लखलख चंदेरी रुपयांची न्यारी दुनिया

लहानपणी वाचलेल्या अद्भुत कथांमध्ये एखादा राजा काही खास कारणाने एखाद्या सामान्य माणसाला आपल्या गादीवर तात्पुरता बसवायचा. अशा माणसाला काही काळापुरते का होईना पण परमानंद वगैरे वगैरे जे काही वाटत असेल याची मलादेखील माझ्या लहानपणी बरोब्बर कल्पना होती. कधी तरी राजकृपेने सिंहासनावर बसायला मिळाले म्हणून नव्हे पण …
ज्या काळी लखलखणारा चांदीचा बंदा रुपया, किंवा इतरही थोड्या कमी किमतीची पण तरीही खास नाणी (कारण चांदीची आणि म्हणून लखलखणारी) काहीतरी उत्तम केल्याचे बक्षीस म्हणून मिळत असत त्या पिढीतला मी आहे. त्या बालवयात असे आगळे बक्षीस मिळणे आणि ते नंतर आईच्या हाती काळजीपूर्वक ठेवण्यासाठी देईपर्यंत(च) खिशात बाळगणे हे अगदी नोबेल पारितोषिकाचा मानकरी असण्याच्या तोलामोलाचे असे. माझ्या खिशातल्या चांदीच्या नाण्यांमुळे मला वाटलेला जग जिंकल्याचा रुबाब अशाच सारखे काहीतरी त्या लहानपणी वाचलेल्या अद्भुत कथांमधल्या औट घटकेच्या राजाला वाटले असणार.
माझ्या लहानपणचा काळात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही वर्षे ब्रिटिश काळातील नाणीदेखील वापरात होती. त्या काळातील "चांदीचा राजा छाप रुपया" हे रोजच्या व्यवहारातील सगळ्यात जास्त किमतीचे नाणे असायचे. अशी नाणी जेव्हा इंग्रजानी सुरू केली त्या वेळी त्यांना "कलदार रुपये" असे म्हणत. स्वातंत्र्यानंतर नाण्यांवरील "राजा" छाप तर गेलाच पण चांदीचा अंशही कमी झाला. त्या आधीच्या काळात तर चांदीची वेगवेगळ्या छापाची आणि ब्रिटिश रुपयांपेक्षा कमी-जास्त किमतीची रुपयाची नाणी व्यवहारात असत. हे जरी "गोंधळाचे" विधान वाटत असले तरी हे का आणि कसे ही माहिती पुढे येईलच.
आताच्या UPI, Credit/Debit Card किंवा Digital Payments जगात "चलनी नाणी" (नोटा नव्हेत) हा प्रकार फार थोडा वापरला जातो. एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बँका, चेक अशा गोष्टी फारशा उपलब्ध नसल्यामुळे रोजचे व्यवहार मुख्यत्वे करून नाण्यांतच चालत आणि अशी बरीच नाणी जवळ ठेवावी लागत. यातील किंमती नाणी (जी चांदीची म्हणजे चंदेरी असत आणि रोज नसली तरी बरीच, विशेषतः मोठ्या व्यवहारांत वापरली जायची) त्यांची ओळख करून देण्याबद्दलचा हा लेख आहे.
भारतीय चलनाचे नाव "रुपया" हेच मुळात चांदीच्या संस्कृत संज्ञेवरून ("रौप्य") आलेले आहे. त्यापेक्षाही जुन्या काळातील आणखीनच "किमती" नाणी सोन्याची असत. ती रोजच्या व्यवहारात क्वचितच वापरली जात. त्यांना जरी सरधोपटपणे "मोहर" म्हटले जात असले तरी त्यांच्यातील सोन्याच्या प्रमाणानुसार त्यांचे व्यवहारातील मूल्य ठरत असे. त्यांच्या वापराचे एक अगदी काव्यमय वर्णन विठ्ठलभक्त दामाजीपंतांच्या वतीने कर भरतांना विठ्ठलाने काय केले ते सांगताना श्री. पु. ल. देशपांड्यांनी इतके छान केले आहे की अगदी आपल्या नजरेसमोर तो प्रसंग साकार होतो.
"खळखळा ओतल्या मोहरा, घ्या जी, मोजून पावती करा"
ब्रिटिश काळातल्या भारतीय "मोहरा" साधारणतः ११.६६ ग्राम वजनाच्या २२ कॅरट शुद्धतेच्या असत. अशा (फक्त) एका मोहरेची सध्याची किंमत सुमारे १.२ ते १.४ लाख (भारतीय) रुपये. त्या शिवाय एखादे मोहरेचे नाणे किती दुर्मीळ (त्यावरील शिक्का, जेव्हा तयार झाले ते वर्ष, इत्यादी, याप्रमाणे ) आणि त्याची झीज/चकाकी अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन सध्याची बाजारी किंमत अनेक पटीने जास्त देखील असू शकेल.
प्राचीन काळापासून एकेका नाण्याची बरीच किंमत असल्यामुळे सोन्याच्या "मोहरा" संपत्तीच्या साठ्याकरता चांगल्या समजल्या जात; कारण थोड्या जागेत खजिन्यातील बरीच संपत्ती साठवली जाऊ शकत असे. व्यापारासाठी चांदीची नाणी जास्त वापरली जात कारण सोन्यापेक्षा चांदीची शुद्धता तपासणे जास्त सोपे असे. अगदी बोलीभाषेत सुद्धा एखाद्याची सचोटी "बंद्या रुपयांप्रमाणे खणखणीत" असल्याचे सांगितले जाते. चांदीचा रुपया दगडी फरशीवर आपटल्यावर खणखणीत वाजतो आणि त्यांत जर काही हीण मिसळलेले असेल तर तो "बद्द" वाजतो हे मीदेखील पाहिले आहे.
१९४७च्या आधीच्या (आणि १८५७च्या नंतरच्या) काळातील ब्रिटनच्या अधिपत्याखालील भारतातील चांदीच्या रुपयांवर एका बाजूला त्या काळातल्या राणी/राजा यांचा चेहेरा व इंग्रजीतील नाव आणि दुसऱ्या बाजूला वेलबुट्टी, नाणे बनवल्याचे वर्ष, नाण्याचे मूल्य अशी माहिती असे. ईस्ट इंडिया कंपनीने आपला भारतातील कारभार अठराव्या शतकात सुरू केल्यापासून आपल्या छापाची चांदीची (आणि इतरही) नाणी पाडणे आणि व्यापारात वापरणे सुरू केले होते. १८५७ सालानंतर भारताचा कारभार ब्रिटिश सरकारने हाती घेतल्यामुळे व्हिक्टोरिया राणीचा चेहरा जरी सन १८४०पासूनच्या नाण्यावर वापरला जात असला तरी १८६२च्या नंतरच्या नाण्यांवर ईस्ट इंडिया कंपनीचे नाव असे. त्यानंतर १९०१पर्यंतच्या नाण्यांवर तिचे वर्णन साम्राज्ञी (Empress) असे करण्यात येत असे. सम्राट सातव्या एडवर्डचा चेहेरा सन १९०३पासून सन १९१०पर्यंत, तर सम्राट पाचवा जॉर्ज याचा चेहरा सन १९११पासून सन १९३६पर्यंत आणि सम्राट सहाव्या जॉर्जचा चेहेरा सन १९३८पासून सन १९४७पर्यंत रुपयाच्या नाण्यावर वापरला गेला. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यामुळे नाण्यांवर ब्रिटिश राजा-राणींची चित्रे वापरणे थांबले.
आणखीही एक महत्त्वाचा बदल म्हणजे १९४० सालच्या आधीची रुपयाची नाणी पूर्णतः चांदीची (म्हणजे ०.९१७ दर्जाची) होती; पण दुसऱ्या महायुद्धातल्या चांदीच्या टंचाईमुळे १९४०नंतरची नाणी ५०% चांदी वापरून केली गेली. १९४६पासून तर रुपयाच्या नाण्याकरता पूर्णपणे तांबे आणि निकेलचा मिश्र धातू वापरला जाऊ लागला.
|
|
ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई (१६७२ सालापासून), कलकत्ता (अठराव्या शतकाच्या मध्यापासून) आणि मद्रास (१६४० सालापासून ) अशा तीन टांकसाळी प्रथम मुगल बादशहाच्या आणि नंतर ब्रिटिश राजा/राणीच्या शिक्क्याची नाणी भारतातल्या वापराकरता बनवत असत. त्याखेरीज त्या काळात भारतातील अनेक संस्थाने कधी स्वतःचा मोठेपणा दाखवता यावा म्हणून तर कधी मुगल बादशहाच्या परवानगीने, आपल्या संस्थानातील व्यापारासाठी चलन म्हणून किंवा शेतसारा/कर अशांसाठी आपल्या किंवा मुगल बादशहाच्या शिक्क्याची चांदीची (आणि इतरही) नाणी तयार करत. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्तीवर भारतात वावरणाऱ्या फ्रेंच, डच, पोर्तुगीज, डॅनिश इत्यादी युरोपियन कंपन्यादेखील आपली नाणीदेखील व्यापारात वापरली जावी अशा प्रयत्नात असत. सगळेच जरी व्यापारी सोय म्हणून मोठ्या किमतीच्या नाण्यांसाठी चांदी वापरत असले तरी अशा सगळ्या विविध नाण्यांतील कांही हाताने ठोकाठोकी करून बनवल्यासारखी ओबडधोबड तर काही अगदी सुबक आणि चोख वजन माप आणि कसाची असत. त्यामुळे अठराव्या शतकात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या, दर्जाच्या आणि शुद्धतेच्या चांदीच्या नाण्यांची नुसती भाऊगर्दी झाली होती.
ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ साली प्लासीची लढाई जिंकल्यावर व्यापाराखेरीज राज्यविस्तारही सुरू केला त्या वेळी भारतात सहाशेपेक्षा जास्त वेगवेगळ्या आकाराची आणि आर्थिक/सैनिक ताकदीची संस्थाने होती. वेगवेगळ्या मार्गांनी ईस्ट इंडिया कंपनीने संस्थानांचा राजकीयच नव्हे तर व्यापारी प्रभावदेखील सतत कमी करत ठेवला. तरीदेखील १९४७ साली भारत स्वतंत्र होताना सुमारे ५६५ संस्थाने अस्तित्वात होती यावरून कल्पना करता येईल की अशा बऱ्याचशा संस्थानांनी जर आपापली नाणी तयार करून जमेल तशी संबंध भारतभर बाजारांत वापरासाठी पाठवून देणे चालूच ठेवले असते तर किती गोंधळ माजला असता.
अनेक संस्थानांची जी चांदीची रुपयांची नाणी (तसेच इतरही) नाणी व्यवहारात वापरली जात, त्यांना वेगवेगळी नावेदेखील असत. पेशवाईच्या काळातल्या "अंकुशी रुपया"वर गणपतीचे शस्त्र अंकुश याची प्रतिमा असे. इंदूर/होळकर संस्थानाच्या रुपयावर त्यांचे प्रतीक असलेल्या सूर्याचे चित्र असे आणि त्याला "चांदवडी रुपया" म्हणत. बडोदा संस्थानाच्या रुपयाला "बाबाशाही" किंवा "सियाशाही" रुपया म्हणत.
एकोणिसाव्या शतकात किंवा त्याही आधी संपूर्ण भारतभरातील वेगवेगळ्या तऱ्हेच्या चलनी नाण्यांच्या देवघेवीत सुसूत्रता राखणारे लोक म्हणजे "सराफ" (Shroff). जेव्हा मोठ्या व्यवहारासाठी किंवा वस्तूंच्या खरेदी/विक्रीसाठी वेगवेगळ्या तऱ्हेची नाणी (जसे विविध संस्थानांनी बनवलेली किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या शिक्क्याची) दिली/घेतली जात तेव्हा ते व्यवहार पूर्ण होण्याआधी किंमत म्हणून दिल्या जाणाऱ्या सगळ्या नाण्यांची किंमत सर्वमान्य परिमाणात ठरवणे गरजेचे असे. जसे मालाचा दर जर ईस्ट इंडिया कंपनी बनवत असलेल्या (सुरती) रुपयात ठरला असेल आणि खरेदी करणाऱ्याने जर बडोदा संस्थानाचे आणि इंदूर संस्थानाचे रुपये आणले असतील तर सराफ लोक (बडोदा आणि इंदूर संस्थानांच्या रुपयांच्या त्या वेळच्या सुरती रुपयांतल्या किमती आणि त्यांचा उठाव यांनुसार) खरेदी करणाऱ्याने आणलेले रुपये पुरेसे आहेत (किंवा नाही) याची हमी माल विकणाऱ्याला (काही शुल्क आकारून) देत. अशी हमी देण्यासाठी ते त्यांच्या समोर आलेल्या नाण्यांना कस लावून त्यातील चांदीचा अंश असायला हवा तेवढा आहे ना याचा अंदाज घेत, नाण्यांची स्थिती (घासलेली, गुळगुळीत झालेली नाणी म्हणजे किमतीत घट) पाहात आणि अशा नाण्यांचा पुरवठा आणि त्या करता असलेली मागणी अशा अनेक बाबींवर विचार करत. ज्या नाण्यांची ते खात्री देत त्यावर ते त्यांची खूण म्हणून एखादा ठसा उमटवत. नाण्यांची किंमत ठरवताना ते अधिकृत किमतीतून करण्याची वजावट (ज्याला "बट्टा" म्हणत) ठरवून देत. मिळालेल्या नाण्यांवरचे टांकसाळींचे शिक्के आणि त्यांची खात्री केल्याबद्दलचे सराफांनी उमटलेले ठसे या दोन्ही गोष्टी आणि त्यांनी ठरवून दिलेली वजावट हे लक्षात घेऊन, खरेदीदाराने आणलेल्या सगळ्या तऱ्हेच्या नाण्यांमधून विकलेल्या मालाची पूर्ण किंमत हातात आल्याची खात्री आणि त्याबद्दलचे सगळे हिशोब जेव्हा सगळ्या पक्षांना मान्य होत असत तेव्हाच मोठे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण होत असत.
एखाद्या नाण्यांवर हमी म्हणून ज्या सराफाने आपला ठसा उमटवला असेल त्या सराफाच्या बाजारातील पतीप्रमाणे त्याच्या ठशाची सर्वमान्यता ठरत असे. त्यामुळे ते नाणे बनवणाऱ्या इतकेच महत्त्व त्याची सर्वतोपरी छाननी करून किमतीची हमी देणाऱ्या सराफालाही असे. त्यामुळे वेगवेगळ्या स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर काम करणाऱ्या सराफांचा त्या भागातील सगळ्याच खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर प्रचंड प्रभाव असे. ज्या सराफी पेढ्यांच्या अनेक ठिकाणी शाखा असत आणि म्हणून त्या पेढ्या अनेक ठिकाणच्या व्यवहारात सोयीस्कर ठरत, त्यांचा एकूणच जास्त दबदबा असे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील काही नामवंत पेढ्यांची नावे पुढे दिली आहेत. त्या खेरीज पूर्ण दक्षिण भारतात अनेक चेट्टीयार कुटुंबे वेगवेगळ्या शहरांतील त्यांच्या परिवाराने चालवलेल्या शाखांच्या तर्फे असेच (चांदीच्या) चलनी नाण्यांचे आणि हुंडीचे व्यवहार करीत.
- जगत सेठ : बंगाल, बिहार आणि उत्तर/पूर्व भारतातील सगळ्यात मोठी पेढी
- लाला काश्मिरी मल: बनारस
- गोपालदास मनोहरदास : बनारस
- बसक : कलकत्ता
- ताराचंद घनश्यामदास : मुंबई, पश्चिम भारत आणि कलकत्ता
- जयरामदास भवानदास : मुंबई, पश्चिम भारत आणि कलकत्ता
सध्या जसे अनेक बँका आणि त्यांच्या शाखांची जाळी पूर्ण भारतात आहेत आणि कुठलेही व्यवहार धनादेश (चेक) किंवा वेगवेगळ्या पैसे देण्याच्या पद्धती वापरून विनासायास होऊ शकतात तशा तऱ्हेची यंत्रणा अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातच काय पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अस्तित्वातच नव्हती. एखाद्या सराफी पेढीच्या शाखेत रोकड (नाणी किंवा नोटांच्या) जमा करून त्या सराफी पेढ्यांच्या इतर ठिकाणी असलेल्या शाखांच्या (किंवा इतर सराफांच्या) नावे हुंडी मिळवल्यास प्रत्यक्ष रोकड बरोबर ठेवून व्यापारासाठी फिरण्याची जोखीम टाळता येत असल्याने काही शुल्क देऊनही नामवंत सराफी पेढ्यांच्या मार्फत व्यवहार करणे सोयीचे ठरत असे.
वेगवेगळ्या तऱ्हांनी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत, जमेल त्या पद्धतीने भारतातील संस्थानांवरचा आपला पगडा सदैव वाढवत राहण्याच्या ब्रिटिश खटाटोपात कायदा, लालूच आणि दबाव या माध्यमातून संस्थानी चलन हळूहळू रद्दबातल करण्याच्या इंग्रजांच्या प्रयत्नामध्ये खालील टप्पे होते –
१. ईस्ट इंडिया कंपनीच्या तीन वेगवेगळ्या टांकसाळीतून १८३५ सालाआधी तीन वेगळ्या पद्धतीची नाणी व्यापारात येत. एका नव्या कायद्यानुसार १८३५ नंतर कंपनीच्या तीनही टांकसाळी सारख्याच तऱ्हेची नाणी बनवू लागल्या. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची आधी तीन ठिकाणी विखुरलेली जाणारी शक्ती हवी तिथे केंद्रित करता येऊ लागली.
२. ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातील भारताचा कारभार १८५८ सालानंतर ब्रिटिश सरकारच्या हातात गेल्यावर जी संस्थाने स्वतःची नाणी आपापल्या टांकसाळीतून तयार करत असत त्यांना येनकेन प्रकारेण त्यांच्या टांकसाळी बंद करायला लावून किंवा त्यांच्या सोने/चांदीच्या वापरावर निर्बंध आणून किंवा त्यांच्या रुपयांवर ब्रिटिश राजा/राणीचा चेहेरा असण्याची सक्ती करून, त्यांच्या नाण्यांचा बाजारपेठेतील पुरवठा कमी करून त्या ऐवजी सर्वत्र सारख्याच परिमाणाची ब्रिटिश भारतीय नाणीच वापरली जावीत यावर भर दिला.
३. या सगळ्या कारणांमुळे २०व्या शतकाच्या सुरुवातीला हैदराबाद/निझाम संस्थान, बडोदा संस्थान, इंदूर/होळकर संस्थान , जयपूर, उदयपूर, कच्छ, त्रावणकोर अशा काही मोजक्याच आर्थिक आणि व्यापारीदृष्ट्या मोठ्या आणि महत्त्वाच्या संस्थानांना त्यांच्या टांकसाळीतून वेगवेगळ्या पद्धतीची नाणी पुरवत राहण्याची परवानगी ब्रिटिशांकडून चालू राहिली.
पेशवाई बुडल्यानंतरच्या काळात (सन १८१८नंतर) ब्रिटिशांनी बऱ्याच संस्थानांची स्वायत्तता आणखीनच मर्यादित केली. अशा सगळ्या बदलांमुळे बाजारातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चांदीच्या नाण्यांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यापार विनिमयासाठी जरूर असणाऱ्या सराफांच्या धंद्यावर मात्र गदा आली आणि सराफीच्या व्यवसायातील बऱ्याच कुटुंबाना इतर उद्योग शोधावे लागले. पुण्यातील सुगंधी द्रव्यांच्या व्यवसायातील "दामोदरदास भगवानदास" या पेढीचा इतिहास एक उदाहरण म्हणून पाहता येईल. त्या पेढीने १८७२ साली सुगंधी द्रव्यांच्या व्यवसायात पदार्पण करण्याआधीच्या काळात, विशेषतः पेशवेकाळात त्यांचे पूर्वज सराफीचा व्यवसाय करत. पुण्यात पेशवाईच्या काळात पेशव्यांच्या "अंकुशी" रुपयाखेरीज इतर संस्थानांच्या चांदीच्या नाण्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे अनेक सराफांना अशा नाण्यांचे मूल्यमापन करण्याचा धंदा करतात येई. सन १८१८ नंतर हा व्यवसाय मंदावला आणि पर्याय म्हणून त्यांनी (कदाचित पेशवाईबाहेरील भारतभरातील त्यांचे दीर्घकाळ प्रस्थापित व्यापारी संबंध वापरत) सन १८७२ ला सुगंधी द्रव्यांच्या व्यवसायासाठी "दामोदरदास भगवानदास" या पेढीची सुरुवात केली. या पेढीचा अत्तरे आणि इतर सुगंधी पदार्थांचा व्यवसाय काही काळानंतर पुण्याबाहेर इतर संस्थानांत देखील पसरला आणि इतर बरेच संस्थानिक आणि त्यांतील श्रीमंत माणसे त्यांची अत्तरे वापरू लागली.
ब्रिटिश सत्तेच्या अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील भारतातल्या विस्तारामुळे संस्थानांची आर्थिक आणि सर्वच तऱ्हांची शक्ती कमी होत गेली. या काळातल्या सगळ्याच संस्थानांच्या नाण्यांचे बदलते महत्त्व समजून घेण्यासाठी काही मोठ्या संस्थानांची उदाहरणे पाहू. बऱ्याच संस्थानांची कधी काळी बनत असलेली स्वतःची नाणी त्या संस्थानांचे आर्थिक महत्त्व कमी झाल्यावर त्यांच्या संस्थानातील व्यवहारातही वापरणे बंद होत गेले आणि अशा नाण्यांचे कौतुक फक्त संग्राहकांकरता शिल्लक राहिले.
हैदराबाद (निजाम) संस्थानाची वेगवेगळ्या पद्धतीची चांदीची नाणी इतर संस्थानांपेक्षा बऱ्याच मोठ्या संख्येत आणि लांबच्या काळ अस्तित्वात होती. सगळ्यात पहिला निजाम "असफ जाह (पहिला)" १७२४ साली त्या काळच्या दिल्लीच्या बादशहाच्या वतीने दक्षिण भारतातील कारभार पाहण्यासाठी आल्यापासून ते १९४८ साली हे संस्थान भारतात विलीन होईपर्यंत झालेल्या सात निजामांनी आपल्या शिक्क्याची नाणी आपल्या अखत्यारीतल्या प्रदेशासाठी बनवली. सुरुवातीच्या काळात दिल्लीच्या बादशहाच्या वतीने कारभार पाहणाऱ्या निजामांनी हळूहळू आपले स्वातंत्र्य जाहीर करत, इतर प्रस्थापित राज्यांबरोबर कधी युद्ध जिंकत तर कधी हरत आपले संस्थान अस्तित्वात ठेवले. ब्रिटिशांच्या काळात मात्र ब्रिटिशांनी बाळगायला लावलेल्या फौजांचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी निजामाच्या बऱ्याच मुलखाचे लचके तोडले आणि तरीही शिल्लक राहिलेले हैदराबाद निजाम संस्थान १९४८ साली भारतात विलीन होताना भारतातील सगळ्यात मोठे आणि श्रीमंत संस्थान होते. ब्रिटिशांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करतांना संस्थानांना दिलेल्या भारतात (किंवा पाकिस्तानांत) सामील होणे अथवा स्वतंत्र राहणे या पर्यायांनुसार हैदराबाद/निजाम संस्थानाने स्वतंत्र राहण्याचे केलेले प्रयत्न असफल होऊन १९४८ साली हे संस्थान भारतात विलीन झाले. त्याच्या चलनाची व्याप्ती त्या वेळी एव्हढी मोठी होती की ते १९५९ पर्यंत स्वातंत्र्यपूर्व भारताच्या चलनाच्या बरोबरीने अस्तित्वात होते.
ब्रिटिश सत्तेने संस्थानांना दिलेल्या आर्थिक सवलती आणि त्यांचे स्वतःचे व्यापार आणि व्यवहारातील महत्त्व अशा अनेक दृष्टीने भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या भारतांत विलीन होण्याच्या वेळी ज्या संस्थानांची नाणी देखील महत्त्वाची होती अशी काही संस्थाने आणि त्यांच्या नाण्यांची खासियत :
बडोदा : एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतची नाणी पर्शियन लिपीतल्या छापाची आणि "ग" ("गायकवाड" दर्शवण्यासाठी) आणि छोटी तलवार/कट्यार अशी बडोदा संस्थानची चिन्हे असलेली होती. त्यानंतर महाराजा सयाजी राव (तिसरे) आणि इतर राजे याची छबी असलेली आणि विक्रम संवतात निर्मितीचे साल दाखवणारी नाणी पाडली गेली. या संस्थानाची रुपयांची (चांदीची) नाणी त्यातील चांदीचा कस थोडा जास्त असल्याने ब्रिटिश भारतातील रुपयांपेक्षा किमतीत थोडी वरचढ होती. हा रुपया गुजरातेतील कापूस खरेदीसाठी वापरात येत असल्यामुळे त्याची ब्रिटिश भारतातील रुपयांमधील किंमत कापसाच्या हंगामाप्रमाणे (आणि त्यामुळे या रुपयाच्या मागणीतील बदलाप्रमाणे) कमी जास्त होत असे. रुपयांपेक्षा कमी किमतीची नाणी (चवली, पावली इ.इ./रुपये/आणा /पैसा/पै) चांदी किंवा तांबे अशा विविध धातूची होती.
त्रावणकोर: यांची नाणी १ रुपया = ७ पणम = २८ चक्रम = ४४८ काशु अशा "द्रविडीयन" पद्धतीच्या कोष्टकात असत. नाण्यांवरील कालगणना केरळातील पद्धतीप्रमाणे होती. एक रुपयाचे नाणे पाडले जात नसे पण चांदीची १/२ रुपया आणि १/४ रुपया ही नाणी तसेच १ चक्रम अशी नाणी तसेच तांब्याची १ पणम इत्यादी तऱ्हेची नाणी वापरात असत. रुपयांची चांदीची नाणी किमतीने ब्रिटिश भारतातील रुपयांपेक्षा त्यातील चांदीचा कस आणि आकार लक्षात घेता थोडी कमी होती.
मैसूर: हे भारतातील सगळ्यात जास्त काळ अस्तित्वात असलेले (सुमारे ५५० वर्षे) आणि १८ व्या शतकाची शेवटची तीन दशके सोडल्यास वोडेयार घराण्याकडे असलेले संस्थान होते. १३९९ साली विजयनगर राज्याच्या काळात स्थापन झालेले हे संस्थान १७९९ सालाआधीच्या तीन दशकात हैदर अली आणि त्यानंतर टिपू सुलतान यांच्या अमलाखाली होते. १७९९ साली टिपू सुलतान ब्रिटिशांबरोबरच्या (मराठे आणि निजाम यांच्यासह) लढाईत मारला गेला आणि त्यानंतर ब्रिटिशांनी आधीचे राजे असलेल्या वोडेयार घराण्याकडे पुन्हा आपल्या अटींवर राज्यकारभार सोपवला. या राज्यांचे दिवाण पूर्णय्या, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इ.इ.यांच्या दूरगामी विचारांमुळे विशेषतः विसाव्या शतकात जलविद्युतनिर्मिती तसेच कागद, कापड आणि इतर अनेक पदार्थ बनवण्याचे कारखाने सरकारी उत्तेजनाने सुरू झाले. या राज्यातील चांदीच्या रुपयाला ब्रिटिश भारतातील चांदीच्या रुपयाएवढीच किंमत मिळे. तसेच, कदाचित ब्रिटिशांची मेहरनजर टिकून राहावी म्हणून असेल, पण बऱ्याच आधीपासून या राज्यात ब्रिटिश भारतातील चांदीच्या रुपयाचा (आणि इतर नाण्यांचा) वापर देखील मोठा होता.
जयपूर, ग्वाल्हेर, कच्छ, मेवाड, इंदूर/होळकर, उदयपूर अशी इतरही संस्थाने आपली चांदीची आणि इतर धातूची नाणी पाडत आणि आपापल्या संस्थानात वापरत असत.
|
|
अखंड भारताबाहेरच्या काही भागांचा ब्रिटिश कारभारदेखील एकोणिसाव्या शतकात भारतातून चालवला जात असे. त्यामुळे सध्याच्या पाकिस्तान आणि बांगलादेश या एकेकाळच्या भारताचे भाग असलेल्या देशांखेरीज आफ्रिकेच्या पूर्व भागातील ब्रिटिश वसाहतीत (सध्याचे केनिया, टांझानिया, युगांडा) तसेच दक्षिण/आग्नेय आशियाच्या बऱ्याच भागांत (सध्याचे मलेशिया, सिंगापूर, म्यानमार आणि श्रीलंका हे देश) आणि पश्चिम आशियात (सध्याचे इराक, अमिराती देश, बहारीन, एडन इ.इ.) आर्थिक (करवसुली, सरकारी नोकरीतील लोकांचे पगार) तसेच व्यापारी व्यवहार यासाठी ब्रिटिश भारतातील नाणी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात बरीच वर्षे (वेगवेगळ्या वेळी) वापरली जात. या सगळ्या देशातील टांकसाळी, आर्थिक उलाढालीची यंत्रणा आणि कायदे विकसित होत गेल्यावर ब्रिटिश भारतीय नाणी (मुख्यतः चांदीचे रुपये) वापरणे कमी होत जाऊन थांबले.
चांदीची शुद्धता तपासणे जास्त सोपे असल्यामुळे जेव्हा व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी सध्याच्या काळातल्या सारखी खात्रीशीर प्रणाली उपलब्ध नव्हती तेव्हा विकत घेतलेल्या मालाची किंमत चुकवण्यासाठी चांदीची नाणी इतर कुठल्याही माध्यमापेक्षा जास्त वापरली जात हे आधी आलेच आहे. हीच परिस्थिती जगाच्या इतर भागातही अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात होती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात माल विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांदीच्या नाण्यांचा वापर चालू होता.
युरोपातून समुद्रमार्गाने आशियातील भारत, चीन आणि इतर देशाशी प्रवास जसा सुकर होऊ लागला तसे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ब्रिटिशांना चीनमधील रेशमी कापड, चहा आणि चिनीमातीच्या वस्तू वाढत्या प्रमाणात विकत घ्याव्याशा वाटू लागल्या. त्या वस्तूंच्या बदल्यात चीनला ब्रिटनमध्ये तयार होणाऱ्या कुठल्याच वस्तू नको होत्या. फक्त चांदीच्या नाण्यांत – शक्यतो स्पेन मधील "pieces of eight" ही चांदीची नाणी (ती चोख दर्जाची असल्यामुळे) हा सगळ्यात जास्त पसंतीचा पर्याय – किंमत मिळाली तरच आपल्या वस्तू विकायला चीन तयार होता.
ब्रिटनकडे चांदीच्या नाण्यांच्या किमतीत (वस्तूंच्या अदलाबदलीच्या ऐवजी) विकता येतील इतक्या भरभक्कम उठाव असलेल्या वस्तू विकण्यासाठी नसल्यामुळे चीनबरोबरचा व्यापार वाढवणे तर दूरच पण चालू ठेवणे हे ही ब्रिटनला फार काळ परवडले नसते, कारण ब्रिटनला आपल्या खजिन्यातील चांदीचा साठा कमी होत राहणे फार काळ चालू ठेवता आले नसते.
काही काळ ब्रिटनने चीनबरोबरचा एकतर्फी व्यापार – दुसरा पर्याय सहजपणे तयार होईपर्यंतही असेल – चालू ठेवला. ब्रिटनने दरम्यान आपल्या अमलाखालील भारतात अफूची लागवड करायला लावून, ती अफू भारतात लिलावाने विकण्यासाठी (चीनमध्ये चोरून पाठवून, तेथे चांदीच्या नाण्यांच्या किंमतीने विकण्यासाठी) यंत्रणा तयार केली आणि वाढवली. अशी तस्करी करून चीनमध्ये पाठवलेली अफू विकल्यावर मिळणारी चांदी आता चीनमधील रेशमी कापड, चहा आणि चिनीमातीच्या वस्तू विकत घेण्यासाठी वापरता येऊ लागल्यामुळे जरी ब्रिटिशांचा प्रश्न सुटला तरी त्यामुळे चीनमधील अनेक तरुण आणि त्यांची कुटुंबे अफूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त होऊ लागली. जरी चीनमधील कायद्यानुसार चीनमध्ये अफू आणण्यास बंदी होती तरी ब्रिटिश आणि इतर व्यापारी (जे भारतात "लिलावामध्ये" अफू विकत घेत) अनेक "मार्गाने" चीनच्या कायद्यातील पळवाटा शोधून किंवा चिनी अधिकाऱ्यांचे हात ओले करून आपला "व्यापार" चालू ठेवत. जेव्हा १८३९ साली चीनने "ग्वाङ्गजो" (Guangzhou किंवा जुने Canton) इथल्या ब्रिटिश आणि इतरांच्या वखारींवर धाडी घालून जप्तीत हाती लागलेली सुमारे १४ लाख किलोग्राम अफू जाळून टाकली तेव्हा संतापलेल्या ब्रिटनने आपल्या युद्धनौका चीनच्या अंतर्भागात पाठवून चीनच्या सम्राटाला नमवले आणि बऱ्याच सवलती आणि हाँगकाँगमध्ये आपली वसाहत स्थापन करण्याची परवानगी मिळवली. त्यानंतर ब्रिटनला सोयीस्कर तऱ्हेने व्यापार करणे (म्हणजे चांदीवाचून अडून राहावे न लागता चीनला अफू विकून त्या बदल्यात हव्या त्या चिनी वस्तू राजरोस खरेदी करत राहणे) चालू ठेवता आला.
हा सगळा इतिहास इथे देण्याचे कारण म्हणजे, जोपर्यंत ब्रिटिशांना फक्त चांदीच्या नाण्यांत किंमत देण्यास चीन भाग पाडू शकला (सुमारे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत) तोपर्यंत चीनला ब्रिटनकडून सुमारे २४,००० किलोग्रॅम चांदीची नाणी – म्हणजे आताच्या भावात सुमारे (अमेरिकन) ५१०० कोटी डॉलर अशी अवाढव्य रक्कम – मिळवता आली.
रुपयाबद्दल एवढं सगळं सांगितल्यानंतर लेखनसीमा गाठण्याआधी रुपयाची महती एका हिंदी चित्रपटातून उसन्या घेतलेल्या एकदम रोखठोक शब्दांत
ना बीवी ना बच्चा, ना बाप बडा ना मैय्या
द होल थिंग इस दॅट, के भैय्या सबसे बडा रुपैय्या
जाता जाता: इथे माहिती दिलेल्या भारतातल्या जुन्या काळातल्या चांदीच्या किमती नाण्यांखेरीज इतर प्रकारची "भोकाचा पैसा" (१/६४ रुपया), "पै" (१/३ पैसा), "ढबू पैसा" (१/६४ रुपया) , "आणेली" (१/१६ रुपया किंवा चार पैसे ), "चवली" (१/८ रुपया किंवा २ आणे), "पावली" (१/४ रुपया किंवा चार आणे), "अधेली" (१/२ रुपया किंवा आठ आणे ) अशी "चिल्लर" नाणी, माझ्या लहानपणी मी स्वतः रोजच्या व्यवहारात वापरली आहेत. ही "रुपये, आणे, पैसे" चलन पद्धती १ एप्रिल १९५७ नंतर रद्द होऊन दशमान पद्धतीची नाणी भारतात वापरात आली. प्राथमिक शाळेतील गणितात या नाण्यांवर आधारलेली "१ रुपया = १६ आणे = चार पावल्या ; १ आणा = ४ पैसे = १/४ पावली" अशा सारखी जीवनोपयोगी कोष्टके तर शिकलोच पण "रेघी पद्धत" आणि त्यातून ओघानेच येणारी "Place Value of Numbers" ही संकल्पना अप्रत्यक्षपणे समजली.
आणखी जाता जाता: लेखाचे शीर्षक प्रभात चित्रपट कंपनीच्या एका गाजलेल्या चित्रपटातील एका श्रवणीय गीतावर बेतलेले आहे. कोणता चित्रपट आणि कोणते गीत याबद्दल काही तर्क?