तुमचे सफरचंद आणि डॉक्टरची रोजीरोटी!

जगभरातील लोकपरंपरांमध्ये म्हणी आणि वाक्प्रचार या महत्त्वाच्या भाषिक परंपरा आहेत. अनुभवजन्य पारंपरिक ज्ञानाचे एकवटलेले गोळीबंद रूप म्हणजे म्हण. अशा अनेक म्हणी लहानपणापासून आपल्या कानांवर पडत राहतात आणि त्या आपल्या दैनंदिन भाषेचा अविभाज्य भाग बनतात. अनेक म्हणींमधून नीतिबोधक संदेश दिलेला असतो. एकंदरीत ते समाजाचे परंपरेने आलेले शहाणपण असते. काही आरोग्यविषयक म्हणींमधून जीवनशैलीसंबंधी सामान्य सल्लेही दिलेले असतात. भौगोलिक परिस्थितीनुसार जगाच्या विविध प्रांतांत अनेक आरोग्यविषयक म्हणी आकाराला आल्या आहेत. त्यांपैकीच इंग्रजी भाषेतील एक सुप्रसिद्ध, किंबहुना अतिप्रसिद्ध म्हण – An apple a day keeps the doctor away.
मुख्यतः आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत पिकणारी सफरचंदे आता जवळजवळ जगभर उपलब्ध आहेत. तसेच अब्जावधी लोक कुठल्या ना कुठल्या स्वरूपात इंग्रजी भाषेचा व्यवहारात वापर करतात. अशा लोकांमध्ये जेव्हा केव्हा सफरचंद खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा नकळतपणे वरील म्हण संभाषणात येते. त्या म्हणीचा विचार करता करता आपण स्मितवदनाने सहजपणे सफरचंदाच्या फोडी गट्टम करतो. ही म्हण लेखी स्वरूपात यूकेच्या वेल्स प्रांतात सुमारे १६० वर्षांपूर्वी उगम पावल्याचे दिसते. तेव्हापासून एखाद्या आरोग्यमंत्राप्रमाणे तिचा जगभर झालेला व्यापक सांस्कृतिक प्रवास वाखाणण्याजोगा आहे. खरं तर नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये, असे म्हणतात; आपण या लोकप्रिय म्हणीच्या मुळाशी आणि कुळाशीही जाणार आहोत. या म्हणीवर भाषा आणि आरोग्य अशा दोन्ही दृष्टिकोणांतून प्रकाशझोत टाकण्यासाठीच हा लेख.
जन्मकथा
एखाद्या म्हणीचा मौखिक उगमकाळ निश्चितपणे सांगणे तसे कठीणच. परंतु या म्हणीचा पहिला लिखित पुरावा सन १८६६मध्ये वेल्समधील पेम्ब्रोकशर परगण्यात प्रसिद्ध झालेल्या 'Notes and Queries' या साहित्य नियतकालिकात आढळतो. सध्या प्रचलित असलेली वरील छोटी म्हण मुळात तिथे अधिक विस्तारित, काव्यमय रूपात अशी आहे:
'Eat an apple on going to bed, and you'll keep the doctor from earning his bread.'
कालौघात तिचे वरील सुटसुटीत झालेले रूप १९१३मधील एलिझाबेथ मेरी राइट यांच्या 'Rustic Speech and Folk-Lore' या लेखनात प्रथम आढळते. तिथून पुढे हे लघुरूपच स्थानिक इंग्रजी भाषिक समाजात रूढ झाले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेतील शेतीविषयक लेखनात या म्हणीचा व्यापक वापर केलेला आढळतो. तेव्हा वॉशिंग्टन आणि न्यू यॉर्क राज्यांमध्ये सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर व्हायचे, आणि तेथील शेतकरी संघटनांनी तर या म्हणीचा अगदी प्रचारमोहिमेसारखा वापर सुरू केला. मग सफरचंदाचे दैनंदिन आहारातील महत्त्व बळकट करण्यासाठी ही म्हण बालवाडीतील बडबडगीते, पालकांसाठीच्या आहारमार्गदर्शक पुस्तिका, सामाजिक आरोग्यविषयक भित्तिपत्रके आणि शाळांमधील पोषण कार्यक्रम यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली. मूळ पूर्ण रूपातल्या म्हणीतले bed आणि bread, तर लघुरूपातील day आणि away ही यमके सुरेख जमलेली आहेत. त्यामुळेच तिचा नादमय उच्चार कानांना सुखावतो. अशी म्हण पिढ्यान्पिढ्या लोकप्रिय राहणार, यात नवल ते कोणते?
वैद्यकीय तथ्य
आता वैद्यकीय दृष्टिकोणातून या म्हणीच्या अंतरंगात डोकावू. कुठलाही सुजाण माणूस या म्हणीचा शब्दशः अर्थ घेणार नाही, हे तर उघड आहे. तिचा मथितार्थ महत्त्वाचा.
उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन समतोल आहार हवाच, आणि आहारात फळांचे महत्त्व निर्विवाद. एखाद्या प्रांतात जर सफरचंदे मुबलक पिकत असतील, तर त्यांचे नियमित सेवन करावे हा सल्लादेखील नैसर्गिकच. म्हणून सफरचंदावरील या पारंपरिक म्हणीचे आधुनिक आहारशास्त्राच्या दृष्टिकोणातूनसुद्धा अंशतः समर्थन करता येते. ते कसे, ते आता पाहू. सफरचंदातील महत्त्वाच्या रासायनिक घटक पुढीलप्रमाणे :
- पेक्टिन (fiber)
- फायटोकेमिकल (quercetin, catechin, chlorogenic acid, anthocyanin)
- क जीवनसत्त्व
या घटकांचे आरोग्यविषयक महत्त्व बघू. पेक्टिन हा चोथ्याचा एक प्रकार असून त्याच्या सेवनामुळे शौचक्रिया सुलभ होते, तसेच काही अंशी रक्तातील घातक LDL कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाते.
फायटोकेमिकल या रसायनांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म चांगल्यापैकी असून त्यामुळे पेशींमध्ये सतत निर्माण होणारी काही घातक रसायने नष्ट केली जातात. जर ही रसायने शरीरात अतिरिक्त प्रमाणात साठत राहिली, तर त्यांतून अनेक दीर्घकालीन आजारांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते. अशा आजारांमध्ये मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यांचा समावेश आहे. म्हणून अँटिऑक्सिडंट गुणधर्म असणारे विविध खाद्यपदार्थ काही अंशी या रोगप्रतिबंधाचे काम करत असतात. क जीवनसत्त्वातसुद्धा अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतो;, शरीरपेशींना बळकट करण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असतो. सफरचंदे काही काळ साठवली असता phytochemicalsच्या प्रमाणावर परिणाम होत नाही; परंतु प्रक्रिया केलेल्या सफरचंदांमध्ये (रस इत्यादी) मात्र त्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होते.
यावरून सफरचंदाचे विशिष्ट, पण मर्यादित आरोग्यविषयक महत्त्व लक्षात येईल. प्रस्तुत म्हणीचा जनमानसावरील पगडा मात्र जबरदस्त आहे. चालू शतकातील वैद्यकीय संशोधनाची गगनभरारी बघताही या म्हणीने आधुनिक रूप धारण न करता आपला पारंपरिक अवतारच टिकवून ठेवलेला आहे. तिचे पडसाद वैद्यकीय संशोधनविश्वातही अधूनमधून उमटतात. त्यातूनच काही वैज्ञानिकांनी, ही लोकप्रिय म्हण दैनंदिन सामान्य आजारांच्या बाबतीत आधुनिक वैद्यकाच्या कसोटीवर कितपत टिकते, ते पाहायचे ठरवले. यासाठी २०१४मध्ये अमेरिकेत या विषयावर एक मोठे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सुमारे १६,००० निरोगी प्रौढांची निवड करून त्यांचे दोन समसमान गट करण्यात आले. एक गट दररोज १५० ग्रॅम वजनाचे एक सफरचंद खाणाऱ्यांचा होता, तर दुसरा (अर्थातच) हे फळ न खाणाऱ्यांचा. आता या दोन गटांपैकी कुठल्या गटातील लोक वर्षभरात डॉक्टरची पायरी कमीअधिक प्रमाणात चढतात (की नाही), ते पाहण्यात आले. वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा डॉक्टरकडे जावे लागणे (अथवा न लागणे) हा त्यातील महत्त्वाचा निकष होता. याव्यतिरिक्त डॉक्टरांनी औषधे लिहून दिली अथवा नाही, आणि रुग्णालयात भरती करावे लागले की नाही, या गोष्टीही तपासण्यात आल्या. अभ्यासांती असे आढळले, की रोज सफरचंद खाणाऱ्या लोकांमध्ये 'प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन्स' लागण्याचे प्रमाण दुसऱ्या गटापेक्षा किंचितसे कमी होते. संख्याशास्त्रीय निकषांवर बघता, सफरचंद खाण्याचा रोगप्रतिबंधाशी असलेला संबंध दखलपात्र (significant) नाही, असेच दिसले. तसेच सफरचंद खाणाऱ्या गटातील लोक बहुतांशी उच्चशिक्षित आणि चांगल्या आरोग्यविषयक सवयी असणारे होते (healthy user effect).
आरोग्यरक्षणासाठी समतोल आहाराचे महत्त्व निर्विवाद आहे. त्या दृष्टिकोणातून आहारात फळे व कच्च्या भाज्यांचे प्रमाण भरपूर असावे, हे बरोबर. या संदर्भातील अनेक संशोधनांचे महाविश्लेषण केले असता एक गोष्ट स्पष्ट होते: आहारात नित्यनेमाने फळे आणि भाज्यांचे प्रमाण चांगल्यापैकी ठेवल्यास हृदयविकार, कर्करोग आणि विविध रोगांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण सर्वसाधारणपणे कमी राहते. म्हणून सफरचंदाच्या या म्हणीकडे शब्दशः न पाहता व्यापक दृष्टीने पाहिलेले बरे. अर्थात, ताजी फळे आणि कच्च्या कोशिंबिरींचे नियमित सेवन आरोग्यपूर्ण आहेच. सफरचंदाबरोबरच पेरू, पेअर, डाळिंब, रास्पबेरी, आव्होकाडो इत्यादी फळांमध्ये चोथ्याचे प्रमाण चांगले असते. आणखी एक मुद्दा : वरील सर्व दीर्घकालीन आजारांच्या कारणमीमांसेत आहाराखेरीज अन्य अनेक घटकांचाही वाटा असतो.
म्हणीचे विडंबन
एखादी म्हण, वाक्प्रचार अथवा वचन कमालीचे लोकप्रिय होते, तेव्हा कालांतराने तो विडंबनाचाही विषय होतो. उठसूट कुठल्याही गोष्टीचे विडंबन सहजासहजी होत नसते; ते होण्यासाठीदेखील मूळ गोष्ट आकर्षक वा दमदार असावी लागते. म्हणूनच या नादमय म्हणीची काही विडंबनेदेखील तितकीच लोकप्रिय ठरली आहेत.
सफरचंद हे कसे गुटगुटीत आणि एकंदरीत प्रसन्न वाटायला लावणारे फळ. ते आवडत नाही असे म्हणणारी व्यक्ती विरळाच. दिवसात कधीही खाण्याजोगे आणि प्रवासात वेळप्रसंगी भूक भागवणारे असे ते फळ आहे. याउलट कांदा व लसूण यांची गोष्ट पाहा. एखादा पदार्थ चवदार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे हे खरे; त्यांच्यातदेखील औषधी गुणधर्म आहेत हेसुद्धा खरे. परंतु त्यांच्या कच्च्या अवस्थेतला उग्र वास हा तसा तापदायक आहे. तो काही जणांना आवडत नाही व असह्य होतो. आपण जर कच्चा कांदा अथवा लसूण खाल्लेला नसेल, आणि त्या वेळी यांपैकी काही खाल्लेला माणूस जर आपल्या निकट संपर्कात आला, तर तो वास आपल्याला अगदी नकोसा वाटतो. याला अनुसरूनच तयार झालेले मूळ म्हणीचे हे विडंबन:
An onion (or garlic) a day keeps everyone away'
आजारांपासून दूर राहण्यासाठी आपले मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे. त्या दृष्टिकोणातून तयार झालेले हे अजून एक विडंबन:
A laugh a day keeps the doctor away.
सत्य आणि मिथक यांच्या सीमारेषेवर असलेली आपली सफरचंदी म्हण अधूनमधून डॉक्टरांच्या समूहांतदेखील गप्पांमध्ये येते. मग डॉक्टरांना लोकांपासून दूर लोटणाऱ्या या म्हणीला उद्देशून डॉक्टरांनाही कधीकधी उत्तर द्यावेसे वाटते. डॉक्टरांच्या मोकळ्याढाकळ्या गप्पांमधूनच या म्हणीच्या अजून एका विडंबनाने जन्म घेतला आहे. मूळ म्हणीत अजून एका वाक्याची भर घालून काय तयार झाले आहे, ते पाहणे रंजक आहे:
An apple a day keeps the doctor away. But, If the doctor is beautiful, keep the apple away!
संगणकयुगात अनेक नवनव्या विडंबनांची यात नेहमीच भर पडत राहील, यात शंका नाही. वाचकांच्या भात्यात अशा काही आधुनिक म्हणी असल्यास त्या वाचण्यास उत्सुक!
तर, अशी ही सफरचंद आणि आरोग्य यांची सांगड घालणारी, जागतिक किर्ती लाभलेली काव्यमय म्हण. चालू दशकातदेखील तिचा वापर कुटुंबाखेरीज विविध आहारविषयक जाहिराती आणि सामाजिक आरोग्यमोहिमांमधून केला जातो आहे. तिच्या विधानातले मर्यादित तथ्य आणि व्यापारी लाभासाठी चतुराईने केलेला तिचा वापर, या विवेचनावरून लक्षात यावा. त्याचबरोबर, रोगांवरील उपचारांपेक्षा त्यांचा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी समतोल आहार ही पहिली पायरी आहे, हे त्या म्हणीतून ध्वनित होणारे आरोग्यतत्त्व त्रिकालाबाधित सत्य असेल.