Skip to main content

प्रत्युत्पन्नमतीचा पाहुणचार

2 minutes

आन्हिकं आटपून खरेदीसाठी बाहेर पडलो तर दुकानात प्रत्युत्पन्नमती भेटला.

"काय प्रत्युत्पन्नमती, आज सकाळीसकाळी?" मी पृच्छा केली.

"काय सांगू?" प्रत्युत्पन्नमती खेदपूर्वक मान हलवत म्हणाला, "दोन मोती गळले."

"गळले नाही, गळाले. आणि तुझा खेद समजू शकतो, पण दोनशेपासष्ठ वर्षे झाली त्या घटनेला."

"मी बखर उद्धृत करत नव्हतो! ऑनलाईन मागवलेले दोन नग मोती साबण गळले. म्हणजे गले या शब्दाचा अनुवाद. ज्यादा चले, बहुत कम गले असं व्हायला हवं. पण हे एका दिवसातच गले."

"हिंदीचा प्रभाव अंमळ जास्तच पडतोय बरं का मित्रा" असं मी म्हणणार होतो, पण मूग गिळून गप्प बसलो. उद्या या वाक्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराला मुकायला नको!

प्रत्युत्पन्नमती बोलतच होता, "मला वाटतं हे खरे मोती साबण नसतील. कल्चर्ड मोती साबण असतील. असो. आता खरा मोती साबण दुकानातून घेतो आणि अभ्यंगस्नान करतो."

"आणि उटणं?"

"तेदेखील ऑनलाईन मागवलं होतं. पण लव्हेंडरच्या सुवासाचं आलं. आता खरमरीत रिव्हयू लिहून त्यांचं उटणं - आपलं, उट्टं - फेडतो."

प्रत्युत्पन्नमतीला शांत करणं क्रमप्राप्त होतं. आपल्या ट्रकवरचा वाहक रागावलेला असावा असं कोणत्या चालकाला वाटेल? प्रत्युत्पन्नमती हा हीनो इंजिन नसल्यामुळे त्याला रूपकात्मक पाणी द्यायला प्रत्यवाय नसावा, असा विचार माझ्या लंबमज्जेत आला.

"एक काम कर. तयारी करून फराळाला माझ्या घरी ये. मी स्वहस्ते बनवलंय सगळं!"

प्रत्युत्पन्नमती तयार झाला, आणि मी तयारी करण्यासाठी लगबगीने घरी परतलो.

तासाभराने प्रत्युत्पन्नमती आला. पाणी, गुळाचा खडा, आणि माठातले थंडगार धारोष्ण दूध, हे देऊन त्याचे स्वागत केले. आणि मग मेजावर मेजवानीचा जामानिमा केला.

विविध दिवाळी अंकांचा आस्वाद घेत, जाहिरातींची संख्या मोजत, काव्यशास्त्रविनोदाबद्दल चर्चा करत, मानधनाबद्दलचे अदमास बांधत, अंकांतल्या गोष्टी सोशल मिडियावर शोधत, समय कसा गेला हे कळलंच नाही.

आणि अचानक मला आठवलं. "कुळवंताचा लेक आज मी, विसरून गेलो रीतरिवाज" अशा लकेरी घेत मी स्वयंपाकघरात गेलो, प्लेट्स भरून घेऊन आलो, आणि प्रत्युत्पन्नमतीला म्हणालो, "ही घे - चिद्घनचपलची चिवडाचकली!"

Node read time
2 minutes