो आपल्या खोलीत गेला, खोलीचं दार आतून बंद करून घेतलं आणि अगदी सावकाशपणे, अगदी काळजीपूर्वक त्यानं ती एयर बॅग उघडली.
आत एका पातळसर कापडात चार चार गाठी बांधलेली ती बरणी होती. स्वप्नीलनं हलक्या हातानं त्या कापडाच्या गाठी सोडल्या, बरणीचं झाकण घट्ट आहे ना याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि ती बरणी खोलीतल्या एकमेव टेबलवर ठेवून त्यानं आपला चेहरा त्या बरणीच्या जवळ आणला.
बरणीच्या आत असलेल्या पालापाचोळ्यातून तपकिरी, वाळूसारख्या रंगाचे एक लहानसे त्रिकोणी डोके बाहेर आले. त्या डोक्यावर बाणासारखी पांढरी खूण होती. डोक्याच्या दोन्ही बाजूंना भिजलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे दिसणारे दोन चमकदार डोळे होते. बंद तोंडातून दुभंगलेली जीभ आतबाहेर होत होती. पाचोळ्यात खाली वळसे एकमेकांवर घासले जात होते. त्याचा खसखस असा आवाज येत होता.
"कंटाळला असशील, मित्रा फरूडा. प्रवासात फार त्रास नाही ना झाला?" स्वप्नीलनं विचारले.
बरणीतून पुन्हा खसखस आवाज आला.
फरूड! एकिस कॅरिनॅटस! फुरसे!
भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूला कारणीभूत असणारा साप! आकारानं लहान पण अत्यंत आक्रमक आणि चिडक्या वृत्तीचा साप. भारतात सगळीकडे आढळणारा आणि उष्ण हवामानाला फारशी दाद न देणारा चिवट आणि अत्यंत धोकादायक साप!
"भूक लागली असेल ना, मित्रा? थांब, त्याची सोय आहे आपल्याकडे." स्वप्नील म्हणाला. हातात रबरी मोजे चढवून त्यानं दुसरी बरणी उघडली. बरणीच्या तळाला दोन लहानसे पांढरे उंदीर गोल गोल फिरत होते. एका चिमट्यानं स्वप्नीलनं त्यांतला एक उंदीर उचलला, त्या बरणीचे झाकण बंद केले आणि फुरसे असलेल्या बरणीचे झाकण किंचित किलकिले करून तो उंदीर आत टाकला आणि झटकन त्या बरणीचेही झाकण बंद केले.
दोनपाच सेकंद तो उंदीर अनिश्चिततेनं स्तब्ध राहिला, त्याचे गुलाबी नाक जरासे फुरफुरले. मग त्यानं किंचितशी हालचाल केली.
पाचोळ्यातून ते चपटे त्रिकोणी डोके विजेच्या चपळाईनं बाहेर आले, काही कळायच्या आतच त्या उंदरावर त्या डोक्याचा आघात झाला आणि परत ते डोके त्या वाळलेल्या पाचोळ्यात दिसेनासे झाले. उंदरानं जागेवर उड्या मारल्या पण थोड्याच वेळात त्याचे सगळे शरीर थरथरू लागले. त्याच्या अंगाला झटके आल्यासारखे झाले. पाचोळ्यातून सापाचे डोके पुन्हा बाहेर आले आणि मग अगदी सावकाशीनं त्यानं त्या उंदराला त्याच्या तोंडाच्या भागाकडून गिळायला सुरुवात केली.
स्वप्नील समाधानानं हसला. त्यानं फुरशाची ती बरणी परत त्या पातळसर फडक्यात बांधली. ती बरणी एयर बॅग मध्ये ठेवली आणि ती बॅग आपल्या खाटेच्या खाली, अजिबात इकडे तिकडे होणार नाही अशा बेतानं ठेवून दिली.
स्वप्नीलचा प्लॅन अगदी साधा होता. नंबूथ्रीच्या त्या निळ्या जाकिटाला दोन्ही बाजूंनी दोन भले मोठे खिसे होते. दुपारचं जेवण संपवून नंबूथ्री हात तोंड धुवायला बाहेरच्या बेसिनवर जात असे. तिथं अगदी खाकरून खोकरून तोंड धुवून झालं की तो समाधानानं ढेकर देत असे आणि मग डुलत डुलत त्याच्या जागेवर जात असे.मग तो जाकिटाच्या खिशातून सिगारेटचं पाकीट, काडेपेटी काढून खुर्चीत बसत असे. एवढं सगळं करायला त्याला बक्कळ दहा मिनिटं लागत असत. स्वप्नीलला तेवढी पुरेशी होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला जाण्याआधी स्वप्नीलनं अतिशय काळजीपूर्वक त्या फरूडाला बरणीतून एका चपट्या डबीत काढून घेतले. त्या चपट्या पेटीच्या झाकणालाही त्यानं काही अगदी लहान छिद्रे पाडून ठेवली होती. त्या डबीचे झाकण त्यानं दोन्ही बाजूला जाड रबरबँड लावून बंद केले आणि ती डबी आपल्या नेहमीच्या सॅकच्या बाहेरच्या कप्प्यात ठेवून तो कामावर आला. दुपारची जेवणाची सुटी होईपर्यंत त्याचं कामात अजिबात लक्ष नव्हतं. नंबूथ्री तोंड धुवायला बाहेर येताच तो त्याच्या केबिनमध्ये शिरला. धडधडत्या छातीनं त्यानं ती डबी उघडली आणि खुंटीला लावलेल्या जाकिटाच्या खिशात रिकामी केली. सिगारेट पाकीट आणि काडेपेटीनं फुगलेला त्या जाकिटाचा खिसा आणखी थोडा फुगला. रिकामी डबी आपल्या सॅकमध्ये कोंबून स्वप्नील मागे वळाला आणि त्याच्या मागेच उभा असलेला नंबूथ्री त्याला दिसला. स्वप्नीलला बघून त्यानं भुवया उंचावल्या.
"काही नाही, आठवडाभर रजेवर होतो ना, ते तुम्हाला सांगायचं होतं." स्वप्नील खोट्या अदबीनं म्हणाला. "जायच्या आधी तुम्हाला भेटायला जमलं नाही, म्हटलं आता सांगावं." त्याला पुढे काय बोलावं ते कळेना. नंबूथ्रीनं पाहिलं असेल का आपल्याला त्याच्या जाकिटात... त्याला काही सुचेना.
"पैसे कापणार तुझे, जितके दिवस खाडा झाला तितक्या दिवसांचे." नंबूथ्री म्हणाला. "या वेळी ठीक आहे, पण पुन्हा मला न सांगता, माझी परवानगी न घेता कुठं गेलास तर लाथ मारून हाकलून देईन." नंबूथ्रीचा हात त्याच्या जाकिटाकडे गेला.
नंबूथ्रीला कसाबसा नमस्कार करून स्वप्नील जवळजवळ धावतच त्या खोलीबाहेर पडला.
जाकिटाच्या खिशात हात घालून नंबूथ्रीनं सिगारेटचं पाकीट आणि काडेपेटी बाहेर काढली. त्यानं सिगारेट पेटवली आणि समाधानानं एक झुरका घेतला.
"नंबूथ्री, तुझ्या जाकिटाच्या खिशात काय आहे?" शेजारच्या टेबलवरच्या कृष्णननं विचारलं.
"कुठं काय?"
"मला काहीतरी वळवळल्यासारखं वाटलं." कृष्णन म्हणाला. नंबूथ्रीनं खिशात हात घातला आणि लगेचच बाहेर काढला.
"आयला, टोचलं मला काहीतरी." तो म्हणाला. "काय भानगड आहे?"
त्यानं जाकीट उलटं केलं तसा तो वळवळणारा जीव त्याच्या टेबलवर पडला. त्या गुळगुळीत पृष्ठभागावरून सरकणं त्याला अवघड होत होतं.
"साप!" कृष्णन भेदरून ओरडला.
"खुळा का काय तू कृषण्या?" नंबूथ्री खदाखदा हसला. "माहिती नाही का तुला. इथं लक्षद्वीपवर साप नाहीत. ही सापसुरळी असेल. नाहीतर गांडूळबिंडूळ काहीतरी."
"काही असो, आपल्याला ती बैदा नकोच. मारूनच टाकतो त्याला." कृष्णन म्हणाला. त्यानं पायताण काढून हातात घेतलं.
"थांब, थांब जरा." नंबूथ्री म्हणाला. "जरा गंमत करू. ते आत्ता बाहेर गेलं ते आहे ना, घाटी आहे ते. त्याच्याकडं असतात असले प्राणी. जरा गंमत करूया त्याची."
"काय करणार आहेस तू?"
"बघशीलच तू" अंगात जाकीट अडकवत नंबूथ्री म्हणाला. त्यानं त्या प्राण्याला उचलून जाकिटाच्या खिशात टाकलं आणि सिगारेटचा एक झुरका घेतला. "चल जरा बाहेर, गंमत बघ."
दाराच्या बाहेरच स्वप्नील उभा होता. नंबूथ्रीला बघताच तो चपापला.
"घाटी," नंबूथ्री म्हणाला. "ये लो तुम्हारे लिए गिफ्ट."
स्वप्नीलच्या अंगावर ते वळवळते भेंडोळे पडताच तो किंचाळला. उडी मारून बाजूला झाला. नंबूथ्रीची हसून हसून पुरेवाट झाली.
"साप! विषारी साप!" स्वप्नील ओरडला. त्याचे डोळे प्राणभयानं फुटायला आल्यासारखे झाले होते. "मारा त्याला, मारून टाका. कुणाला चावलाबिवला तर जीव जाईल. " तो किंचाळला.
"भेकड साला!" नंबूथ्री म्हणाला "भित्रट, अरे, हा काही तुझा मराठा इलाखा नाही. इथं लक्षद्वीपवर साप नाहीत . हे कसलं सालं किरडू आहे कुणास ठाऊक!" शेपटी धरून त्यानं त्याला उचललं. त्या प्राण्यानं त्याच्या मनगटावर उसळी घेतली. "घे की तुझी भेट!" स्वप्नीलच्या दिशेनं भिरकावत तो हसला. स्वप्नील चपळाईनं बाजूला झाला. शेजारच्या झुडपात खसफस झाली आणि तो जीव त्या झुडपांत दिसेनासा झाला.
दुपार झाली.
वाकून काम करणारा नंबूथ्री उठून उभा राहिला. त्यानं आपला हात आपल्या घामानं डबडबलेल्या कपाळावरून फिरवला आणि घाम निपटून टाकला. "कृष्णन, मला थोडं बरं वाटत नाहीये. मी आतमध्ये जरा वेळ पडतो. चहा आला की उठव मला. "
चहा आला आणि नंबूथ्रीला उठवायला कृष्णन आतमध्ये गेला. नंबूथ्री एका बाजूला कसातरीच वाकडा होऊन झोपला होता. कृष्णननं त्याला हाक मारली पण त्यानं काहीच प्रतिसाद दिला नाही. जवळ जाऊन कृष्णननं त्याला सरळ केलं तेव्हा त्याची मान वाकडी होऊन एका बाजूला कलली. त्याचे अर्धवट उघडे निर्जीव डोळे काहीही बघण्याच्या पलीकडे गेले होते.
संध्याकाळ झाली होती. नंबूथ्रीचे अंत्यविधी आटोपून सगळे कामगार चाळीत परतले होते. हलक्या आवाजात कुजबूज चालू होती. उन्हात बराच वेळ काम केल्यानं मेंदूत रक्तस्राव होऊन नंबूथ्री मरण पावला असं इस्पितळातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावर कुणाचं काही म्हणणं नव्हतं.
जेवण झाल्यावर कुणाशी न बोलता आपल्या खोलीत जाणारा स्वप्नील रात्री बाहेर पडलेला बघून त्याच्या शेजाऱ्याला नवल वाटलं. "जरा नंबूथ्रीच्या ऑफिसपर्यंत जाऊन येतो." स्वप्नील न विचारताच म्हणाला. "जिथं नंबूथ्री गेला त्या जागेवर जाऊन येतो."
"तुम्हां लोकांमध्ये अशी श्रद्धांजली वाहतात काय? अशी पद्धत असते?" शेजाऱ्यानं विचारलं.
"हां, तसंच म्हणायचं." स्वप्नील म्हणाला.
दिवसा गजबजलेला तो परिसर रात्रीच्या शांततेत वेगळाच वाटत होता. हातातल्या टॉर्चच्या उजेडात चालत स्वप्नील नंबूथ्रीच्या केबिनपर्यंत आला. इथेच... काही तासांपूर्वीच… भीतीची एक थंड सणक स्वप्नीलच्या मणक्यांतून निघून गेली. त्यानं आसपास बघितलं. सगळीकडे शांतता होती.
"फरूडा, कुठं आहेस तू?" स्वप्नील म्हणाला. "तुला ऐकू येतंय का, मित्रा? तुला ज्या कामासाठी मी घेऊन आलो ते तू केलंस. पण ते केल्यावर तुला मरून जायचं होतं. मीच तुला मारणार होतो. तू असं निसटून जायला नको होतंस."
रात्रीच्या शांत वातावरणात दुरून समुद्राची गाज अस्पष्ट ऐकू येत होती.
"मी तुला मारणार हे तुला कळलं की काय? पण नाही, एवढी बुद्धी काही तुम्हा लोकांना नसते. पण तू निसटून जायला नको होतंस. पण फरूडा, तू निसटलास तरी असा फार दिवस राहू शकणार नाहीस" स्वप्नील म्हणाला. "ऐकलंस का? तू काही दिवस, काही महिने, फार फार तर काही वर्षं जिवंत राहशील आणि मग एकटा मरून जाशील. तुला तुझी वीण वाढवता येणार नाही. तुला संतती होणार नाही. कारण फरूडा, इथं तुला कुणी जोडीदार भेटणार नाही. इथं साप नाहीत, ऐकलंस का फरूडा, लक्षद्वीपवर साप नाहीत."
फरूडाला त्याचे शब्द ऐकू आले नाहीत. ऐकू आले असते तरी तिनं त्यांकडे किती लक्ष दिलं असतं कुणास ठाऊक. निसर्गानं तिच्यावर सोपवलेली, उत्क्रांतीच्या घुसळणीतून शिल्लक राहिलेली, एक आदिम पण महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात ती मग्न होती.
दोन दगडांच्या कपारीत, अंधाऱ्या ओलसर जागी ती फरूड अंगाचे वेटोळे करून बसली होती. तिच्या शेपटीकडचा भाग ताठ झाला होता आणि शतकानुशतकांच्या अनुवांशिक वारशाला प्रतिसाद द्यावा तसा थरथरत होता. फरूडाच्या मागच्या भागात एकावर एक असलेल्या खवल्यांच्या आत त्यांचे जननेंद्रिय असते. त्यावरचे खवले विलग झाले होते आणि लहानशा पारदर्शक कोशांमध्ये गुरफटलेल्या, अगदी लहान पण जन्मत:च आपल्या आई-वडिलांइतक्याच विषारी असणाऱ्या आपल्या डझनभर बाळांना ती फरूड जन्म देत होती.
(मध्यवर्ती कल्पना फ्रेडरिक फोरसाईथ, 'देअर आर नो स्नेक्स इन आयर्लंड')